Wednesday, 8 November 2017

चित्रांची भाषा...

चित्रांची भाषा... 
आज सकाळी सई ने एक सुंदर चित्र मला पाठवलं. चित्र हा तिचा आवडता टाईमपास. फावला वेळ मिळाला कि कुंचले आणि रंग घेऊन बाईसाहेब रंगकामात डूबलेल्या असतात. चित्र किती सुंदर काढता येते ह्या पेक्षा ती जी काही तिच्या मनाने काढते ते खरे तर मला जास्ती आनंद देते. कोणीतरी चांगल बोलाव किंवा कोणत्यातरी स्पर्धेत मेडल मिळाव म्हणून चित्राच्या मागे लागण मला पटत नाही किंबहुना आम्हा दोघांना हि.
आजच चित्र जरा खासच. तिच्या रंगकामापेक्षा मला काही आवडल असेल तर चित्रातून काय जाणवलं ते सांगण्याचा प्रयत्न. हे चित्र तिने तिच्या मनाने काढल. चित्राचा विषय ते रंगकाम सगळ तिने कोणाला न विचारता केल. त्या चित्रातल्या मला जाणवलेल्या गोष्टी खूप काही आहेत. समुद्राच्या किनारी आपण पिकनिक ला आलो आहोत. मस्त समुद्र दाखवताना तिने मागे डोंगर पण दाखवले आहते. पण त्यात एक वेगळा भाग म्हणजे त्याची शिखर. डिस्कवरी वर नेहमी बघताना डोंगराची शिखर हिमच्छादित असतात हे तिच्या निष्णात नजरेतून सुटल नाही. तेच तिने चित्रात पण दाखवल आहे. दोन नारळाच्या झाडांखाली चटई टाकून निसर्गाचा आस्वाद घेताना तिने घरच्यांना दाखवल आहे. त्यातही एक गोष्ट म्हणजे चटई च्या चारी बाजूने एक एक जण बसला आहे. मुख्य चटई वर खायच समान आहे. तर खेळण्याच साहित्य आणि उरलेल्या वस्तू आजूबाजूच्या वाळूत आहेत.
मला हे खूप आवडल कि इतक्या बारकाईने तिने समुद्रावरच्या गोष्टीच निरीक्षण केल आहे. दोन नारळांची झाड दाखवताना एक झाड तिने झुकलेल दाखवल आहे. त्याच्या मागे सूर्य लपलेला दाखवला आहे. जणू काही त्या झाडांच्या आडोश्याचा आधार घेऊन जेवणाची जागा निवडली आहे. वाळू दाखवताना पण त्याचे डोंगर अस दाखवल आहे. समुद्राच्या वाळूत जागोजागी दिसणारे खेकडे आणि कासव पण तिने दाखवल आहे. हा सगळा नक्कीच डिस्कवरी च्यानेल बघण्याचा परिणाम अस मला तरी वाटते. कारण एकंदरीत मुंबईच्या किंवा भारताच्या बीचेस वर तिने अस कधी बघितल नसेल. अपवाद एकच कि मॉरीशस चा बीच लक्षात असेल तिच्या कदाचित पण ती शक्यता मला कमीच वाटते. समुद्राच्या पाण्यात एक ओक्टोपस आणि दोन डॉल्फिन पाण्यातून उड्या मारताना दिसतात. मला हे खूप महत्वाच वाटल कारण ऑक्टोपस हा नेहमी एकटा असतो तर डॉल्फिन नेहमी ग्रुप मध्ये असतात. होड्या दाखवताना पण कमालीच निरीक्षण आहे. एक होडी पाण्यात दाखवताना तीच शिड उघडलेल आहे. म्हणजे वाऱ्यावर ती होडी पुढे जाते आहे तर वाळूत असलेल्या होड्यांच शिड मात्र बंद दाखवल आहे.
एका चित्रातून इतकी सगळी निरीक्षण तिने दाखवली आहेत. मला त्याचा खूप आनंद झाला. निरागस मन हीच असतात न जे कोणाला आवडेल म्हणून नाही तर आपल्याला काय आवडल आणि समजल ते अगदी कसला हि विचार न करता उत्स्फूर्तपणे व्यक्त करतात. रंग, रेषा आणि विषय ह्या पलीकडे आपल्या मनातल्या गोष्टी अश्या चित्रांच्या माध्यमातून आपल मुल व्यक्त करत असते तेव्हा आपण सो कॉल समजंस पालक त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो का? कि कासव मोठा काढला, समुद्रावर कधी बर्फाचे डोंगर असतात का? इतके खेकडे थोडीच असतात. सूर्य असा थोडीच असतो किंवा कासव हिरव कधी असते? होड्या अश्या असतात का? किंवा कोणता रंग कुठे द्यायचा हे पण तुला कळत नाही का? अस म्हणून त्या निरागस मनांनी व्यक्त केलेल्या संवेदनांना आपण आपल्या समंजस पणाने चिरडून टाकतो.
रंग, रेषा ह्या नंतर येतात. माझ्या दृष्ट्रीने पहिली असते ती भाषा. कला समजून घ्यायला रंगांपलीकडे आपली विचार क्षमता असावी लागते. अर्थात ती किती जणांकडे असते हा संशोधनाचा भाग. माझी मुलगी म्हणून नाही पण कोणाचहि लहान मुल एक उच्च प्रतिभा घेऊन असते. फक्त ती जाणून घ्यायची आपली प्रगल्भता हवी. सई च्या आजच्या चित्राने मला खूप काही शिकवलं तिच्याबद्दल. तिची निरीक्षण क्षमता आणि कल्पना अविष्कार खरच माझ्यापेक्षा जास्ती प्रगल्भ आहे अस मला वाटल. कारण चित्र काढताना आजही चित्राच्या भाषेचा मी इतका अभ्यास केला नसता जितका तिने केला. आपल्या मुलांना साच्यात बसवयच्या आधी आपल्या मुलाचा साचा समजून घेण हेच प्रगल्भ पालकत्व असते नाही का? चित्रांची भाषा समजून घेण त्यातली एक पायरी.

No comments:

Post a Comment