माकडाच कोलीत...
लहानपणी रोज रात्री ७:३० च्या बातम्या बघणे हा माझ्या आयुष्यातील एक भाग होता. कारण पूर्ण दिवसात कुठे काय झाल निदान महाराष्ट्राच्या बाबतीत जाणून घ्यायला तीच वेळ असायची. हळूहळू उपग्रह क्रांतीमुळे २४ तास टी व्ही बघण्याची सोय उपलब्ध झाली आणि बातम्या पण २४ तास झळकू लागल्या. १-२ बातम्यांचे च्यानेल होते तोवर ठीक होत. बातम्यांच्या मध्ये एक सुसूत्रता होती. पण हळूहळू जशी स्पर्धा वाढली तसतसा टी.आर.पी. राखण्यासाठी काय वाट्टेल ते करून पहिला मी अस करण्याची अहमहमिका सुरु झाली. फेसबुक, व्हात्स अप, ट्विटर च्या उत्क्रांतीमुळे प्रत्येक नागरिकाला आपल्याला काय वाटल ते सांगण्याची तसेच आपल्या सोबत झालेल्या घटना किंवा आपल्या भागात झालेल्या घटनांची माहिती इतरांना देण्यासाठी एक माध्यम मिळाल.
माणूस हा माकडापासून उत्क्रांती झालेला प्राणी आहे हे पुन्हा एकदा ह्या माध्यमांच्या उत्क्रांतीमुळे दिसून आल. घरबसल्या किंवा जिकडे असू तिकडे काय वाट्टेल ते पूर्ण जगाला सांगण्याच माध्यम आपल्या बोटावर मिळाल्यावर आणखी काय हव होत. माकडाला जस हातात कोलीत मिळाल कि सगळीकडे आनंदात तो आग लावत फिरतो. त्यामुळे होणाऱ्या परिणामांची चिंता न करता फक्त आणि फक्त समोर दिसेल ते पेटवून देण्याची अहमिका त्याला दिसत असते. माणूस ह्याहून वेगळ काय वागतो. आपल्या समोर आलेल्या बातमीला कधी एकदा १०-५० ग्रुप मध्ये आणि २००-५०० मित्र मैत्रीणीना सांगतो अशीच त्याची अवस्था असते. मला बातमी मिळाली म्हणजे ती सगळ्यांना सर्वात आधी सांगितल तर होणारा आनंद कोणाला नको असतो? पण खरच ह्या नंबर च कोणाला काही पडलेल असते का? नक्की उताविळपणा करून बातमी पोचवताना आपण किती ठिकाणी आग लावतो ह्याचा विचार तरी आपण करतो का?
मला मिळालेली कोणतीही बातमी किंवा माहिती खरी का खोटी ह्याची शहानिशा करण्याच तंत्रज्ञान पण हाताच्या बोटांवर उपलब्ध असताना किती जण ती करण्याची तसदी घेतात. Forwarded as Received म्हणत माझी जबाबदारी संपली असच आपण सूचित करतो. पण खरीच अशी जबाबदारी संपते का? आपल्या शिक्षणाने, अनुभवांनी, वयाने किंवा विचारांनी आपण प्रगल्भ असू तर ह्या प्रगल्भपणाचा वापर आपण करतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. तो किंवा ती तशी वागली म्हणजे एखादी बातमी आपल्याला न बघता पाठवली तर आपण पण तेच करणार का? कोणीही माती खाल्ली तर आपण पण खाणार कारण ती जबाबदारी माझी कुठे कारण मी तर Forwarded as Received केल नाही का?
एखाद्या दुर्घटनेची बातमी असो, नैसर्गिक प्रलयाची बातमी असो वा आपल्या घराशी, गल्ली शी , शहराशी किंवा देशाशी संबंधित बातमी असो. आपण एकदा ती पुन्हा तपासण्याची तसदी घेतो का? कोणाच तरी नाव लिहून आलेला सुविचार, लेख, विचार, किंवा घोषणा प्रत्यक्ष त्या माणसाने केली आहे का? हे तपासून बघतो का? अनेक संस्थाच्या, अनेक व्यक्तींच्या नावाने आपल्याला आलेले मेसेज पुढे ढकलताना खरच असा काही आहे का? ह्याची शहनिशा न करता पुढे पाठवतो तेव्हा आपण आपली जबाबदारी टाळतो अस वाटत नाही का? एक सेकंद असा विचार करा तुम्ही ती व्यक्ती असाल? किंवा तुम्ही किंवा तुमच जिवलग कोणीतरी त्याच वेळी त्या भागात असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे त्या बातमीशी निगडीत असाल तर होणारा मनस्ताप किती असेल ह्याची एकदा नक्कीच कल्पना करा.
आपण जिकडे बातमी पाठवतो त्या ग्रुप मध्ये कोणता वयोवर्ग आहे ह्याच हि भान ठेवायला हव. चित्रविचित्र अपघातांचे फोटो, सेक्सी किंवा प्रौढ अर्थ असणारे मेसेज किंवा कोणताही मेसेज पाठताना २ मिनिट थांबून आपण कोणाकोणाला तो पाठवत आहोत ह्याचा विचार आपण करायला हवा. कळतनकळत आपण कुठेतरी कोणाच्या मनावर वाईट संस्कार ते कोणाच्या मनात घृणा आणि कोणाच मानसिक स्वास्थ बिघडवत आहोत हे पण लक्षात घ्यायला हव. हि जबाबदारी फक्त सॉरी म्हणून टाळता येत नाही. काय मोठा फरक पडणार असतो कि आपण ५ मिनिट आलेल्या बातमीच आकलन करून पुढे पाठवली तर. जास्तीत जास्त काय तर आपण कोणाच्यातरी नंतर सांगू. पण आपण योग्य ती बातमी सांगतो हा विश्वास निर्माण होण जास्ती गरजेच असते ह्या पेक्षा कि आपण पहिली बातमी सांगतो.
सर्वाना कळाव हा हेतू उद्दात असला तरी कोणत्या प्रकारची माहिती कश्या पद्धतीने आपण देत आहोत ह्याचा विचार आपण करायला हवा. ती जबाबदारी प्रत्येकाची आहे. आधी मी आधी मी करत आपण आपल्या स्व ला तर खुश करू पण ते करताना आपण निर्माण केलेल्या चुकांची किंवा पाठीशी घातलेल्या एखाद्या गोष्टीची जबाबदारी पण आपलीच असते हे सर्वानीच ध्यानात ठेवायला हव. माहिती तंत्रज्ञान च्या ह्या युगात आपण क्षणात जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो. आपण क्षणात हजारो, लाखो, अब्जोवधी लोकांपर्यंत पोहचू शकतो. हि ह्या तंत्रज्ञानाची जशी ताकद आहे तशी आपल्या वाढलेल्या जबाबदारीची हि. एक साध १०० लोकांसमोर बोलायचं असेल तर आपण किती तयारी करतो. प्रत्येक शब्द, उच्चार सगळ तपासून बघतो. त्याच एक अनामिक दडपण आपल्यावर असते मग आपण पुढे केलेली माहिती क्षणात अब्जोवधी लोकांपर्यत जर जात असेल तर आपल्याला त्याच किती दडपण त्याहीपेक्षा जबाबदारीची जाणीव असायला हवी.
माहिती तंत्रज्ञान जरी माणसाच्या आयुष्याच अविभाज्य अंग आता झाल असल तरी त्यायोगे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि जबाबदारीसाठी पण आपण स्वतःला तयार करायला हव. हे करण्यासाठी जास्ती काही लागत नाही. आपला माकड न बनू देण आपल्या हातात आहे. आपण जर स्वतःला सुशिक्षित, प्रगल्भ, उत्क्रांती झालेला माणूस मानत असू तर माणसाचे गुण वापरण हेच आपल्या माणूसपणाच लक्षण आहे. अन्यथा माकड सगळ्यांना बनता येत. आपण ठरवायचं आपल कोलीत आपण माणूस बनून पुढे न्यायचं कि माकड बनून.
No comments:
Post a Comment