Wednesday, 8 November 2017

उत्तरार्धातल प्रेम...

उत्तरार्धातल प्रेम... 
ऐन तारुण्यात प्रेमाचा बहर सगळ्यांच्या आयुष्यात येतो. तारुण्याचे बदल होत असताना मनाच्या कोवळ्या पाकळ्यांवर जेव्हा प्रेमाची फुल फुलतात तेव्हा आपण सर्वात आनंदी असतो. हा बहर कधी लग्नात बांधला जातो तर कधी तसाच अव्यक्त रहातो. लग्न ह्या सामाजिक बंधनात बांधून घेतल कि पुन्हा ह्या विचारांचा विचार करायचा नाही अश्या एका नियमात आपण स्वतःला बांधून घेतो. जो आला किंवा जी आली तिच्या प्रेमात आयुष्य घालवणे हे कितीही खर असल तरी अश्या किती जोड्या मिळतात हा मोठा प्रश्न आहे.
कितीही कोन जुळले तरी त्यात फटी राहतातच. अश्या फटीत बसणार कोणी आयुष्याच्या उत्तरार्धात येत तेव्हा ते स्वीकाराव कि नाही ह्याच द्वंद मनात सुरु होत. एकच व्यक्ती सर्व पातळ्यांवर पूर्ण पडत नसताना ती जागा अनाहृतपणे व्यापणार अस कोणी असेल तर त्या मनाला पुन्हा बहर येतोच. अर्थात तारुण्यात आलेला बहर आणि आताचा बहर ह्यात खूप फरक असतो. त्या काळात अनेक गोष्टी नवीन असतात. शारीरिक पातळीवर, भावनिक पातळीवर त्यामुळे त्याच आकर्षण खूप असते. पण आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाने सगळ अनुभवलेलं असते किंबहुना त्यातून तो तालावून सुखावून बाहेर पडलेला असतो. फक्त प्रश्न निर्माण होतात ते आपण जर त्या प्रेमाला तारुण्याच्या बहराप्रमाणे घेतल तर.
वयाने विचारांची प्रगल्भता वाढतेच अस नाही. पण निदान अनुभवाने आपण समृद्ध नक्कीच होतो. त्यामुळे ह्या गोष्टींकडे कस बघायचं हे अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला जमायला हव पण तस होत नाही. अस कोणी मनात आवडल, त्याच्या किंवा तिच्या विषयी अस वाटू लागल तर एकतर आपण अस काहीच नाही अस म्हणून ते सोडून देतो कारण आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्याला अजून एक नवीन अडचण नको असते. प्रेम होण किंवा वाटण ह्यात चुकीच काहीच नाही कारण ती एक भावना आहे. पण त्या भावनेला मूर्त स्वरूप आपण कसे देतो ह्यावर त्यातून देव निर्माण होतो कि दानव हे ठरलेल असते.
आपल्याला वाटणाऱ्या भावना ह्या नक्की कोणत्या आहेत हे शोधण म्हणजे पहिली पायरी. कारण ह्या टप्यावर जेव्हा सगळ समोर असताना नक्की आपल्याला कोणती कमी जाणवते आहे ते शोधण खूप महत्वाच. ती शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा त्या पलीकडे असेल. ती अनुभूती जाणवून मग तीच अपेक्षा आपण समोरच्याकडे व्यक्त करण हे ज्यांना जमते त्यांना हे निभावण जमते. ती अनुभूती जेव्हा दोन्ही बाजूला तितकीच खोलवर असेल तर आपण अजून एक वरच्या पातळीवर अश्या नात्यांना घेऊन जातो.
बरेचदा धावणाऱ्या जगात आपल्याला काय नक्की हव आहे? ह्याचा विचार करत बसायला आपल्याकडे वेळ नसतो. वेळ असला तरी आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांतून अजून एक नवीन जोखड किंवा कमीटमेंट निभावण्याची आपली तयारी नसते. कारण आपल्या सोबत अजून काही लोकांची मन, जबाबदाऱ्या त्यात गुंतलेल्या असतात. तारुण्यातल प्रेम आणि उत्तरार्धातल प्रेम ह्यात हाच एक मोठा फरक असतो. तेव्हा आपण एकटे असतो. आता त्यात अनेक मन गुंतलेली असतात. त्यामुळे कशाला, कोणालाही कोणता धक्का न लावता अस नात निभावायला आपल्या विचारांची बैठक, प्रगल्भता खूप पक्की असावी लागते.
सगळा विचार एकतर्फी असून कधीच अस नात यशस्वी होऊ शकत नाही. कारण हि बैठक दोन्ही बाजूने असावी लागते. एकमेकांच्या कुटुंबांचा विचार त्यात केलेला असतो. एकमेकांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य ह्यांना त्यात मान असतो किंवा निदान द्यावा लागतो. तु मला भेटली नाहीस किंवा तुला माझ्यासाठी वेळच नसतो अस कॉलेज गोइंग प्रेम असेल तर ह्या फंदात न पडलेलं बर. त्याच्याशी का बोललास किंवा तिच्याशी मैत्री का केली? किंवा तिला सोडून माझ्याकडे ये किंवा त्याला सोडून माझ्यासोबत चल अश्या अपेक्षा आपल्या न फुललेल्या अपरिपक्व प्रेमाची लक्षण दाखवतात.
ह्या वयात समाजात वावरताना काही एथिक्स पाळावेच लागतात. जर मॉल मध्ये, गर्दीच्या ठिकाणी, किंवा वर्चुअल जगात आपल्या प्रेमाच ओंगळवाण प्रदर्शन मांडत असू तर चर्चा हि होणारच. त्याचा चिखल होणारच. त्या चिखलाचे शिंतोडे आपल्या अंगावर तर आपल्या कुटुंबावर नकळत येणारच हा साधा नियम जर समजत नसेल तर आपण वयाने वाढलो अकलेने नाही. अनेकदा हे समजून घेण्याची गरज आपल्याला वाटत नाही इकडेच आपण चुकतो. समाजाला, लोकांना बोलायला संधी आपण देतो व ते बोलल्यावर एकतर त्या नात्याचा गळा घोटतो किंवा बेजबाबदारपणे ह्यात गुंतलेल्या लोकांना, संसाराला किंवा त्यातील भावनांना पायदळी तुडवतो.
उत्तरार्धातल प्रेम हि एक सुंदर भावना आहे. कोणत्याही वयात ती कोणाबद्दल पण वाटू शकते. ती आपण कशी व्यक्त करतो, कशी निभावून नेतो किंवा त्याला कस हाताळतो ह्यातच आपली प्रगल्भता दडलेली आहे. सगळ्यांना जमतेच अस नाही. पण इतकही कठीण नाही. जर ती प्रगल्भता दोन्ही बाजूने नसेल तर अश्या नात्यात न पडणेच उत्तम. अशी नाती काही देण्यापेक्षा इतके वर्ष जपलेले, निर्माण केलेले संबंध, व्यक्तिमत्व एका क्षणात हिरावून नेतात. उत्तरार्धातल प्रेम खूप सुंदर असल तरी ते निभावून नेण खूप कठीण आहे. अर्थात प्रत्येक वेळी त्यात काटे असतात अस नाही. पण वाट मात्र बिकट असते हे नक्की. त्यासाठी दोन्ही बाजूची प्रगल्भता आणि विचारांची बैठकच ह्या रस्त्यावरून ते यशस्वी करू शकते.

No comments:

Post a Comment