धार्मिक अंधश्रद्धा ...
श्रद्धेवरचा विश्वास, आस्था, त्याला जपणं, ती जोपासणं हे सगळं महत्वाचं असलं तरी त्यावरचा अंधविश्वास मात्र आपल्याला भयंकर परिणाम दाखवतो. एखाद्या देव, गुरु, संत, किंवा पंथ ह्यावरील श्रद्धा आपल्याला एका चांगल्या मार्गाकडे घेऊन जाते. आपला उत्कर्ष घडवते. चांगल्या विचारांची साथ आपला वर्तमान, भविष्य उज्ज्वल करते. पण ह्या मार्गाच अंधानुकरण म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर मारणं. आपला गुरु, संत, पंथ किंवा देव सांगतो म्हणून कोणत्याही अमानवीय, अतिरेकी, विध्वंसक कृत्य म्हणजे श्रद्धेची अंधश्रद्धा होय.
कोणत्याही श्रद्धेत कोणाचं वाईट, कोणाला त्रास होईल असं कोणतंच कृत्य नसते. तरीपण श्रद्धेच्या नावाखाली आपण अशी कृत्य करतो. आपण विश्वास ठेवलेली गोष्ट बरोबर असेलच असं नसते. जर घरातील व्यक्ती दगा देऊ शकतात तर विश्वास ठेवलेली श्रद्धा का नाही. आपण त्याच अंधानुकरण करायचं कि नाही हे आपण ठरवायचं. आपलं शिक्षण, अनुभव, आपले प्रगल्भ व्यक्तिमत्व हेच तर आपल्याला शिकवतात. काय योग्य आणि काय अयोग्य हे विचार करण्याची सारासार बुद्धी गहाण ठेवून जर आपण पुढे जात असू तर असे अनेक गुरु, संत तसेच पंथ निर्माण होत रहाणार जे एक समाज म्हणून आपली अधोगती करत रहाणार.
स्त्री च्या आत्मसन्मान पायदळी तुडवत जर तीच शोषण, बलात्कार करणारा कोणीतरी गुरु जर आपल्या श्रद्धेचं वजन वापरत पूर्ण सिस्टीम ला वाकवू शकतो. त्याला आपण कुठेतरी नकळत साथ देत असू तर हा हि एक प्रकारचा आतंकवाद आहे. ज्या निष्पाप लोकांचे जीव गेले किंवा दिले. त्या लोकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या गुरूंना जर कायदा फक्त पोसणार असेल तर आपल्या कायद्याचा हि विचार व्हावा. भारतीय सेना हि आपल्या सिमांच रक्षण करण्यासाठी आहे. तिला ह्या असल्या अंधश्रद्धेच्या खेळाला आटोक्यात आणण्यासाठी बोलवावं लागते हि समाज म्हणून आपली झालेली अधोघती नक्कीच आहे. ह्या कारवाईत लोक मारले गेले तर त्यांना संवेदना म्हणून मोर्चे, पोलिसांवर कारवाई होणार असेल तर आपण २१ व्या नाही तर १८ व्या शतकाच्या अराजकतेकडे वाटचाल करत आहोत. धार्मिक आतंकवाद आज जर आपल्या पुढलं सगळ्यात मोठं आव्हान असेल तर हे प्रकार त्याचाच भाग आहेत. कारण श्रद्धेला वापरून हिंसा दाखवून त्या मागे पळणारी, लपणारी हि मंडळी त्याच आतंकीभावनेला खत पाणी घालत आहेत. मी देव आहे, गुरु आहे, संत आहे, पंथ आहे. मी जे करिन ते सर्वच त्या शक्तीने दाखवलेला मार्ग आहे. केलेल्या वाईट कृत्यांसाठी मला शिक्षा होऊ शकत नाही कारण मी तो सर्वसेवा करणारा आहे. हि भावना मुळी धार्मिक आतंकवादाला खतपाणी घालणारी आहे.
डोळे बंद करून आपल्या गुरु, संत, पंथ ह्यांनी केलेल्या प्रत्येक कृत्य, रस्त्याचं समर्थन आपण अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे दाखवून देतो. त्या समाजाचा भाग म्हणून मला कुठेतरी हे सगळं खूप अस्वस्थ करणार आहे. ज्या स्त्री च्या आत्मसन्मानासाठी मूक मोर्चे निघतात. कॅण्डल मोर्चे निघतात. त्या स्त्री वर बलात्कार करून राजरोसपणे मोकळं फिरणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ म्हणून २९ लोक जीव देतात. हे सगळंच कोड्यात टाकणार आहे. भारत ह्या देशात जन्मलो म्हणून नेहमीच अभिमान वाटत आला पण ह्या अश्या घटना कुठेतरी हा विश्वास मुळापासून हलवून टाकतात हे नक्की. अश्या गुरु, संत, पंथ सगळ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि व्हायला हवी. ज्या निष्पाप लोकांचे प्राण ह्यात गेले.
जे नुकसान झालं त्या सगळ्याला तो गुरु, संत आणि पंथ सगळेच जबाबदार आहेत. नुसतं टी.व्ही. समोर शांतीच अपील करायचं आणि मागे संघटन आणि आपल्यावरील विश्वासाचा फायदा उचलत हिंसा करायची. ह्या सगळ्याला जर कायदा रोखू शकत नसेल तर अशी धार्मिक अंधश्रद्धा ह्यापुढे हि अशीच फोफावत जाणार. धर्म, जात, पंथ कोणताही असला तरी त्याचा खरा चेहरा हा दशहतवादाचा असणार आहे. आपण सुजाण, प्रगल्भ नागरिक म्हणून अश्या लोकांपासून एकतर दूर राहण , समर्थन न करण आणि अश्या लोकांचा, शक्तींचा विरोध नक्कीच करू शकतो. आज कुठेतरी त्याची जास्ती गरज आहे असं मला मनापासून वाटते.
No comments:
Post a Comment