Wednesday 8 November 2017

भावनेतील बुद्धिमत्ता...

भावनेतील बुद्धिमत्ता... 
भावना हि मनुष्य प्राण्याला मिळालेली खूप मोठी देणगी आहे. ती जरी प्राण्यान मध्ये किंवा सजीवांमध्ये असली तरी तिला अनेक रुपात व्यक्त करण्याच सामर्थ्य फक्त मानवाला आहे. म्हणूनच नातेसबंधाच्या अनेक पायऱ्या आपल्या आयुष्यात प्रत्येक माणूस चढत जातो. बुद्धिमत्ता हि अजून एक देणगी मानवाला आहे कि ज्यामुळे पृथ्वीवर आज तो इतका प्रगती करू शकला आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच माणसाच्या हानीसाठी पण कारणीभूत ठरतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी बनते. पण हाच हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून रॉकेट च इंधन सुद्धा. असच काहीस ह्या दोन्ही गोष्टींच असते.
बुद्धिमता हि मेंदूत असते तर भावना हि मनात. मन आणि मेंदू एकाच वेळी काम करत असतात. पण दोघेही आलटून पालटून माणसाला कंट्रोल करतात. हे प्रमाण कमी अधिक प्रत्येक माणसाच्या बाबतीत असते. माणूस जितका बुद्धिवादी तितका कमी वेळ मनाला मिळतो म्हणून आपल्या क्षेत्रात दादा असणारी हि माणस भावनेच्या काळात मेंदू कडेच रिमोट कंट्रोल ठेवतात. उदाहरण द्यायचं झालच तर एखादा प्रथितयश अभियंता मानवनिर्मित गोष्टीकडे इंजिनीअरिंग च्या दृष्ट्रीकोनातून बघतो. त्यामुळे त्यातल सौंदर्य त्याला दिसत नाही. तो बांद्रा वरळी सी लिंक बघताना त्यातल्या इंजिनिअरिंग कडे बघेल पण समुद्रात असणाऱ्या त्याच्या सौंदर्याकडे क्वचितच लक्ष जाईल.
भावनाशील माणूस नेहमी गोष्टींकडे मनातून बघतो. त्याच मन नेहमीच त्याच्या प्रत्येक गोष्टींवर कंट्रोल करत असते. म्हणून अशी माणस आयुष्यात खूप चुका करतात. स्पेशली आयुष्यातले निर्णय जर भावनेने घेतले तर तोंडघाशी पडण आलच. प्रयोगशील होण ह्या माणसांना जमत नाही. म्हणून हि माणस नेहमीच चाचपडत, होरपळत असतात. मन आणि मेंदू हे दोघेही माणसाच्या शरीराचा ताबा आलटून पालटून घेत असताना कोणाच्या आहारी न जाता योग्य वेळी योग्य संधी म्हणा किंवा योग्य वेळी योग्य पद्धतीने विचार करतो तोच जास्त आयुष्यात यशस्वी होतो.
ह्या दोन्ही टोकावर रमणारी माणस खूप आहेत. प्रश्न आहे तो आपण हि टोक बदलायची केव्हा? आयुष्यात अनेक असे प्रसंग येतात कि जिकडे आपल्या नकळत ह्यातीन एक जण आपला ताबा घेतो. आनंद, दुखः, अपमान, संताप, चीड, किळस अश्या विविध टोकांच्या भावनिक आंदोलनाच्या वेळी मन आपसूक आपला ताबा घेत. सारासार विचार करण्याची शक्तीच आपण गमावून बसतो. म्हणूनच अश्या वेळी निर्णय प्रक्रिया बाजूला ठेवण्यात आपली प्रगल्भता आहे. कोणताही निर्णय मग तो लहान- मोठा कसा हि का असेना ह्या काळात घेतलेला आपल्याला पश्चाताप , मनस्ताप देतोच. रागाच्या भरात निघालेले शब्द, कृती हे अस काही नुकसान करतात कि कधी कधी परत येण पण शक्य नसते. आत्महत्या हि पण अशीच एक कृती आहे कि नेहमीच भावनेच्या भरात केली जाते.
बुद्धिमत्तेने सगळेच प्रश्न सोडवता येत नाहीत. समाधान मिळवायला, जाणवायला मन लागते. एखाद्या गोष्टीचा आस्वाद घ्यायला मन लागते तिकडे आपल मन हवच. अश्या गोष्टी मेंदूने नाही अनुभवता येत. माणसाची प्रगल्भता इथेच कि त्याने मन आणि मेंदू ह्यापेकी कोणाला कधी ताबा द्यायचा. बुद्धिमत्ता जेव्हा आपल्याला कंट्रोल करते तेव्हा “कल करे सो आज कर, आज करे सो अब कर” हे तत्व आपण नेहमीच पाळायला हव. मेंदूने घेतलेले निर्णय हे सारासार विचार करून असतात आणि त्याला अनुभव, तत्व तसेच व्यवहाराची जोड असते. म्हणून ते योग्यच ठरतात. जेव्हा आपण भावनेच्या भरात असतो तेव्हा हेच वाक्य उलट करायचं “अब करे सो बादमे कर, आज करे सो कल कर” म्हणजे कोणताही निर्णय न घेता शांत होऊन बाजूला व्हा. एखादी कॉफी, एखादा चित्रपट, एखादा वॉक, एखाद सुंदर गाण ऐका किंवा अगदीच काही नाही जमल तर शांत बसून तुमचा कंट्रोल मेंदूच्या ताब्यात येईपर्यंत काहीच करू नका. आयुष्य खूप मोठ आहे. आजचा निर्णय उद्या घेतला तर काही बिघडत नसते. सगळच सेम रहाते. अश्या वेळेस सिट ब्याक, रील्याक्स एंड एन्जोय टाईम विथ युरसेल्फ.
भावनेच्या भरात केलेल कोणतही कृत्य आणि मेंदूने घेतलेला आस्वाद हे नेहमीच रॉकेट मधील हायड्रोजन आणि ऑक्सिजन च मिश्रण असते. त्याने विध्वंस होणारच. तर भावनेतून घेतलेला आस्वाद आणि मेंदूने घेतलेले निर्णय हे पाणी बनवणार हायड्रोजन- ऑक्सिजन च मिश्रण असते. ज्यात आपली तहान भागवायची आणि आयुष्याला जिवंत ठेवण्याची ताकद असते. भावनेतील बुद्धिमत्ता समजली तर आयुष्यातील अनेक गुंते निर्माण होणार नाहीतच आणि झालेच तर ते सोडवायची मास्टर कि आपल्याकडे तयार असेल.

No comments:

Post a Comment