Wednesday 8 November 2017

शब्दांची डिग्निटी...

शब्दांची डिग्निटी... 
शब्द हे हत्यार असते आणि तलवारीपेक्षा त्याचे घाव घातक असतात हे आपल्याला माहित असून पण शब्द आपण न विचार करता वापरत असतो. कधीतरी चुकून तर कधी कधी मुद्दामून. आपला विचार, आपल्याला वाटणाऱ्या भावना पोचवण्याच माध्यम शब्द आहेत. म्हणून मराठी सारख्या भाषेत एकाच भावनेला तिच्या वेगवेगळ्या टप्प्यावर व्यक्त करायला वेगवेगळे शब्द आहेत. पण हे शब्द हवे तसे वापरले तर अर्थाचा अनर्थ होतो ह्याची जाणीव आपल्याला कधी होत नाही.
फेसबुक किंवा सोशल मिडिया वर लिहण्याची मुक्तता असते. आपण कोणाच्याही भिंतीवर आपल्याला वाटणार त्या पोस्ट विषयी च मत अगदी उघडपणे, मोकळेपणाने लिहू शकतो आणि त्या पलीकडे आपल्याला वाटणाऱ्या भावना हि व्यक्त करू शकतो. हे व्यक्त करण म्हणजे फेसबुक आणि सोशल मिडिया च खूप मोठ यश आहे. इतके वर्ष अस कोणतच माध्यम नसताना आज फेसबुक मुळे ती संधी आज सगळ्यांना उपलब्ध झाली पण त्याचा आपण योग्य वापर करतो का? ह्याचा विचार सर्वांनी करायला हवा.
कोणाची तरी भिंत हि त्या व्यक्तीच्या विचारांच दालन असते. जस आपण पाहुणे म्हणून दुसर्यांकडे जातो तेव्हा काही शिष्टाचार किंवा अलिखित नियम पाळतो. दुसऱ्याच्या घरात जाऊन त्या घरातल्या वस्तूची ठेवण आपल्याला पटली नाही तरी त्या हलवण्याच धारिष्ट किंवा स्वातंत्र्य आपल्याला नसते. फार फार तर आपण सूचना करू शकतो. हीच पद्धत आपण फेसबुक च्या भिंतीवर वापरतो का? एखाद्याने टाकलेले विचार हा त्याचा किंवा तिचा विचार, दृष्टीकोन असू शकतो. ती काळ्या दगडावरची रेष किंवा न्यूटन चा नियम नसतो कि तो जगमान्य असायला हवा. त्यामुळे त्याला विरोध करताना किंवा आपले विचार मांडताना आपल्या शब्दांची डिग्निटी आपण जपायला हवी.
कोणताही ग्रुप मग तो राजकीय असो, वैचारिक असो वा कोणत्याही उद्दिष्ठा खाली एकत्र आलेली अनेक डोकी असो. आपण लिहिलेले शब्द त्या १००,५००, किंवा १०००, १०००० लोकांपर्यंत जात असतात. अश्या वेळेस आपण काय लिहितो आहोत कोणत्या शब्दात मांडतो आहोत ह्याचा तर्कसंगत विचार विचार आपण करायला हवा. प्रगल्भता किंवा वैचारिक ठेवण ह्यातून तर दिसून येते. दुसऱ्याच्या विचारांचा मान ठेवून आपले विचार तर्कसंगतपणे मांडणे हीच तर प्रगल्भता आपण शिक्षणातून शिकायची असते. किंबहुना फेसबुक सारख्या माध्यमातून हेच तर शिकण्यासारख आहे. विरोध असो वा सहभाग कोणत्याही क्षणी शब्दांची डिग्निटी सांभाळता आली पाहिजे.
आपण लिहितो तेव्हा शब्दांचा वापर आपण कसा करतो ह्यावर समोरचा त्यातून काय घेतो हे ठरलेल असते. सांगायचं झाल तर शील आणि अश्लील ह्यामध्ये एका अ चा फरक आपल्या आख्या दृष्टीकोनात बदल करतो. तसाच बदल आपण मांडलेल्या विचार समोरच्या पर्यंत पोहोचवण्यात होऊ शकतो. सेक्स, स्त्री, स्त्री पुरुष नातेसंबंध, प्रेम हे खूप भावनिक विषय आहेत. त्यात शब्दांचा पोत सांभाळायला हवा. आपले विचार एकदम विरोधी असले तरी लोकांना त्याचा आक्षेप नसतो. आक्षेप असतो तो आपण ज्या शब्दातून मांडतो त्याचा. विरोध पण चांगल्या शब्दांनी करता यायला हवा तेव्हाच त्याची क्वालिटी ठरते.
शब्दांची पातळी कधी पण खाली आणायला वेळ नाही लागत. वेळ लागतो ती वर न्यायला आणि ती जशी आहे तशी मेंटेन करायला. समोरचा चिखलात उतरत असेल तर आपण पण उतरायचं कि नाही ह्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असायला हवा. समोरच्याचा नाही. बरेचदा हा रिमोट कंट्रोल आपण समोरच्याकडे देऊन मोकळ होत. त्याने किंवा तिने तस लिहील म्हणून मी उत्तर दिल अस आपण अनेकदा म्हणतो. त्याने किंवा तिने लिहल म्हणून त्यावर व्यक्त व्हायचं कि नाही हा निर्णय तर तुमचा असतो. जर खऱ्या आयुष्यात आपण सगळ्याचं ऐकत नसू तर फेसबुक वर वर्चुअल जगात कोणाच्या तरी लिखाणाला आपण इतकी किंमत का देतो? जरी कोणी तरी महत्वाच असेल तरी त्याच शब्दांच्या लेवल वर उत्तर देण्यापेक्षा आपल्या उत्तरांची वरची पातळी आपल्या शब्दांचा जास्ती प्रभाव पाडते. त्यामुळे समोरचा उतरला म्हणून आपण उतरायचं का हे आपल्याला ठरवता येण म्हणजेच प्रगल्भता.
फेसबुक किंवा व्हास्त अप वर जर कोणाला रिस्पेक्ट मिळतो तो त्यांनी उमटवलेल्या शब्दातून. आपल व्यक्त होण जर योग्य शब्दात असेल तर समोरच्याला उचकवायला संधी मिळत नाही. नक्कीच आपण पण माणूस आहोत कधी तरी शब्द वर खाली होतात. मनाची स्थिती नेहमीच सारखी असेल अस नाही. अश्या वेळी कधीतरी असे शब्द निघून जातात. शब्द मागे घेता येत नसले तरी आपण पायरी सोडल्याची जाणीव आपल्याला व्हायला हवी हेच प्रगल्भतेच लक्षण आहे. हि जाणीव होण म्हणजेच शब्दांची डिग्निटी जपण. आपल्यापेकी प्रत्येकाने नक्की पुढल्या वेळेस लिहताना ह्याचा विचार करावा. शब्दांची डिग्निटी जपण हा अभ्यास आहे, शास्त्र आहे, त्यासाठी आपले विचार आणि भाषा ह्या दोन्हीवर प्रभुत्व असण गरजेच आहे. कदाचित आज आपण तितके प्रभावी नसू पण ह्या गोष्टीचा नुसता विचार पण तुमची आमची वैचारिक पातळी कित्येक पटींनी वर घेऊन जातो हीच तर शब्दांच्या डिग्निटी ची जादू आहे.

No comments:

Post a Comment