Wednesday 8 November 2017

म्याच्युअर रिलेशनशिप...

म्याच्युअर रिलेशनशिप... 
तारुण्यात पदार्पण केल कि शरीराच्या रचनेत होणारे बदल खुणावत असतात. भिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होताना मना आधी कुठेतरी शरीर समोर येत असत. कारण ते वयच तस असते. होर्मोनल बदल तसेच सळसळत्या तरुण रक्ताचा प्रभाव आपल्या विचारात आणि एकूण व्यक्तीमत्वात पडतो. त्याची तीव्रता मात्र परिस्थिती, व्यक्ती आणि इतर गोष्टींवर अवलंबून असते.
तारुण्यातून चाळीशी – पन्नाशी चा पल्ला गाठला कि विचार परिपक्व होतात. काही अपवाद असतील. पण स्त्री च्या बाबतीत आता शरीर मागे पडलेलं असते. शरीर अनुभवून आता त्याचा तिरस्कार वाटू लागतो. कारण आलेले अनुभव चांगले नसतील तर ते नकोस वाटू लागते. स्त्री च्या बाबतीत हा बदल थोड्या आधी येत असला तरी पुरुष मात्र अजूनही शरीरात रमलेला असतो. स्त्री च्या बाबतीत रजोनिवृत्तीचा काळ जवळ येताना पुरुषाच्या बाबतीत मात्र शरीराचा विचार सुरुच असतो. स्त्री आणि पुरुष ह्यांच्या बेसिक वैचारिक पातळीवरचा फरक ह्या काळात प्रामुख्याने दिसून येतो.
पुरुष अजूनही शरीराच्या शोधात असतो तर स्त्री कुठेतरी त्याच्या वरच्या लेवल ला भावनिक आधार शोधत असते. जोडीदाराकडून तो प्रत्येकवेळी मिळेल अस नसते. मग कुठेतरी अश्याच कोणाकडून शोधताना कधी कधी कोणी जोडीदारा पलीकडे मिळतो पण. वैचारिक ठेवण जर सारखी नसेल तर आगीतून निघून फुफाट्यात अशीच स्त्री ची अवस्था होते. कारण भावनिक आधार शोधणाऱ्या स्त्री ला बरेच वेळा अवेलेबल अस समजून पुरुष शरीरासाठी जवळ येतो. आता हि अवस्था कोणाच्या बाबतीत कधी येते यावर भावनांची तीव्रता अवलंबून असते. कारण अनेकदा आधी अशी काही अपेक्षा नसणारा पुरुष जेव्हा त्याच अपेक्षा बोलून दाखवतो तेव्हा मन तुटलेल्या स्त्री ला भावनांना कुठे सांगता हि येत नाही आणि गप्प हि बसता येत नाही. हि अवस्था खूप भीषण असते. कारण बाजार कोणालाच आणि कोणता नको असतो. गॉसिप नको असते. पण समजून घेणार कोणीतरी हव असते. अशी व्यक्ती त्यावेळी सोबत असेल अस नाही. असली तरी तुटलेल्या विश्वासाच्या गर्तेत विश्वास तरी कोणावर ठेवणार?
स्त्री ला भावनिक आधार देऊन सुद्धा शरीरात न रमणारे पुरुष म्हणजे वेगळेच. एकतर असे मिळण म्हणजे राजयोगच. कारण पुरुषाची मानसिकता शरीरापलीकडे जात नाही निदान स्त्री च्या शोधात असलेल्या पुरुषांची. स्त्री एकटी म्हणजे शारीरिक दृष्ट्या ती एकटी किंवा समाधानी नाही असा एक सार्वत्रिक समज पुरुषांमध्ये आहे. त्यामुळे अनेकवेळा अश्या नात्यांचा शेवट विस्कटलेला गुंता म्हणून होतो. स्त्री च्या अपेक्षा बरेचदा माफक असतात. कोणीतरी ऐकणार असावं, कोणीतरी समजून घेणार असावं बस ह्या पलीकडे काहीच नको असताना नाती त्याच लेवल वर ठेवण पुरुषांना जमत नाही. म्हणून शरीरापलीकडे विचार जाण हे पुरुषांच्या बाबतीत तितक सोप्प नसत.
पुरुष प्रत्येक वेळी शरीरात अडकतात असे हि नाही. पुरुष जरी ह्यातून अलिप्त राहिले तरी शरीरात अडकलेल्या स्त्रिया हि तितक्याच आहेत. खरे तर अश्यावेळी कायद्याचा, आपल्या स्त्री असण्याचा फायदा हि त्या घेतात. कित्येक स्त्रियांकडून पुरुषाला बळी पाडण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. सहानभूतीचे खांदे द्यायला इतर पुरुष वेशीवर तयार असतातच. अश्या वेळी पुरुषाच्या आयुष्यात निर्माण होणारे प्रश्न खूप भयानक असतात. कारण आपल्या इमेज शी तडजोड स्त्री किंवा पुरुष दोघानाही पचवण तितक सोप्प नसते.
नात्याच मूळ जर आपल्याला माहित असेल तर नात्यात अश्या अडचणी येत नाहीत. ते व्हायला त्या दोघात संवाद हा खूप महत्वाचा असतो. एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा जर सारख्या नसतील तर गोंधळ होणारच. मूक संमती किंवा समजून घेण हा भाग इकडून बाजूला काढून ह्या विषयावर उघडपणे बोलून पुढे जाण ज्यांना जमते त्यांना म्याच्युअर रिलेशनशिप निभावता येतात. त्याहून पुढे जर हे समजून घेण उच्चतम पातळी वर असेल तर डिव्हाईन नात्यात त्याच रुपांतर होऊ शकते. जिकडे कोणाच कुठेतरी लांब असण पण पुरेस असते. नक्कीच ह्या सगळ्या अभ्यासाच्या आणि विचारपूर्वक करणाच्या गोष्टी आहेत. पण घडाळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या आयुष्यात सगळ पटापट मागणाऱ्या आपल्या अपेक्षांमध्ये इतका विचार करणारे किती?
दुधाने भाजल्यावर ताक फुंकून पिण्यापेक्षा दुधाला थंड करून पण पिता येऊ शकते. फक्त दुध थंड होण्याची योग्य वेळ आणि तितकी कटीबद्धता दोन्ही टोकांकडून यायला हवी. कारण ताकाला सगळेच फुंकून पितात. दुधाला फुंकण्यामध्ये तर म्याच्युअर रिलेशनशिप आहे.

No comments:

Post a Comment