Wednesday, 8 November 2017

झाडावर लागलेला पैसा...

झाडावर लागलेला पैसा... 
माणूस मोठा झाला निदान पैशाच्या बाबतीत कि लोक, समाज किंवा आपलेच कुटुंबातले त्याकडे वेगळ्या नजरेने बघयला लागतात. त्याला काय? किंवा तिला काय? अस केल कि झाल. महिन्याला पैसे जमा होणार. आमची काय हालत होते ती आम्हालाच माहित. अशी वाक्य आपण नेहमीच ऐकतो. स्पेशली अशी काही कामाची क्षेत्र कि जिकडे पैसा जास्ती मिळतो. त्या क्षेत्रा कडे बघण्याचा दृष्ट्रीकोन असाच असतो. पण खरच इतक सोप्प असते का? ह्या क्षेत्रात पैसा झाडावर लागलेला असतो का? ह्याचा विचार करण्याची प्रगल्भता किंवा जाणीव खूप कमी लोकांना असते.
वैमानिक, आय.टी., ओईल एंड ग्यास, मर्चंट नेव्ही असे एक ना अनेक क्षेत्र आहेत कि जिकडे नेहमीच्या पठडीतल्या पेक्षा पैसा जास्ती आहे. पण ज्या सगळ्यांना हा पैसा दिसतो त्या सर्वाना ह्या क्षेत्रात हा पैसा का आहे? ह्याचा विचार मनात येत नाही. ज्या क्षेत्रात जबाबदारी, संकट, जोखीम, अनिश्चितता, प्रचंड पैसा गुंतलेला आहे अश्या क्षेत्रात काम करणे तितकच जबाबदारीच असते. कारण कधी काय होईल ह्याचा नेम किंवा ते होण्याची शक्यता खूप जास्ती असते. अगदी स्वतःचा जीव धोक्यात येईल इतकी शक्यता असते. म्हणूनच ह्या क्षेत्रात मिळणार मानधन हे इतर क्षेत्रापेक्षा जास्ती असते. हे आपण ध्यानात ठेवायला हव.
ओईल एंड ग्यास असच एक क्षेत्र आहे. जमिनीतून उत्खनन करून ओईल मिळवणे म्हणजे पाणाच्या विहरीत मोटर बसवून किंवा बोअर मारण्या इतक सोप्प नसते. ओईल आणि ग्यास हे नेहमीच पृथ्वीच्या अतिशय कठीण भागात मिळते म्हणजे समुद्र, वाळवंट अश्या ठिकाणी. ह्या वातावरणात जिकडे माणसाच रहाण म्हणजेच एक परीक्षा असते तिकडे काम करण किती कठीण असू शकेल ह्याची कल्पना आपण क्युबिकल च्या ऑफिस मध्ये बसून करू शकत नाही. तसेच जमिनीच्या, पाणाच्या खाली ४००० ते ५००० मीटर खोल विहीर खोदणे हे तितकेच कठीण काम आहे. पृथ्वीच्या भूगर्भात आपण जसा प्रवेश करत जाऊ त्यात दोन गोष्टी प्रामुख्याने वाढतात. तापमान आणि दाब. प्रत्येक मीटर मागे ह्या गोष्टी वाढत जातात व त्यांना थोपवण हे खूप मोठी परीक्षा असते. पुढे काय असणार ह्याचा नुसता अंदाज आपण बांधू शकतो पण त्याची कोणती कल्पना नसताना अचानक समोर येणाऱ्या गोष्टी किंवा तुमची एक चूक तुमचा आणि तुमच्या सोबत इतरांच्या जीवावर बेतू शकते. अश्या वेळेस द्यावी लागणारी किंमत खूप मोठी असते.
समुद्रात उत्खनन करणे तितक सोप्प नसते. जमिनीपासून लांब सगळ्या वातावरणात पाण्यात उभ राहून ड्रिलिंग करणे तितकच जोखमीच आणि कठीण काम आहे. हे काम करणाऱ्या रिग चा चालवण्याचा खर्च सुद्धा तितकाच प्रचंड असतो. एखादी ज्याक अप रिग दिवसाला ६०,००० ते १,५०,००० अमेरिकन डॉलर मानधन घेते. म्हणजेच प्रत्येक दिवसाला जवळपास ५० लाख रुपये. हीच किंमत ड्रील शिप च्या बाबतीत १.५ कोटी ते ३ कोटी रुपयांच्या घरात असते. म्हणजे ज्याक अप रिग पकडली तरी प्रत्येक तासाला दोन लाख तर प्रत्येक मिनिटाला ३५०० रुपये खर्च असतो. ड्रील शिप च्या बाबतीत हेच आकडे अगदी मिनटाला रुपये २०,००० पर्यंत असू शकतात. अश्या ठिकाणी तुम्ही ५ मिनिटे वाया घालवली तर नुकसानीचा आकडा १५,००० रुपयान पलीकडे जातो तर ड्रील शिप मध्ये १ लाख रुपये. म्हणजे ५ मिनिट पण खूप महत्वाची असतात. एक चूक आणि तुम्ही केलेल्या नुकसानीचा आकडा प्रत्यके मिनिटाला कित्येक पटींनी वाढत जातो. अश्या ठिकाणी काम चालते ते २४ X ७ X ३६५ दिवस. इकडे आठवडा आणि रविवार, सणसमारंभ, ब्यांक हॉलिडे वगरे असले प्रकार नसतात. कामाच्या वेळा कमीत कमी १२ तासापासून अखंड ३६ ते ४८ तास पण असू शकतात. कारण निर्माण होणाऱ्या अडचणीच्या वेळी कमीत कमी वेळेत अडचण सोडवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. तुम्ही तुमच्या आख्या कंपनी ला तिकडे रिप्रेझेंट करत असतात. त्यामुळे बॉस पासून ते झाडूवाला पर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर असतात.
घरी कोणी आजारी असो, तुमचा किंवा घरच्यांचा वाढदिवस असो, गणपती असो वा दिवाळी असो तुमच्यासाठी सर्व दिवस सारखेच असतात. रोज सभोवताली दिसणार पाणी आणि रोज दिसणारी तीच तीच माणस ह्या पलीकडे काहीच नसताना तुमची भाषा जाणणार, तुम्हाला ओळखणार अस कोणीच नसते. किंबहुना तिकडे ओळख करून घ्यायला पण वेळ कोणाकडे असतो? अश्या स्थितीत कामाची अत्युच्च पातळी राखायला मनाची स्थिती संतुलित ठेवायला खूप तयारी आणि समतोल लागतो. क्युबिकल मध्ये बसून आणि रोज घरी जाऊन काम करण वेगळ. घरापसुन लांब राहून काम करण वेगळ. दोघात कमालीचा फरक आहे. म्हणूनच मिळणाऱ्या मोबदल्यात.
जगात कोणतच काम कमी दर्जाच नसते. पण कामासाठी मिळणारा मोबदला हा आपण त्यासाठी केलेल्या त्रासाचा, परिश्रमाचा मोबदला असतो. लांबून सगळ सोप्प वाटत असल तरी प्रत्येक काम हे तितकच अडचणीच असू शकते. मिळणारा मोबदला हा ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन दिला जातो. त्यामुळे कोणत्याच अश्या कामाच्या ठिकाणी पैसे झाडावर लागत नाहीत. प्रथमदर्शनी जरी ते सोप्पे वाटले, दिसले तरी ते मिळवताना आपण त्या साठी दान केलेल्या वेळेची,श्रमाची ती किंमत असते. पुढल्या वेळी कोणतीही व्यक्ती जी अश्या एखाद्या वेगळ्या क्षेत्रात काम करून जर जास्ती पैसे कमवत असेल तर त्या व्यक्तीने त्यासाठी मोजलेल्या मोबदल्याची किंमत विचारात घ्यायला विसरू नका. कारण झाडावर पैसे कधीच लागत नाहीत.

No comments:

Post a Comment