कृष्णविवर...काळोखानंतरची एक नवीन पहाट... विनीत वर्तक ©
जगाच्या कोपऱ्यात कुठेही आपण वावरतो, तेव्हा एक गोष्ट जवळपास सारखी असते..ती म्हणजे, गुरुत्वाकर्षण!
समजा, आपण एखाद्या रस्त्यावरच म्हणजे, मुंबईतल्या एस.व्ही. रोड किंवा पुण्यामधल्या डेक्कनवरचं गुरुत्वाकर्षण नाहीसं केलं तर..? जे लोक आधीच कोणत्याही मोशन म्हणजे वेगात आहेत ते अवकाशात फेकले जातील. तसेच, गाड्या हवेत उडायला लागतील. पण, समजा उलटं केलं तर..?
आपल्यावर पृथ्वीचं जे बल काम करते ते १ जी असतं. समजा, आपण ते ८-९ जी केलं, तर आपल्याला अस्वस्थ वाटेल. काही काळ आपण सहनही करू, जसे लढाऊ विमानातील पायलट अनुभवतात. समजा, हा फोर्स काही मिलियन जी केला तर? तुमच्या डोक्याच्या वजनाने तुम्ही पूर्णपणे चेपले जाल. म्हणजे तुमच्या डोक्याच्या वस्तुमानाच वजन इतकं होईल की तुमचं शरीर पूर्णपणे त्यात दबून जाईल.
आता हाच फोर्स किंवा गुरुत्वीय बल जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढतं, तेव्हा प्रकाश पण त्याच्या वजनापुढे गुडघे टेकतो. म्हणजे की, या प्रचंड बलापुढे तो इच्छा असूनही पुढे जाऊ शकत नाही. आता, प्रकाश जर आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही, तर आपल्याला काय दिसेल? फक्त काळोख! पण, त्या काळोखात दडलेलं असेल ते प्रकाशाला झुकवणारं प्रचंड गुरुत्वीय बल.
प्रचंड मोठे तारे म्हणजे, सूर्याच्या २० पट वजन असणारा एखादा तारा आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी सगळं इंधन जाळून झाल्यावर आपल्याच वजनाला झेलू शकत नाही. त्या वजनाखाली तो दबला जातो. किती तर अवघा १६ किलोमीटरच्या एका साच्यात. विचार करा, सूर्याच्या २० पट वजनाचा तारा जेव्हा फक्त १६ किमीचा होईल, तेव्हा किती प्रचंड वस्तुमान त्यात दाबलेलं असेल? (त्याचा आकार कमी झाला तरी त्याच वस्तुमान हे सारखं असेल) या वस्तुमानापुढे प्रकाश पण झुकेल. त्याचवेळी, त्या ताऱ्याचं गुरुत्वीय बल (गुरुत्वाकर्षण) मात्र वस्तुमानाच्या पटीत काम करत असेल. म्हणजे, काय होईल की त्याच्या जवळ येणारी प्रत्येक गोष्ट या गुरुत्वीय बलाने त्याच्याकडे ओढली जाईल आणि त्या काळोखात लुप्त होईल. पण प्रकाश बाहेर येत नसल्याने त्या काळोखात ती वस्तू कुठे गुडूप होते आहे याचा काहीच अंदाज आपल्याला येणार नाही. अश्या जागेलाच म्हणतात, स्टेलर किंवा मध्यम कृष्णविवर!
प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी अशी प्रचंड मोठी सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोल किंवा कृष्णविवरं आढळून येतात. आपल्या आकाशगंगेच्या म्हणजेच 'मिल्की वे' च्या मध्यभागी जे कृष्णविवर आहे त्याला 'सॅजेटेरीयस ए' असं म्हणतात. ४ मिलियन (४० लाख) सूर्यांचं वस्तुमान एका सूर्यात, या कृष्णविवरामध्ये एकवटलेलं आहे. विचार करा की ४० लाख सूर्य एकत्र केले तर त्यांच गुरुत्वाकर्षण किती प्रचंड असेल. आपल्या पृथ्वीसारखे ग्रह या गुरुत्वाकर्षणात कुठे गायब होतील आपल्याला कळणार पण नाही. मग जिकडे काहीच म्हणजे अगदी प्रकाश पण बाहेर येत नाही तर, ते कृष्णविवर आपण ओळखणार तरी कसं? जरी काही दिसत नसलं तरी आधी म्हटलं तसं गुरुत्वीय बल आपलं काम करत असतं. आता या बलाच्या भोवती जे काही असेल ते त्याच्याकडे खेचलं जातं.
अवकाशाच्या काळोखात आजूबाजूला कोणत्याही ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नसताना एका समान रस्त्याने जेव्हा एखादा तारा किंवा ग्रह अंधाऱ्या काळोखात परिक्रमा करतात तेव्हा, एक न दिसणारं बल म्हणजेच गुरुत्वाकर्षण त्यावर काम करत असतं. हे बल काही वेळा इतकं प्रचंड असतं कि ताऱ्याभोवती असलेले वायू आपल्याकडे खेचून घेतं. परिवलन गती आणि एका काळोख्या बिंदूकडे खेचला जाणारा वायू मिळून एखाद्या सी. डी. प्रमाणे डिस्क तयार होते. या डिस्कमधील वायू प्रचंड गरम होऊन एक्स-रे लाईट बाहेर पडतात. हा एक्स-रे लाईट जेव्हा आपण बघतो तेव्हा या प्रचंड बलाचं म्हणजेच कृष्णविवराचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं.
कोणत्याही कृष्णविवराचा पृथ्वीला धोका सध्यातरी नक्कीच नाही. सूर्याच्या आकाराचं कृष्णविवर आपण सूर्याच्या ठिकाणी ठेवलं तरी सगळे ग्रह त्या भोवती आता फिरतील तसेच परिक्रमा करतील. फरक एकच, आपण कोणाभोवती फिरतो आहोत ते आपण बघू शकणार नाही. दिवस न होता रात्रीचं राज्य पृथ्वीवर असेल. अर्थात, सूर्याच्या कमी वस्तुमानामुळे त्याचं रुपांतर रेड जायंट स्टार आणि नंतर व्हाईट डार्फ ताऱ्यात होईल. आता समजा, अशा भल्या मोठ्या प्रचंड कृष्णविवरांची टक्कर झाली तर काय? दोन प्रचंड अशा वस्तुमानांची टक्कर नक्कीच पूर्ण विश्वात आपलं अस्तित्व दाखवेल. पण, ती स्फोटाच्या किंवा प्रकाशाच्या रूपाने नाही तर, गुरुत्वीय बलाने. दोन प्रचंड अश्या गुरुत्वीय बलात झालेली अशी टक्कर संपूर्ण विश्वाच्या पटलावरती गुरुत्वीय तरंग तयार करतील जे पाण्यात दगड टाकल्यावर तयार होणाऱ्या तरंगा प्रमाणे विश्वाच्या संपूर्ण पटलावर प्रवास करतील असं जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन याने आपल्या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी मधे सिद्धांताने सिद्ध केलं आणि यालाच म्हणतात 'ग्रॅव्हिटेशनल वेव्ह'. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी लिगोने पहिली अशी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह शोधली. १५ जून २०१६ ला दुसऱ्या अशा प्रचंड टकरीतून निर्माण झालेल्या ग्रॅव्हिटेशनल व्हेवचं अस्तित्व लिगोने दाखवून दिलं. त्यानंतर प्रकाशापलिकडे बघण्याची एक वेगळी नजर आपल्याला मिळाली. यामुळेच अल्बर्ट आईनस्टाईन च विश्वाला समजून घेण्यात दिलेलं योगदान असामान्य मानण्यात येतं.
कृष्णविवराच्या आत नक्की काय आहे? हा प्रश्न सामान्य माणसापासून वैज्ञानिकांपर्यंत सर्वांना सतावतो आहे. जिकडे भौतिकशास्त्राचे नियम गळून पडतात. जिकडे, प्रकाश झुकतो. जिकडे, वेळ थांबते... तिकडे काय? आपण विचार पण करू शकत नाही असं विश्व तिथे असेल. कदाचित, नवीन नियम, नवीन प्रवास असेल. दिवसानंतर रात्र ठरलेली आहे, तशी काळोखानंतर एक पहाट आहे. आपण कदाचित भूतकाळात जाऊ, कदाचित भविष्यकाळात. कारण, जिकडे वेळ थांबते तिथे आपण केलेला प्रवास हा काळाच्या पलिकडे असेल.
विचार करताना मती गुंग होत असेल. पण, असं होऊ शकतं आणि होत असेल. विज्ञान अजून या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलेलं नाही. पण एक मात्र नक्की, आपल्या विश्वाचा जन्म ज्या बिग बँगने झाला, कदाचित तो अशाच एका प्रचंड, अतिप्रचंड कृष्णविवराचा स्फोट असेल.....
जिकडे जन्म आहे तिकडे मृत्यू आहे आणि जिकडे मृत्यू आहे त्यानंतर एक नवीन पहाट आहे. कृष्णविवर अशीच काळोखानंतरची एक नवीन पहाट आहे.....
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment