Wednesday 8 November 2017

सुखातल समाधान कि समाधानातल सुख...

सुखातल समाधान कि समाधानातल सुख... 
आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते अखेर पर्यंत माणूस सुखाच्या क्षणांनसाठी धडपडत असतो. ते जितके जास्ती तितकाच आयुष्य समृद्ध आणि आनंदी असत अस आपण मानतो. सुख कोणत्याही स्वरूपात असो मग तो पैसा, उन्नती, भरभराट, शिक्षण, नोकरी, जोडीदार असे अनेक टप्पे त्यात येतात. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ते मिळाव ह्यासाठी माणूस जीवाच रान करतो. पण ते खरच मिळते का? मिळाल तरी किती टिकते? ह्याचा उलगडा व्हायला आयुष्य निघून जाते. आनंदाची / सुखाची व्याख्या आपण करू तशी सापेक्ष असते. आपण आयुष्यभर सुखातून समाधान शोधतो पण समाधानातल सुख नेहमीच चिरकाळ टिकणारा आनंद देते.
दहावीला ९०% मिळाले हि गोष्ट खूप आनंदाची/ सुखावह गोष्ट असू शकेल पण ते किती वेळ टिकते? हे ९०% आपल्याला हव्या त्या कॉलेज ला प्रवेश मिळवून देतील ह्याची शाश्वती नाहीच. सुखाने समाधान होईलच अस नाही. खूप पैसा कमावला पण तो किती काळ टिकेल? किंवा टिकवता येईल ह्यावर आनंदाचे क्षण अवलंबून असतात. पैश्याने सुख विकत घेतल पण समाधान? हवा तसा जोडीदार शोधला रंग, रूप, शिक्षण, सामाजिक पातळीवर जुळणारा तरी जेव्हा तो किंवा ती आपल्याला किती समाधान देईल ह्यावर सुख अवलंबून आहे. थोडक्यात काय तर आनंद आणि सुख हे सापेक्ष असते. त्याला मर्यादा असते. त्याचा शेवट असतो आणि सगळ मिळवून सुद्धा ते मिळेलच ह्याची खात्री नसते. मग नक्की कशाचा शोध घ्यावा सुखातल्या समाधानाचा कि समाधानातल्या सुखाचा?
आपल लिखाण लोक वाचतात ह्याचा आनंद मला नक्कीच खूप होतो. खूप लोकांपर्यंत जाते. फेसबुक वर अनेक लाईक चा पाउस तर व्हात्स अप वर अंगठ्यांचा भडीमार होतो. आनंदी वाटतही पण कुठे तरी ते त्या क्षणापुरतीच असत. म्हणजे तो क्षण गेला कि त्यातल नाविन्य संपत जाते. नक्कीच कुठेतरी मनात छान भावना नेहमीच रहाते पण ती मनातच. त्याने समाधान होतेच अस नाही . मनाला समाधान वाटणाऱ्या गोष्टीत खर सुख आणि आनंद असतो. हजारो लाईक आणि शेकडो कमेंट मध्ये जे समाधान मिळत नाही ते एका कमेंट मध्ये मिळून जाते. म्हणूनच अश्या कमेंट किंवा दाद माझ्यासाठी समाधानातल सुख देतात ज्यांच्या शोधात मी नेहमीच असतो.
परवाचा माझा “आयुष्याला घडवणारी माणस” हा लेख वाचून एक छान प्रतिक्रिया आली. “माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझ्या लहान बहिणीचा खूप हात होता. मे महिन्यात तिच्याकडे राहिले असताना काही वादामुळे आमच्यात वितुष्ट आल. आपल्या घरी आल्यावर पुन्हा तिच्याकडे कधी जायचं नाही असच मनाशी ठरवलं. पण तुझा लेख वाचला आणि आयुष्याला घडवणाऱ्या त्या बहिणीची मला आठवण झाली. सगळ बाजूला ठेवून पुन्हा तिला भेटून आले मळभ दूर झाल. आता त्या निरभ्र आकाशाला पुन्हा अनुभवते आहे”. हे वाचून मी क्षणभर स्तब्ध झालो. आपले शब्द कोणाच्या आयुष्यात इतके सुंदर क्षण आणू शकतात. हे समाधान मला जे सुख देऊन गेल. ते मी शब्दात पण मांडू शकत नाही.
माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. माझ्या आई बाबांना माझ्या लिखाणाबद्दल काहीच माहिती नव्हत. म्हणजे आई ला खूप कल्पना होती कारण तिचे आणि माझे शाब्दिक वाद चालूच असायचे. पण बाबा मात्र खूपच अनभिज्ञ होते. समोर असलेले सगळेच वाचक त्यातले काहीतर पहिल्यांदा भेटलेले समोर येऊन जेव्हा माझ्या लेखांबद्दल आणि माझ्याबद्दल बोलत होते तेव्हा त्यांच्या कौतुकांच्या शब्दांपेक्षा बाबांच्या डोळ्यात दिसलेल्या आनंदाश्रूनी जे समाधान आणि सुख दिल त्याची तुलना कशातच नाही.
इस्रोच्या लेखावर एका ७० वर्षाच्या आजीनी मला अभिप्राय पाठवला होता. “इतके वर्ष मला कुतूहल होत कि नक्की रॉकेट मधून एकतर हे उपग्रह पाठवतात कसे? एकाच वेळी वेगवेगळ्या कक्षेत ते स्थापन कसे करतात? त्यांची कक्षा अशी वेगवेगळी का? अश्या अनेक प्रश्नांना गेल्या कित्येक वर्षात मी उत्तर शोधू शकली नव्हती आज तुझ्या लेखामुळे त्याची उत्तर मिळाली”. माझा लेख विज्ञानाच्या कक्षेत येतो का मला माहित नाही? तो पूर्ण असतो का? मला माहित नाही. पण तो जर एका ७० वर्षाच्या आजींना समजत असेल तर तो नक्कीच सगळ्यांन पर्यंत पोहचत असेल. हे समाधान कित्येक पुरस्कार आणि पुस्तकाच्या विक्रीच्या खपाच्या आकड्यांपेक्षा जास्ती आहे.
आयुष्यात आपण कशाच्या मागे धावायचं हे आपण ठरवायचं. सुखातल्या समाधानाकडे कि समाधानातल्या सुखाकडे. दोन्हीकडे आनंद आणि सुख आहेच. सुखातल समाधान कदाचित आपण पटकन मिळवू पण ते चिरकाळ टिकेल ह्याची काहीच खात्री नाही. तर समाधानातल सुख मिळायला कदाचित खूप वर्ष जातील पण ते चिरकाळ आनंद देणार असेल अगदी शाश्वत. प्रसिद्धी, लाईक, शेअर आणि आपल्या स्व ला मिळणाऱ्या सुखापेक्षा लिखाणातून मला समाधान मिळते. वर आलेल्या प्रतिक्रिया त्या समाधानातल सुख मला देतात जे चिरकाळ माझ्यासोबत टिकणार असते. सुखातल समाधान कि समाधानातल सुख आपण काय निवडायच ह्याचा विचार ज्याचा त्यांनी करायला हवा.

No comments:

Post a Comment