पाणबुडी एक सर केलेल शिखर...
पाणबुडी नेहमीच एक आव्हान देणार तंत्रज्ञान मानल गेल आहे. अस तंत्रज्ञान अवगत करण म्हणजे शत्रूच्या एक पाउल पुढे असण. २००५ साली भारताने स्कोर्पियन डिझाईन प्रमाणे ६ पाणबुड्या बनवण्याचा ३ बिलियन अमेरिकन डॉलर चा करार फ्रांस च्या डी.सी.एन.एस. मध्ये झाला. प्रोजेक्ट ७५ आणि प्रोजेक्ट ७५ (आय) ह्या ३० वर्षाच्या प्लान नुसार भारत दोन असेम्बली लाईन वर १२ पाणबुड्या बनवणार आहे. तर अजून १२ पाणबुड्या भारतीय डिझाईन नुसार बनवण्यात येणार आहेत. म्हणजे २०३० पर्यंत २४ पाणबुड्या भारताकडे अद्यावत तयार असतील. ज्या भारताच्या ७००० किमी. पेक्षा जास्ती लांबीच्या किनाऱ्यांच रक्षण तर करतील पण हिंद महासागरामधील प्रत्येक जहाजावर पाण्याखालून लक्ष ठेवण्याची ताकद भारतीय नौदलाला मिळेल.
ह्या ६ पाणबुड्या मधील पहिली पाणबुडी २१ सप्टेंबर २०१७ ला नौदलाच्या हवाली करण्यात आली. ३० ऑक्टोबर २०१५ ला बनवून पूर्ण झाल्यावर अनेक पद्धतीच्या चाचण्यांना सामोरी जाऊन आता ती भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली आहे. आय.एन.एस. कलावारी (एस ५०) डीझेल- इलेक्ट्रिक पाणबुडी असून अतिशय प्रगत अश्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने बनवली गेली आहे. ह्या पाणबुडी वर ६ X ५३३ मिमी टोर्पिडो ट्यूब असून १८ ब्ल्याक शार्क टोर्पिडो आहेत. एस.एम ३९ नौकाविरोधी मिसाईल बसवलेली आहेत. त्याशिवाय ३० माईन्स ने हि पाणबुडी अद्यावत आहे. १५६५ टन वजनाच डिस्प्लेसमेंट असणारी हि पाणबुडी ५० दिवस पाण्याखाली राहू शकते तर तब्बल ३५० मिटर खोल पाण्याखालून प्रवास करू शकते. १२,००० किमी चा प्रवास १५ किमी/तास वेगाने ती करू शकते.
आय.एन.एस कलावरी हि पूर्णतः भारतात बनवली गेलेली पहिली पाणबुडी आहे. २००५ साली जेव्हा भारताने स्कोर्पियन तंत्रज्ञानावर आधारित ६ पाणबुड्यांची ऑर्डर दिली तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवून हा करार केला गेला. चीन ची समुद्रातील वाढती ताकद, साउथ चायना सी सोबत हिंद महासागरावर सुरु झालेली चीन च्या अरेरावी ला शह द्यायचा असेल तर भारताला झपाट्याने आपल्या सागरी क्षमतांमध्ये वाढ करण गरजेच होत. त्याच सोबत वय झालेल्या आणि कालबाह्य होत जाणाऱ्या पाणबुड्याना निवृत्त करणे हि गरजेचे होत चालले होते. पण अश्या वेळी त्यांची जागा घेणाऱ्या नव्या दमाच्या पाणबुड्यांची हि गरज होतीच. ह्या करारानुसार फ्रेंच नेव्ही ने तंत्रज्ञान हस्तांतर करण्याच मान्य केल आणि ह्या पाणबुड्याची निर्मिती माझगाव डॉक इकडे सुरु झाली.
कलावारी सोबत खांदेरी आणि कारंज ह्या दोन पाणबुड्याच काम अंतिम टप्प्यात असून २०१८ मध्ये ह्या दोन्ही पाणबुड्या भारतीय नौदलात समाविष्ट होती. आण्विक पाणबुडी च तंत्रज्ञान असताना डीझेल पाणबुडी का? आण्विक पाणबुडी च तंत्रज्ञान क्लिष्ट आहे. त्यामुळे त्याची बांधणी सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप कठीण आहे. ह्याशिवाय ह्या पाणबुड्यांचा एक मोठा अवगुण म्हणजे ह्या पाणबुड्या मध्ये असणाऱ्या अणुभट्टी ला सतत कुलंट पंप कराव लागते. हे पंपिंग छोटा पण ओळखता येईल असा ध्वनी निर्माण करते. ह्यामुळे पाणबुडी शत्रूच्या नजरेत येण्याची शक्यता खूप असते. पण ह्या तुलनेत डीझेल-इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर पाणबुड्या ए.आय.पी. म्हणजेच एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन चा वापर करत आवाज न होऊ देता काम करू शकतात. एअर इंडिपेंडंट प्रपोल्शन मध्ये इथेनॉल आणि ऑक्सिजन चा वापर करत वाफ निर्माण केली जाते. ह्या वाफेचा वापर करून टर्बाईन ला फिरवून उर्जेची निर्मिती पाणबुडीत केली जाते.
हवेतून प्रवास करण जितक सोप्प त्याच्या बरोबर उलट पाण्याखालून प्रवास करण कठीण आहे. मॉरीशस ला मी असताना अश्याच एका पाणबुडीतून ३० मिटर खालच माशांच, जलचरांच विश्व बघण्याचा योग आला. अवघ्या एका तासामध्ये जीवाची झालेली घालमेल, झालेला कोंडमारा तसेच पाण्याच्या वजनामुळे डोळ्याच्या बुबुळावर पडणाऱ्या दाबामुळे रंगसंगती ओळखण्यात झालेले बदल ह्या सगळ्या गोष्टीनी पाण्याखाली रहाण किती कठीण असू शकेल ह्याचा अंदाज आला होता. हे सगळ अवघ्या ३५ मिटर वर तर ३५० मिटर खोलीवरच्या त्रासाची कल्पना मी करूच शकत नाही. म्हणूनच अश्या पाणबुडी मध्ये काम करून देशाच रक्षण करणाऱ्या सर्वच नौसैनिकांना मानाचा सलाम.
माणसाच्या शारीरिक क्षमताना धाप टाकायला लावणाऱ्या अश्या पाणबुड्याच निर्माण आणि त्यामागच तंत्रज्ञान अवगत करून त्यांची निर्मिती करण हा खूप मोठा टप्पा आहे. म्हणून पाणबुडी निर्मिती तंत्रज्ञान आज मोजक्याच देशांकडे आहे. ह्यात स्वबळावर निर्मिती करून भारत अश्या देशांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे. आय.एन.एस. कलावारी च्या येण्याने भारतीय नौदलाची ताकद कमालीची वाढली आहेच पण हे तंत्रज्ञान स्वबळावर निर्माण करणार माझगाव गोदीतील संपूर्ण कामगार वर्ग कौतुकास पात्र आहे. ह्याच्या मागोमाग अजून २ पाणबुड्यांची निर्मिती आणि त्यांची भारतीय नौदलाकडून स्वीकृती येत्या वर्षभरात होईल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आय.एन.एस कलावारी च्या सर्व निर्मात्यांचे अभिनंदन आणि सलाम.