Sunday, 4 September 2022

एका लाईफ लाईन ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका लाईफ लाईन ची गोष्ट... विनीत वर्तक ©

'कोन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम अनेकांनी बघितलेला आहे आणि अनेकांना माहिती आहे. यात भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्यांचा प्रवास सुरु ठेवण्यासाठी संधी दिली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या 'लाईफ लाईन' चा ऑप्शन दिले जातात. याच लाईफ लाईन करोडपती बनण्यासाठी एक महत्वाचा दुवा असल्याचं अनेकदा या कार्यक्रमात स्पष्ट झालेलं आहे. लाईफ लाईन नसेल तर करोडपती होण्याचं  कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे खऱ्या आयुष्यात ही अश्या लाईफ लाईन असतात ज्या आपलं जीवन आणि मृत्यू यामधल्या दुवा असतात. जेव्हा तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यातून वगळता तेव्हा तुमचा प्रवास हा मृत्यू च्या दिशेने वेगाने होतो हे पुन्हा एकदा काल स्पष्ट झालं. 

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पालघर इथल्या चारोटी नाक्याजवळ असणाऱ्या एका ब्रिज ला धडकून प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मेस्त्री यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यातून सायरस मेस्त्री यांनी लाइफ लाईन ला दिलेला चकवा हे प्रमुख कारण आहे. ते ज्या गाडीतून प्रवास करत होते ती मर्सिडीज गाडी भारतातील एक सुरक्षित गाडी समजली जाते. मर्सिडीज आपल्या नावाप्रमाणे एक अतिशय सुरक्षित आणि आधुनिक कार आहे. यात अनेक प्रणाली आहेत ज्या या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी बनवल्या गेल्या आहेत. पण सगळं असलं तरी ते वापरण्याचा अधिकार आणि हक्क हा शेवटी त्या प्रवाश्याचा असतो. जर तो त्यांनी बजावला नाही तर लाईफ लाईन न वापरल्यामुळे जन्म आणि मृत्यू यातलं अंतर कमी होत जाते. 

काही आठवड्यांपूर्वी मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय नेतृत्व विनायक मेटे यांचा सुद्धा अश्याच एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. फोर्ड एन्डेव्हर सारखी सुरक्षित गाडी असताना पण त्यांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. या अपघातानंतर समोर आलेलं कारण म्हणजे लाईफ लाईन ला दिलेला चकवा. तुमची गाडी कितीही सुरक्षित असली तरी त्यात दिलेल्या लाईफ लाईन जर तुम्ही वापरल्या नाहीत तर तुमच्या जन्म - मृत्यू मधलं अंतर कमी झालेलं असते हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. तुम्ही पुढल्या सीट वर बसा अथवा मागच्या सीट वर. सीट बेल्ट ही तुमची लाईफ लाईन आहे. तिचा वापर टाळला तर कोणत्याही अपघातात मृत्यू च्या समीप ज्याण्यापासून कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही. 

काल झालेल्या अपघातात सायरस मेस्त्री यांच्या गाडीत पुढल्या सीट वर बसलेले दोघेही जण वाचलेले आहेत. तर मागच्या सीट वर बसलेल्या दोन्ही जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की मर्सिडीज गाडीचं इंजिन गाडीच्या पुढल्या भागात आत मधे घुसलं. पण इतकं होउन सुद्धा पुढल्या सीट वरील दोघेही जण बचावले याच कारण दोघांनी सीट बेल्ट लावलेला होता. त्यांच्या जन्म आणि मृत्यू मधे सीट बेल्ट ची लाईफ लाईन होती. पण मागच्या सीट वर बसलेल्या दोघांनी सीट बेल्ट लावलेला नसल्याने मृत्यू ने त्यांना सहज कवटाळलं. समोरच्या सीट वर डोकं आदळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पुढल्या सीट वरील लाईफ लाईन ने असं होण्यापासून वाचवल्याने त्या दोघांचे प्राण वाचले. मर्सिडीज गाडीच्या फ्रंट सीट वरील दोन्ही एअर बॅग्स डिप्लॉय झाल्या पण सगळ्यात मोठी लाईफ लाईन होती ती म्हणजे सीट बेल्ट. पोलीस पकडतील म्हणून लाईफ लाईन वापरणं हा विचार जोवर जात नाही तोवर अश्या अपघातात आयुष्य जात राहणार. सीट बेल्ट हे पोलिसांसाठी नाही तर तुमच्या आयुष्यासाठी आहेत. 

एक सोपं गणित आपण केलं तर १०० किलोमीटर अंतर १०० किलोमीटर/ तास वेगाने गाठायला वेळ लागेल साधारण १ तास. पण जर तुम्ही हेच अंतर ८० किलोमीटर/ तास वेगाने कापलं तर तुम्हाला वेळ लागेल १ तास १५ मिनिटे. पण त्याचवेळी अपघातात तुमच्या जीवाला असणारा धोका हा निम्मा होईल. प्रत्येक १६ किलोमीटर / तास वेग वाढल्यावर तुमच्या जीवाला असणारा धोका दुप्पट होत जातो. याचा अर्थ साधा आहे की १५ मिनिटांसाठी तुम्ही तुमच्या आयुष्याचा धोका दुप्पट करणार का? एक्स्प्रेस वे वर किंवा कोणत्याही चांगल्या रस्त्यावर पोलीस अथवा कॅमेरे आहेत म्हणून गाडी योग्य वेगात चालवणार की तुमच्या आयुष्याचा धोका कमी करण्यासाठी चालवणार? हा प्रश्न आपण स्वतः ला विचारायला हवा. जेव्हा असे प्रश्न आपण स्वतःसमोर ठेवू तेव्हा कोणी बघते आहे का नाही याने तुमच्या गाडीच्या वेगात कोणताच बदल होणार नाही. तुमची गाडी भले २०० किलोमीटर / तास चालवण्यासाठी सक्षम असेल पण तुम्हाला एखाद्या संकटाच्या वेळी मिळणारा काळ हा अर्ध्यापेक्षा कमी झालेला असतो. त्याचवेळी मेंदूवरील ताण कैक पटीने वाढलेला असतो. 

एखादी १०० किलोमीटर/ तास वेगाने जाणाऱ्या गाडीला संपूर्णपणे थांबवण्यासाठी कमीत कमी १०० मीटर च अंतर गरजेचं असते. पण जर का हाच वेग ८० किलोमीटर / तास असेल तर लागणार अंतर हे अवघे ६८ मीटर इतकं असेल. पावसाळ्यात जेव्हा रस्ते ओले असतात तेव्हा हेच अंतर अजून वाढलेलं असते. याशिवाय एखाद्या चालकाचं रिएक्शन टाइम काय आहे यावर पण खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. साहजिक जास्त वेग असेल तर मिळणारा वेळ हा खूप कमी असेल आणि गाडी त्या वेळेत आटोक्यात आणणं शक्य होत नाही. हे सगळं गणित मांडण्याचा अर्थ एकच की काळ कधीही कोणासाठी येऊ शकतो पण ती वेळ येऊ देणं अथवा तिला टाळणं आपल्या हातात असते. ती वेळ टाळण्यासाठी कोणत्याही गाडीत लाईफ लाईन दिलेल्या असतात. त्याचा वापर करा. १ किंवा २ लाख रुपये वाचतील म्हणून लाईफ लाईन वगळून गाडी घेऊ नका. एखाद्या अडचणीच्या वेळी तेच १ ते २ लाख रुपये तुमच्या आयुष्याची लांबी वाढवू शकतात. 

तुम्ही भले कितीही सुरक्षित आणि नियमात गाडी चालवली तरी समोरचा तसे चालवेल असं नाही. भारतात सगळेच आपल्या आवडी प्रमाणे गाडी चालवतात. ज्याला जी लेन आवडते तो त्या लेन मधून गाडी चालवतो. मूड बदलला की मागचा पुढचा विचार न करता लेन पण चेंज करतो. भारतात ज्या पद्धतीने ड्राइव्हिंग लायसन्स दिले जातात त्यावर मी अजून काही अधिक लिहण्याची गरज नाही. रिक्षावाले, ट्रकवाले, नवशिके, माज असणारे आणि मिरवणारे असे सगळेच आपल्याला रोजच्या रोज भेटत असताना जर का आपण आपल्या लाईफ लाईन ला चुकवत असू तर मृत्यू आपली वाट बघत उभा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज ना उद्या तो आपल्याला खिंडीत गाठणारच. त्यासाठीच आपल्या लाईफ लाईन चा वापर करा. कोणासाठी नाही तर स्वतःच्या जीवासाठी वाहतुकीचे नियम पाळा. १५ मिनिटांनी १०० किलोमीटर अंतर गाठताना तुमच्या आयुष्यात कोणताही फरक पडत नसतो. पण त्या १५ मिनिटांसाठी आयुष्य दावणीला बंधू नका. अर्थात हे मला सुद्धा लागू आहे. ड्राइव्ह करत असताना अनेकदा माझ्याकडून ही याच उल्लंघन झालं आहे. पण मी लाईफ लाईन कधीच विसरत नाही. माझ्या नोकरीच्या ठिकाणी गाडीत बसल्यावर सीट बेल्ट लावणं हा नोकरीचा एक कायदा आहे. जो मोडला तर तुमच्या नोकरीवर गदा येऊ शकते. आधी जाचक वाटणारी ही अट आज माझ्यासाठी लाईफ लाईन ठरली आहे. 

सायरस मेस्त्री असो वा विनायक मेटे किंवा तुमच्या, आमच्या सारखं सामान्य माणूस. तुम्ही फ्रंट सीट वर आहात की बॅक सीट वर, पोलीस किंवा कॅमेरे आहेत किंवा नाहीत या वरून तुमच्या लाईफ लाईन चा वापर ठरवू नका. गाडीत बसल्या क्षणी लाईफ लाईन सोबत स्वतःला बांधून घ्या. काय माहित पुढच्याच वळणावर त्याची गरज तुम्हाला पडेल..... 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment