बदलणारी मानसिकता... विनीत वर्तक ©
सगळ्यात कठीण काम कोणतं असेल असा प्रश्न विचारला तर माझ्या मते सगळ्यात कठीण काम म्हणजे एखाद्या व्यक्ती, संस्कृती, राष्ट्र किंवा समाजाची मानसिकता बदलवणं. माणूस हा समाजप्रिय आहे. त्या समाजाचे, संस्कृतीचे काही नियम असतात जे पिढ्यानं पिढ्या पुढे नेले जातात. जेव्हा त्या समजुतीला छेद दिला जातो तेव्हा ते स्विकारणं किंवा त्या नवीन प्रवृत्तीला स्थान देणं इतकं सहजतेने होत नाही. भारतात आणि भारतीय लोकांमध्ये विशेष करून स्वातंत्र्यानंतर अनेक प्रवृत्ती या जोपासल्या गेल्या आहेत तर काही जाणून बुजून रुजवल्या गेल्या आहेत. त्याच प्रवृत्तींना छेद देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याच मला विशेष कौतुक आहे. पिढ्यानं पिढ्या जोपासलेली मानसिकता नक्कीच एका दिवसात किंवा एका वर्षात बदलणार नाही हे कितीही सत्य असलं तरी त्याची सुरवात कुठेतरी होताना बघणं सुखदायक आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हाताच्या बोटावर मोजल्या जाणाऱ्या स्वातंत्र्य वीरांच योगदान होतं तसेच इतर अनेक स्वातंत्र्य वीरांचं होतं. स्वातंत्र्य लढा हा कोण्या एका कुटुंबाने लढलेला नव्हता. पण स्वतंत्र्य भारतात या लढ्यासाठी आणि एकूणच देशासाठी एकाच कुटुंबाने रक्त वेचल्याचा दिखावा तयार केला गेला. वातावरण निर्मिती केली गेली. त्यासाठी प्रत्येक माध्यमाचा वापर करण्यात आला. मग तो शालेय अभ्यासक्रम असो, सरकारी धोरणं असो वा भारतीय लोकांची मानसिकता असो सगळीकडे एकाच कुटुंबाची मक्तेदारी राहील असं बघण्यात आलं. त्यामुळेच गेल्या ७५ वर्षाच्या काळात जवळपास २-३ पिढयांना इतिहासातील खऱ्या हिरोंची ओळख कधी झालीच नाही. ज्या प्रमाणे एका कुटुंबाचं अथवा काही विशिष्ठ व्यक्तींचं योगदान नेहमीच समोर ठेवलं गेलं त्याचवेळी दुसऱ्या लोकांनी केलेल्या प्रयत्नांना जाणीव पूर्वक इतिहासाच्या पानात लुप्त करण्यात आलं.
लहानपणी जेव्हा जेव्हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल वाचनात आलं तेव्हा मनोमन एकच प्रश्न पडायचा की या लढ्यात किती असे चेहरे होते ज्यांच बलिदान आपल्याला कधी कळलच नाही. त्यातील एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. एकीकडे गांधीजींची चाले जाव चळवळ आणि मिठाचा सत्याग्रह होता तर त्याचवेळी जागतिक पातळीवर नेताजींनी एक सशस्त्र लढा ब्रिटिश सरकार विरुद्ध उभारला होता. 'इंडियन नॅशनल आर्मी' सारख्या संघटनेची उभारणी नेताजींनी ज्या पद्धतीने केली ते अनेकांसाठी प्रेरणादायी आजही ठरू शकते. त्या संघटनेतील कितीतरी व्यक्तिमत्व आज भारतीयांना माहिती नाहीत. त्यांच्या संघटनेमधील प्रत्येक विरावर एक चित्रपट बनेल इतक्या त्यांच्या साहसाच्या कथा आहेत. ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील कित्येक सरदारांवर आज चित्रपट येत आहेत, कित्येक सरदारांच्या कथा नवीन पिढीला प्रेरणा देत आहेत मग ते बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, शिव काशीद, येसाजी कंक, हंबीरराव मोहिते अशी अनेक नावं घेता येतील. त्या प्रमाणे नेताजींच्या सेनेतील प्रत्येक सैनिकाची स्वतःची अशी एक कथा आहे. प्रत्येकाने ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध फक्त आपल्या देशात नाही तर दुसऱ्या भूमीवर जाऊन लढा दिला. ब्रिटिश सरकारचे डोळे उघडले. शस्त्र आणि सैन्याच्या जोरावर ब्रिटिश आपलं साम्राज्य आता सांभाळू शकत नाहीत याचा अर्थ कोणी समजावून सांगितला असेल तर तो नेताजींच्या इंडियन नॅशनल आर्मी ने.
अंहिसेची चळवळ जर ब्रिटिश सरकारचा मूक प्रतिकार होती तर नेताजींची सशस्त्र चळवळ ब्रिटिश साम्रज्याला खिंडार पाडणारी होती. या दोघांशिवाय भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. पण जाणूनबुजून एका कुटुंबच आणि व्यक्तीच महत्व स्वतंत्र्य भारतात वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. जेव्हा जेव्हा नेताजींचा इतिहास वाचला तेव्हा तेव्हा मनात हाच प्रश्न यायचा की आजच्या काळात कुठे आहेत नेताजी? कुठे आहेत त्यांच्या शूर वीरांच्या कथा? आम्हाला ज्या प्रमाणे अहिंसेचे धडे देण्यात आले त्याचप्राणे कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा धडा का शिकवला गेला नाही? भारताने कधीच कोणावर आक्रमण केलं नाही मग आमच्यावर होणाऱ्या आक्रमणाला, लुटमारीला आम्ही अहिंसेने सामोरं जायचं हा विचार कुठेतरी मनाला अस्वस्थ करणारा होता. ज्या छत्रपतींना आम्ही दैवत मानतो, ज्यांच्या मराठा साम्राज्याने एकेकाळी अटकेपार झेंडे रोवले. त्या मराठ्यांनी अंहिसेने शत्रूच्या समोर नांगी टाकायच्या. हे विचार अक्षरशः मला स्वतःला अस्वस्थ करणारे होते. मी अहिंसेच्या विरोधात नाही. मी कोणावर कधीच हल्ला केला नाही. मी कधीच कोणाचं घर उध्वस्थ केलं नाही. पण जर कोणी माझं घर उध्वस्थ करत असेल तर मी अंहिसेने लढा का द्यायचा. अरे ला कारे? केलं तर आपल्या वरील अन्याय थांबू शकतो या मताचा मी आहे. त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जर कोणी निर्णायक कलाटणी दिली असेल तर ते होते नेताजी आणि त्यांची इंडियन नॅशनल आर्मी.
आज एकाच कुटुंबाच्या आडनावांची नावं देशातील संस्था, रस्ते, कार्यक्रम यांना जाणीवपूर्वक देण्यात आली. त्यांच्यावर रकाने भरून लेख लिहले गेले, त्यांचेच धडे पाठयपुस्तकातून शिकवले गेले. भारतातील अश्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांना जाणीवपूर्वक बगल दिली गेली. एक मानसिकता तयार करण्यात आली की देशाचं स्वातंत्र्य एकाच कुटुंबाच्या त्यागातून मिळालेलं आहे. याच मानसिकतेला आज फाटा दिला जातो आहे हे बघणं मला व्यक्तिशः सुखदायक आहे. ही मानसिकता आहे गुलामगिरीची, ही मानसिकता आहे मृगजळाची, ही मानसिकता आहे घराणेशाहीची. या सगळ्या मानसिकतांना फाटा देताना बघणं मला व्यक्तिशः खूप आनंद देऊन जाते आहे. माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबानी, माझ्या ८ पिढीने देशासाठी काहीतरी केलं म्हणून त्याची आठवण ठेवत मला पण दैवत्व बहाल करा ही मानसिकता आज जी सगळ्या क्षेत्रात वाढत जाते आहे ती मानसिकता आज बदलण्याची गरज आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण, ते देशातील कोणतंही क्षेत्र असो स्वकर्तृत्व हेच व्यक्तीच्या आदराचं प्रमाण असलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे.
काल दोन चांगल्या घटना घडल्या एक म्हणजे ब्रिटीज गुलामगिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजपथाचे नाव बदलून 'कर्तव्यपथ' असं केलं गेलं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा झालेला योग्य सन्मान. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष उलटून गेल्यावर का होईना देशाच्या स्वातंत्र्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेताजींचा सन्मान हा नक्कीच एका बदलणाऱ्या मानसिकतेचा संकेत आहे. त्यांचा सन्मान झाला म्हणून दुसऱ्या कोणाचा अनादर झाला असा अर्थ काढणारे अनेक महाभाग आणि तत्त्वज्ञांनी असतील. प्रत्यक्षात ज्या व्यक्तींना आजवर डावललं गेलं त्यांना पुन्हा एकदा प्रकाशात आणलं जात आहे याच कौतुक आपण मनापासून केलं पाहिजे. पण गेली ७५ वर्ष विशिष्ठ प्रवृत्ती आणि मानसिकता जोपासणाऱ्या लोकांना ते कितपत पचेल याबद्दल मनात शंका आहे.
भारत आणि भारतीय संस्कृती, भारतीय लोकशाही, भारतीय समाज, भारतीय इतिहास आज भारतीयांना वेगळ्या नजरेतून, मानसिकतेमधून बघण्याची आणि शिकण्याची गरज आहे. वेगळ्या मानसिकतेमधून बघणं म्हणजे कोणाचा अनादर करणं नव्हे तर ज्यांचा आदर, सन्मान करायला आपण आजवर चुकलो आहोत, ज्या इतिहासाची पाने आपण अजून वाचली नाहीत, ज्या संस्कृतीला आपण आजवर अनुभवलेलं नाही. ते बघणं, शिकणं आणि आत्मसात करणं म्हणजेच बदलणारी मानसिकता.
जय हिंद!!!
तळटीप :- वर लिहलेली मते माझी स्वतःची मते आहेत. ती न पटल्यास सोडून देणे. कृपया करून माझ्या पोस्ट वर आपल्या मतांची हुज्जत घालू नये ही विनंती.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment