Thursday, 29 September 2022

#दुर्गाशक्ती_२०२२_पाचवं_पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२२_पाचवं_पान... विनीत वर्तक © 

कोणीतरी सांगून ठेवलं आहे, 

मंजिले उन्हीं को मिलती हैं, जिनके सपनो मैं जान होती हैं, 

यूँही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती हैं।

आयुष्यात स्वप्नं सगळेच बघतात पण ते प्रत्यक्षात उतरवण्याची धमक खूप कमी जणांत असते. ही गोष्ट आहे अश्याच एका आई आणि मुलीच्या जोडीची, ज्यांनी आपल्या स्वप्नांच्या पंखांना मेहनत आणि जिद्दीचं बळ दिलं आणि अश्या गोष्टी प्रत्यक्षात करून दाखवल्या ज्या आजवर जगात कोणालाच जमलेल्या नाहीत. हे करत असताना आपल्या मुलीसमोर तिच्याच आईने स्वतःचा एक आदर्श निर्माण केला आहे. त्यासोबत आपल्या मुलीच्या प्रत्येक यशात आणि अपयशात खंबीरपणे ती एक आई, कोच आणि टीम मेम्बर म्हणून पाठीशी उभी राहिली आहे. तिच्या मुलीने आपल्या आईकडून संस्कारांचे, मेहनतीचे आणि जिद्दीचे बाळकडू शिकून भारताचा तिरंगा जगाच्या कानाकोपऱ्यात फडकवला आहे. साक्षात दुर्गाशक्तीचं रूप असणाऱ्या त्या आहेत लीना शर्मा आणि भक्ती शर्मा. 

गोष्ट सुरू होते 'Venice of the East' असं ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरपासून. लीना शर्मा यांना आपल्या मुलीने मोठं होऊन काहीतरी भव्यदिव्य करावं असं मनापासून वाटत होतं. प्रत्येक आईला आपल्या मुलाने मोठे होऊन नाव कमवावे असे वाटत असते त्यात काही वेगळे नाही. पण लीना शर्मा यांनी अगदी लहानपणापासून आपल्या मुलीच्या भवितव्यावर मेहनत घ्यायला सुरूवात केली. लीना शर्मा यांना पोहण्याची खूप आवड होती. पण परिस्थितीमुळे त्यांना कोच वगैरे ठेवणं शक्य नव्हतं. पण आपल्या मुलीच्या बाबतीत त्यांनी ते शिवधनुष्य स्वतः उचललं. वयाच्या २.५ वर्षी भक्तीला त्यांनी पाण्याची ओळख करून दिली. त्यातून सुरू झाला एक पोहण्याचा प्रवास. 

भक्तीच्या आयुष्यात कलाटणी देणारा निर्णय घेण्याची वेळ आली जेव्हा ती १४ वर्षाची होती. तिच्या आईने म्हणजेच लीना शर्मानी तिला स्विमिंग पूल मधून ओपन वॉटरमध्ये पोहण्याचा सल्ला दिला. वयाच्या १३ व्या वर्षी भक्ती शर्माने उरण ते गेट वे ऑफ इंडिया हे १६ किलोमीटरचं अंतर ४ तासांत कापलं तर धरमतल ते गेट वे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचं अंतर ९ तास ३० मिनिटांत २००४ साली सलग पोहून पार केलं. ओपन वॉटर पोहणं हे एखाद्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्यापेक्षा खूप वेगळं आहे. इकडे तुमचा फक्त स्टॅमिना महत्वाचा नसतो तर निसर्गाशी तुम्हाला जुळवून घ्यायचे असते. समुद्राच्या पाण्यात येणाऱ्या लाटा, बदलणारा प्रवाह, भोवरे, वारा, मासे आणि त्यातली जैव विविधता या सोबत खाऱ्या पाण्याची सवय अश्या अनेक अडचणींवर मात करावी लागते. यासाठी खडतर मेहनतीची मानसिकता असावी लागते. भक्तीने वयाच्या १३ व्या वर्षी या सर्व आव्हानांना तोंड देत आपण अजून मोठ्या कामगिरीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. 

इंग्लिश खाडी पोहणं हे प्रत्येक स्विमरचे एक स्वप्न असते, ते भक्तीचेही होते. वयाच्या १६ व्या वर्षी २००६ मधे तिने १३ तास ५५ मिनिटात इंग्लिश खाडी पोहून पार केली. आपल्या मुलीच्या पराक्रमात एक कोच म्हणून भूमिका निभावत असताना लीना शर्मा यांच्या मनात सुद्धा अनेक वर्षं लपलेली इच्छा आकार घेत होती. त्यांनी आपल्या मुलीला आपली इच्छा बोलून दाखवल्यावर सुरू झाला एका आईचा आणि मुलीचा पोहण्याचा प्रवास. ४ डिग्री सेल्सिअस तपमान असलेल्या पाण्यात अनेक तास पोहणं सोप्पं नव्हतं. पण म्हणतात न, 'हौसलों से उड़ान होती हैं" त्याप्रमाणे आई आणि मुलीने एकत्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं ठरवलं जे आजवर जगात कोणालाच जमलेलं नव्हतं. १३ जुलै २००८ ला लीना शर्मा आणि भक्ती शर्मा यांनी इंग्लिश खाडी पोहून पार करण्यासाठी उडी घेतली. पण वाऱ्यांचा वेग आणि लाटांचा वेग वाढल्यावर त्यांना तो प्रयत्न मधेच सोडून द्यायला लागला होता. अपयश आल्यावरही दोघीही डगमगल्या नाहीत. पुन्हा एकदा सर्व तयारीनिशी त्यांनी इंग्लिश खाडी पोहायला सुरवात केली. पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशानंतर फक्त १० दिवसांनी २३ जुलै २००८ रोजी आई आणि मुलीने एकाचवेळी इंग्लिश खाडी पोहण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. 

भक्तीचा प्रवास इकडे थांबत नाही तो इकडून सुरू होतो. २००४ मध्ये हिंद महासागर, २००७ मध्ये पॅसिफिक महासागर, २०१० मध्ये आर्क्टिक महासागर तर २०१५ मध्ये अंटार्टिक महासागर अश्या चारही महासागरांत पोहण्याचा पराक्रम करणारी आशियातील पहिली मुलगी तर जगातील सगळ्यांत लहान वयामध्ये असा पराक्रम करणारी स्विमर ती ठरली आहे. २०१५ मधे १ डिग्री सेल्सिअस पाण्याच्या तपमानात तिने ४१ मिनिटात २.३ किलोमीटर अंतर कापून एक नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हे करताना तिने लिन कॉक्स (अमेरिका) आणि लेविस पुग (ब्रिटिश) अश्या प्रख्यात स्विमरचे विश्वविक्रम मोडीत काढले. तिच्या या विश्वविक्रमी कामगिरीची नोंद घेताना तिला भारत सरकारकडून २०१५ सालच्या तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आई आणि मुलीने मिळून आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात तर उतरवलं पण तसं करत असताना भारताच्या तिरंग्याची शान विश्वात उंचावर नेली. लीना आणि भक्ती शर्मा यांचं कार्य तिथे थांबत नाही तर स्विमिंगच्या माध्यमातून राजस्थानसारख्या राज्यात त्यांनी मुलीचं महत्व समाजाला पटवून देण्यासाठी काम सुरू केलं आहे. आपल्या यशाचं रहस्य सांगताना भक्ती सांगते, 

“I always believe that you have to be a little crazy to do great things in life and being crazy means never giving up.”

एक आई आणि एक मुलगी ठरवलं तर एकाच वेळी आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकतात. एक आई कश्याप्रकारे मार्गदर्शक बनून आपल्या मुलींच्या पंखाला बळ देऊ शकते हे लीना शर्मा यांनी दाखवून दिलं आहे. आई आणि मुलीच्या रूपात दिसणारं दुर्गाशक्तीचं अनोखं रूप समाजाला खूप काही शिकवून जाणारं आहे. विश्वपटलावर भारतीय स्त्रीबद्दल असलेली चुकीची मानसिकता बदलवत लीना आणि भक्ती शर्मा यांनी भारतीय स्त्रीच्या एका नव्या रूपाचं दर्शन जगाला दाखवलेलं आहे. त्यांच्या या पराक्रमाला माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




No comments:

Post a Comment