Monday 26 September 2022

#दुर्गाशक्ती_२०२२_दुसरं_पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२२_दुसरं_पान... विनीत वर्तक ©

२०२० चं साल उजाडलं तेच मुळी कोरोनाच्या आगमनाने. कोरोनाचा प्रसार भारतात आणि जगात वेगाने होत होता. आजपर्यंत एकट्या भारतात ४.५ कोटी लोकांना कोरोनाने गाठलेलं आहे. तर आजपर्यंत जवळपास ५.५ लाख लोकांना आपल्या जीवाला मुकावं लागलं आहे. संपूर्ण जगाला कोरोनाने अक्षरशः थांबायला लावलं. त्याचवेळी भारतात आणि जगात या रोगावर संशोधन सुरू झालं. जगातील सर्वात मोठ्या दोन लोकशाही देशांना या रोगाचा सगळ्यात मोठा फटका बसला. ते देश म्हणजे अमेरिका आणि भारत. कोरोना रोगावर लस आल्यानंतरही ज्या प्रकारे या रोगाचं संक्रमण आजच्या क्षणालाही सुरू आहे, तो मोठ्या अभ्यासाचा विषय आहे. मुळात हा व्हायरस शरीरात कश्या प्रकारे शिरतो? शिरल्यावर तो कश्या प्रकारे माणसाच्या विविध भागांवर हल्ला करतो? कश्या प्रकारे याचं संक्रमण रोखता येऊ शकेल? अश्या एक ना अनेक प्रश्नांवर जगात आजही संशोधन सुरू आहे. कोरोना व्हायरसचा एकूण प्रवास आणि त्याचा स्त्री आणि पुरुषांवर वेगळ्या पद्धतीने होणारा हल्ला याचं एक संशोधन एका डॉक्टर आई मुलीच्या जोडीने पुढे आणलं आहे. भारतातील आणि अमेरिकेतील कोरोना व्हायरसच्या विळख्यात आलेल्या रुग्णाचं संशोधन करून एक वेगळाच निष्कर्ष त्यांनी जगापुढे मांडला आहे. त्या आहेत दुर्गाशक्ती डॉक्टर जयंती शास्त्री आणि डॉक्टर अदिती शास्त्री. 

डॉक्टर जयंती शास्त्री या मुंबईच्या संसर्गजन्य रोगावर संशोधन करत असलेल्या कस्तुरबा हॉस्पिटलच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या अध्यक्ष आहेत. तर डॉक्टर अदिती शास्त्री या मॉन्टेफिओर मेडिकल सेंटर आणि अल्बर्ट आइनस्टाइन कॉलेज ऑफ मेडिसिन, ब्रॉन्क्स, न्यूयॉर्क येथील ऑन्कोलॉजीच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. कोरोना महामारीच्या विळख्यात जग सापडलं असताना आई आणि मुलीची जोडी जगाच्या दोन टोकांवर कोरोना व्हायरसवर आपापल्या पद्धतीने संशोधन करत होत्या. भारतात आणि अमेरिकेत एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनाने आपल्या विळख्यात घेतलं. या रुग्णांमधील लक्षणे, त्यांच्या शरिराने केलेला प्रतिकार आणि रुग्णाला बरा होण्यास लागणारा वेळ अश्या अनेक प्रश्नांचा वेध आई-मुलीची जोडी आपल्या पद्धतीने घेत होती. आपलं संशोधन कुठल्या पद्धतीने पुढे जाते आहे? काय अडचण येते आहे? या गोष्टींवर या आई आणि मुलीच्या दररोज चर्चा व्हायच्या, घरी जाताना ट्रॅफिक मधून कारने प्रवास करताना मिळालेल्या वेळात या गोष्टी बोलल्या जायच्या. अमेरिकेत ज्यावेळी डॉक्टर अदिती शास्त्री आपल्या कामाच्या ठिकाणी जायला निघायच्या, त्याच वेळी इकडे मुंबईच्या ट्रॅफिक मधून जयंती घरी जात असायच्या. संशोधनातून समोर येणारे निष्कर्ष एकमेकींना सांगत असताना त्यात एक सुसूत्रता दिसायला लागली. कोरोना व्हायरस हा स्त्रियांपेक्षा पुरुषांना आपलं लक्ष लवकर आणि सहजगत्या बनवतो. तसेच स्त्रियांपेक्षा पुरुषांना कोरोना व्हायरसच्या विळख्यातून बाहेर यायला अधिक वेळ लागत असल्याचं त्यांच्या संशोधनात स्पष्ट दिसत होतं. जगाच्या दोन कोपऱ्यांमधील रुग्णांमधून समोर येणारे निष्कर्ष कोरोना व्हायरसबद्दल एक नवीन माहिती समोर आणत होते. 

आई आणि मुलीने आपापल्या टीमसोबत त्या पद्धतीने यावर अजून संशोधन केल्यावर समोर आलेले निष्कर्ष अजून काही गोष्टींवर प्रकाश टाकणारे होते. कोरोना व्हायरसला माणसाच्या शरीरात प्रवेश देणारे रिसेप्टर असते ACE2. हे रिसेप्टर पुरुषांच्या अंडकोषात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. पण त्याच वेळी स्त्रियांच्या अंडाशयात मात्र हे अजिबात नसते. भारतात आणि अमेरिकेमधील रुग्णांचा अभ्यास केल्यावर पुरुषांची कोरोना होण्याची आणि त्यात जीव गमावण्याची संख्या स्त्रियांच्या तुलनेत खूप जास्ती असल्याचं आकडे सांगत होते. याचा अर्थ पुरुषांच्या अंडकोषात असणारे हे रिसेप्टर कदाचित कोरोनाच्या व्हायरसच्या मुक्कामाचं स्थान किंवा त्याला मदत करणारे असू शकेल असा निष्कर्ष त्यातून समोर येत होता. 

ACE-2 or Angiotensin receptor-2 हे रिसेप्टर कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीन सोबत मिसळून त्या व्हायरसला माणसाच्या पेशीमध्ये यायला प्रवेशद्वार उघडं करून देत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात ACE-2 रिसेप्टर माणसाच्या शरीरात असणार तितक्या मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसची लागण, प्रसार आणि त्याची क्षमता जास्त असणार हे उघड आहे. डॉक्टर जयंती शास्त्री आणि डॉक्टर अदिती शास्त्री यांच्या संशोधनातून पुढे आलेल्या निष्कर्षात पुरुषांच्या अंडकोषात मुबलक प्रमाणात असणारं हेच रिसेप्टर स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना या व्हायरसची लागण, प्रसार आणि मृत्यूच्या समीप नेत असल्याचं या संशोधनातून स्पष्ट होत आहे. कोरोना व्हायरस झालेल्या पुरुष रुग्णांच्या अंडाशयाला या रोगातून बरे झाल्यावर काही त्रास होतो का? पुरुषांचे अंडाशय या रोगाच्या प्रसारात कश्या पद्धतीने निर्णायक भूमिका बजावते? पुरुष आणि स्त्रियांना वेगवेगळ्या पद्धतीने औषध देण्याची गरज आहे का? अश्या इतर अनेक प्रश्नांचा वेध आई आणि मुलीची जोडी जगाच्या दोन कोपऱ्यांवर घेत आहे. 

कोरोना व्हायरसला समजून घेण्यात एक महत्वाचं संशोधन करणाऱ्या डॉक्टर जयंती शास्त्री आणि डॉक्टर अदिती शास्त्री या दुर्गाशक्तीचं एक रूप आहेत. दोन वेगळ्या पिढ्यांचं नेतृत्व करताना आई आणि मुली मधील संवाद हा मानवाच्या एका रोगावरील संशोधनाला वेगळी कलाटणी देण्याची ताकद ठेवतो हे या निमित्ताने अधोरेखित होते आहे. आपापली क्षेत्रं आणि आपापलं वेगळ्या रस्त्यावरचं संशोधन सांभाळून, एकमेकांचे अहंकार आडवे न येऊ देता जगाच्या दोन कोपऱ्यांतही मूलभूत संशोधन होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे. कोरोना व्हायरसच्या संशोधनात एक कलाटणी देणारं संशोधन करणाऱ्या दुर्गाशक्ती डॉक्टर जयंती शास्त्री आणि डॉक्टर अदिती शास्त्री यांना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढील संशोधनास खूप खूप शुभेच्छा..

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



1 comment: