सेमीकंडक्टर ची गोष्ट... विनीत वर्तक ©
सध्या महाराष्ट्रात सर्वांच्या तोंडावर सेमीकंडक्टर हे नाव गाजते आहे. फॉक्सकॉन सारख्या कंपनांच्या नावाचा उदो आणि उद्धार एकाचवेळी सुरु आहे. यात सर्व सतरंजी उचलणारे कार्यकर्ते, भक्त आणि राजकारणी सर्वांनीच उडी घेतली आहे. एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यात कोण बरोबर आणि कोण चुकीचं यातल्या राजकारणात मला जायचं नाही. पण यातल्या एकाला जरी सेमीकंडक्टर म्हणजे काय रे भाऊ? असं विचारलं तर दिवसा ढवळ्या तारे दिसतील अशी परिस्थिती आहे. सेमीकंडक्टर म्हणजे काय? नक्की त्याचा उपयोग कुठे आणि कसा होतो? येणाऱ्या काळात सेमीकंडक्टर कसा हुकमाचा एक्का बनणार आहे आणि त्यात भारताचा काय सहभाग असेल? या सर्व गोष्टी आपण राजकारणापलीकडे समजून घ्यायला हव्यात.
सेमीकंडक्टर म्हणजे काय? समजून घ्यायचं असेल तर आपण एखाद्या फिल्टर चा विचार करावा. ज्या प्रमाणे फिल्टर सगळंच लिक्विड भळाभळा जाऊन देत नाही आणि ते एकदम बंद पण होत नाही. तर ते योग्य प्रमाणात लिक्विड फिल्टरिंग करून त्यातून बाहेर येत असते. सेमीकंडक्टर अगदी असच काम करतो. तो आपल्यातून इलेक्ट्रिक करंट सहजतेने जाऊ पण देत नाही पण त्याला संपूर्णपणे थांबवत पण नाही. तसेच हा अवरोध एका बाजूने कमी तर दुसऱ्या बाजूने जास्ती असू शकतो. याचा अर्थ सेमीकंडक्टर चा अवरोध हा बदलणारा आहे. त्याशिवाय त्याचे गुणधर्म हे प्रकाश आणि हिट ( उष्णतेने ) बदलतात. याचा अर्थ आपण जर या गोष्टी आपल्याला हव्या तश्या आणि हव्या तेव्हा बदलल्या तर आपण एकाच वेळी इलेक्ट्रिक कंडक्टर आणि इलेक्ट्रिक इन्स्युलेटर अश्या दोन्ही गोष्टी साध्य करू. त्यामुळेच सेमीकंडक्टर हे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा पाठीचा कणा आहे.
सेमीकंडक्टर कसे काम करतात हे समजून घ्यायला अणू ची रचना आपण समजून घेतली पाहिजे. ज्या प्रमाणे कोणत्याही मूलद्रव्याच्या मूळ रचनेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रस्थानी असतात आणि इलेक्ट्रॉन हे एखाद्या विशिष्ठ कक्षेत फिरत असतात हे आपण शाळेत शिकलेलो आहोत. सर्व साधारण मूलद्रव्यांच्या बाबतीत एखादा, दुसरा इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत असतो. पण जे मटेरीयल सेमीकंडक्टर असतात त्यांच्या बाहेरच्या कक्षेत मात्र चार इलेक्ट्रॉन असतात. ते चार इलेक्ट्रॉन इतर चार इलेक्ट्रॉन सोबत बंध करतात. जर का असं झालं तर ते मटेरियल स्वतःला क्रिस्ट्ल स्ट्रक्चर मधे बदलते. उदाहरण द्यायचं झालं तर सिलिकॉन क्रिस्टल. तर हे सेमीकंडक्टर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणात इलेक्ट्रिक करंट हा नियंत्रित करतात. जेव्हा आपल्याला पाहिजे तेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच इलेक्ट्रिक करंट कोणत्याही उपकरणात पाठवतात. अश्या पद्धतीची रचना करण्यासाठी आधी मोठ्या व्हॅक्युम ट्यूब आणि खूप मोठं इलेक्ट्रिक करंट लागायचं. पण सेमीकंडक्टर आल्यानंतर त्याचा आकार कमी कमी होत गेला.
एकेकाळी डेस्कटॉप कम्प्युटर ते आज अगदी मुठीत मावणाऱ्या मोबाईल फोन च्या आकारात झालेला बदल हा मुख्यत्वे सेमीकंडक्टर च्या आकारात आणि कार्यक्षमतेत झालेल्या बदलांमुळे आहे. एखाद्या सेमीकंडक्टर चिप मधे इजिप्त मधल्या पिरॅमिड मधे लागलेल्या सर्व दगडांपेक्षा जास्त ट्रान्झिस्टर असतात. जेवढे जास्ती ट्रान्झिस्टर तितकी त्या चिप ची कार्यक्षमता जास्ती. आज जगात १०० बिलियन पेक्षा जास्ती इंटिग्रेटेड सर्किट रोज वापरले जातात. या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे ते म्हणजे सेमीकंडक्टर. आज भारत त्याला लागणारे सर्वाच्या सर्व १००% सेमीकंडक्टर परदेशातून आयात करतो. एकट्या २०१९ मधे भारताने तब्बल ५० बिलियन अमेरिकन डॉलर किमतीचे सेमीकंडक्टर आयात केले आहेत. आज सेमीकंडक्टर कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, बँकिंग, सिक्युरिटी, हेल्थकेअर, ट्रान्सपोर्टेशन, मॅन्युफॅक्चयुरिंग अश्या सगळ्याच क्षेत्रात गरजेचे आहेत.
आज तैवान सारखा देश सेमीकंडक्टर क्षेत्रात दादा देश आहे. सेमीकंडक्टर बनवण्यासाठी तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि एकूणच त्याच्या निर्मिती मधील छोट्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. १९७४ मधे ७५०० अमेरिकन डॉलर च्या मुद्दलीवर 'टेरी गाऊ' यांनी 'हॉन हाय' म्हणजेच 'फॉक्सकॉन' कंपनीची स्थापना केली. आज फॉक्सकॉन च बाजार मूल्य तब्बल ७० बिलियन तैवान डॉलर च्या पलीकडे गेलं आहे. भारताची सेमीकंडक्टर ची गरज भागवण्यासाठी आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी फॉक्सकॉन ने वेदांता या भारतीय कंपनीशी भागीदारी करत सेमीकंडक्टर बनवण्याचा उद्योग उभारण्याची सुरवात करण्यासाठी पावलं टाकली. महाराष्ट्र नेहमीच त्यांच पहिलं डेस्टिनेशन होता. पण महाराष्ट्रातील राजकारण आणि बदलणारं अस्थिर सरकार त्यांची धोरणे याला वैतागून त्यांनी गुजरात ची निवड केली आहे. नक्कीच यामुळे महाराष्ट्रातील रोजगार हा गुजरात मधे गेला आहे यामधे दुमत नाही. पण राजकारण्यांची आणि त्यांच्या धोरणांची धरसोड वृत्ती, स्वतःचे इगो जपण्याचं राजकारण आणि आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट दाखवण्याची वृत्ती याला जबाबदार आहे. हे अपयश कोण्या एका पक्ष, राजकीय नेता अथवा सरकारच नाही तर संपूर्ण राजकीय अस्थिरतेच आहे. आता इकडले त्यांच्या खापर फोडतील आणि तिकडले इकडल्यांवर पण या सगळ्यात महाराष्ट्राच्या होणाऱ्या नुकसानीची कोणाला काही पडलेली नाही हे सत्य पुन्हा एकदा सिद्ध होते आहे.
सेमीकंडक्टर येणाऱ्या काळात हुकमाचा एक्का असणारं आहे. ज्याच्याकडे सेमीकंडक्टर ची सूत्र असतील तो देश, राज्य आणि ती कंपनी येणाऱ्या काळात इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री च नेतृत्व करणार आहे. त्यामुळे एकमेकांचे वाभाडे काढण्याच्या राजकारणात न गुंतता तोच वेळ सेमीकंडक्टर आणि येणाऱ्या काळाची पावलं ओळखण्यात दिला तर आपण आपल्या भविष्याचा मार्ग सुकर केला असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
जय हिंद!!!
तळटीप :- पोस्ट चा उद्देश राजकीय नाही. तेव्हा कोणत्याही पद्धतीची राजकीय कमेंट यावर करू नये.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Radiator
ReplyDeleteaakash05yadav@gmail.com
ReplyDelete