Tuesday 27 September 2022

#दुर्गाशक्ती_२०२२_तिसरं_पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२२_तिसरं_पान... विनीत वर्तक ©

१९८३ चं वर्ष होतं जेव्हा भारताची अर्थव्यवस्था ही भारतापुरती मर्यादित होती. त्याचवेळी अमेरिकेतलं आपलं उज्ज्वल भविष्य सोडून भारतात परतलेले डॉक्टर प्रताप रेड्डी काय करता येईल याचा विचार करत होते. अमेरिकेतील वैद्यकीय व्यवस्था आणि त्याकाळी भारतात अस्तित्वात असलेली वैद्यकीय व्यवस्था यांच्यामधील दरी त्यांना स्पष्ट दिसत होती. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी भारताच्या वैद्यकीय सेवेला एक नवीन उंची देण्याचं ठरवलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी भारतात पहिल्यांदा १५० खाटांचं एक कॉर्पोरेट प्रायव्हेट हॉस्पिटल उभं केलं. ज्याचं नाव होतं 'अपोलो हॉस्पिटल'. कोणत्याही गोष्टीची सुरूवात ही सोपी असते पण त्या लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं काम मात्र सगळ्यात कठीण असते. आपल्या वडिलांनी लावलेल्या याच लहान रोपट्याचं रूपांतर आज प्रचंड मोठ्या अश्या वटवृक्षात केलं आहे, त्यांच्या चार दुर्गाशक्तीनी. आज जगातील १४० देशांत अपोलो हॉस्पिटलचं जाळं विणलं गेलं आहे. १०,००० पेक्षा जास्ती खाटा, ४०० क्लिनिक, ५००० पेक्षा जास्त फार्मसी जगात पसरलेल्या आहेत. एकट्या भारतात तब्बल ५३ हॉस्पिटल असून त्यांची क्षमता ८००० पेक्षा जास्त रुग्णांना सामावून घेण्याची आहे. डॉक्टर प्रताप रेड्डी यांच्या या रोपट्याचं महाकाय वटवृक्षात रूपांतर करणाऱ्या दुर्गाशक्ती आहेत प्रिथा रेड्डी, सुनीता रेड्डी, शोभना कामीनेनी आणि संगीता रेड्डी. 

डॉक्टर रेड्डींना एक सोडून चार मुली असल्याबद्दल त्यांची अवहेलना पांढरपेशा समाजाने केली. लोकं त्यांना खिजवून म्हणत असत, 

'Poor Reddy has four daughters and no son to help run his company'... 

पण याच चार मुलींनी पांढरपेशा समाजाच्या विचारसरणीची लक्तरे वेशीवर टांगून सिद्ध केलं की मुलगी कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. तिने दुर्गेचं रूप घेतलं तर एका लहान रोपट्याचं ती वटवृक्षात रूपांतर करू शकते. आज अपोलो हॉस्पिटलचा रेव्हेन्यू तब्बल १४,००० कोटी रुपयांच्या (जवळपास २ बिलियन अमेरिकन डॉलर) पलीकडे गेला आहे. डॉक्टर रेड्डींच्या याच चार मुली त्यांच्या या वटवृक्षाचा पाया मजबूत करून त्याचा पसारा नुसत्या भारतातच नव्हे तर जगभरात वेगाने वाढवत आहेत. यात नुसता पैश्याचा वाटा नाही तर अपोलो हॉस्पिटलला ISO 14001 आणि 0991 अशी जागतिक दर्जाची गुणवत्तेची सर्टिफिकेट मिळवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. याशिवाय हॉस्पिटल क्षेत्रात मापदंड समजल्या जाणाऱ्या Joint Commission International accreditation सर्टिफिकेट त्यांच्या भारतातील ८ हॉस्पिटल्सना मिळालेलं आहे. 

पण चौघींसाठीही हा प्रवास सोप्पा नव्हता. आपल्या वडिलांनी जो एक पल्ला गाठला होता त्यावर पुढे जाणं एक मोठं शिवधनुष्य होतं. लहानपणापासून आपल्या वडिलांचा प्रवास जवळून अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली. अगदी शाळेतून बाहेर पडल्यानंतर चौघीही आपल्या वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या वडिलांना जमेल तशी मदत करत होत्या. त्यातूनच या बिझनेसचे बाळकडू त्यांनी आत्मसात केले. कॉर्पोरेट हॉस्पिटल कश्या पद्धतीने चालते? समोर येणाऱ्या अडचणी मग त्या वैद्यकीय असो अथवा प्रशासनाच्या असो, या सगळ्या त्यांना लवकर समजल्या. सार्वजनिक प्रशासनाचं पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर प्रिथाने हॉस्पिटलच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शोभनाने फार्मसी आणि इंश्युरन्स बिझनेस मधील प्लॅनिंग, डिझाईन आणि अंमलबजावणी अश्या कामाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. ती अपोलो म्युनिच हेल्थ इंश्युरन्सची डायरेक्टर बनली. 

संगीताने आय. टी. उपक्रम आणि क्लिनिक नेटवर्कची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या जबाबदारीचा भाग म्हणून तिच्या खांद्यावर संशोधन, नवे उपक्रम आणि आरोग्यसेवेशी निगडित उपक्रम यांची जबाबदारी आली. याशिवाय अपोलो हॉस्पिटलच्या मानव संसाधन विभाग आणि आय. टी. विभागाची कार्ये यांची संपूर्ण जबाबदारी तिने उचलली. तर दुसरीकडे सुनीताने रुग्णालयांचा दैनंदिन व्यवसाय आणि कंपनीचे आर्थिक पैलू व्यवस्थापित ठेवण्याची जबाबदारी उचलली. याशिवाय तिच्याकडे कॉर्पोरेट रणनीती, वित्त, निधी, आणि गुंतवणूक आणि विलीनीकरणाचा लाभ याचे सर्व निर्णय घेऊन नफा अनुकूल करण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर आहे. 

जो समाज डॉक्टर रेड्डी यांना मुलगा नाही म्हणून आता तुमचा व्यवसाय कोण पुढे नेणार? असा प्रश्न विचारून हिणवत होता, त्याला या चार दुर्गाशक्तींनी आपल्या कार्यातून सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आज अपोलो हॉस्पिटलच्या सर्व व्यवसायात तब्बल ६२,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. ५३ वेगवेगळ्या हॉस्पिटल ,त्यांच्या वैद्यकीय सेवा आणि संपूर्ण आर्थिक व्यवसायाची घडी या चार दुर्गाशक्तींनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली आहे. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मते त्या बहिणींपेक्षा चार मैत्रिणी आहेत. त्यांची लग्नं झालेली असतानासुद्धा त्यांचे नवरे या बिझनेसपासून अलिप्त आहेत. आपल्या वडिलांच्या किंवा आपल्या नवऱ्यांच्या नावाखाली न लपता अथवा न दबता या चार बहिणींनी आपलं स्वतःचं अस्तित्व आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. 

कॉर्पोरेट क्षेत्रात अपोलो हॉस्पिटलचं साम्राज्य उभारून ते पुढे वाढवत जगाच्या नकाशावर आपला ब्रँड निर्माण करणाऱ्या या चार दुर्गाशक्ती म्हणजेच भारतीय स्त्रिया काय करू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. मुलगा असला म्हणजेच आपला वंश पुढे जातो या समाजाच्या मान्यतेला आपल्या कर्तृत्वातून या दुर्गाशक्तींनी फाटा दिला आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment