Sunday, 25 September 2022

#दुर्गाशक्ती २०२२_ पहिलं पान... विनीत वर्तक ©

#दुर्गाशक्ती २०२२_पहिलं पान... विनीत वर्तक ©

भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आलं आहे. अजूनही हा पगडा समाजाच्या अनेक भागांत, गावांत, शहरांत कायम आहे. स्त्रीकडे नेहमीच एक वस्तू म्हणून अगदी पांढरपेशा समाजात आजसुद्धा बघितले जाते. सोशल मिडिया वापरणाऱ्या कित्येक स्त्रियांना याचा अनुभव अगदी रोज येत असतो. एकटी, विधवा, घटस्फोट झालेली किंवा स्वबळावर आपला प्रवास करणारी प्रत्येक स्त्री अव्हलेबल असते. हेच प्रतिबिंब यातल्या प्रत्येक स्त्रीच्या इनबॉक्समध्ये पुरुषांकडून येणाऱ्या मेसेजच्या रूपात बघायला मिळते. त्यामुळेच एकटी स्त्री समाजाच्या पटलावर आजही स्वतःला असुरक्षित समजते. कारण प्रत्येक क्षणाला तिच्या उंचवट्यांवर पडणारी नजर किती वाईट असू शकते आणि कोणत्या थराला जाऊ शकते याचा अंदाज तिच्या सिक्स्थ सेन्स ला नेहमी येत असतो. ही गोष्ट आहे अश्याच एका स्त्रीची, जिने समाजाच्या या विखारी आणि वासना भरलेल्या नजरेपासून स्वतःचं आणि आपल्या मुलीचं रक्षण करण्यासाठी असा एक निर्णय घेतला ज्याची कल्पना एखादी दुर्गाशक्तीच करू शकते. 

गोष्ट सुरू होते तामिळनाडू मधल्या कटुनायक्कनपट्टी या गावातून. या गावात राहणाऱ्या एस. पेटचीअमल हिचं वयाच्या २० व्या वर्षी लग्न झालं. सुखी संसाराची सुरूवात एका नवीन प्रवासाने झाली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. लग्नाला १५ दिवस होत नाही तोवर तिच्या नवऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण या १५ दिवसांत तिने एका नवीन वळणावर प्रवेश केला होता. ते वळण होतं मातृत्वाचं. एका छान गोंडस मुलीला जन्म दिल्यावर आपल्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटवण्यासाठी ती मिळेल ते काम करू लागली. पण पितृसत्ताक समाजात विधवा झालेल्या स्त्रीकडे वासनेने बघणाऱ्या नजरा कमी नव्हत्याच. त्या समाजात एका विधवेच्या भावनांची कोणी कदर करेल याची सुतराम शक्यताही नव्हती. बांधकामाच्या ठिकाणी, हॉटेल ते चहाच्या टपरीवर आपल्या मुलीला घेऊन दोन वेळचं पोट भरत असताना आपल्या लहान मुलीला दूध पाजताना तिच्या त्या ब्लाउजमधून बाहेर पडणाऱ्या उरोजांकडे वासनेने बघणाऱ्या नजरांचा सामना ती करत होतीच. पण त्या नजरा वडील नसलेल्या आपल्या मुलीवरही पडू शकतात हे एका आईने ओळखलं होतं. जेवणाची भ्रांत असताना आणि काम, पैसे मिळत नसताना या सर्व नजरांपासून वाचण्याचा एकच उपाय तिच्या समोर होता. 

एस. पेटचीअमल मधली दुर्गाशक्ती जागी झाली आणि तिने सरळ तिरुचेंदूर मुरुगन मंदिर गाठलं. तिकडे तिने आपले केस कापून टाकले. आपला पेहराव बदलून टाकला. शर्ट आणि लुंगी घालून एस. पेटचीअमल देवळातून बाहेर पडली ती 'मुथु' बनून. तिथून सुरू झाला एक असा प्रवास ज्यात तिचं अस्तित्व हे फक्त तिच्या मुलीला आणि काही जवळच्या लोकांना माहित होतं. मुथु बनून तिने हाताला पडेल ते काम करायला सुरूवात केली. रंगारी पासून ते कडिया पर्यंत. पुरुष बनल्यावर तिच्याकडे आणि तिच्या मुलीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलून गेला. वासनेची नजर आदरात बदलली. मुथु ला आता लोक 'अन्नाची' असं आदरयुक्त बोलवायला लागले. गेली ३६ वर्षं मुथु म्हणून जगल्यावर वयाच्या ५७ व्या वर्षी जेव्हा शरीराने मजुरीची काम करणं जड होऊ लागल्यावर तिने आपली खरी ओळख जगासमोर आणली. MGNREGS (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act 2005 or MNREGA) च्या माध्यमातून जॉब मिळवण्यासाठी तिला आपली खरी स्त्री असल्याची ओळख द्यावी लागली. गेल्या ३६ वर्षांत आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळखपत्र अश्या सर्व सरकारी दस्तवेजांवर तिची ओळख मुथु अशी नोंदली गेली आहे. या काळात तिने आपल्या मुलीला शिकवून तिचं लग्नही चांगल्या घरात केलं. आता तिची मुलगी एका सुखवस्तू घरात आनंदाने जगते आहे. 

एस. पेटचीअमलला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मुथु म्हणून जगायचं आहे. आज तिच्या मुलीचं लग्न झालं तरी त्या अजूनही वासनेच्या नजरा विसरलेल्या नाहीत. त्यामुळेच आजही पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात यायला तिचं मन धजावत नाही हे मला आपल्या समाजाचं खूप मोठं अपयश आहे असे मला व्यक्तिशः वाटते. स्त्री आजही स्वतःला सुरक्षित समजत नाही. आपल्या आणि आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी आजही तिला दुर्गाशक्तीचे एक रूप घ्यावे लागते. समाजाला त्याची जागा दाखवून द्यावी लागते. आजच्या जमान्यात पुरुषी समाज व्यवस्थेला तिचं प्रतिबिंब दाखवत गेली ३६ वर्षं आपल्या मुलीचा सांभाळ करत तिला एक सन्मानाचं आयुष्य देताना स्वतःचं अस्तित्व पुसून टाकत दुर्गाशक्तीचं एक वेगळं प्रतिबिंब दाखवणाऱ्या एस. पेटचीअमल यांना माझा कडक सॅल्यूट. त्यांनी दाखवलेल्या दुर्गाशक्तीचं स्वरूप एकीकडे स्त्री शक्तीची जाणीव करून देणारं आहे, एका आईचा संघर्ष दाखवणारं आहे तर दुसरीकडे समाजाचा बुरखा फाडणारंही आहे. एस. पेटचीअमल म्हणूनच या वर्षीच्या दुर्गाशक्तीच्या पहिल्या पानाच्या मानकरी आहेत.
 
फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



4 comments:

  1. अतिशय सुंदर लेख

    ReplyDelete
  2. एका स्रिला आपलं स्त्रीत्व लपवून जगावं लागलं हे निरोगी समाजाचं लक्षण नाही.

    ReplyDelete
  3. Can I share these columns on whatsapp group with your name..???

    ReplyDelete
  4. खरंच हे समाजाचं दुर्दैव आहे, की एका स्त्रीला पुरुष बनून आयुष्य काढावं लागलं, धन्य ती दुर्गा माता,तिला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹

    ReplyDelete