Sunday, 4 September 2022

प्रगतीची पावलं... विनीत वर्तक ©

 प्रगतीची पावलं... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या आकड्यांप्रमाणे भारताने ब्रिटन ला मागे टाकत जी.डी.पी. च्या आर्थिक निकषानुसार ५ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. भारताची अर्थव्यवस्थेच मुल्य साधारण ३.५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर तर ब्रिटन च्या अर्थवयवस्थेचं मुल्य याच काळात ३.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर राहिलेलं आहे. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी नंतर भारत जगातील सगळ्यात मोठी ५ वी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. नक्कीच ही अतिशय चांगली बातमी असली तरी आपण काही बाबतीत खूप मागे आहोत. आर्थिक आकडे अनेकदा फसवे असतात. त्यासाठीच मुळात जी.डी.पी. म्हणजे काय? एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थे बद्दल नक्की ती काय सांगते? भारताची खरोखर प्रगती होत आहे का? असे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनात येत असतील तर याच प्रश्नांचा उपापोह खाली घेतला आहे. 

जी.डी.पी. म्हणजे काय तर सकल राष्ट्रीय उत्पन्न. सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या विशिष्ठ काळात देशात लोकांनी खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवा यांच एकत्रित मूल्य. जितकी ही खरेदी जास्त तितकी एखाद्या देशाची अर्थव्यवस्था चांगली असं ढोबळमानाने मानण्यात येते. इकडे काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जश्या महागाई आणि आयात - निर्यात इत्यादी. त्यामुळे आकडे हे बदलू शकतात. तर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचं मुल्य होतं २.७ लाख कोटी रुपये. भारताची लोकसंख्या होती जवळपास ३४० मिलियन ( ३४ कोटी ). आपण गणित केलं तर साधारण प्रत्येक भारतीयांच दरडोई उत्पन्न जवळपास २६५ रुपये इतकच होतं. २०२२ येता येता भारताच्या अर्थव्यवस्थेचं मुल्य आता ३.५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर च्या पल्याड गेलं आहे. पण त्याच वेळी भारताची लोकसंख्या १४१ कोटी पलीकडे गेली आहे. जर गणित केलं तर दरडोई ही उत्पन्न जवळपास १,२८,८२९ रुपये इतकं झालं आहे. 

ब्रिटन ची लोकसंख्या लक्षात घेतली तर त्यांच दरडोई जी.डी.पी. जवळपास ४७,००० अमेरिकन डॉलर इतक प्रचंड आहे. त्यामुळे भारताने जरी आकड्यांच्या बाबतीत भारताने आघाडी घेतली असली तरी एकूणच जीवन मानाचा स्तर आपण उंचावण्या पासून आपण ब्रिटन पेक्षा खूप मागे आहोत. असं सगळं असलं तरी भारत २०२९ पर्यंत जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालेली असेल. २०१४ साली आपण जगात १० व्या स्थानावर होतो. गेल्या ८ वर्षात आपण ५ स्थानांची उडी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग बघता आपण येत्या काळात चांगल्या स्थितीत असणार आहोत. भारताकडे १९५० च्या आसपास जवळपास १.८२ बिलियन अमेरिकन डॉलर च परदेशी चलन होतं. आज भारताकडे ५७३ बिलियन अमेरिकन डॉलर च परकीय चलन आहे. जे भारताची पुढली सहा महिन्यांची गरज सहज भागवू शकेल. 

आपण आज अनेक बाबतीत स्वयंपूर्ण आहोत. भारत आज जगातील सगळ्यात मोठा दूध, मसाल्याचे पदार्थ आणि ज्यूट उत्पादक आहे. तर भात, गहू, ऊस, भाजीपाला, फळ, कापूस, कोळसा, सिमेंट यांच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय इलेक्ट्रिसिटी उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या ७५ वर्षाचा प्रवास बघितला तर भारताने काही असाध्य गोष्टी साध्य केल्या आहेत. अजून खूप लांबचा पल्ला बाकी आहे. भारताची लोकसंख्या लक्षात घेतली तर आपण दरडोई उत्पनाच्या बाबतीत ब्रिटन किंवा इतर अनेक देशांना मागे टाकायला खूप वर्ष लागतील. कारण भारताची लोकसंख्या इतकी प्रचंड आहे की हे जवळपास अशक्य आहे. पण त्याचवेळी भारत एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात खूप चांगली प्रगती करतो आहे. हळू हळू का होईना भारतातील नागरिकांचे राहणीमान उंचावत जाते आहे. १९९१ पर्यंत भारत एक बंदिस्त अशी अर्थव्यवस्था होती. त्यानंतर भारत एक खुली अर्थव्यवस्था म्हणून जागतिक मंचावर पुढे आला आहे. त्यामुळे एकूणच भारतीय प्रगतीचा आलेख बघायचा असेल तर १९९१ ते २०२२ हा कालखंड आपण लक्षात घ्यायला हवा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment