Thursday, 1 September 2022

तेजस मार्क २... विनीत वर्तक ©

 'तेजस मार्क २'... विनीत वर्तक ©

भारताचं तेजस लढाऊ विमान सद्या जागतिक बाजारात खूप चर्चिल जात आहे. भारता नंतर मलेशिया ने १८ तेजस विमानांची ऑर्डर भारताला दिलेली आहे. अनेक जागतिक विमानांना स्पर्धेत मागे टाकत तेजस विमानाला पसंती मलेशियाने दिली आहे. मलेशिया पाठोपाठ अर्जेंटिना ने तेजस विमानात रुची दाखवली आहे. भारताच्या विदेश मंत्रांच्या दौऱ्यात अर्जेंटिना ने तेजसची खरेदी करण्यास उत्सुक असल्याचं स्पष्ट केलं आहे. या नंतर कोलंबिया, इजिप्त या देशांनी तसेच त्याच सोबत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन्स देशांनी तेजस विमान खरेदी करण्यात उत्सुक असल्याचं कळवलं आहे. अचानक जागतिक बाजारपेठेत तेजस विमानांच महत्व का वाढलं? खरच तेजस इतकं प्रभावी आहे का? तेजस पार्ट २ साठी नुकतीच भारत सरकारने मंजुरी दिली आहे? तर नक्की तेजस पार्ट २ काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. 

तेजस एक लाईट कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्ट आहे. जगात मिडीयम आणि हेवी एअरक्राफ्ट खूप आहेत. पण त्यांचा देखभालीचा खर्च हा भरपूर आहे. त्यामुळेच अनेक देशांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळेच संरक्षण करून सुद्धा स्वस्त आणि किफायतशीर लढाऊ विमानांकडे अनेक देश वळत आहेत. तेजस ची किंमत आणि देखभालीचा खर्च इतर लढाऊ विमानांच्या तुलनेत कमी आहे. तेजस त्याच्या गटातील अगदी सर्वोत्तम लढाऊ विमान नसलं तरी तुल्यबळ नक्कीच आहे. भारताने हे लढाऊ विमान स्वबळावर निर्माण केलेलं असल्यामुळे त्याच्या निर्यातीसाठी भारताला तात्विक दृष्ट्या कोणत्या देशाची परवानगी घेण्याची गरज नाही. तेजस ज्या विमानाला सगळ्यात जास्ती टक्कर देतो आहे ते विमान म्हणजे पाकिस्तान- चीन यांनी संयुक्तरित्या बनवलेले जे.एफ. १७. खरेदी करण्याचं अर्जेंटिना ने जवळपास नक्की केलं होतं पण अचानक कहानी मधे एक ट्विस्ट आला. अर्जेंटिना ने भारताच्या तेजस विमानांची माहिती मागवली. पुढे काय होतं ते येणारा काळ ठरवेल पण एकंदरीत तेजस ने जागतिक बाजारपेठेत स्वतःबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे हे नक्की. 

भारत सरकारच्या कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी ने तेजस मार्क २ च्या विकासासाठी ६५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तेजस मार्क २ ची निर्मिती भारत करतो आहे ते आपल्या निवृत्त होणाऱ्या लढाऊ विमानांची जागा घ्यायला. एकीकडे तेजस मार्क १,  मिग २१ विमानांची जागा घेते आहे. त्याच वेळी येत्या काळात निवृत्त होणाऱ्या मिग २९, मिराज २००० आणि जॅग्वार विमानांची जागा घेण्यासाठी भारताने तेजस मार्क २ विमान निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजस मार्क २ हे मिडीयम कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्ट असेल. ४.५ ++ पिढीतील राफेल सारख्या विमानाला तोडीस तोड असेल. काही बाबतीत तर राफेल पेक्षा  सरस असेल. तसेच काही बाबतीत जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान एफ २२ राफ्टर मधील काही तंत्रज्ञान तेजस मार्क २ मधे असणार आहे. तेजस मार्क २ हे कनार्ड डेल्टा विंग पद्धतीचे असणार आहे. यात जनरल इलेक्ट्रिक च जेट इंजिन बसवलं जाणार आहे. हे विमान ६५०० किलोग्रॅम वजनाची शस्त्रास्त्र घेऊन जाण्यात सक्षम असणार आहे. 

तेजस मार्क २ वर भारताने निर्माण केलेली अस्त्र मार्क १, २ आणि ३ ही बी.व्ही.आर. मिसाईल बसवण्यात येणार आहेत. यातील अस्त्र मार्क ३ ची क्षमता ३५० किलोमीटर अंतराची असणार आहे. तेजस मार्क २ वर उत्तम ए.इ.एस.ए. रडार बसवलं जाणार आहे. या रडार ची क्षमता १ स्क्वेअर मीटर आकाराच्या कोणत्याही  ऑब्जेक्ट चा १७० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून वेध घेण्याची आहे. तसेच तेजस मार्क २ च कॉकपीट हे Indium Oxide Layer ने बनलेलं असणार आहे. अश्या पद्धतीचं कॉकपीट एफ २२ रॅप्टर या विमानात आहे. या लेअरमुळे रडार लहरी शोषल्या जातात आणि विमान सुरक्षित रहाते. कोणत्याही विमानासाठी महत्वाचं असते ते आर.सी.एस. रडार क्रॉस सेक्शन. हे आर.सी.एस. जितकं कमी तितकं ते विमान रडार वरून अदृश्य असते. तेजस मार्क २ विमानाचं आर.सी.एस. हे अवघे ०. १ स्केवर मीटर असणार आहे. राफेल च आर.सी. एस. हे जवळपास १ ते १.२५ स्केवर मीटर इतकं असते. यावरून लक्षात येईल की तेजस मार्क २ मधे अनेक अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

तेजस मार्क २ च पहिलं उड्डाण येत्या २-३ वर्षात अपेक्षित आहे. तर २०३० पर्यंत त्याच उत्पादन अपेक्षित आहे. त्याच सोबत भारत स्वबळावर ए.एम.सी.ए. आणि टी.बी.डी.एफ. या लढाऊ विमानांची पण निर्मिती करत आहे. भारतीय वायू सेनेने आधीच १२३ तेजस एम के १ लढाऊ विमानांची ऑर्डर दिलेली आहे. तेजस मार्क २ वर भारताच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी येत्या काळात असणार आहे. राफेल आणि सुखोई ३० एम के आय सोबत तेजस भारतीय वायू सेनेचा कणा राहणार आहे. 

जागतिक स्तरावर तेजस मार्क १ या विमानांच्या विक्रीसाठी भारत प्रयत्नशील आहे मलेशिया नंतर अनेक देश तेजस घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. तेजस जरी सगळ्या बाबतीत सर्वश्रेष्ठ नसलं आणि काही गोष्टी कमतरतेच्या असल्या तरी अनेक गोष्टी जमेच्या ही आहेत. येत्या काळात एकूणच लढाई करण्याची पद्धत ही बदलत जाणार आहे. त्यामुळे काळानुरूप बदल करत तेजस मार्क २ येत्या काळात भारताच्या संरक्षणासाठी सज्ज असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तूर्तास तेजस च्या निर्मिती आपलं योगदान देणाऱ्या सर्व वैज्ञानिक, अभियंते, संस्था, उद्योग समूह या सर्वांचा आभारी आहे. 

जय हिंद!!!                 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



No comments:

Post a Comment