Saturday 17 September 2022

'डार्ट'... विनीत वर्तक ©

 'डार्ट'... विनीत वर्तक © 

साधारण ६५-६६ मिलियन वर्षापूर्वी ( १ मिलियन म्हणजे १० लाख ) पृथ्वीवर मनुष्याने वस्ती करण्याअगोदर डायनोसर च अधिराज्य होतं. ते जर राहिलं असतं तर कदाचित मानवाचा आजचा प्रवास झाला नसता. पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. १० ते १५ किलोमीटर आकाराचा अशनी ३० किलोमीटर / सेकंद वेगाने पृथ्वीवर कोसळला. त्याच्या आघाताने तब्बल २० किलोमीटर खोल विवर तयार झालं आणि पृथ्वीवर तब्बल १६५ मिलियन वर्ष अधिराज्य केल्यावर पृथ्वीवरून डायनोसर या जातीचा संपूर्णपणे विनाश झाला. आपल्याला कोणी हरवू शकत नाही आणि मीच या जगाचा राजा या गर्वाला नियती अवघ्या १०-१५ किलोमीटर च्या अशनीने संपवू शकते हा इतिहास मानवाला माहिती आहे. डायनोसर च्या समोर आपण अगदी क्षुद्र मग आपलं अस्तित्व नष्ट करायला याहीपेक्षा कमी आकाराची गरज नियतीला लागेल. तीच भिती मानवाला सतावत आहे. आज जेव्हा मानवाने निर्माण केलेलं तंत्रज्ञान अतिशय उच्च दर्जाचं असलं तरी नियतीच्या आस्मानी संकटातून वाचवण्याची ताकद मात्र त्यात आलेली नाही. 

पृथ्वीच्या उत्पत्तीपासून पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची मालिका चालत आलेली आहे. त्यात खंड पडण्याची कोणतीही शक्यता नाही. आता विकसित झालेल्या तंत्रज्ञानातून आणि आपण वेध घेतलेल्या लघुग्रहांच्या कक्षेवरून ही शक्यता प्रत्येक ५०,००० वर्षात एक इतकी वैज्ञानिक सांगत आहेत. डायनोसर सारख्या प्राण्याचं किंवा एकूणच पृथ्वीवर असलेल्या प्रजातींच अस्तित्व नष्ट करणारा अशनी प्रत्येक ३ लाख वर्षात एकदा आदळण्याची शक्यता वैज्ञानिक व्यक्त करतात  किंवा आजचं आधुनिक तंत्रज्ञान ते आकडे सांगते. कोणाला वाटेल किती मोठा काळ आहे. त्यामुळे आपण घाबरण्याचं कारण नाही. पण गेल्या ६५ मिलियन वर्षात पृथ्वीवर असा अशनी आदळलेला नाही. हीच सगळ्यात मोठी धोक्याची घंटा सध्या वैज्ञानिकांना सतावत आहे. जर इतके वर्षात काही घडलं नाही तर उद्याचा उजाडणारा दिवस पण निर्णायक असू शकतो. 

आज माणसाने आपलं तंत्रज्ञानाचा वापर करून अश्या लघुग्रहांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. कारण जर आपल्याला असा एखादा  लघुग्रह आढळला जो पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत असेल तर पुढे काय? आपण पृथ्वी आणि त्या लघुग्रहाची टक्कर टाळू शकतो का? टाळू शकतो तर कशी? यावर अनेक वर्ष वैज्ञानिक संशोधन करत आहेत. अशा एखाद्या टकरीपासून बचावाचे अनेक मार्ग तात्विक आणि वैज्ञानिक दृष्ट्या समोर असले तरी जे सध्याच्या तंत्रज्ञानाने प्रत्यक्षात उतरवू शकतो असे खूप कमी आहेत. यातला एक मार्ग आहे तो म्हणजे अशा एखाद्या लघुग्रहावर आण्विक बॉम्बस्फोट करून त्याचा मार्ग बदलवणे अथवा त्याला नष्ट करणं. पण १६ ते ३० किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रवास करणाऱ्या लघुग्रहाचा वेध अवकाशात घेणं सोप्प नाही. तसेच या आण्विक स्फोटातून पृथ्वीला होणारा संभाव्य धोका महत्वाचा आहे. आण्विक स्फोट योग्य तऱ्हेने घडवून आणण्यासाठी आपल्याला लघुग्रहाची कक्षा, अंतर आणि किती वेळापूर्वी आपल्याला त्याच्या बद्दल माहिती मिळते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. जेव्हा या सर्व गोष्टींचं गणित जुळून येईल तेव्हाच आपण आण्विक मिसाईल चा वापर करू शकतो. 

सध्यातरी १० ते १५ किलोमीटर लांबीचा सजीवांचा अस्तित्व नष्ट करणारा कोणताही अशनी येत्या १०० वर्षात पृथ्वीला टक्कर देण्याची शक्यता नाही असं नासा ने स्पष्ट केलं आहे. पण सगळ्यात मोठं आव्हान आहे ते छोट्या आकाराच्या लघुग्रहाचं. जे अचानक आपल्याला पृथ्वीच्या जवळ आल्यावर दृष्टीक्षेपात येतात. त्यांच्या लहान आकारामुळे त्यांची कक्षा नक्की ठरवता येत नाही. ते आपला मार्ग कधीही बदलू शकतात. या सगळ्या गोष्टी अतिशय अनियंत्रित पद्धतीने कधीही घडून येऊ शकतात. नासा तब्बल २८,००० अश्या लहान - मध्यम आकारांच्या लघुग्रहांवर लक्ष ठेवून आहे. ज्यांची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता आहे. यात प्रत्येक वर्षी ३००० नवीन लघुग्रहांची भर पडते आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की पृथ्वीवर अवकाशातून घोंघावणारं आस्मानी संकट किती मोठं आहे. यांच्या टकरीने संपूर्ण मानवजाती नष्ट होत नसली तरी एखादा देश, खंड जगाच्या नकाशावरून पुसण्याची ताकद नक्कीच आहे. 

प्रत्येक वेळी आपल्याला आण्विक मिसाईल पाठवलं पाहिजे असेही नाही. लघुग्रहाचा आकार जर लहान असेल तर त्याच्यासोबत झालेली एखादी टक्कर पण त्याचा मार्ग कित्येक हजारो किलोमीटर ने बदलवू शकते. अवकाशात वेगामुळे मिळणाऱ्या कायनेटिक बलाचा वापर करून अशी टक्कर अवकाशात घडवून आणली जाऊ शकते.परंतु ह्यात ही एक मेख आहे ती म्हणजे ही टक्कर इतकी ही जोरात नको की त्या लघुग्रहाचे अनेक बारीक तुकडे होतील आणि ते तुकडे मग सांभाळणं आपल्याला कठीण जाईल. येणाऱ्या लघुग्रहाचं आकारमान, त्याचा वेग ह्याचा अंदाज घेऊनच ह्या यानाच्या टक्करीचं गणित जुळवून आणावं लागेल. पृथ्वीवर हे सगळं जुळवलं तरी प्रत्यक्षात अवकाशात हे जुळवून आणणं शक्य होईल का? हे तपासण्यासाठी नासा आणि अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरी ह्यांनी मिळून एक मिशन हाती घेतलं आहे. त्याच नावं आहे डार्ट (Double Asteroid Redirection Test). 

डार्ट (Double Asteroid Redirection Test) ह्या मिशनमध्ये नासा एक यान बायनरी ( बायनरी म्हणजे एका लघुग्रहाभोवती दुसरा लघुग्रह फिरत आहे. ) लघुग्रहांवर पाठवत आहे. ह्यातला मोठा लघुग्रहाचं नाव आहे 'डीडेमॉस ए'. हा ७५० मीटर व्यासाचा असून ह्याच्या भोवती एक छोटा लघुग्रह ज्याला 'डीडेमॉस बी' किंवा 'डीडेमून' असं म्हंटल जातं तो परिक्रमा करत असून त्याचा व्यास १६० मीटरचा आहे. हे लघुग्रह निवडण्यामागे काही कारणं आहेत. लहान असलेला डीडेमून ११.९ तासात आपल्या मोठ्या भावाभोवती प्रदक्षिणा घालतो. नासाचं यान ५०० किलोग्रॅम वजनाचं असून ते ६ किलोमीटर / सेकंद ह्या वेगाने डीडेमून वर टक्कर मारेल. ह्या टक्करीमुळे डीडेमून च्या कक्षेत अर्ध्या मिलीमीटर / सेकंदाचा फरक पडेल. ह्यामुळे त्याच्या डीडेमॉसभोवती परिक्रमेचा वेग १० मिनिटांनी कमी होईल. अर्थात हा फरक खूप कमी वाटत असला तरी अश्या टकरीमुळे होणारा फरक पृथ्वीसोबत टक्कर होताना तब्बल मिलियन किलोमीटर अंतराचा बदल घडवू शकते. याचा अर्थ एखादा पृथ्वीच्या दिशेने येणारा लघुग्रह अश्या टकरीमुळे जवळपास १० लाख किलोमीटर अंतरावर लांब जाऊ शकतो. पृथ्वीशी टक्कर होण्या ऐवजी तो पृथ्वी जवळून सुरक्षित अंतरावरून पार होऊ शकतो. डार्ट मिशन ने पृथ्वी ला कोणताही धोका नाही. हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीच्या रस्त्यात येतं नाही किंवा यायची शक्यता नाही. त्यामुळे समजा हे मिशन विफल झालं तरी पृथ्वीला त्याचा कोणताही धोका उद्भवणार नाही.

येत्या २६ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी (युरोपियन टाइम. भारतीय प्रमाणवेळ संध्याकाळी १० वाजून ४४ मिनिटे ) ही टक्कर होण्याची शक्यता आहे. डार्ट सोबत पिगी बॅग म्हणून इटालियन स्पेस एजन्सी आपले दोन क्यूब सॅट पाठवत आहे. टक्कर मारण्याच्या थोड्याआधी हे डार्ट पासून विलग होतील. डार्टची डीडेमूनशी होणारी टक्कर कॅमेऱ्यात बंदिस्त करून ती पृथ्वीकडे परत पाठवतील. ह्या नंतर युरोपियन स्पेस एजन्सी “हिरा” नावाचं एक यान डीडेमून कडे पाठवत आहे. हे यान ह्या टक्करीनंतर डीडेमून च्या कक्षेत झालेल्या बदलांचा अभ्यास करेल. डार्ट मोहिमेचा मुख्य उद्देश आपण एखाद्या लघुग्रहाची कक्षा बदलवू शकतो का? ह्या प्रश्नाच उत्तर शोधणं आहे. पृथ्वीवर पुढे जर एखादा लघुग्रह रस्त्यात येत असेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि गणित ह्याचा वापर करून आपण त्याचा रस्ता बदलवून पृथ्वीवर असलेल्या मानवजातीचं संरक्षण करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या टकरीने मिळणार आहे. 'डार्ट' मोहिमेतून विज्ञानाच्या अनेक प्रश्नांचा वेध घेतला जाणार आहे, ज्यात आपल्या भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न समाविष्ट आहे.   

फोटो शोध सौजन्य :-  नासा, गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



4 comments: