Friday, 30 September 2022

#दुर्गाशक्ती_२०२२_सहावं_पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२२_सहावं_पान... विनीत वर्तक © 


मेरी पहचान आप से पापा, 

क्या कहूं,आप मेरे लिए क्या हो, 

रहने को है पैरों के नीचे ये जमीं, 

पर मेरे लिए तो मेरा आसमान आप हो ।

कोणत्याही स्त्रीच्या जडणघडणीत सगळ्यांत महत्वाच्या पुरुषाचं स्थान असेल तर ते असतं वडिलांचं. वडिलांकडून प्रत्येक स्त्री काही न काही स्फूर्ती आयुष्यात घेत असतेच. वडीलच असतात जे आयुष्याच्या वाटेवर सगळ्यात पहिला आधार बनतात. त्यामुळे अनेकदा स्त्रीच्या आयुष्याला कलाटणी देण्याची आणि तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करण्याची ताकद वडिलांकडे असते. जेव्हा वडील बनून एक पुरुष आपल्या मुलीतील दुर्गाशक्तीचं अस्तित्व समजून घेतो तेव्हा त्या शक्तीचा सगळ्यांत जास्ती सन्मान होतो. आपल्या वडिलांच्या रूपाने जेव्हा स्त्रीला असे प्रोत्साहन मिळते, तेव्हा तिच्यातील दुर्गाशक्ती असं काही मिळवते ज्याचा विचार करणेही कदाचित तिला एकटीला शक्य झाले नसते. अश्याच दोन दुर्गाशक्तींची ही गोष्ट आहे, ज्यांनी आपल्या वडिलांच्या आधाराने, त्यांच्या प्रोत्साहनामुळे खडतर अशी आव्हाने सहजरित्या पार केली आहेत. त्यांच्या अभूतपूर्व प्रवासासाठी आज बाप-लेकींच्या या जोड्या दुर्गाशक्तीच्या मानकरी ठरल्या आहेत. 

गोष्ट सुरू होते १९७७ साली जेव्हा अजित बजाज यांनी वयाच्या १२ व्या वर्षी १७,३५३ फूट (५२८९ मीटर) उंचीचं फ्रेंडशिप शिखर गाठलं. त्यानंतर पोलार ट्रायॉलॉजी पार करणारे ते पहिले भारतीय ठरले. (polar trilogy means skiing to the North Pole, South Pole and across the Greenland icecap) तसेच त्यांनी साहसी खेळात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा २०१२ साली पद्मश्री सन्मानाने गौरव केला होता. आपल्या वडिलांची कीर्ती लहानपणापासून दियाच्या मनात घर करून होती. आपल्या वडिलांचं कर्तृत्व तिला कुठेतरी साद घालत होतं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचं ध्येय दियाने निश्चित केलं. मे २०११ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी दियाने ट्रान्स ग्रीनलँड स्कीइंग एक्सपीडीशन पूर्ण केलं. असं करणारी जगातली सगळ्यांत कमी वयाची स्त्री ती बनली. याशिवाय ग्रीनलँडच्या बर्फावर स्कीइंग करणारे अजित आणि दिया पहिले भारतीय ठरले. पण हा प्रवास इकडे थांबत नाही. 

दिया आणि अजितने अजून एक लक्ष्य आपल्यासमोर ठेवलं ते म्हणजे जगातील सगळ्यात उंच असं माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं जे आजवर कोणत्याही भारतीय वडील-मुलीला जमलेलं नव्हतं. मुलगी असली तरी ती आपल्या कुटुंबाचं नाव उंच शिखरावर नेऊ शकते हा संदेश संपूर्ण भारताला देण्यासाठी दियाने एव्हरेस्टला आपलं लक्ष्य बनवलं. १६ मे २०१८ ला दिया बजाज आणि अजित बजाज यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करून एक नवीन इतिहास रचला. एक मुलगी आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवत, त्यांना आपल्यासोबत घेऊन जगाचं सर्वांत उंच टोक गाठू शकते हे दियाने दाखवून दिलं. दिया आणि अजितने याच वर्षी ५ जून २०२२ ला जगातील सात खंडातील ७ उंच शिखरं पादाक्रांत करण्याचा विक्रम केला. हा विक्रम करणारी आशिया खंडातील वडील आणि मुलीची पहिलीच जोडी ते बनले आहेत. मुलीच्या रूपात आपल्या वडिलांच्या बरोबरीने आपण कुठे कमी नाही हे दाखवून देणारी दिया दुर्गाशक्तीचं एक आधुनिक स्वरूप आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 

दुसरी वडील-मुलीची प्रेरणादायी गोष्ट सुरू होते, जिकडे २०१७ साली इंडियन नेव्हीच्या एझिमला या दक्षिण भारतात असलेल्या तळावर नुकत्याच भारतीय नौदलात प्रवेश केलेल्या अधिकाऱ्यांची पासिंग आउट परेड सुरू होती. पण ही परेड एका गोष्टीसाठी विशेष होती ती म्हणजे आज त्या परेडचा भाग होती कामिनी दौंडियाल. तिच्यासाठी ही परेड खूप महत्वाची आणि विशेष होती. कारण गेली कित्येक वर्षं तिने पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात खरं होत होतं. गेली ३० वर्षं तिचे वडील भारताच्या रक्षणासाठी भारतीय नौदलात भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करत होते आज तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून ती भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी भारतीय नौदलाचा भाग झाली होती. 

कामिनी दौंडियालने आपलं शिक्षण नेव्हीच्या शाळेतून मुंबई आणि विशाखापट्टणम इकडे पूर्ण केलं. दहावीच्या परीक्षेत तिने शाळेत पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग ९४% टक्यांसह उत्तीर्ण झाली. अभ्यासात नेहमीच अग्रेसर असलेल्या कामिनीला पहिल्याच फटक्यात एक्सेंचर सारख्या प्रतिष्ठेच्या कंपनीत नोकरी मिळाली. तिकडे तिने ७ महिने नोकरी केली. पण तिचं मन तिकडे लागेना भारतीय नेव्ही तिला खुणावत होती. गेली ३० वर्षं आपल्या वडिलांना ज्या शिस्तीत भारताची सेवा करताना बघितलं होतं, त्या शिस्तीची आणि भारतीय नेव्हीची तिला भुरळ पडली होती. भारतीय नेव्हीमध्ये स्त्रियांना प्रवेश द्यायचा निर्णय घेतल्यानंतर तिने Services Selection Board (SSB) ची परीक्षा दिली. त्यात निवड झालेल्या ५ मुलींमध्ये कामिनी होती. तिला नेव्हीच्या शस्त्रास्त्र संवर्ग (Armament cadre) मधे प्रवेश मिळाला. तिने पुन्हा SSB ची परीक्षा दुसऱ्या केंद्रावरून दिली. त्यातही नेव्हल अकादमी मध्ये तिला प्रवेश मिळला. भारतीय नेव्हीच्या अकादमीमध्ये तिला सर्वोत्कृष्ट 'सीमनशिप' चा पुरस्कार मिळाला आणि सगळ्या ट्रेनिंग ऑफिसर मधून तिने तिसरा क्रमांक पटकावला. 

चीफ पेटी ऑफिसर फर्स्ट क्लास (MCPO 1) उमेशचंद्र दौंडियाल यांच्यासाठी हा क्षण खूप महत्वाचा होता. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत सुखाची नोकरी सोडून देशसेवेचा मार्ग त्यांच्या मुलीने स्वीकारला होता. भारताच्या संरक्षण सज्जतेत स्त्रिया कुठेही मागे नाहीत. पुरुषांच्या जोडीला बंदूक हातात घेऊन देशांच्या सीमांचे संरक्षण करू शकतात हे त्यांच्या मुलीने म्हणजेच सब लेफ्टिनंट कामिनी दौंडियाल हिने आज दाखवून दिलं होतं. एकाचवेळी भारतीय नेव्हीचा पांढरा पोशाख घालून 'शं नो वरुणः' ही आपली टॅगलाईन बनवत जेव्हा पिता पुत्रीची ही जोडी देशसेवेसाठी कार्यरत झाली, तो क्षण फक्त कामिनीसाठी नाही तर संपूर्ण देशाचा गौरव वाढवणारा क्षण होता. भारतीय समाजव्यवस्थेची चौकट मोडत सब लेफ्टिनंट कामिनी दौंडियाल यांनी दुर्गाशक्तीचं एक अनोखं रूप सर्वांसमोर ठेवलं आहे. 

सब लेफ्टिनंट कामिनी दौंडियाल आणि दिया बजाज या दोघींनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांच्या साथीने वडील आणि मुलीच्या नात्यांचं एक अनोखं बंधन समोर ठेवताना दुर्गाशक्तीचं एक नवीन रूप आपल्यासमोर मांडलं आहे. कोणत्याही स्त्रीसाठी तिचे वडील हे पहिले आदर्श असतात. मुलगा असला म्हणजेच तो वडिलांच्या कार्याची महती पुढे नेऊ शकतो हा समज या दोघींनी खोटा ठरवला आहे. त्यामुळेच या दोघीही त्यांच्या कर्तृत्वाने दुर्गाशक्तीचं एक रूप आहेत असे मला मनापासून वाटते. कामिनी दौंडियाल आणि दिया बजाज यांच्या कर्तृत्वाला माझा कडक सॅल्यूट तसेच त्यांना आपलं आकाश पादाक्रांत करण्यासाठी मोकळं आकाश देणाऱ्या आणि तोलामोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या वडिलांनाही माझा कुर्निसात. दुर्गाशक्तीच्या या नवीन स्वरूपाच्या पुढल्या प्रवासाला आणि अजून शिखरं पादाक्रांत करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




No comments:

Post a Comment