कोणासाठी कुणीतरी... विनीत वर्तक ©
कोणीतरी आपलं असणं आणि आपण कोणासाठी त्यांच असणं ही भावनाच एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी आहे. स्थळ, काळ, वेळ या सर्वांपलीकडे जर ही भावना जाणवत असेल तर आयुष्यातलं अमृत सापडलं असं समजावं. आयुष्याच्या अनेक छटा आपण अनुभवत असताना येणारे अनुभव वेगवेगळ्या भावना निर्माण करतात. स्पेशली आभासी जगाच्या काट्यावर आयुष्य आज जगत असताना खऱ्या आयुष्यात अश्या भावना अनुभवणं आज स्वप्नवत झालेलं आहे. आभासी जगात निर्माण होणारी प्रतिमा अनेकदा त्या काचेवर तयार होणाऱ्या आपल्या प्रतिमेसारखी असते. वाटते तर खूप जवळची पण असतेच तितकी फसवी. पकडायला जावं तर मृगजळाचा भास होतो आणि सोडायला जावं तर काहीतरी निसटल्याची जाणीव.
अश्या दोलायमान अवस्थेतून आपण प्रत्येकजण मार्गक्रमण करत आहोत. आभासी जगात आलेले विचित्र अनुभव एकूणच नात्यानं वरचा विश्वास, आपुलकी, प्रेम, सत्यता आणि कोणीतरी आपलं यावर असलेल्या आपल्या दृष्टिकोनाला न भरून येणारं नुकसान करून गेलेले असतात. अनेकदा माणसं असं वागू शकतात यावर विश्वास बसत नाही. पण समोर येणारं सत्य हे पचवावंच लागते भले ते किती कटू आणि टोचणारं का असेना. न जुळणारे कोन कोणासोबत कसे जोडले जातील हे कोणीच सांगू शकत नाही. पण तशी व्यक्ती भेटल्यावर पण प्रत्यक्षात ती आपलं मानेल का? मानलं तरी ते कितपत टिकेल याबद्दल शाश्वत असं काहीच उत्तर कोणाकडे नसते. पण कधीतरी अश्या व्यक्ती आपल्या आयुष्याचा नकळत भाग होऊन जातात. एखाद्या मंद वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे काही क्षणांसाठी आपल्याला अपार आनंद देऊन जातात. ती झुळूक एक नवीन ऊर्जा देणारी तर असतेच पण आपण कोणासाठी कोणीतरी आहोत याची जाणीव करून देणारी पण असते.
कोणासाठी आपण कोणीतरी आहोत ही जाणीव प्रत्येकवेळी व्यक्त केलीच पाहिजे असं नसते. अनेकदा ती अव्यक्त राहिलेली चांगली असते. नात्यांचे साचे बदलणं किंवा आपल्या त्या भावनेला कोणत्यातरी नात्यांच्या साच्यात बसवणं हे अनेकदा आपल्याच भावनेला मारक ठरते. साच्यांचे नियम आणि अपेक्षा पूर्ण करताना आपलेपणाची भावनाच त्यात गारठून जाते. मग सुरु होतो तो एक अनिश्चितततेचा खेळ ज्यात नक्की पुढे काय होणार हे कोणालाच कळत नसते. पण असं असताना सुद्धा एकमेकांचा विश्वास टिकवून ठेवणं आणि एकमेकांना त्यांची स्पेस देणं हे ज्यांना जमते त्यांची आपलेपणाची भावना टिकून राहते. आभासी जगातून प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा जेव्हा कोणी आपलं मानतं किंवा आपण कोणासाठी खास असतो तेव्हा शब्दांशिवाय संवाद होतात. कोणीतरी असल्याची जाणीव दोन्ही बाजूने होते. आयुष्याच्या सगळ्या बंधनांना, समाज नियमांचा आदर करून पण एक निकोप नातं आकार घेतं. अश्या नात्यांच टार्गेट ठरलेलं नसते त्यामुळेच अश्या निकोप नात्याला मग कोणत्या स्पष्टीकरणाची गरज भासत नाही.
आभासी जगाने नात्यांच्या अनेक परिभाषा बदलवून टाकल्या आहेत. कोण कोणत्या नात्याच्या साच्यात आपल्याला बघते हेच कळेनासे झाले आहे. आलेल्या कटू अनुभवांनंतर पुन्हा एकदा स्वतःला कोणाशी एकरूप करणं तितकं सोप्प नसते. आपलेपणाची भावना आभासी जगातून प्रत्यक्षात जेव्हा अनुभवतो तेव्हा ती आपल्याला पुन्हा एकदा मनाशी जोडते. ते क्षण हवेहवेसे वाटतात. ती अनुभूती पुन्हा पुन्हा अनुभवण्याची ओढ निर्माण होते. कोणीतरी आपल्या सोबत असणं पुरेस असते. त्यासाठीच कोणासाठी कुणीतरी व्हावं किंवा कोणीतरी आपल्यासाठी काही असावं. नात्यांची मज्जा ती अनुभवण्यात आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तश्या घडतील अश्या नाही. पण मिळालेली अनुभूती आणि ते क्षण निरंतर सोबत असतील हे नक्की.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment