Wednesday 28 September 2022

#दुर्गाशक्ती_२०२२_चौथं_पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२२_चौथं_पान... विनीत वर्तक © 

उसे गुमाँ है कि मेरी उड़ान कुछ कम है 

मुझे यक़ीं है कि ये आसमान कुछ कम है ... नफस अम्बालवी 

जुळ्या लोकांची दुनिया काही वेगळीच असते. कोणीतरी आपल्यासारखं आपल्या सोबत या विश्वात एकाच क्षणाला जन्माला आलं हा विचार खूप वेगळा असतो. जरी जुळं म्हणून जन्माला आलो तरी त्यांचे आयुष्याचे रस्ते हे मात्र वेगवेगळे असतात. फार क्वचित वेळेला असं होतं जेव्हा त्या जुळ्या व्यक्तींची स्वप्नं पण एकसारखी असतात. जेव्हा स्वप्नं उंचीची असतात तेव्हा फार थोड्या लोकांना ते आव्हान पेलता येते. जेव्हा हीच स्वप्नं दोन जुळ्या भारतीय मुली बघतात तेव्हा त्यातील अडचणी अजून कित्येक पटींनी वाढलेल्या असतात. एकतर मुलीने अशी स्वप्नं बघणं जिकडे आजही सहजपणे स्वीकारलं जात नाही, तिकडे जुळ्या मुलींनी एकाचवेळी अशी स्वप्नं बघून त्यालाच आपलं लक्ष्य बनवणं किती कठीण असेल. पण वर लिहिलं तसं जेव्हा तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास असतो आणि योग्य साथ मिळते तेव्हा उंच उडीला आकाशही ठेंगणं वाटतं. ही गोष्ट आहे अश्याच दोन जुळ्या मुलींची ज्यांच्या स्वप्नांच्या उडीने त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स् मध्ये स्थान मिळालं आहे. ही गोष्ट आहे ताशी आणि नुंगशी मलिक या जुळ्या बहिणींची, ज्यांच्यातील दुर्गाशक्तीच्या रूपाने भारताचा तिरंगा आज जगभर फडकतो आहे. 

ताशी आणि नुंगशी मलिक यांची गोष्ट सुरू होते २००९ साली. त्याआधी सामान्य मुलींप्रमाणे त्यांचं आयुष्य सुरू होतं. अभ्यासासोबत खेळातही दोघींना रुची होती. बास्केटबॉल, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स आणि हॉकीसह सगळ्या खेळांत त्यांनी सहभाग घेतला होता. पण २००९ साली जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग मध्ये गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी दाखल केलं, त्यानंतर त्यांनी हिमशिखरांनी साद घालायला सुरूवात केली. आधी बेसिक मग ऍडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्स, प्रक्षिशण देण्याचा कोर्स आणि स्कीईंग ते सर्च एन्ड रेस्क्यू अश्या सर्व पातळ्यांवर या दोन्ही बहिणींनी स्वतःला सिद्ध केलं. त्यांची जिद्द, मेहनत घेण्याची तयारी आणि स्वप्नांना कवेत घेण्याची ईर्षा बघून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना 'एव्हरेस्ट ट्विन्स' असं नाव ठेवलं. जगातील सगळ्यांत उंच शिखर सर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं. 

एव्हरेस्ट सर करण्याचा प्रवास तसा सोप्पा नव्हता. जगातील सर्वांत उंच शिखर पार करताना शारीरिक क्षमतेसोबत तुमच्या मानसिक क्षमतेचाही कस लागत असतो. याशिवाय आर्थिक बाजूही महत्वाची असते. या सर्व प्रवासात प्रत्येक क्षणाला अनेक धोके, अडचणी असतात. बदलणारा निसर्ग, निसरडी वाट आणि इतर अनेक गोष्टी ज्यांत जीव जाण्याचा धोका असतो. त्यामुळे एका आईसाठी आपल्या दोन्ही मुलींना एकाचवेळी अश्या धोक्याच्या रस्त्यावर पाठवण्याचा निर्णय घेणं कठीण गेलं. पण भारतीय सेनेचा भाग असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना खंबीरपणे पाठबळ दिलं. कर्नल विरेंद्र सिंह मलिक हे नॅशनल डिफेन्स अकादमी मधून भारतीय सेनेचा भाग झाले व सॅम माणेकशॉ यांच्या २/८ गोरखा रेजिमेंटचे सदस्य होते. आपल्या वडिलांकडून स्फूर्ती घेत या दोन्ही जुळ्या बहिणींनी एव्हरेस्टकडे कूच केलं. पण त्याआधी त्यांनी माउंट रुदुगैरा हे १९,००० फूट उंचीवरचं शिखर पार केलं. 

मे २०१३ च्या उन्हाळ्यात त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा रोवला. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या काळात जगातील सातही खंडातील सगळ्याच उंच शिखरांना त्यांनी आपलंसं केलं. माउंट एव्हरेस्ट (आशिया, जगातील सर्वात उंच, मे 2013), माउंट एल्ब्रस (युरोप, ऑगस्ट 2013), माउंट अकोनकाग्वा (दक्षिण अमेरिका, जानेवारी 2014), माउंट कार्स्टेन्झ पिरॅमिड (ऑस्ट्रेलिया, मार्च 2014), माउंट डेनाली (उत्तर अमेरिका, जून 2014), माउंट किलीमांजारो (आफ्रिका, फेब्रुवारी 2012), (आफ्रिका, जुलै 2015) त्यानंतर त्यांनी पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर म्हणजेच उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर स्वारी केली ( एप्रिल 21, 2015) असं करताना त्यांनी आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी "एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम" (एव्हरेस्टसह जगातील सात सर्वोच्च शिखरांवर चढणे आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणे) पूर्ण करणाऱ्या त्या वयाने सगळ्यात लहान स्त्री ठरल्या तसेच जगातील एकमेव जुळ्या बहिणी आहेत ज्यांनी हा पराक्रम केलेला आहे. त्यांच्या आधी जगातील फक्त २९ लोकांनी हा पराक्रम केलेला आहे. त्यातही फक्त ८ स्त्रियांना आजवर हे जमलेलं आहे. त्यात ताशी आणि नुंगशी मलिक यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी हे उत्तुंग यश मिळवलेलं आहे. त्यांच्या या पराक्रमाची दखल घेताना भारत सरकारने त्यांना तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानित केलं आहे. 

एप्रिल २०१५ मध्ये त्यांनी भारतातील मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि लिंगावरून होणाऱ्या भेदभावाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी 'नुंगशीताशी फाऊंडेशन’ ची स्थापना केली आहे. भारतात गिर्यारोहणाचा खेळ म्हणून विकास करणे आणि मैदानी साहसाद्वारे मुलींचे सक्षमीकरण करणे ही या संस्थेची दुहेरी उद्दिष्टे आहेत. तसेच या फाऊंडेशनच्या माध्यमातून ''मुली आणि महिलांच्या सक्रिय आणि समान सहभागासह भारताला एक ‘आउटडोअर राष्ट्र’ बनवणे'' हे लक्ष्य त्यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण करताना त्या अभ्यासातही मागे राहिलेल्या नाहीत. अखिल भारतीय बोर्ड परीक्षांमध्ये 88 % आणि 86 % तर पदवी शिक्षणात कॉमर्समध्ये 94 % आणि 92 % सिक्कीम मणिपाल विद्यापीठातून मिळवताना पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदवी प्रथम विभागात मिळवलेली आहे. इन्व्हरकार्गिल, न्यूझीलंड येथून व्यायाम आणि क्रीडा विज्ञानात या दोघीही उच्च शिक्षण घेत आहेत. 

साहसी क्रीडाप्रकार हा आजही भारतात रूळलेला नाही. आजही भारतात साहसी क्रीडाप्रकारात असणाऱ्या मुलींकडे वेगळ्या नजरेने बघितलं जाते. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक टोमण्यांचा सामना करावा लागतो. त्यांना आजही समाजात सून म्हणून स्वीकारण्यासाठी कुटुंबं तयार नसतात. साहसी क्रीडाप्रकारात आणि विशेष करून गिर्यारोहणासारख्या क्षेत्रात जाण्यासाठी आजही मुलींना बंदी घातली जाते. तिकडे ताशी आणि नुंगशी मलिक यांनी समोर ठेवलेलं दुर्गाशक्तीचं उदाहरण नक्कीच समाजव्यवस्थेचा बुरखा फाडणारं आहे. आपले छंद, आवड जोपासत असताना या दोन्ही बहिणींनी आपल्या शालेय आणि इतर अभ्यासक्रमातही यशाचा आलेख चढता ठेवला आहे. जुळ्या म्हणून एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊन एकाचवेळी वेगवेगळ्या क्षेत्रांत लीलया चढाई करणाऱ्या या दोन बहिणींचं उदाहरण दुर्गाशक्तीचं अनोखं स्वरूप आहे. त्यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा...

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment