Monday 7 March 2022

स्त्रियांची गोष्ट... विनीत वर्तक ©

 स्त्रियांची गोष्ट... विनीत वर्तक ©

आज संपूर्ण जग महिला दिवस साजरा करतो आहे. आजच्याच दिवशी १९०८ साली १५,००० स्त्रियांनी न्यूयॉर्क शहरात स्त्रियांच्या हक्कासाठी, त्यांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी एक विशाल मोर्चा काढला होता. याच दिवसानंतर अमेरीकेच्या इतिहासात आणि एकूणच जगात स्त्रियां बद्दलच्या दृष्टिकोनात क्रांतिकारी बदल झाले. पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांना बरोबरीचे स्थान देण्यासाठी पाया घातला गेला. त्याची आठवण म्हणून आजचा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासात ही स्त्रिला अनेक दशकं चूल आणि मूल यापुरती मर्यादित केलं गेलं. पण गेल्या काही वर्षात नक्कीच हा दृष्टिकोन बदललेला आहे. असं असलं तरी अजून खूप मोठा पल्ला एक समाज म्हणून आपल्याला गाठायचा आहे हे ही तितकच खरं. आजच्या दिवशी म्हणूनच भारतातल्या चूल आणि मूल यात रमलेल्या स्त्रियांनी राष्ट्रप्रेमासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी असं एक कार्य केलं होतं त्याच स्त्रित्वाच्या गोष्टीला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. 

आजपासून साधारण ५१ वर्षापूर्वी गुजरात मधील भुज इकडे भारत आणि पाकीस्तान च्या युद्धाचं रणशिंग फुंकले होते. बांगलादेश ची निर्मिती करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ डिसेंबर १९७१ ला युद्धाला सुरवात झाली. भारताचं पारडं कुठेतरी जड होते आहे हे बघून पाकिस्तान ने आपल्या स्वभावाला जागत भारताच्या पश्चिम बाजूने आघाडी उघडण्यासाठी भारतावर हवाई हल्ले सुरु केले. ८ डिसेंबर १९७१ ची रात्र होती जेव्हा पाकिस्तान वरून आलेल्या सारबे जेट नी नॅपलम बॉम्ब टाकून भुज मधली धावपट्टी पूर्णपणे उध्वस्थ केली. भुज मधील ही धावपट्टी फक्त १९७ किलोमीटर सरद्दीपासून लांब आहे. भारतावर जर पुन्हा पाकिस्तान च्या विमानांनी आक्रमण केलं तर त्यांना उत्तर द्यायला भारतीय वायू दलाची विमान उड्डाण भरू शकणार नव्हती हे तिकडे तैनात असलेले स्क्वार्डन लिडर विजय कर्णिक यांच्या लक्षात आलं. पाकिस्तान ची विमाने भारताच्या हद्दीत येऊन पाठीवर वार करत होती. त्यांना रोखण्यासाठी भुज ची धावपट्टी लवकरात लवकर पुन्हा उड्डाणासाठी योग्य बनवणं अतिशय गरजेचं होतं. 

 स्क्वार्डन लिडर विजय कर्णिक आणि त्यांच्या सोबत असलेले दोन ऑफिसर, ५० भारतीय वायू दलाचे कर्मचारी आणि ६० संरक्षण सुरक्षा कॉर्प्स फक्त यांच्या साथीने ही धावपट्टी पुन्हा उड्डाण भरण्यायोग्य करणं शक्य नव्हतं. त्यामुळेच या कामासाठी लोकांची मदत घेण्याचा पर्याय पुढे आला. पण युद्ध सुरु असताना आकाशातून बॉम्ब वर्षाव होत असताना आणि शत्रूचं लक्ष्य असणाऱ्या ठिकाणी कोणते नागरीक मदत करणार. अश्या कठीण प्रसंगात धावून आल्या त्या भारतीय स्त्रिया. एक , दोन नाही तर चक्क ३०० स्त्रियांनी स्वतःहून या कामासाठी आणि देशासाठी आपल्या जीवाचं बलिदान करण्याचं ठरवलं. ज्या देशात अंगमेहनतीची काम फक्त पुरुष करू शकतात , ज्या देशात शत्रूशी दोन हात फक्त पुरुष करू शकतात किंवा एकूणच देशाची सेवा करणं हे पुरुषांच कर्तव्य आहे असे समज रूढ होते. त्याच देशात मातृभूमीच्या रक्षणासाठी अशिक्षित, गरीब आणि चूल आणि मूल यात रमणाऱ्या स्त्रियांनी देश रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकलं. 

९ डिसेंबर १९७२ च्या सूर्योदयापासून ३०० स्त्रिया भारतीय वायू दलाच्या साह्याने धावपट्टी बनवत होत्या. ही सर्व साधारण घटना अथवा वेळ नव्हती. पाकिस्तानी विमान भारताच्या आकाशात घिरट्या घालत होती. कोणत्याही क्षणी बॉम्ब आपल्यावर येऊन पडेल अश्या स्थितीत या स्त्रियांनी आपल्याबद्दल समाजाच्या असलेल्या विचारसरणीला छेद देण्याचा चंग बांधला होता. सूर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत अन्नाचा एकही कण न घेता त्या ३०० स्त्रिया देशासाठी आपलं सर्वस्व वेचून काम करत होत्या. तब्बल ४ दिवस युद्धाच्या स्थितीत त्या ३०० स्त्रिया आपलं कुटुंब बाजूला ठेवून देशासाठी झटत होत्या. त्यातील काहींची मुलं तर अवघी काही महिन्यांची होती. हे सगळं कशासाठी तर देशासाठी. 

१२ डिसेंबर १९७२ ला संध्याकाळी ४ वाजता भुज च्या त्या धावपट्टी वरून भारतीय विमानांनी उड्डाण भरायला सुरवात केली. यानंतर अवघ्या ४ दिवसांनी म्हणजेच १६ डिसेंबर १९७२ ला ९३,००० पाकिस्तानी सैनिकांनी सशर्त शरणागती पत्करली आणि युद्धाची सांगता झाली. पाकिस्तान च्या या पराभावात खारीचा वाटा भारताच्या भुज मधल्या त्या ३०० स्त्रियांचा होता ज्यांनी जगाला स्त्रिया एकत्र आल्या तर काय करू शकतात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.

आज जेव्हा ८ मार्च रोजी संपूर्ण जग त्या १५,००० स्त्रियांच्या मोर्चाची आठवण म्हणून महिला दिवस साजरा करत आहे तेव्हा प्रत्येक भारतीयाने त्या ३०० स्त्रियांच्या देशप्रेमाची आठवण सुद्धा ठेवली पाहिजे. भुज सारख्या एका लहान खेड्यात १९७२ साली महिलांच्या आत्मसन्मानाची, त्यागाची, देशप्रेमाची, समानतेची ज्योत त्या ३०० महिलांनी पेटवली होती. आज महिला दिवसाच्या निमित्ताने त्याच ३०० महिलांच्या असामान्य कर्तृत्वाची जाणीव ठेवत आजचा दिवस त्यांना समर्पित करूया असं मला मनापासून वाटते. स्त्रियांची ही गोष्ट अनेक महिलांना आजच्या दिवशी नक्कीच प्रेरणा देईल आणि प्रत्येक पुरुषाला स्त्रिया काय करू शकतात याची जाणीव करून देईल.   

तळटीप :- याच कथेवर भुज :- द प्राईड ऑफ इंडिया नावाचा एक चित्रपट २०२१ साली येऊन गेला. पण हा चित्रपट कधीच त्यांच्या त्यागाची ज्योत मनात जागवू शकला नाही हे सत्य आहे. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





No comments:

Post a Comment