Saturday 19 March 2022

ब्राह्मोस च रिव्हर्स इंजिनिअरींग खरच शक्य आहे का?... विनित वर्तक ©

 ब्राह्मोस च रिव्हर्स इंजिनिअरींग खरच शक्य आहे का?... विनित वर्तक ©

गेल्या आठवड्यात ब्राह्मोस मिसाईल पाकिस्तान मधे चुकून १२४ किलोमीटर गेल्यानंतर अनेक तर्क मांडले जात आहेत. या घटनेनंतर ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्यावरून हा अपघात नसुन अगदी जाणूनबुजून एक चाचणी भारताने केल्याचं अनेक रक्षा तज्ञांचे मत आहे. जर आपण मत ग्राह्य मानलं किंवा अगदी हा अपघात असला तरी ब्राह्मोस मिसाईल आपल्या शत्रू देशाच्या हातात लागल्यामुळे आता पाकिस्तान सुद्धा ब्राह्मोस च रिव्हर्स इंजिनिअरींग करणार का? अश्या बातम्यांना उधाण आलं आहे. नक्की असं होऊ शकते का? या प्रश्नाचा घेतलेला मागोवा. 

मुळात रिव्हर्स इंजिनिअरींग म्हणजे काय? हे आपण आधी जाणून घेतलं पाहिजे. एखादी वस्तू परीपूर्ण रूपात जेव्हा आपल्या समोर असते तेव्हा तिचं अंतरंग वेगळं करून त्यातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि त्याची निर्मिती कशी केली गेली असेल हे समजून घेणं आणि त्याची पुन्हा निर्मिती करणं असा एक साधारण त्याचा अर्थ होतो. रिव्हर्स इंजिनिअरींग इतकं सोप्प आहे का? तर याच उत्तर मुळीच नाही. एक साधारण उदाहरण घेऊ. आपल्या घरात अनेक वस्तू असतात जश्या टूथपेस्ट, ब्रेड, वॉशिंग मशीन, टी.व्ही. आणि इतर अनेक. जर आपण बघितलं तर टूथपेस्ट, ब्रेड सारख्या वस्तूंवरती त्यात वापरलेल्या घटकांचा उल्लेख केलेला असतो. आपल्याला त्या पदार्थात काय घटक आहेत ते माहित असलं तरी आपण तसच्या तसं आपण बनवू शकतो का? वॉशिंग मशीन, टी.व्ही.हे पुन्हा त्याच गुणवत्तेच बनवू शकतो का? फार फार तर आपण त्या प्रमाणे डुप्लिकेट बनवू शकू. पण ती गुणवत्ता आणणं योग्य माहिती असल्याशिवाय शक्यच नसते. आता कोणी सांगेल की खायच्या वस्तू किंवा घरातील वस्तू यांची मिसाईल तंत्रज्ञानाशी तुलना कशी होऊ शकते? तर मुद्दा हा आहे की रोजच्या वापरातील गोष्टी रिव्हर्स इंजिनिअरींग करणं याची शक्यता कमी आहे तिकडे मिसाईल तंत्रज्ञानात किती सुरक्षा आणि गोपनियता बाळगली गेली असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. 

अमेरीकेच्या एफ ३५ या विमानाचं रिव्हर्स इंजिनिअरींग करून चीन ने जे २० बनवल्याचं म्हंटल जाते खरे तर ते वास्तव आहे. पण जे २० बघायला गेलं तर राफेल  ला ही स्पर्धा करू शकत नाही. जे २० चे चीन जे आकडे सांगते आणि त्याच्या वैशिष्ठ बद्दल जगात धिंडोरा पिटते. ते कोणीच बघितलेलं नाही. फक्त चीन जे बोलतो त्यावर विश्वास ठेवावा लागतो. तो विश्वास किती पोकळ असतो हे जगाने HQ-9P च्या रूपाने बघितलेलं आहे. एस ३०० च रिव्हर्स इंजिनिअरींग करून चीन ने ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम पाकिस्तान ला विकली होती. आता हा किती मोठा प्रोपेगेंडा होता हे पाकिस्तान ही समजून चुकला आहे. जरी बाहेरून ती सारखी दिसत असली तरी त्याच्या गुणवत्तेचा कोणताही निकष हा ओरिजिनल सिस्टीम च्या जवळपास पण जात नाही. याचा अर्थ रिव्हर्स इंजिनिअरींग ने सेम टू सेम दिसणारं लढाऊ विमान किंवा मिसाईल बनवलं तरी प्रत्यक्षात त्याचा दर्जा आणि गुणवत्ता चीन ला मिळवता आलेली नाही तिकडे पाकिस्तान बद्दल न बोललेलं बरं. 

आता ब्राह्मोस चा विचार केला तर ब्राह्मोस ला सगळ्यात घातक बनवणारे तीन घटक आहेत. १) ब्राह्मोस चा वेग म्हणजेच त्याला ज्या इंधनामुळे हा वेग मिळतो ते इंधन  २) ब्राह्मोस ची अचूकता म्हणजे त्याची नॅव्हिगेशन प्रणाली, त्यातील सॉफ्टवेअर आणि इतर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट ३) ब्राह्मोस च वॉरहेड म्हणजेच स्फोट घडवून आणणारं साधारण अथवा आण्विक मटेरियल. आता जे मिसाईल पाकिस्तान मधे गेलं त्याबद्दल बोलूयात. पाकिस्तान मधे जे ब्राह्मोस पाडलं त्यात वॉरहेड नव्हतं याचा अर्थ पाकिस्तान ला त्यात फक्त दगड भरलेले मिळाले म्हणजे तिसरा मुद्दा निकालात निघाला. आता दुसरा मुद्दा नॅव्हिगेशन प्रणाली किंवा त्यातील सॉफ्टवेअर. ब्राह्मोस चे जे फोटो आले त्यातून हे स्पष्ट होते की ते जळून गेलेलं आहे. याचा अर्थ त्यातील सॉफ्टवेअर किंवा नॅव्हिगेशन प्रणाली संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. खरे तर मिसाईल जेव्हा इम्पॅक्ट करते किंवा पाडलं जाते तेव्हा ही प्रणाली त्यात नष्ट होईल अशी रचना मिसाईल डिझाईन करताना केलेली असते. ज्यामुळे अश्या गोष्टी शत्रूच्या हातात पडू नयेत. त्यामुळे पाकिस्तान च्या हाती इकडे पण दगड आले आहेत. आता मूळ आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ ते म्हणजे त्यातील इंधन. आता आपण जर संपूर्ण ब्राह्मोस ने कापलेल्या अंतराचा वेध घेतला तर जवळपास त्याने २९० किलोमीटर आणि त्याहीपेक्षा थोडं जास्ती अंतर कापल्याचे स्पष्ट होते आहे. याचा अर्थ त्यात असणारं सर्व इंधन त्याने वापरलेलं आहे. 

तुम्ही बघाल तर भारताला पाकिस्तान मधे ब्राह्मोस पाठवायचं होत तर सरळ पाठवता ही आलं असतं. पण भारताने जाणून बाजून जवळपास १०० किलोमीटर ब्राह्मोस च अंतर हे भारतात कापलेलं आहे किंवा त्या प्रमाणे त्याची दिशा ठेवली होती. आपण पाकिस्तान ने दाखवलेल्या ब्राह्मोस च्या रस्त्याचा विचार केला तरी हे स्पष्ट होईल की सरळ पाकिस्तान समोर असताना ब्राह्मोस ला जवळपास गुजरात पर्यंत आणून मग ९० अंशाचे वळण घेत पाकिस्तान मधे १२४ किलोमीटर (त्याहून जास्तीच आहे.) अंतर कापण्याचे प्रयोजन काय? तर याच उत्तर पहिल्या मुद्यात दडलेलं आहे. भारताला २९० किलोमीटर अंतर पाकिस्तानात जायचं नव्हतं किंवा संवेदनशील शहरांच्या जवळ हे मिसाईल पडायचं नव्हतं. त्यासाठीच कोणाच्या गावी नसलेल्या पण लष्करी दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मियान चानू या भागाची निवड केली गेली. अडचण अशी होती की ब्राह्मोस च्या क्षमतेच्या अर्ध्यावर हे ठिकाण होतं त्यातही ब्राह्मोस मधे वॉरहेड नसल्याने कदाचित शत्रू राष्ट्राला इंधनाच्या रासायनिक गुणधर्माची चाहूल उरलेल्या इंधनावरून लागू शकते हे भारताला आणि भारतातल्या रक्षा वैज्ञानिकांना चांगल ठाऊक होतं. मग यावर उपाय एकच की ब्राह्मोस अश्या पद्धतीने फायर करायचं किंवा त्याची दिशा अश्या पद्धतीने ठरवायची की आपलं अर्ध इंधन ते भारतात प्रवास करून जाळून टाकेल. उरलेल्या अर्ध्या इंधनात आपलं लक्ष्य साध्य करेल. 

भारताने हेच केलं की ब्राह्मोस ला जवळपास १०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर भारताच्या हवाई क्षेत्रात कापू दिलं. नंतर अचानक ९० अंशाचे वळण घेऊन ब्राह्मोस ने आपल्या लक्ष्याकडे कूच केलेलं होतं. त्यामुळेच ब्राह्मोस जेव्हा या भागात भारताने पाडलं तेव्हा या बाबतीत पण पाकिस्तान च्या हातात दगड मिळाले आहेत. पण काय आहे की आपण एवढे बकरा बनलो आहोत हे पाकिस्तान ला हे सगळं पचवणं अवघड जाते आहे. त्यामुळेच पाकिस्तान ने भारतातील आपले काही चमचे आणि मिडिया हाऊस जे की भारताविरुद्ध विष ओकत असतात. त्यांना हाताशी धरून आता पाकिस्तान ब्राह्मोस च रिव्हर्स इंजिनिअरींग करू शकतो ही आवई उठवलेली आहे. अर्थात हे सगळं सांगणारे आपल्याच देशातील काही गद्दार लोक आहेत. मी गद्दार यासाठी म्हणालो की अमेरिकेच्या एफ ३५ च डिझाईन चिनी इंजिनिअर आणि चीनला पैश्यासाठी पुरवणारे कमी अमेरीकन लोकच होते. अश्या गद्दरांची भारतात काही कमी नाही. जे पैश्यासाठी देशाला विकू शकतात. ब्राह्मोस तंत्रज्ञान चोरीला जाण्याचा एकच मार्ग म्हणजे भारतातील ते बनवणाऱ्या संस्थांकडून जर या गोष्टी लिक झाल्या अथवा तिथल्या कोणी पैश्यासाठी देशाशी गद्दारी केली. 

उद्या मानून चालू की पाकिस्तान ला या सर्व गोष्टी चोरून मिळाल्या तरी पाकिस्तान ब्राह्मोस बनवू शकेल हे जवळपास अशक्य आहे. आज एक साधा उपग्रह आणि रॉकेट ते स्वबळावर बनवू शकत नाहीत. त्यांचा सर्व आण्विक कार्यक्रम आणि सर्व मिसाईल ही चीन ने अक्षरशः रंग मारून त्यावर चंद्र काढून त्यांना दिलेली आहेत. त्यांच्यासाठी ब्राह्मोस क्षमतेबाहेरचं आहे. चीन ने जरी बनवलं तरी त्याच्या क्षमता भारताच्या ब्राह्मोस इतक्या अचूक असतील यावर मला तरी शंका आहे. चीन च्या अर्ध्याहून अधिक गोष्टी प्रोपगंडा असतात. असं असलं तरीसुद्धा बाह्मोस च तंत्रज्ञान चीन कडे जाऊ नये यासाठी भारताने सजग राहणं अतिशय गरजेचं आहे. पण पाकिस्तान मधे पडलेल्या ब्राह्मोस मिसाईल वरून पाकिस्तान रिव्हर्स इंजिनिअरींग करून ब्राह्मोस बनवेल या शक्यतेचा विचारही करू नये या मताचा मी आहे. उलट भारतीय वैज्ञानिकांनी सगळ्या जर- तर च्या शक्यतांचा विचार करून ब्राह्मोस चा डेमो दिला होता याचा मला संपूर्ण विश्वास आहे. कारण तर्क हे हवेत न मांडता जर ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याचा विचार केला तर खूप गोष्टी आपल्याला समजतात. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment:

  1. मुळातच ब्रम्होस फिलिपाईन्स ला देण्याचा करार झाला आहे... त्यामुळे ते उघड मार्केट मध्ये एकप्रकारे आलेच आहे....ज्याला reverse engineering करायचं आहे तो ते तिथूनही करू शकतोच... पण पाकड्यांना इतकं जमलं असतं तर भीक मागत कशाला फिरले असते????

    ReplyDelete