Friday 18 March 2022

गेम ऑफ थ्रोन्स... विनित वर्तक ©

 गेम ऑफ थ्रोन्स... विनित वर्तक ©

सत्तेची नशा आणि झिंग एकदा चढली की सुरू होतो तो सिंहासन वाचवण्याचा खेळ. ज्यात शहाला काटशह दिले जातात आणि निरनिराळे डावपेच आखले जातात. कधी समोरून तर कधी पाठीवर वार केले जातात. त्यात कधी कोथळा बाहेर काढला जातो तर कधी डाव आपल्यावर उलटतो. कधी परके आपले होतात तर कधी आपण आपल्या माणसांना परकं करतो. आपण कधी शेर बनतो तर कधी समोरचा आपल्याला वरचढ ठरतो आणि हा गेम ऑफ थ्रोन्स असाच पुढे सुरू राहतो. राजकारण, समाजकारण, अर्थकारण ते मी, माझं कुटुंब अश्या सर्व पातळ्यांवर हा सुरू असतो. ही सत्ता कधी आर्थिक वर्चस्वाची, कधी सामाजिक वर्चस्वाची तर कधी अस्तित्वाची लढाई असते. असे म्हणतात प्रेमात आणि युद्धात सगळे काही माफ असते. ते सूत्र या खेळातसुद्धा तितकेच लागू पडते. 

आज आपल्या आजूबाजूला बघितलं तर सर्वच पातळीवर गेम ऑफ थ्रोन्स दिसून येतो. राजकारण हे तर त्याचं दृष्य स्वरूप. पक्ष, संघटना, देश, अस्मिता या सर्वांना वेठीस धरून हा राजरोस सुरू असतो. खेळाच्या चाली रचणारा ते ज्याच्या विरुद्ध त्या रचल्या जातात त्यासोबत या दोघांच्या आजूबाजूला असणारे सर्वच त्या शिकारीचा भाग होतात किंवा शिकार बनतात. त्याची तीव्रताही वरून खाली येते. सगळ्यात वर जो असतो त्याला याने काहीच फरक पडत नसतो. कधी पडलाच तरी एखादा साधा ओरखडा ज्याची किंमत त्याने आधीच वसूल केलेली असते. मात्र याची सगळ्यात जास्ती किंमत मोजतात किंवा त्रासाला सामोरे जातात ते सगळ्यात खालच्या पायरीवर असणारे. 'विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती' असं म्हणत कोणताही झेंडा हातात घेतल्यावर त्याचा भार त्यांनाच सोसायचा असतो हे मात्र विसरून जातात. राजकारण्यामधल्या गेम ऑफ थ्रोन्सचा सगळ्यात जास्ती फायदा पण वरून खाली होतो. वर असलेला सगळ्यात जास्ती फायद्यात असतो तर खाली असलेल्याच्या हातात मात्र रिकामा कटोरा असतो. 

सामाजिक पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर गेम ऑफ थ्रोन्स हा अदृश्य पातळीवर सुरू असतो. कोण आपलं आणि कोण शत्रू हे ओळखणं अनेकदा खूप कठीण असतं. प्रत्येकाचे निकष हे वेगळे असतात. प्रत्येकाचे खेळायचे नियम वेगळे असतात. कोणाचा अजेंडा काय आहे हे अनेकदा शेवटपर्यंत कळत नाही. त्यामुळेच हा गेम सगळ्यांत जास्ती नुकसान आणि जखम देणारा असतो. यात अनेकदा आयुष्यं उध्वस्त होऊन जातात. यातील प्रत्येक चाल ही मनाला क्लेश आणि यातना देऊन जाते. यातले मुखवटे जेव्हा गळून पडतात तेव्हा होणारा त्रास शब्दांपलीकडे असतो. सोशल मिडिया हा याच गेम ऑफ थ्रोन्सचं एक चालतं  बोलतं उदाहरण आहे. शालजोडीतले, स्क्रीन शॉट ते गॉसिप हे सगळ्याच या गेम ऑफ थ्रोन्सच्या चाली आहेत. ज्यात प्रत्येकजण एकमेकाला शह काटशह देत असतो. पण यात दोन्ही बाजूने नुकसान होते हे मात्र अनेकांना उमजत नाही. आपलं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण समोरच्याला आपण खाली पाडलं पाहिजे, समोरच्याला इंगा दाखवला पाहिजे, समोरच्याचा अपमान केला पाहिजे, समोरच्याचा माज उतरवला पाहिजे आणि इतर अनेक कारणांसाठी आपण इतक्या पायऱ्या उतरतो की आपण तळाला पोहोचलो याची जाणीव अनेकदा आपल्याला होत नाही. 

कौटुंबिक आणि सामाजिक गेम ऑफ थ्रोन्समध्ये खरंच कोणी जिंकून समाधानी होते का? याचं उत्तर नाही हेच येते. कारण ज्याच्यावर वार होतात आणि जे वार करतात ते कधीतरी आपलेच असतात. मुखवटे घालून असतील, फसवून असतील, भावनांशी खेळून असतील पण कधीतरी आपलेच असतात म्हणून तर याचा त्रास सगळ्यांत जास्ती होतो. पण म्हणतात ना की एकदा झिंग चढली की आपण काय मिळवतो आणि काय गमावतो याचा जमाखर्च मांडण्याची गरजही आपल्याला वाटत नाही. तिकडेच सुरू होतो एक न संपणारा खेळ ज्यात हरणारा उध्वस्त होतोच पण जिंकणाराही सर्व गमावून बसतो. या खेळात तोच जिंकतो ज्याला आपण कुठे थांबायचं हे कळतं, ज्याला हरूनसुद्धा जिंकता येतं आणि ज्याला आपल्यापेक्षा समोरचा काय चाल करणार याची माहिती जास्त असते. गेम ऑफ थ्रोन्स हा न संपणारा आहे. ज्यात वेगवेगळ्या लेव्हल येतात. प्रत्येक लेव्हलवर आपण जिंकू याची जशी शाश्वती नसते तशी प्रत्येक खेळात आपण सामाविष्ट व्हायलाच पाहिजे असा अट्टाहासही नको. कधीतरी बाजूला बसून सुद्धा गेम ऑफ थ्रोन्सची मजा अनुभवता आली पाहिजे. हे जेव्हा जमते तेव्हा आपण न खेळताही या खेळातला हुकूमाचा एक्का बनतो. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment