Monday 28 March 2022

चुकलेला माणूसच असतो... विनीत वर्तक ©

 चुकलेला माणूसच असतो... विनीत वर्तक ©

ऑस्कर मिळवणं हे चित्रपट क्षेत्रातील एक परमोच्च आनंदाचा क्षण मानला जातो. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगितकार आणि चित्रपटातील कलाकार या सर्वांसाठीच हा क्षण आयुष्यातील अमुल्य क्षणांसारखा असतो. हा सन्मान मिळण्याचा सोहळा दरवर्षी एखाद्या उत्सवासारखा जगाच्या काना-कोपऱ्यात बघितला जातो. पण हा आनंददायी सोहळा अनेकदा हटके अथवा वेगळ्या गोष्टींसाठी जास्त गाजलेला आहे. या वर्षीचा सोहळा याला अपवाद ठरला नाही. या वर्षीचा सर्वोत्तम कलाकार ठरलेल्या विल स्मिथ ने हा सोहोळा सादर करणाऱ्या ख्रिस रॉक ला स्टेज वर जात कानशिलात लगावली. हा प्रसंग जगातील अब्जोवधी लोकांनी लाईव्ह बघितला. 

अनेक लोकांना स्टेजवर घडलेला सगळा प्रकार स्क्रिप्ट चा भाग वाटला. पण विल स्मिथ चा चेहरा खूप काही सांगून जात होता. गोष्ट एकदा सहनक्षिलतेच्या पलीकडे गेली की माणूस काय करू शकतो हे दाखवणारा कालचा प्रसंग होता. गेली काही वर्ष विल स्मिथ ची बायको जडा पँकेट- स्मिथ ही 'एलोपेशिया' सारख्या आजाराने त्रस्त आहे. ख्रिस रॉक ने बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर हा पुरस्कार देण्याआधी त्याच्या बायकोवर आणि तिच्या आजारावर मस्करी केली. जे विल स्मिथच्या सहन पलिकडचं झालं आणि त्याचा परीणाम म्हणजेच कालचा घडलेला प्रसंग. 

या प्रसंगानंतर दोन्ही बाजूने लोकांच्या खूप प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. विल स्मिथ सारख्या ऑस्कर जिंकणाऱ्या कलाकाराकडून असं वर्तन अपेक्षित नव्हतं ते त्याच वर्तन कसं योग्य आहे किंवा त्याने जे केलं त्याच समर्थन अनेकजण करत आहेत. कालच्या घटनेनंतर दोन्ही कलाकारांनी अतिशय संयम आणि प्रगल्भता दाखवलेली आहे. दोन्ही कलाकारांनी आपण माणूस असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. माणूस चुका करू शकतो खरे तर चुकलेला माणूसच असतो हे एकप्रकारे मान्य केलेलं आहे. माझ्या मते कालच्या घटनेतील ही सगळ्यात मोठी शिकवण आहे. 

एकीकडे ख्रिस रॉक ने अनपेक्षितपणे कानशिलात बसल्यावर चेहऱ्यावर काही न दाखवता सोहळा आणि त्याच सूत्रसंचालन प्रभावीपणे त्यानंतर ही सुरु ठेवलं आणि ऑस्कर च्या सोहळ्याला अजून गालबोट लागू दिलं नाही. त्याच सोबत आपण विल स्मिथ वर पोलिसात तक्रार करणार नसल्याचं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे विल स्मिथ ने सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार स्विकारताना मनापासून झालेल्या घटने बद्दल दिलगिरी व्यक्त केली. सर्वांसमक्ष त्याने ख्रिस सोबत ऑस्कर ची ही माफी मागितली. हे सगळं इतकं आतून आलेलं होतं की कुठेतरी त्या घटनेपेक्षा माणूस म्हणून समजून घेतल्याचा आनंद मला तरी व्यक्तिशः झाला. 

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग असतात की ज्यात आपण हतबल असतो. या हतबलतेची तिव्रता सगळ्यात जास्त असते जेव्हा ती चूक आपल्या कडून घडलेली असते किंवा आपल्या अतिशय जवळच्या व्यक्तीशी ती घटना संबंधित असते. त्या वेळी सगळ्या भावनांचा कोंडमारा होतो आणि तो साठत जातो एखाद्या बॉम्ब सारखा. त्याला एका ठिणगीची गरज असते आणि त्याचा स्फोट होतो. नेमकं हेच विल स्मिथ च्या बाबतीत घडलं. आपल्या बायकोच्या आजारामुळे एक प्रकारची हतबलता त्याला आलेली होती. पैसा, समृद्धी, सुख सगळं पायाशी लोळण घेत असताना पण आपण काही करू शकत नाही. तिच्या या आजाराची  कोणीतरी अब्जोवधी लोकांसमोर मस्करी करते हे सहन करणं विल ला अनावर झालं. पुढे जे झालं ते सर्वानी टीव्हीवर बघितलेलं आहे.  

विल नक्कीच एक कलाकार म्हणून चुकला. त्याने निवडलेली वेळ, स्थळ आणि कृती नक्कीच चुकीची होती. पण एक माणूस म्हणून, एक पती, एक जोडीदार म्हणून तो नक्कीच चुकीचा नाही. ख्रिस एक माणूस म्हणून चुकला. आपल्या मस्करी अथवा विनोदातून आपण कोणाचा अपमान अथवा त्यांच्या त्या हळव्या कोपऱ्यात तर हस्तक्षेप करत नाहीत याची जाणीव त्याने ठेवायला हवी होती. विनोद करताना, मस्करी करताना आपण कोणाच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींना चव्हाट्यावर आणून त्याची तर मज्जा घेत नाही याचं भान त्याने निश्चितच ठेवायला हवं होतं. पण एक कलाकार म्हणून त्याने वेळ नक्कीच निभावून नेली. आपण कुठे चुकलो याची जाणीव त्याला कदाचित झाली असेल त्यामुळेच त्याने पोलिसात विल विरुद्ध तक्रार दाखल केलेली नाही. 

या सगळ्या घटनेतून एक बोध आपण नक्कीच घ्यायला हवा तो म्हणजे चुकलेला पण माणूस असतो. कोणाची मस्करी, विनोद करताना अथवा कोणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावून बघताना आपण एक अदृश्य रेषा ओलांडत नाही न याची काळजी आपण घ्यायला हवी. आपण जर तशी काळजी घेतली नाही तर पुढे घडणाऱ्या घटना आपण विचार करतो त्या पलीकडे गंभीर असू शकतात. कारण कोणाच्या मनात किती साचलेलं आहे? किती प्रेशर आहे? किती विस्फोटक  स्वरूपात ते बाहेर पडू शकते याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment