Wednesday 2 March 2022

उद्या काय होणार? (भाग १)... विनीत वर्तक ©

 उद्या काय होणार? (भाग १)... विनीत वर्तक ©

युक्रेन आणि रशिया मधलं युद्ध किती काळ सुरु राहणार?

मागे मी लिहिलं होतं की रशिया आणि युक्रेन मधील युद्ध ४८ ते ७२ तास चालेल. पण गेल्या काही दिवसातील घडामोडीवरून ते अजून काही आठवडे चालेल असं दिसत आहे. ४८ ते ७२ तास सांगण्यामागे कारण होत की आपल्या देशाचा विध्वंस होण्यापेक्षा युक्रेन शरणागती पत्करेल असं मला वाटत होतं. निष्पाप युक्रेन नागरिकांच्या काळजीने तरी स्वतःचा अजेंडा राबवणारे युक्रेन चे सर्वसेवा यांचे डोळे उघडतील अशी आशा होती पण ती फोल ठरताना दिसत आहे. याचे गंभीर परीणाम युक्रेनला आणि पर्यायाने जगाला भोगावे लागणार आहेत. रशिया युक्रेनवर वर्चस्व मिळवल्या शिवाय मागे हटणार नाही हे स्पष्ट आहे. जर युक्रेन ने आपला हेकेखोरपणा असाच सुरु ठेवला तर आण्विक युद्धाची सुरवात झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. 

युद्ध थांबण्याचा एकच पर्याय म्हणजे युक्रेन ने शरणागती पत्करणे. काही फेसबुक तज्ञ याला देशप्रेमाचा रंग देऊन 'बचेंगे तो और भी लढेंगे' असं युक्रेन ने वागायला हव वगरे तारे तोडतील. पण त्या सगळ्यांनी एक लक्षात घ्यायला हवं की जितका जास्त काळ युक्रेन प्रतिकार करणार तितक्या अधिक प्रमाणात त्यांच्या नागरिकांच, मालमत्तेचं, देशाचं नुकसान होणार. याला जगातील कोणतीही शक्ती, देश अडवू शकणार नाही. 

पुतीन हिटलर आहेत का? पुतीन हेच युद्धाला कारणीभूत आहेत का? 

मी आधी लिहिलं तसं या युद्धाला पुतीन नाही तर अमेरीका संपूर्णपणे जबाबदार आहे. २०१४ पर्यंत सगळं सुरळीत असताना युक्रेनने चुकीच्या राजकारण्यांची निवड केल्यानंतर गरज नसताना रशियाच्या शेजाऱ्यांमध्ये अमेरीकेने घुसखोरी केल्याचे हे परीणाम आहेत. अमेरिकेच्या आणि युरोपियन युनियन च्या तालावर नाचणाऱ्या युक्रेनच्या राजकारणी लोकांमुळे ही परिस्थीती आज युक्रेनवर आलेली आहे. पुतीन यांची एकच स्पष्ट मागणी आहे ती म्हणजे अमेरिकेने आणि युरोपियन युनियन नें नाटो च्या नावाखाली युक्रेन शी संबंध जोडू नयेत. ते जर तस करणार नसतील तर मग रशिया आपलं राष्ट्रहित जपण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. 

नाटो या संघटनेचा युक्रेनमधील हस्तक्षेप पूर्णपणे चुकीचा आहे. युक्रेन जर नाटो चा सदस्य झाला तर नाटो च्या कराराप्रमाणे अमेरीका आपले सैनिक, मिसाईल आणि अगदी अणुबॉम्ब युक्रेन मधे ठेवू शकणार आहे. नाटो चा करार असा सांगतो की नाटो च्या कोणत्याही देशावर जर हल्ला झाला तर नाटो मधील सर्व देश एकत्र येऊन त्या देशाविरुद्ध युद्ध करू शकतात. त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. म्हणजे उद्या युक्रेन च्या भूमीवरून रशियावर गोळीबार झाला आणि प्रतिउत्तर म्हणून रशियाने गोळी झाडली तर नाटो चे सर्व सदस्य देश आपली सेना युक्रेन मधे आणू शकतात. रशिया विरुद्ध जगातील ३० पेक्षा जास्त देश असा सामना सुरु होऊ शकतो. जे रशिया कस स्वीकारणार आहे? उद्या रशियाने आपली सेना अश्याच एखाद्या कराराचा आधार घेऊन मेक्सिको मधे उतरवली तर अमेरीका हे चालवून घेईल का? जर चीन ने असाच करार करून बांगलादेश, श्रीलंका किंवा पाकिस्तान मधे आपलं सैन्य उतरवलं तर भारत हे चालवून घेणार का? 

या प्रश्नाची उत्तर जर नाही असतील तर भारतीय मिडिया आणि भारतातील काही पुरोगामी आणि स्वतःला शहाणे समजणारे तज्ञ ज्या पुतीन ला हिटलर बनवायला तयार झाले आहेत. ते योग्य आहे का? कोणताही देश आपलं राष्ट्रीयत्व जपतो. त्याला जर कुठे धोका निर्माण होणार असेल तर त्यासाठी कठोर पावलं ही उचलावी लागतात. अमेरीकेने आजवर युनायटेड नेशन च्या ज्या ७ व्या आर्टिकल चा वापर करत जगातील सगळ्या युद्धात भाग घेतला मग ते अफगाणिस्तान असो वा व्हियेतनाम. तर आज त्याचा वापर करून रशिया युद्ध करत असेल तर रशिया चुकीची आणि अमेरिका बरोबर हा मतप्रवाह मांडणारे तज्ञ बघून जगातील इतिहासाच ज्ञान किती तोकडं आणि एखाद्या मृगजळा प्रमाणे असते हे दिसून येते. 

माझ्या मते पुतीन आणि रशिया आपल्या ठिकाणी योग्य आहेत. जो काही निष्पाप लोकांचा संहार चालू आहे त्याला अमेरीका, नाटो देश आणि युक्रेन चे कॉमेडी सरकार पूर्णपणे कारणीभूत आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करतो की युक्रेन ची सेना आणि लोक जी या युद्धात रशियाला प्रतिकार करत आहेत त्यांच्या आदर आणि त्यांच्या देश्प्रेमाला सलाम. पण हे देशप्रेम देश चालवणाऱ्या लोकांच्या चुकीच्या निर्णयांमुळे वाया जाते आहे याच शल्य ही आहे. यातून भारताला खूप काही शिकण्यासारखं आहे. वयाची उंची गाठलेल्या पण अजून बुद्धीची उंची न गाठता आलेल्या नेत्याच्या हातात देश देणं किती महाग पडू शकते. हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं आहे.  

 पाकिस्तान चे पंतप्रधान रशियात काय करत होते? या सगळ्यात भारताची बाजू योग्य आहे का? 

असं म्हणतात की बेडकाने बैल बनण्याचा प्रयत्न करू नये. त्यात त्याचाच प्राण जातो. पण काय आहे विनाशकाले विपरीत बुद्धी असला प्रकार पाकिस्तान चा सुरु आहे. अमेरीकेने भारताशी वाढवलेल्या सलगी नंतर तसेच पाकिस्तान ला वाळीत टाकल्यानंतर अमेरीकेच नाक ठेचण्यासाठी पाकिस्तान चे पंतप्रधान लागोलाग अमेरीके विरुद्ध बाजू घेऊन रशियाशी सलगी वाढवायला रशियात जाऊन पोहचले. रशियाशी जवळीक दाखवून आपण अमेरीकेच्या नाकातून धूर काढू आणि त्यांना अद्दल घडवू असली स्वप्न बघणाऱ्या पाकिस्तान ला दोन्ही बाजूने पेकाटात लाथ बसली आहे. 

एकीकडे पाकिस्तान च्या भुमिकेमुळे चिडलेल्या अमेरीकेने पाकिस्तानवर ५५ मिलियन अमेरीकन डॉलर चा दंड ठोठावला आहे. अडीच कंगाल असलेल्या पाकिस्तान ला याने अजून फटका बसला आहे. ज्या कारणासाठी पाकिस्तान चे पंतप्रधान रशिया ले गेले होते. ते कारण म्हणजे पाकिस्तान ला गिलगिट प्रांतातून गॅस लाईन टाकण्यासाठी रशियाने मदत करावी असा प्रस्ताव त्यांनी पुतीन यांना सांगितला. यावर पुतीन नी जी सिक्सर मारली आहे त्याने पाकिस्तान च्या पंतप्रधानांचे तोंड बघण्यासारखं झालं आहे. पुतीन यांनी हसत पाकिस्तान च्या पंतप्रधानांना सुनावलं की तुम्ही ज्या गिलगिट प्रातांची गोष्ट करत आहात. तोच मुळी रशिया तुमचा मानत नाही. हा भूभाग भारताचा आहे असं रशियाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे मदत तर विसरा पण जर तुम्ही असा काही प्रयत्न केला तर रशिया भारतासोबत उभा असेल हे लक्षात असू द्या असं सुनावलं. 

रशियात थोबाडीत आणि पाकिस्तानात बुडावर लाथ बसलेल्या पाकिस्तान च्या पंतप्रधानांचा दौरा पाकिस्तान ची शकले अजून उडवणार आहे. पाकिस्तान मधे एका गॅस सिलेंडर ची किंमत २७६० रुपयांच्या घरात आहे. या युद्धानंतर ती अगदी ५००० रुपयांवर जाऊ ही शकते कारण अमेरीका पाकिस्तान च हे वर्तन हलक्यात घेणारी नाही. एफ.ए.टी.एफ. च्या पुढील बैठकीत पाकिस्तान ला ब्लॅक लिस्ट मधे टाकण्यासाठी अमेरीका आपलं वजन वापरणार हे उघड आहे. जर का तसं झालं तर पाकिस्तान ला ब्लॅक लिस्ट मधे जाण्यापासून चीन पण रोखू शकणार नाही. पाकिस्तान चे दिवाळं त्या नंतर अजून निघणार आहे. नको तिकडे बाजू घेतली तर काय होऊ शकते हा धडा आपण पाकिस्तान कडून शिकायला हवा. 

भारताने घेतलेली बाजू अतिशय योग्य आहे. रशिया आपला मित्र आहे आणि रशियाने आपल्याला नेहमीच साथ दिलेली आहे. त्यामुळे अश्या वेळी रशियाची साथ न सोडणं हे योग्य आहे. ज्यावेळेस भारत अमेरीकेच्या जवळ जात होता त्यावेळेस जुन्या राजकारण्यांनी बांधलेली मोट नवीन राजकारणी मोडत आहेत असा कांगावा भारतातील अनेक प्रथितयश पुरोगामी आणि विचारवंतांनी केला. आज जेव्हा भारत रशियासोबत आहे तेव्हा यांच्यात पोटात सगळ्यात जास्ती दुखत आहे आणि ते युक्रेन आणि अमेरीके सोबत मानवतेच्या दृष्टिकोनातून जाण्यासाठी आवाज करत आहेत. देशाच्या दृष्टीने चांगलं राहिलं बाजूला पण आपलं आणि आपल्या विचारसरणीच त्यायोगे तस नरेटिव्ह सेट करणाऱ्या राजकीय पक्षांच सगळ्यात आधी भलं कस  होईल याची दुकान उघडून हे तयार बसलेले आहेत. देशाचा निर्णय योग्य ठरला तर आधीच्या राजकारण्यांच्या प्रयत्नांचं फळ आणि जर चुकला तर आत्ताच्या राजकारण्यांनी देशाची केलेली हालत यावर रकाने लिहायला हे लोक तयार आहेत. 

भारताने अतिशय समतोल भुमिका घेतलेली आहे आणि ज्याचे पडसाद येणाऱ्या काळात भारताच्या फायद्याचे असणार आहेत. जागतिक महासत्तेच केंद्र आता पश्चिमी कडून पूर्वेकडे सरकत आहे. येणाऱ्या काळात चीन आणि भारत हे दोन्ही देश पश्चिमी देशांना भारी तर पडणार आहेतच पण जागतिक महासत्तेच्या दिशेने वेगाने जाणार आहेत. जर का खोडा घालायचा असेल तर भारत आणि चीन ला आपापसात युद्धात गमावून ठेवणं हा एक पर्याय पश्चिमी देशांना दिसतो आहे. या सगळ्यात रशिया हा खूप मोठी भुमिका येत्या काळात बजावणार आहे. रशियाचे दोन्ही देशांशी संबंध जवळचे आहेत. रशिया तटस्थ राहणं भारतासाठी खूप महत्वाचं आहे. कारण जर रशिया चीन जवळ गेला तर आपलं सगळ्याच दृष्टीने खूप मोठं नुकसान असणार आहे. 

रशिया आज संरक्षण, अवकाश क्षेत्रात आपला सगळ्यात मोठा भागीदार आहे. चीन ला ज्या ब्राह्मोस आणि एस ४०० च्या जीवावर आपण डोळे दाखवू शकतो ते रशियाने दिलेलं आहे. आज भारत अवकाश क्षेत्रात जी उडी मारू शकलेला आहे त्यात रशियाचा मोठा वाटा आहे. येणाऱ्या गगनयान, चांद्रयान मोहिमेत रशियाच आपल्याला मदत करतो आहे. मग रशियाची आपण तटस्थ राहिलो तर ती चूक कशी असेल? १९६५, १९७१, १९९९ कोणतंही युद्ध घ्या, आर्टिकल ३७०, पोखरण आण्विक चाचण्या, काश्मीर प्रश्न या सगळ्या बाजूंवर रशियाने आपल्याला साथ दिली आहे. मग आज जर रशियाची साथ सोडा पण निदान तटस्थ राहणं जर करू नाही शकलो तर ते योग्य राहील का? त्यातही रशियाची बाजू पूर्णपणे योग्य असताना फक्त काही तळवे चाटणाऱ्या लोकांच्या सांगण्यावरून आपण विरोधी भुमीका घेणं अयोग्य आहे. 

क्रमश: 

पुढील भागात भारतीय लोकांची- विद्यार्थ्यांची सुटका, त्यातील आव्हान, त्यांच्या अडचणी, त्यांनी व्यक्त केलेली उदासीनता या सोबत एकूणच युद्धाचे संभावित परीणाम. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



6 comments:

  1. विनीत जी,भारताला युक्रेन आणि रशियात मध्यस्थी करायला सांगण्यात पाश्चात्य देश आपल्याला खरेच एव्हढे मोठे मानतात की हा त्यांच्या कूटनीतीचा एक भाग आहे? उद्या जर चीनने आपल्यावर आक्रमण केले तर भारतीय लोकशाही ही खरी नाही आणि म्हणून त्यांनी मदत करण्याची आवश्यकता नाही हे सिद्ध करण्यासाठी ही मध्यस्थीची मागणी आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. i think we have that position now due to economic and world politics.

      Delete
  2. विनीतजी,माझा एक साधा प्रश्न आहे,युद्ध होणार आहे हे आपल्या राज्यकर्त्यांना माहीत होत तर आपले नागरिक वेळीच तिथून हलवले का नाहीत?
    का यातही श्रेयवादाच राजकारण आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. I have written about it in the next article

      Delete