'ही दोस्ती तुटायची नाय'... विनित वर्तक ©
युक्रेन- रशिया युद्धाला आता जवळपास २५ दिवस उलटून गेलेले आहेत. हे युद्ध आपल्या अंतिम टप्यात आलं आहे का? याबद्दल आता सुद्धा कोणीच काही सांगू शकत नाही. एकीकडे रशिया युक्रेन मधील एक एक शहराला बेचिराख करून ताबा मिळवत आहे तर तिकडे दुसरीकडे युक्रेन ची सेना रशियाला तगडा प्रतिकार करत आहे. या युद्धाचा निकाल रशियाच्या बाजूने जाणार हे उघड आहे. फक्त रशिया किती वेळ आपला संयम ठेवू शकते यावर खूप काही अवलंबून आहे. हा संयम आता सुटताना दिसत आहे. कारण युद्धाचा प्रत्येक दिवस रशियावर आर्थिक झळ टाकत आहे. त्यामुळे एका क्षणाला रशिया आपल्या भात्यातील अशी संहारक शस्त्र बाहेर काढेल ज्यामुळे संपूर्ण युक्रेन बेचिराख होईल. मग तेव्हा कोणीच युक्रेनला वाचवू शकणार नाही. त्याची सुरवात रशियाने दोन दिवसांपूर्वी केली आहे. रशियाच्या या कृतीचा निषेध या युद्धाला कारणीभूत असणारी अमेरीका आणि तिची मित्र राष्ट्र जगाच्या पाठीवर तावातावाने करत आहेत. पण त्यांच्या या निषेधाला रशियाने केराची टोपली दाखवलेली आहे. त्याची दखल घेण्याची गरज सुद्धा रशियाला वाटत नाही. कारण रशियाचे मित्र देश त्याच्या सोबत उभे आहेत.
भारत आणि रशियाची मैत्री खूप जुनी आहे. कोल्ड वॉर च्या काळापासून भारत रशियासाठी आणि रशिया भारतासोबत उभा राहिलेला आहे. आज या युद्धाच्या निमित्ताने या मैत्रीचा पुन्हा एकदा कस लागलेला आहे. आजचा काळ वेगळा आहे. आजचं जागतिक पटलावर असणारं भारताचं स्थान वेगळं आहे. रशियाला जर कुठेतरी रोखायचे असेल तर तशी क्षमता असणारा आज भारत आपल्या जवळचा एकमेव देश आहे हे अमेरीका आणि युरोपियन युनियन जाणून आहेत. त्यामुळेच भारताची या युद्धातील भुमिका निर्णायक मानली जात आहे. भारत अमेरीका सोबत क्वाड ग्रुप मधे आहे. भारताचे जी २० देशांशी अतिशय चांगले संबंध आहेत. भारताचे ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, फ्रांस, युनायटेड किंगडम अश्या आज रशिया विरुद्ध शड्डू ठोकलेल्या सर्व देशांशी अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. त्याच सोबत भारताचे रशियाशी घनिष्ठ संबंध आहेत. २०२१ मधे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन जर कुठे गेले असतील तर तो एकमेव देश भारत आहे. (जिनेव्हा इथली मिटिंग वगळता). आज रशिया जेव्हा अमेरीका आणि युरोपियन राष्ट्रांना भिक घालत नाही त्यावेळेस त्यांची बाजू मांडण्याची जबाबदारी आपसूकपणे भारतावर आलेली आहे. त्याच वेळेस रशियाची बाजू या राष्ट्रांसमोर मांडण्याची जबाबदारी ही भारतावर आलेली आहे.
भारताने आपल्या मैत्रीला जागताना ही तारेवरची कसरत यशस्वी केली आहे असं आता दिसून येते आहे. भारताने रशियाच्या विरुद्ध कोणत्याही प्रस्तावाला गैरहजर राहून रशियाची मदत केली त्याचवेळी भारताच्या पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्राध्यक्षांशी बोलून हे युद्ध संपवण्याच आवाहन केलं आहे. अमेरीका आणि मित्र राष्ट्रांनी भारतावर दबाव टाकला आहे असं एक चित्र प्रसार माध्यमांनी उभं केलं आहे. पण ते फसवं आहे. दबावाला झुकणारा भारत राहिलेला नाही. भारतासाठी काय योग्य त्याचा विचार करून भारताने सरळ शब्दात आपली बाजू स्पष्ट केली आहे. क्वाड मधे रशियाबद्दल चर्चा करण्याचा प्रस्ताव इतर सर्व देशांनी मांडला होता. ज्याला भारताने स्पष्ट विरोध करत अशी चर्चा करण्यास आपला विरोध असल्याचं कळवलं आहे. काही दिवसांपूर्वी जपान चे पंतप्रधान भारतात असताना त्यांनी रशियाबाबत भाष्य केलं. पण त्यांच्या समोर सुद्धा भारताने रशिया विरुद्ध एकही अक्षर न बोलता जपानला आपली बाजू स्पष्ट केली आहे. तीच गोष्ट ऑस्ट्रेलिया च्या बाबतीत घडलेली आहे. भारताची रशियासोबतची मैत्री आणि बाजू आम्ही समजू शकतो हे ऑस्ट्रेलिया कडून आलेलं विधान उगाच आलेलं नाही. अमेरिकेने रशिया बाबतीत भारत डळमळीत वक्तव्य करत असल्याचं तसेच भारताने घेतलेली बाजू इतिहासात लिहली जाईल असं म्हंटल. त्यावर भारताने आमचा इतिहास आम्ही लिहू असं म्हणत एक सूचक इशारा दिला आहे.
जेव्हा जगातील ५७ मुस्लिम देश एकत्र येऊन काश्मीर आणि पॅलेस्टाईन वर चर्चा करतात तेव्हा भारत आपल्या मित्राला आपल्या घरी आमंत्रण देतो. भारताने एकीकडे या ५७ देशांना आपल्या बाजूने वळवण्याचा सपाटा लावला आहे त्याचवेळेस या सर्वांचा शत्रू आणि आपला सार्वकालिक मित्र इस्राईल च्या पंतप्रधानांना भारतात बोलावलेलं आहे. इस्राईल चे पंतप्रधान एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ दिवसांच्या विशेष भारत दौऱ्यावर येत आहेत. भारत इस्राईल संबंधांना ३० वर्ष पूर्ण होत असून त्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असली तरी त्याचे मायने खूप वेगळे आहेत. भारत आणि इस्राईल अनेक क्षेत्रात सहकार्य करत तंत्रज्ञान विकसित करत आहेत. संरक्षण हे त्यातलं प्रमुख क्षेत्र आहे. भारताच्या एअर डिफेन्स प्रणाली मधील बराक ८ ही प्रणाली भारत आणि इस्राईल यांनी संयुकरीत्या विकसित केलेली आहे. जगातील सगळ्यात प्रसिद्ध आणि ताकदवान अशी गुप्तचर संघटना म्हणजेच इस्राईल ची 'मोसाद'. भारताची रॉ आणि इस्राईल ची मोसाद आज अनेक पातळीवर गुप्त गोष्टींचं आदानप्रदान करत आहेत. इस्राईल चा आशिया खंडातील सगळ्यात मोठा मित्र भारत आहे. तर भारताला सगळ्याच वेळी इस्राईल ने मदत केलेली आहे. एकीकडे इस्राईल च्या दुश्मन देशांशी म्हणजेच अरब राष्ट्रांशी भारताने आपले संबंध बळकट केले आहेत. पण त्याचा कोणताही परीणाम भारत आणि इस्राईल यांच्या मैत्रीवर झालेला नाही. उलट ती दिवसेंदिवस अजून बहरत आहे.
रशिया आणि इस्राईल या दोन्ही देशांशी भारताची असलेली मैत्री जागतिक पटलावर न तुटणारे बंध म्हणून बघितली जाते. अनेक देशांनी या मैत्रीला तोडण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आलेलं आहे. उलट ही मैत्री अजून घट्ट होत असल्याचं यानिमित्ताने जगाने अनुभवलेलं आहे. जगाच्या बदलत्या समीकरणात या दोन्ही देशांशी असलेल्या मैत्रीचा आज कस लागला आहे. पण आज तरी 'ही दोस्ती तुटायची नाय' असच ठळकपणे स्पष्ट होते आहे.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment