Monday, 14 March 2022

एका चुकलेल्या मिसाईल ची गोष्ट...विनित वर्तक ©

 एका चुकलेल्या मिसाईल ची गोष्ट...विनित वर्तक ©

काही दिवसांपूर्वी भारताचं एक क्षेपणास्त्र चुकून आपला रस्ता भरकटत चक्क पाकिस्तानात जाऊन पडलं. पाकिस्तान ची सरहद्द ओलांडून १२४ किलोमीटर चा प्रवास पाकिस्तान मधे सुपर सॉनिक वेगाने अवघ्या साडेतीन मिनिटात करत त्याने पाकिस्तान मधील मियान चानू प्रांतात पडलं. पाकिस्तान ने या गोष्टीचा खूप गाजावाजा केला. भारतावर प्रतिबंध घालण्याची मागणी युनायटेड नेशन आणि त्याच्या सदस्य देशांना केली. भारताच्या या कृतीचा सर्व जगाने निषेध करावा यासाठी सर्व देशांना पत्र पाठवणार असल्याचं ही पाकिस्तान ने सांगितलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारताकडून फक्त एक पत्रक काढून चौकशी करू तसेच हे मिसाईल चुकून पाकिस्तान च्या हद्दीत गेल्याच आम्हाला दुःख असल्याचं म्हंटलेलं आहे. यानंतर भारताने ऑफिशिअली यावर काहीही विधान केलेलं नाही किंवा यावर भारत सरकारकडून अथवा कोणत्याही पदावरील मंत्र्यांकडून कोणताही खुलासा अथवा वक्तव्य आलेलं नाही. त्यामुळेच या चुकलेल्या मिसाईल ची गोष्ट मोठी रंजक बनली आहे. त्यामुळेच ही चुकलेलं मिसाईल नक्की काय आहे हे थोडं जाणून घेऊ या. 

भारताने आपलं पत्रक या घटनेवर प्रसिद्ध केलं तेव्हा त्यात कोणत्याही मिसाईल च नाव घेतलेलं नाही. पण पाकिस्तान आणि अनेक रक्षा तज्ञांच्या मते ते 'ब्राह्मोस' सुपर सॉनिक मिसाईल होतं. आपण मानून चालू की हे ब्राह्मोस मिसाईल होतं. २००१ मधे ब्राह्मोस मिसाईलची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. याचा अर्थ जवळपास २० वर्ष भारत या मिसाईलच तंत्रज्ञानाच्या आणि इतर सर्व सिस्टीम च्या चाचण्या घेत आला आहे. त्यात बदल करत आला आहे. साहजिक आहे की आत्ता जी ब्राह्मोस तयार आहेत ती २००१ च्या तुलनेत खूप प्रगत, खूप प्रभावी आणि त्याच प्रमाणे चूक न होण्यासाठी बनवली गेलेली आहेत. कोणतेही मिसाईल फायर करण्याआधी खूप सारे प्रोटोकॉल आणि परवानग्या घेतल्या जातात. मिसाईल लाँच च्या वेळेस सुद्धा प्रत्येक पातळीवर प्रत्येक अधिकाऱ्याचा क्लिअरन्स घेतला जातो. ज्या प्रमाणे एखाद्या रॉकेट उड्डाणात मिशन कंट्रोल डायरेक्टर ने गो अहेड दिल्याशिवाय रॉकेट उड्डाण भरत नाही. त्याच प्रमाणे मिसाईल हे फायर होत नाही. मिसाईल फायर करताना पण त्यात ओ. टी. पी. प्रमाणे कोड टाकावा लागतो. जो काही वेळासाठी लागू असतो. हा कोड सिक्रेट असतो व वेळेवर तो योग्य अधिकाऱ्याच्या हातात दिला अथवा सांगितला जातो. आता साधा विचार केला तर चुकून मिसाईल फायर होण्यासाठी यातल्या सगळ्या पायऱ्यांवर चूक अथवा निष्काळजीपणा घडणं गरजेचं आहे. कारण यातील एक जरी स्टेप चुकली तरी मिसाईल फायर होणार नाही. मग भारताने आणि भारताच्या रक्षा अधिकाऱ्यांनी इतकी मोठी चूक खरे तर चुका केल्या का? जर खरेच चुका झाल्या असतील तर भारताच्या पंतप्रधानांनी तात्काळ सुरक्षा परिषदेची मिटिंग घेऊन सगळ्याच अधिकाऱ्यांची कानउघाडणी करणं अपेक्षित नाही का? 

ब्राह्मोस हे जगातील सगळ्यात वेगाने जाणारे स्वनातीत क्रूझ मिसाईल आहे. २.८ मॅक वेगाने ३०० किलोग्रॅम वॉरहेड जे की साधं किंवा आण्विक नेण्याची त्याची क्षमता आहे. ब्राह्मोस त्याच्या प्रचंड वेगामुळे त्याच्या आकारापेक्षा २० पट जास्ती विध्वंस करण्यात सक्षम आहे. एक मिसाईल एखाद्या सैनिकी जहाजाचे क्षणात दोन तुकडे करण्यात सक्षम आहे. यावरून ब्राह्मोस च्या ताकदीचा अंदाज आपण लावू शकतो. मग चुकीने ब्राह्मोस फायर होणं किती महाग पडेल? तसं होऊ नये म्हणून भारताने त्यासाठी उपाययोजना केल्या नसतील का? जर त्या सगळ्याच चुकल्या तर हे किती गंभीर होऊ शकते? आण्विक वॉरहेड लावलेलं आणि चुकून सुटलेलं ब्राह्मोस भारताची एक- दोन शहर जगाच्या नकाशावरून एका क्षणात गायब करू शकते. मग भारता कडून चूक झाली हे शेंबड्या पोराला तरी पचेल का? 

आता आपण पाकिस्तान कडे येऊ. त्यांचे मेंदू नाहीतरी गुडघ्यात असतात. ही घटना घडल्यानंतर काही क्षणात भारतीय अधिकाऱ्यांनी याची कल्पना पाकिस्तान ला दिली. तोवर पाकिस्तान ला काय घडलं आहे याची सुतराम कल्पना नव्हती. भारताने माहिती दिल्यानंतर तब्बल २-३ तासाने पाकिस्तान ने पत्रकार परिषद घेऊन भारताच मिसाईल आपल्या भागात पडल्याचं जगाला सांगितलं. पण आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी पाकिस्तान ने या मिसाईल ची कल्पना आपल्याला पाकिस्तान च्या हद्दीत शिरल्यावर आली. तसेच या मिसाईल च प्रोजेक्टाईल ही पाकिस्तान ने पत्रकार परिषदेत दाखवलं. पाकिस्तान ने यात हे मिसाईल हरयाणा मधल्या सिरसा येथून सोडण्यात आलं. काही काळ म्हणजे जवळपास ८०-१०० किलोमीटर चा प्रवास केल्यावर याने अचानक ९० अंशाच वळण घेत पाकिस्तानकडे कूच केलं. पाकिस्तान ची सरहद्द ओलांडून १२४ किलोमीटर चा प्रवास करून हे मिसाईल पाकिस्तान चा लष्करी तळ असलेल्या मियान चानू प्रांतात पडलं असल्याचं पाकिस्तान ने सांगितलं. 

पाकिस्तान मधले अधिकारी कसे गुढघ्यात मेंदू ठेवून असतात ते बघू. ब्राह्मोस हे स्वनातीत मिसाईल आहे. जमिनीच्या अगदी जवळून ते लक्ष्यावर झेप घेऊ शकते. ब्राह्मोस व्हर्टिकल डाइव्ह ७०-९० अंशाच्या कोनात घेऊन लक्ष्यावर निशाणा साधू शकते. (व्हर्टिकल डाइव्ह म्हणजे एखादा शत्रू डोंगराच्या मागे लपला असेल तर डोंगराची उंची गाठून दुसऱ्या बाजूला दरीत लपलेल्या शत्रूला लक्ष्य करू शकते.) अमेरीका, चीन, रशिया, इस्राईल सारख्या देशांची रडार सुद्धा याचा मागोवा याचमुळे काढू शकत नाहीत. कारण हे मिसाईल अतिशय वेगवान, चपळ आणि हवेतल्या हवेत आपला रस्ता बदलण्यास सक्षम आहे. पाकिस्तान अधिकाऱ्यांच्या मते ब्राह्मोस ने पाकिस्तान च्या हद्दीत प्रवेश केल्यावर लगेच यांच्या चीन ने भंगारात दिलेल्या एअर डिफेन्स प्रणाली ने ब्राह्मोस चा मागोवा घेतला आणि शेवटपर्यंत त्याचा पाठलाग केला. आता सरळ प्रश्न येतो की तुमची एअर डिफेन्स प्रणाली इतकीच सक्षम होती तर मिसाईल १२४ किलोमीटर आत येईपर्यंत ती काय अंडी उबवत होती का? शत्रू राष्ट्राचं स्वनातीत मिसाईल आपल्या दिशेने येत आहे याची जाणीव झाल्यावर पण कोणतीच यंत्रणा त्याला रोखण्यासाठी कार्यांवित का गेली नाही? त्या मिसाईल वर कोणत्याही प्रकारचं वॉरहेड असतं तर? म्हणजे पाकिस्तानवर अणुबॉम्ब पडतो आहे पण पाकिस्तानी यंत्रणा त्याचा फक्त मागोवा घेणार? हा विचारच किती हास्यास्पद आहे. हे सगळं विचार न करता आपली चड्डी सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर सांगताना याना थोडीपण लाज वाटत नाही. 

खरी गोष्ट ही आहे की या चुकलेल्या मिसाईलमुळे पाकिस्तान सोडाच चीन, अमेरीका सारखे देश चिंतेत आहेत. याच कारण की भारताच्या मिसाईल चा थोडा पण अंदाज पाकिस्तान च्या एअर डिफेन्स प्रणालीला,  AWACS रडार ला किंवा पाकिस्तान च्या कोणत्याही रडार यंत्रणेला आला नाही. याचा अर्थ ब्राह्मोस या सगळ्या प्रणालींना चकवा देत आपलं काम फत्ते करू शकते हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ब्राह्मोस ला रोखणं तर सोडाच त्याचा मागोवा घेण्याची यंत्रणा निर्माण करणं अजून जमलेलं नाही. चीन ची एअर डिफेन्स प्रणाली यामुळे आता भंगारात जाण्याच्या लायकीची आहे यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेलं आहे. ब्राह्मोस च हे व्हर्जन जुनं म्हणजे साधारण २९० किलोमीटर ब्लॉक मधील आहे. (ज्या प्रमाणात मिसाईल ने अंतर कापलं आहे त्यावरून) भारताने सुरक्षित स्थळी हे मिसाईल आपणहून पाडलेले आहे. याचा अर्थ भारताची यंत्रणा भारतातून शत्रू देशात असणाऱ्या मिसाईल च्या प्रणाली नियंत्रित करू शकते.भारताने आपल्या मिसाईल ने कुठे, केव्हा, कधी, कश्या पद्धतीने लक्ष्य करायचं या सगळ्यावर आपलं नियंत्रण मिळवलेलं आहे हे या चुकलेल्या मिसाईल ने सिद्ध केलं आहे. 

मिसाईल चुकून उडालं की मुद्दामून पाठवलं गेलं यातल्या गोष्टी बाहेर येणार नाहीत. पण ज्या पद्धतीने भारताने या गोष्टी राजकीय, आंतरराष्ट्रीय आणि पाकिस्तान सोबत हाताळल्या आहेत ते कुठेतरी हे खूप मोठं मिशन असल्याचं सुतोवाच करत आहेत. चक्क अमेरीकेने या घटनेनंतर पाकिस्तान ला तंबी दिली आहे की तुम्ही उगाच नको तो थयथयाट करू नका. मिसाईल चुकून आलं हे भारताने मान्य केलं आहे सो आता विषय संपवा. या गोष्टी सहज पचनी पडणाऱ्या नाहीत. पाकिस्तान चा मित्र चीन सुद्धा यावर मूग गिळून गप्प आहे. त्यामुळेच हे चुकलेल्या मिसाईल ने खूप साऱ्या गोष्टी बरोबर केल्या आहेत. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment