Saturday 5 March 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २०)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २०)... विनीत वर्तक ©

असं म्हणतात की, 'एखाद्या जहाजाचे तुम्ही कप्तान झालात म्हणून जहाज कसं चालवायचं विसरायचं नसते'. कदाचित याच अवस्थेतून आज युक्रेन जातो आहे. आज त्यांच्या जहाजाचा कप्तान जहाज कसं चालवायचं हे विसरून आपण कप्तान असल्याच्या अविर्भावात संपूर्ण देशाला दावणीला बांधून स्वतः दुसऱ्या देशात पळून गेल्याची बातमी आहे. मी आधी लिहिलं तसं, वयाची उंची गाठलेल्या पण अजून बुद्धीची उंची न गाठता आलेल्या नेत्याच्या हातात देश देणं किती महाग पडू शकते. हे आज संपूर्ण जग अनुभवते आहे. आज घडणाऱ्या घटनांनी उद्याच्या भविष्यात मोठे बदल केले आहेत. वाऱ्यांची दिशा यामुळे संपूर्णपणे बदलून तर गेलीच आहे पण आता पुढे काय होणार याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. रशिया- युक्रेन युद्ध हे संपूर्णपणे जगाच्या पटलावर बुद्धिबळाच्या चाली बदलावणारं ठरलेलं आहे. आता यात नवीन प्रयोग आणि नवीन चाली खेळण्यासाठी खतपाणी घातलं गेलं आहे. या चाली कोणत्या? त्याचा भारतावर होणारा परीणाम आणि त्यात भारताची बाजू काय  शकेल याचा थोडक्यात घेतलेला मागोवा. 

जगावर नाटोने रशिया- युक्रेन हे युद्ध लादलं आहे. एका राष्ट्रपतीला बळीचा बकरा बनवत छुपे मनसुबे साध्य करण्याच्या इराद्याने पावलं टाकत असलेल्या अमेरीका आणि नाटो राष्ट्रांना सध्या घडणाऱ्या घडामोडीमुळे कभी खुशी कभी गम चा सामना करावा लागत आहे. अमेरीका आणि नाटो राष्ट्रांनी जेवढा अंदाज केला त्यापेक्षा जास्त रशियाने सर्वस्व पणाला लावून या युद्धात उडी घेतली आहे. सगळे आंतरराष्ट्रीय प्रतिबंध जुगारून पुतीन यांनी आपण युक्रेनवर कब्जा करणार या इराद्याने पावलं टाकली आहेत. या  पावलांचा अंदाज नाटो आणि अमेरीकेला आला नाही हे आता स्पष्ट होते आहे. अमेरीका प्रशासन आणि युरोपियन युनियन  रोज उठून नवीन नवीन प्रतिबंध रशियावर लावत आहेत. पण या सगळ्याला रशियाने केराची टोपली दाखवून आपल्या लक्ष्याकडे आगेकूच सुरु ठेवली आहे. रशियाच्या या पावलांमुळे नाटो देशातच फूट पडायला सुरवात झाली आहे. ही फूट का? आणि कशामुळे? हे पुढे स्पष्ट करतो. आम्ही रशियाचा विरोध करतो, मानवतेच्या दृष्टिकोनातून, पुतीन हिटलर आहेत  वगरे अशी सगळी वाक्य सांगून झाल्यावर प्रत्यक्ष कृती करायला ना अमेरीका तयार आहे ना युरोपियन राष्ट्र. 

युक्रेन रशिया वादात अमेरीका आणि नाटो देश भरपूर प्रमाणात युक्रेनला सैनिकी मदत करत असले तरी प्रत्यक्षात जमिनीवर यातलं एकही जण पुढे आलेलं नाही. नाटो ने आपले सैनिक, मिसाईल इतकच काय आण्विक मिसाईल सज्ज ठेवल्याच्या बातम्या रोज येतात पण त्याला प्रत्यक्षात काहीच अर्थ नाही. रशियाने युक्रेनच्या बराचसा भाग हस्तगत केला आहे. युक्रेन ची शहरे बेचिराख केली आहेत. तिकडे युक्रेन चे राष्ट्रपती दुसऱ्या देशातून बचेंगे तो और भी लढेंगे च्या घोषणा देत आहे. यात हानी होते आहे ती युक्रेनच्या लोकांची, युक्रेनच्या सैनिकांची. पण त्याच कोणालाच सोयरसुतक नाही. मजा बघा रशियावर आरोप करणाऱ्या एकाही युरोपियन राष्ट्राने रशियाशी युद्धात उतरण्याचं सुतोवाच केलेलं नाही. नुसती तोंडातली वाफ दवडली जात आहे. युरोपियन राष्ट्र त्यांना लागणाऱ्या जवळपास ४५% नॅचरल गॅस आणि २५% क्रूड ऑइल रशियाकडून आयात करतात. या युद्धामुळे याच्या पुर्ततेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. युरोपियन देशांना लागणार इंधन आणि इतर गोष्टी कॅप्सिकन समुद्रातून पुरवल्या जातात. रशियाशी वैर युरोपातील आणि एकूणच जागतिक इंधनाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण करणार हे उघड आहे. नाटो आणि अमेरीका यांची सद्यस्थिती सध्या तरी रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यांसारखी आहे. जे भुंकतात तर खूप पण जवळ येऊन रशियाला चावायची हिंमत एकामध्ये पण नाही. 

या युद्धाच्या निमित्ताने जगाच्या पटलावर पूर्व आणि पश्चिम अशी नवीन समीकरणं उदयाला येत आहेत. एकीकडे अमेरीका आणि युरोपियन देश तर दुसरीकडे रशिया, चीन आणि भारत अशी एक युती होताना दिसत आहे. सध्या चालू असलेल्या सर्व वादावर भारताने तटस्थ भुमिका घेतलेली आहे. तर चीन रशियाच्या बाजूने उभा राहिला आहे. अमेरीकेने आणि युरोपिअन युनियन टाकलेल्या आर्थिक निर्बंधाखाली रशियन अर्थव्यवस्थेचे वाभाडे निघणार हे उघड आहे. मग अश्या वेळेला रशिया चीन च्या वर अजून जास्त अवलंबून होणार आणि कदाचित चीन च्या हो ला हो म्हणत अमेरिकेविरुद्ध शड्डू ठोकणार हे पण स्पष्ट आहे. रशिया चीन युती अमेरीकेला अजून डोकेदुखी ठरणार आहे. कारण आधीच चीन ची वाढती ताकद अमेरीकेला डोकेदुखी आहे. आता रशियाची सोबत त्यात काळजी वाढवणारी आहे. पण हे सगळं अमेरीकेने खाजवून खरूज घेतल्या सारखं आहे. अमेरीकेच नेतृत्व ज्या पद्धतीने निर्णय घेते आहे ते बघता अमेरीका एकाच वेळेस अनेक शत्रू निर्माण करते आहे. सगळ्या बाजूने वेगवेगळ्या शत्रुंना शिंगावर घेणं येत्या काळात अमेरीकेच्या अंगलट आलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. 

भारताची अवस्था या सगळ्यात चांगली आणि वाईट अशी आहे. भारत हा एकमेव देश आहे जो दोन्ही बाजूला महत्वाचा आहे. एकीकडे भारत आणि अमेरीका यांचे संबंध तसेच भारत आणि युरोपियन देशांशी संबंध वेगवेगळ्या पातळीवर घट्ट आहेत. मग ते क्वार्ड असो, जी २० असो. तर दुसरीकडे भारत आणि रशिया यांचे संबंध खूप घट्ट आहेत. भारत आणि चीन संबंध सध्या सगळ्यात खालच्या पातळीवर असले तरी ब्रिक सारख्या पटलावर हे दोन्ही देश एकत्र आहेत. भारताला अश्या पद्धतीच्या समतोल पातळीवर खूप साऱ्या संधी पण आहेत आणि खूप सारे धोके पण आहेत. भारताची अवस्था दोन्ही घरचा पाहुणा उपाशी किंवा दोन्ही बाजूने आपला फायदा करून घेता येईल अशी आहे. आताही आपण बघू शकतो की एकीकडे अमेरीकेने भारतावर बाजू घेण्यासाठी दबाव टाकला होता पण भारताने घेतलेल्या तटस्थ भूमिकेचं अमेरीका चे राष्ट्रपती आणि रशियाचे राष्ट्रपती दोघांनी कौतुक केलं आहे. अमेरीकेने भारताने चर्चेने मधला मार्ग काढावा या भूमिकेसाठी तर रशियाने अमेरीकेसोबत न जाता संपूर्ण जग विरुद्ध असताना मैत्रीची साथ देण्यासाठी. यात भारताचं स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत झालं आहे. भारताच्या भूमिकेला वजन प्राप्त झालं आहे. 

भारताला रशियाशी संरक्षण करार आणि व्यापार करण्यात अडचणी वाढणार आहेत. भारताला रशियात आर्थिक गुंतवणूक करण्यात पण अडचणी येणार आहेत. त्याच सोबत रशियाची चीनशी वाढणारी जवळीक भारताला कुठेतरी चिंतेत टाकणारी आहे. नक्कीच भारत- चीन प्रश्नावर रशिया नेहमीच तटस्थ राहील असं सध्यातरी दिसते आहे. पण या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत. परिस्थिती बघून त्या त्या वेळेस निर्णय घेतले जातील. पण काहीही असलं तरी जागतिक पातळीवर घडणारे बदल एका नव्या रचनेची नांदी आहेत असं सध्यातरी बदलणारे वारे दाखवत आहेत. अश्या परिस्थितीत भारत काय निर्णय घेतो यावर भारताचं चांगल होणार का वाईट हे अवलंबून असणार आहे. भारताने जर युक्रेन प्रमाणे सत्तेची चावी एखाद्या कमी बुद्धीच्या नेत्याकडे दिली तर येणारा काळ आपली शकले उडवू शकणार आहे. त्यासाठीच भारतीयांनी सजगपणे आपल्या नेतृत्वाची निवड करण्याची गरज आता सगळ्यात जास्ती आहे. 

एकाचवेळी अमेरीका- नाटो आणि रशिया चीन या सगळ्यांसोबत राहून आपलं महत्व जागतिक पातळीवर वाढवून घेणं जर भारताला जमलं तर किंग मेकर च्या भूमिकेत बुद्धिबळाच्या पटलावर भारताची भूमिका सगळ्यात महत्वाची ठरणार आहे. आता झालेल्या रशिया- युक्रेन युद्धात त्याची छोटीशी चुणूक आपल्याला दिसून आली आहे. चाणक्य निती किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टी असलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील चालींचा अवलंब केला तर सर्व वारे भारताच्या बाजूने वाहतील अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. प्रश्न हा आहे की त्या वाऱ्यांना अचूक ओळखून निर्णय घेण्याची क्षमता त्यावेळेस भारताच्या नेतृत्वाकडे असेल की नाही हा येणारा काळच सांगेल. 

तूर्तास या वाऱ्यांनी आणलेल वादळ लवकरात लवकर जावो आणि जागतिक पटलावरच्या राजकारणात निष्पाप लोकांचा बळी न जावो हीच प्रार्थना... 

क्रमशः

तळटीप :- या लेखात लिहीलेली मते माझी आहेत. तीच योग्य आहेत असा माझा अट्टाहास नाही. जेवढं योग्य वाटेल तितकं घ्यावं, नाही पटल्यास सोडून द्यावं. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment