एक चुकलेलं मिशन... विनीत वर्तक ©
इतिहासाच्या पानात काही गोष्टी अश्या लुप्त झाल्या आहेत की ज्याची आठवण आली तरी अंगावर काटा उभा रहातो. त्या काळ्याकुट्ट अधांरात वाहिलेले रक्ताचे पाट सुकून गेले. ज्यांनी ते वाहिले त्यांच्या आठवणी आपण विसरून गेलो. जे कोण यातून वाचले त्यांनी त्याची वाच्यता कधीच केली नाही. कारण जे काही केलं ते फक्त आणि फक्त देशासाठी. ही गोष्ट आहे अश्याच एका चुकलेल्या मिशन ची ज्यात ३० भारतीय सैनिकांनी आपल्या रक्ताचे पाट वाहिले. ज्यात २९ जणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. त्या काळ्याकुट्ट अंधारात नक्की काय घडलं हे समजलं जेव्हा यात वाचलेल्या एका भारतीय सैनिकांनी त्या काळ रात्रीचा थरार सांगितला. त्या सैनिकाच नाव होतं 'शिपाई गोरा सिंग'.
११ ऑक्टोबर १९८७ ची संध्याकाळ होती. जेव्हा भारतीय सैनिकांनी श्रीलंकेतील लिट्टे च्या दशहतवाद्यांना कंठस्थान घालण्यासाठी श्रीलंकेत पाऊल ठेवलं होतं. त्या दिवशीच्या अंधारात भारतीय सेनेने एक मिशन हाती घेतलं होत ते लिट्टे च्या दशहतवाद्यांना कोंडीत पकडण्याच आणि त्यांचा नेता प्रभाकरन ला कोंडीत पकडण्याचं. पण दुर्दैवाने सगळ्या मिशन ची चाहूल लिट्टे ला आधीच लागली आणि लिट्टे ला कोंडीत पकडण्यासाठी केलेल्या व्युव्हरचनेत भारतीय सैनिक अडकले. लिट्टे च्या अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक श्रीलंकेतील जाफना विद्यापीठाच्या आवारात होणार होती. या बैठकीची गुप्त बातमी भारतीय सैनिकांना कळाली आणि त्यांनी 'ऑपरेशन पवन' ची आखणी केली.
लिट्टे ची क्षमता काय हे ओळखण्यात भारतीय गुप्तहेर कमी पडले आणि लिट्टे ने भारतीय सैनिकांमधे झालेलं गुप्त संभाषण ऐकलं होतं. भारतीय सैन्याला खिंडीत गाठण्यासाठी त्यांनी आपले दशहतवादी योग्य ठिकाणी तैनात केले होते. त्या दिवशीच्या मिशन ची जबाबदारी १० पॅराकमांडो चे १२० सैनिक आणि १३ सिख लाईट इन्फ्रंटरी च्या ३६० जवानांना मिळून देण्यात आली होती. काही सैनिक हे जाफना विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानात हेलिकॉप्टर उतरवून बाकीचे सैनिक त्यांना रस्त्याने येऊन मिळणार अशी रचना करण्यात आली. भारतीय सैनिक कुठे उतरणार याची आधीच कल्पना असल्याने लिट्टे चे दशहतवादी आधीच मशिनगन घेऊन त्या मैदानात लपून बसले होते. जशी पहिली दोन हेलिकॉप्टर भारतीय सैनिकांना उतरली तशी लपलेल्या लिट्टे च्या दहशतवाद्यांनी चारही बाजूने गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. या अचानक गोळीबारामुळे जिकडे भारताचे ३६० सैनिक उतरणार होते तिकडे फक्त ३० सैनिक उतरले.
हा हल्ला इतका भिषण होता की संपूर्ण मिशन एबॉर्ट करण्याची नामुष्की ओढावली. तिकडे उतरलेल्या ३० सैनिकांना कोणतीही मदत किंवा त्यांना वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत देता येणं शक्य नसल्याने मेजर बिरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली ३६० ऐवजी १/१२ म्हणजे फक्त ३० सैनिकांनी चारही बाजूने वेढलेलं असताना शत्रूला प्रतिकार करायला सुरवात केली. संपूर्ण रात्र ते १२ ऑक्टोबर १९८७ च्या सकाळी ११.३० वाजेपर्यंत शेवटची गोळी संपेपर्यंत २७ सैनिक हुतात्मा झाले होते. उरलेल्या ३ सैनिकांकडे असलेल्या सर्व गोळ्या संपल्या होत्या. पण तरीही हार न मानता त्यांनी बायोनेट चार्ज द्वारे शत्रूवर हल्ला केला. (बायोनेट चार्ज म्हणजे बंदुकीच्या पुढे चाकू लावलेला असतो. त्याचा वापर करत शत्रूवर हल्लाबोल करणे)
त्या तिघांचा संख्येने अधिक असलेल्या दशतवाद्यांसमोर टिकाव लागणं अवघड होतं. यातील दोघांना यात विरमरण आलं. तर तिसरा सैनिक गंभीर जखमी झाला. या गंभीर जखमी झालेल्या सैनिकाला लिट्टे ने पकडलं आणि बंदी बनवलं. या सैनिकांच नाव होतं 'शिपाई गोरा सिंग'. भारताचं हे मिशन अयशस्वी झालं. पण त्या ३० सैनिकांच काय झालं या बद्दल कोणतीच माहिती भारतीय सेनेला मिळू शकली नाही. तब्बल ७ दिवसांनी जेव्हा भारतीय सैनिक या भागात येऊ शकले तेव्हा त्यांना भारतीय सैनिकांचे फाटलेले कपडे, त्यांच सामान आणि हजारो मशिनगन च्या गोळ्यांची शकले आणि गोळ्या आढळून आल्या. त्यावरूनच त्या रात्री इकडे काय भयंकर घडलं असेल याचा अंदाज त्यांना आला. पण नक्की काय हे त्यांना कळलेलं नव्हतं.
शिपाई गोरा सिंग यांची मुक्तता लिट्टे ने केल्यावर त्यांनी तिथे घडलेला सगळा नरसंहार भारतीय सैन्याला सांगितला. हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांचे कपडे लिट्टे च्या दशहतवाद्यांनी फाडून टाकले. त्यांच्या नग्न देहांना एका रेषेत ठेवून बाजूच्या नागराजा देवळात अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्यात आलं. नंतर उरलेल्या देहांना तिकडेच पुरून टाकण्यात आलं. लिट्टे च्या या अमानुष कृत्यांचा पाढाच शिपाई गोरा सिंग यांनी सुटका झाल्यावर कथन केला. या कारवाईत १३ सिख लाईट इन्फ्रंटरी चे २९ सैनिक देशासाठी हुतात्मा झाले. लिट्टे कडून होणारे अमानुष अत्याचार सहन करून शिपाई गोरा सिंग यांनी आपल्या साथीदारांच्या बलिदानाची सगळी कथा भारतीय सैन्यापर्यंत पोहचवली. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भारतासाठी लढण्याची आपली प्रतिज्ञा त्यांनी पाळली.
अजूनही ११ ऑक्टोबर ला १३ सिख लाईट इन्फ्रंटरी मधे त्या २९ जणांच्या हौतात्म्यासाठी अखंड पाठ म्हंटला जातो. यातील अनेक सैनिकांचा वीर चक्राने सन्मान केला गेला तर शिपाई गोरा सिंग यांना नायक या पदावर बढती दिली गेली. आज ते २९ जण इतिहासाच्या पानात लुप्त झाले आहेत. तर त्या काळरात्रीतुन परत आलेले नायक गोरा सिंग भारताच्या एका कोपऱ्यात आपलं आयुष्य शांतपणे व्यक्तीत करत आहेत.
आज भारताचे खरे हिरो भारतीयांसमोर आणण्याची गरज आहे. आजवर आपल्या जिवाचं बलिदान देणारे हे खरे हिरो लपून राहिले आहेत आणि अनेकदा मुद्दामून राजकीय फायद्यासाठी लपून ठेवले गेले आहेत. चित्रपटात अंगावर खोट्या गोळ्या झेलणारा हिरो आज नवीन पिढीचा आदर्श आहे मग त्याने खऱ्या आयुष्यात ड्रग्स घेतली किंवा देशद्रोही कारवाईना छुपेपणाने हातभार लावला किंवा अगदी देशात राहायला असुरक्षित वाटते अशी विधानं केली तरी ते देशभक्त ठरतात. त्यांचे शब्द झेलण्यासाठी देशाचा मिडिया रात्रंदिवस एक करतो. पण खऱ्या आयुष्यात अंगावर खऱ्या गोळ्या झेलून देशासाठी हसत हसत हुतात्मा पत्करणारे ते खरे हिरो कोण होते याची जाणीव ही भारतीयांना नसते. या सगळ्याचा एकमेव साक्षीदार असणारे आणि साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत आलेले नायक गोरा सिंग असेच एखाद्या विटांच्या घरात आपलं आयुष्य शांतपणे जगत असतात.
आज चुकलेल्या एका मिशनमुळे नायक गोरा सिंग यांच कर्तृत्व आणि त्या २९ अनामिक सैनिकांच बलिदान सगळ्यांसमोर आणता आलं. त्या सर्वांच्या बलिदानाला माझा कडक सॅल्यूट.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment