Tuesday 22 March 2022

मध्यरात्री धावणाऱ्या मुलाची गोष्ट... विनित वर्तक ©

 मध्यरात्री धावणाऱ्या मुलाची गोष्ट... विनित वर्तक ©

काही दिवसांआधी चित्रपट निर्माते विनोद कापरी यांना नोएडा इकडे मध्यरात्री एका मुलाला पाठीवर बॅग घेऊन पळताना पाहिलं. त्याला काहीतरी मदत पाहिजे असेल या हेतूने त्यांनी त्याला आपल्या कार मधे लिफ्ट देण्यासाठी विचारलं पण त्या मुलाने धावता धावता त्यांना नकार दिला. या प्रकाराने चक्रावलेल्या विनोद कापरी यांनी मुलाचा व्हिडीओ बनवताना त्याच्या या धावण्यामागची गोष्ट विचारली. हा व्हिडीओ त्यांनी नंतर ट्विटर वर शेअर केल्यानंतर खूप व्हायरल झाला. उत्तराखंड मधल्या अलमोरा भागातला १९ वर्षाचा प्रदीप मेहरा अचानक एक सेन्सेशन बनला. पण त्या नंतर सुरु झाल विकृत समाजाच ग्रहण ज्यामुळे कदाचित त्या निरागस मध्यरात्री धावणाऱ्या मुलाची गोष्ट अर्धवट संपेल की काय? अशी भिती वाटायला लागली आहे. काय आहे ही गोष्ट. 

प्रदीप मेहरा नावाचा एक १९ वर्षाचा मुलगा नोएडा सेक्टर १६ मधल्या मॅकडोनाल्ड्स मधे काम करतो. रोज रात्री मध्यरात्री आपलं काम संपवून घरी जाताना १० किलोमीटर च अंतर तो रोज धावून पार करतो. त्याच्यासाठी हीच वेळ त्याला भारतीय सैन्यात जाण्यासाठी लागणाऱ्या शारिरीक तंदुरुस्ती आणि स्टॅमिना निर्माण करण्यासाठी मिळते. सकाळी ८ ते मध्यरात्री पर्यंत आपलं काम मग १० किलोमीटर धावणं. घरी जाऊन जेवण बनवणं आणि या सगळ्या मधून वेळ काढत हॉस्पिटल मधे असलेल्या आपल्या आईची काळजी घेणं हे सर्व आनंदाने करणाऱ्या प्रदीप मेहरा ची गोष्ट इकडे संपत नाही तर ती सुरु होते. 

विनोद कापरी यांनी शेअर केलेला व्हिडीओ बघितला तर अनेक गोष्टी त्यातून शिकण्यासारख्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोर परिस्थिती प्रतिकूल असताना पण त्याला स्वीकारुन उद्याचा दिवस चांगला असेल या आशेवर प्रामाणिकपणे केलेले प्रदीप मेहरा चे प्रयत्न. जे आपल्या वाटेला दुःख आलं आहे त्यावर रडत न बसता परिस्थिती बदलण्यासाठी असलेली इच्छा आणि जिद्द. आपल्या उत्कर्षासोबत आपल्या कुटुंबाची असलेली काळजी. प्रदीप ने जेवणासाठी दिलेली विनोद कापरी यांची ऑफर आपल्या भावासाठी धुडकावून लावली. आपण जेवू पण आपला भाऊ तिकडे उपाशी राहील हा विचार आपल्याच माणसाशी असलेली आस्था दाखवतो. हा संपूर्ण व्हिडीओ करत असताना प्रदीप एक क्षण पण थांबलेला नाही. तो आपल्या लक्ष्यापासून विचलित झालेला नाही. हे सगळं खूप प्रेरणादायी होतं  त्यामुळेच हा व्हिडीओ खूप लोकांना आवडला. 

आजकाल लोकांना चांगल्या गोष्टी पण अजिर्ण होतात. प्रदीप चा हा प्रवास जसा व्हायरल झाला तसा भारताच्या एका कोपऱ्यात दररोज आयुष्याशी झुंज देणारा प्रदीप सगळ्या भारतात प्रसिद्ध झाला. त्याच्या भारतीय सैन्यात जाण्याच्या इच्छेला मदत करण्यासाठी भारतीय सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी त्याला मदत करण्याचं ट्विट केलं. पण हे ट्विट येताच त्यावर अनेक प्रतीकात्मक प्रतिक्रिया सुरु झाल्या. प्रदीप च्या जातीपासून ते भारतातील अनेक गरीब लोकांच्या प्रश्नांपर्यंत आणि अगदी भारतीय सैन्यात घेण्यासाठी लॉबिंग अश्या प्रकारच्या आरोपाचे ट्विट ही यायला सुरवात झाली. काही मिडिया वाले लगेच त्याच्या घरी जाऊन पोहचले. त्याला आपल्या न्यूज रूम मधे वाट बघायला लावून पुन्हा त्याच्याच नावाने आपला टी.आर.पी. वाढवला. अजूनही त्यावर चिखलफेक ट्विटर वर चालू आहे. 

आज चांगली गोष्ट लगेच समाजात व्हायरल होते पण चांगल्या गोष्टीकडे बघण्याचा एक समाज म्हणून आपला दृष्टिकोन मात्र कलुषित झाला आहे. आपल्या एकमेकांमध्ये इतका द्वेष रोवला गेला आहे की प्रत्येक चांगल्या गोष्टीला आपण धर्म, जात, श्रीमंत, गरीब आणि इतर अनेक झापड लावायला लागलो आहोत. त्यातून आपल्यातील द्वेषाचं विष अजून वाढत जात आहे हे समजण्याची मानसिकता पण आपण गहाण ठेवली आहे. मध्यरात्री एक धावणारा मुलगा एका व्यक्तीच्या चांगुलपणामुळे सोशल मिडियावर व्हायरल झाला. पण त्याच्या या चांगुलपणातून प्रेरणा घेण्यापेक्षा आज सोशल मिडियावर ज्या पद्धतीने समाजातून चिखलफेक होताना दिसते आहे ते बघून एका मध्यरात्री धावणाऱ्या निष्पाप मुलाची गोष्ट अशीच लपून राहायला हवी होती असं मनापासून वाटते. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.


 


No comments:

Post a Comment