Sunday 13 March 2022

काश्मीर फाईल्स ते झुंड.. समाजव्यवस्थेची दोन टोके... विनित वर्तक ©

 काश्मीर फाईल्स ते झुंड.. समाजव्यवस्थेची दोन टोके... विनित वर्तक ©

अनेकदा चित्रपट मनोरंजना पलीकडे आपल्या आयुश्याशी जोडले जातात. असे चित्रपट अनेकदा समाजाच्या दृष्टीने खळबळ माजवणारे ठरतात. समाजाच्या किंवा व्यक्तिगत आयुष्यात घडणाऱ्या पडद्यामागच्या गोष्टी, लपवलेले संदर्भ, चुकीच्या पद्धतीने दाखवलेला आरसा अश्या गोष्टींवर चित्रपटातून जेव्हा भाष्य करण्यात येते. तेव्हा त्याची निर्मिती ही चौकटीबाहेरची ठरते. हॉलिवूड मधे असे अनेक चित्रपट ज्यांनी असे विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडले ते आजही सार्वकालिक महान चित्रपटात गणले जातात. तर असा एखादा फसलेला प्रयत्न असणारे चित्रपट हे सुमार दर्जाचे प्रतिनिधित्व आजही करतात. हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीत असे प्रयोग करण्याकडे दिग्दर्शक अथवा निर्माते आजवर वळत नव्हते. कारण असे चित्रपट बघायला प्रेक्षकवर्ग सुद्धा तितकाच प्रगल्भ लागतो. नायक नायिकेच्या प्रेमात आणि घरातील सासू- सुनांच्या राजकारणात रमलेला भारतीय प्रेक्षक अश्या कलाकृतींना योग्य तो न्याय देण्यास कमी पडत होता हे सत्य आपण स्विकारायला हवं. 

गेल्या काही वर्षात यात नक्कीच बदल झाला आहे. तो नक्कीच स्वागताहार्य आहे. पण याच बदलाने समाजव्यवस्थेतील लपलेल्या अनेक भेगांना उघडं केलं आहे. सद्या सुरु असलेल्या दोन चित्रपटांत समाजव्यवस्थेची हीच दोन टोकं पुन्हा एकदा उघडी पडली आहेत. त्यामुळेच दोन्ही चित्रपटांबद्दल अतिशय टोकाच्या प्रतिक्रिया सोशल मिडिया आणि इतर माध्यमातून उमटत आहेत. त्या बरोबर की चूक हा नंतरचा प्रश्न आहे. पण त्या उमटणाऱ्या प्रतिक्रिया समाजव्यवस्थेतील दरी अतिशय सप्ष्टपणे दाखवत आहेत. एकीकडे झुंड सारखा चित्रपट समाजाच्या अतिशय खालच्या वर्गाचं आणि त्यांना भेडसावणाऱ्या किंवा जाणवणाऱ्या प्रश्नांचा वेध किंवा चित्रण करतो तर दुसरीकडे काश्मीर फाईल्स समाजातील उच्चवर्णीय म्हणून गणल्या गेलेल्या लोकांना ज्या प्रकारे धर्माचा आधार घेऊन त्यांच्यावर ज्या पद्धतीने अत्याचार केले गेले ते नागडं सत्य पडद्यावर मांडतो. 

अश्या पद्धतीच्या कलाकृतींवर दोन्ही बाजूने समर्थन करणारे आणि विरोध करणारे लोकं आपल्या पद्धतीने चित्रपटांच विश्लेषण करताना जात, धर्म या गोष्टीतून आपला दृष्टिकोन मांडतात. चित्रपट बघून समाजव्यवस्था अजून जात , धर्म यातून बाहेर आलेली नाही हेच दिसून येते आहे. एखादा चित्रपट तयार करताना त्या दिग्दर्शकाची, निर्मात्याची छाप त्यावर असते हे उघड आहे. झुंड जेव्हा नागराज मंजुळे समोर घेऊन येतो तेव्हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनुभवलेल्या किंवा त्यांनी बघितलेल्या त्यांच्या समाजाची छाप त्या चित्रपटावर असणार आहे हे आपण स्वीकारून तो बघायला हवा. ते किती खरं किंवा खोटं हे आपण आपल्या चष्म्यातून बघून ठरवू शकत नाही. फक्त त्या परिस्थितीची जाणीव आपल्याला चित्रपट बघून होऊ शकते. चित्रपटात जर दिवाळी, होळी किंवा गणपती या सणांव्यतिरिक्त एखाद्या महापुरुषाची जयंती दाखवली म्हणून चित्रपट न बघायला जाणं किंवा त्याचा विरोध करणं निदान व्यक्तिशः मला पटत नाही. चित्रपटातील कथानक, दाखवलेल्या गोष्टी यांच्या बद्दल मतभिन्नता शकते आणि नक्कीच असावी. पण आपलीच भुमिका योग्य या दृष्टिकोनातून चित्रपट बघावा अथवा बघू नये या प्रकारचा अट्टाहास मात्र चुकीचा आहे. आपले विचार, आपली मत पूर्णपणे वेगळी असली. आपल्याला ती पटत नसली तरी समोरचा काय म्हणतो आहे किंवा सांगतो आहे ते ऐकून अथवा बघण्याची आपली मानसिकता असावी, कारण त्याचवेळी आपली मत आणि आपला दृष्टिकोन समोरचा ऐकून घेऊ शकतो. चित्रपटाला जातीय रंग निर्माता किंवा चित्रपट बनवणाऱ्याने दिला असेल तर सुजाण प्रेक्षक म्हणून तो स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा आपला हक्क प्रत्यकाने ठरवावा. पण तोच सर्वांचा असावा असा दोन्ही बाजूचा अट्टाहास चुकीचा आहे. 

आतंकवाद्यांना धर्म नसतो हे आपल्याला नियमित सांगणारे जेव्हा ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांना धर्माच्या आणि जातीच्या चष्म्यातून बघून प्रोपगंडा केला असं म्हणतात तेव्हा समाजातील तीच लोकं स्वतःच एक प्रोपगंडा उभा करत असतात. भारतात धर्माच्या आणि जातीच्या आधारावर झालेल्या एका अमानुष हत्याकांडाची घटना पडद्यावर बघताना जेव्हा बघणारा प्रेक्षक पुन्हा एकदा ते सगळं अनुभवतो. तेव्हा त्या घटनेच दुःख, आवेग, त्रास आणि एकूणच त्याची भिती पुन्हा एकदा स्पष्टपणे आपण चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवरून अनभवू शकतो. ही इतकी अमानुष घटना त्या वेळच्या राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि धर्माच राजकारण करून सहिष्णुतेची पोळी भाजणाऱ्या आपल्याच आजूबाजूच्या लोकांमुळे आपल्या पर्यंत मुद्दामून इतके वर्ष पोहचू दिली गेली नसेल. तिच गोष्ट आज जर चित्रपटांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असेल तर तो प्रोपगंडा कसा असू शकतो. शिंडलर्स लिस्ट च्या माध्यमातून जर स्टीवन स्पिलबर्ग ने जर्मनी मधे ज्यू लोकांवर झालेला अत्याचार जगासमोर आणला तर ती अजरामर कलाकृती ठरते. आणि काश्मीर फाईल्स च्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री ने काश्मीर पंडितांवर आणलेला अन्याय जर समोर आणला तर हीच लोकं त्याला प्रोपगंडा म्हणून जर नावं  ठेवत असतील तर असं बोलणारे प्रोपगंडा करतात हे स्पष्ट आहे. 

प्रश्न हा नाही की झुंड अथवा काश्मीर फाईल्स समाजातील एखाद्या वर्गाच प्रतिनिधित्व करतात. प्रश्न हा आहे की दोन टोकांना समजून घेण्यास आपला समाज कमी पडतो आहे. विरुद्ध मताची अथवा जाती, धर्माची लोकं आज या दोन्ही चित्रपटांना आपल्या त्याच धर्माच्या आणि जातीच्या झापडीतून बघत आहेत. त्यामुळेच एकूणच हे दोन्ही चित्रपट समाजातील लपलेल्या भेगा किती खोलवर रुजलेल्या आहेत याच एक चित्रच आपल्यासमोर उभं करत आहेत असं मला मनापासून वाटते. शिंडलर्स लिस्ट बनवणारा स्पिलबर्ग ऑस्कर जिंकतो तर काश्मीर फाईल्स बघता येऊ नये म्हणून पद्धतशीरपणे भारतात छुपा अजेंडा चालवला जातो तर झुंड ला जातीचं लेबल लावलं जाते. त्यामुळेच मला असं वाटते की आज सुजाण आणि प्रगल्भ प्रेक्षक घडवण्याची नितांत गरज आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी शो मधे कुठल्या तरी चित्रपटाच प्रमोशन केलं म्हणून आणि कोणत्यातरी फेसबुक सेलिब्रेटी लेखकाने आपली मत विरोधी अथवा समर्थन म्हणून मांडली म्हणून चित्रपटांची उंची आणि त्याचा दर्जा ठरत नसतो हे समजून घेण्याची गरज आहे. 

झुंड आणि काश्मीर फाईल्स किंवा या निमित्ताने अश्या पद्धतीच्या विषयांवर एकूणच चित्रपट काढणे आणि त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे हा एक चांगला बदल असला तरी त्या निमित्ताने समाजात खोलवर रुतलेल्या भेगा पुन्हा एकदा उघड्या पडल्या आहेत. त्याचा परीणाम एकमेकांच्या बद्दल असलेल्या दृष्टिकोनात पडणार आहे. आडनावावरून धर्म, जात, पंथ बघून त्याच वर्गीकरण करण्याच्या विचारांना यामुळे बळ मिळणार आहे. पण याची एक बाजू चांगली आहे. ती जर आपण समजून घेतली तर असे चित्रपट समाजातील आपल्याला माहित नसलेल्या किंवा विरुद्ध बाजूच्या परिस्थिती चा एक आरसा आपल्यासमोर घेऊन येतात. त्यातली मते पटली अथवा न पटली तरी ते प्रतिबिंब बघण्याची क्षमता आपल्याला एक प्रगल्भ प्रेक्षक आणि आपली विचारसरणी, दृष्टिकोनाच क्षितिज रुंदावण्यास नक्की मदत करतील असा मला विश्वास आहे. 

तळटीप :- वर लिहलेली मत माझी आहेत. सर्वाना ती पटतील अथवा त्यांनी पटवून घ्यावीत असा माझा अट्टहास नाही. जितकं आवडेल तितकं घ्यावं. नाही पटत ते सोडून द्यावं. उगाच वाद घालू नयेत. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनित वर्तक ©) कॉपीराईट आहे.




2 comments:

  1. विनीतजी
    आपले विचार व लिखाण खूपच उत्तम आहे आणि विचार करायला लावणारे आहे.
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. any comment on The Tashkent Files:2019 Film, in light with so called political Heroes, Heroines & other special turtles.. Kindly write on this! want to read desperately.

    ReplyDelete