Tuesday 31 August 2021

(Nothing Is Impossible) काहीच अशक्य नाही... विनीत वर्तक

(Nothing Is Impossible) काहीच अशक्य नाही... विनीत वर्तक ©

आयुष्यात अश्या काही घटना घडतात की आपलं संपूर्ण आयुष्य त्या वादळांच्या तडाख्यामुळे कोलमडून जाते. अनेकांसाठी ही वादळं नोकरी, व्यवसाय, शिक्षण, पैसा, पद- प्रतिष्ठा, मान- सन्मान अश्या भौतिक घटनांशी निगडित असतात. अश्या छोट्या वादळांच्या तडाख्यामुळे निराश होऊन अनेकदा व्यक्ती आपलं आयुष्य संपूर्ण संपवतात अथवा तसं करण्याचा प्रयत्न करतात. पण खरच या भौतिक गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात?. आयुष्यात काही वादळं अशी येतात की सगळं होत्याचं नव्हतं करतात. जेव्हा जगाला वाटत असते की संपलं सगळं तेव्हाच काही व्यक्ती त्या अपयशातून असं काही करून दाखवतात की संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागते. 

असं म्हणतात जिंकणं किंवा हरणं हा खेळाचा एक भाग आहे. महत्वाचा आहे की तुम्ही खेळणं. टोकियो मधे सुरु असलेल्या पॅराऑलम्पिक स्पर्धेमधील प्रत्येक स्पर्धक आयुष्यातील अश्या एका वादळाला सामोरं गेलं आहे ज्याने त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याची दिशा बदलवून टाकली. त्या संकटातून, अपयशातून हे सर्व खेळाडू पुन्हा उभे राहिले आहेत. प्रत्येकाने आपल्या परीने जगाला दाखवून दिलेलं आहे की (Nothing Is Impossible) "काहीच अशक्य नाही"...    

या सर्व खेळाडूंमधे असा एक खेळाडू आहे ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. तो म्हणजे इजिप्त चा 'इब्राहिम हमदतु'. १० वर्षाचा असताना एका ट्रेन च्या अपघातात इब्राहिम चे दोन्ही हात खांद्यापासून तुटले. आयुष्य सुरु होण्याआधीच त्याच्या आयुष्यात एक असं वादळ आलं ज्याने सर्व काही हिरावून नेलं होतं. दोन्ही हात नसताना जिकडे आयुष्य जगणं म्हणजेच एक शिवधनुष्य पेलणं तिकडे खेळ वगरे तर गोष्टी कोसो लांब होत्या. व्यंगत्व आलेल्या व्यक्तीला समाजाकडून ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते त्याचा अनुभव इब्राहिम ला पण आला. पण म्हणतात न, काही लोक वेगळ्या मातीचे बनलेले असतात. एकीकडे व्यंगत्व म्हणून टोचणारे शब्द जिकडे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात तिकडेच त्यात शब्दात आयुष्य बदलण्याची पण शक्ती असते. 

इब्राहिम आपल्या मित्रांसोबत एका क्लब मधे टेबल टेनिस च्या मॅच मधे अंपायर ची भूमिका बजावत होता. एका गुणांवरून त्याच्या टेबल टेनिस खेळणाऱ्या दोन मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाले. साहजिक अंपायर च्या भूमिकेत असलेल्या इब्राहिम ने आपली भूमिका बजावताना योग्य रीतीने मूल्यमापन करून त्या गुणाचं माप एका मित्राच्या बाजूने दिलं. चिडलेल्या दुसऱ्या मित्राने त्याला स्पष्ट सांगितलं की, 'तू आमच्या मधे मध्यस्ती करू नकोस. जो खेळ तू खेळू शकत नाही त्यावर बोलण्याचा तुला अधिकार नाही'. हे शब्द इब्राहिम च्या मनात खोलवर रुतले. आपल्या व्यंगत्वावर केलेली बोचरी टीका त्याला अस्वस्थ करून गेली. दुसरं कोणी त्याच्या जागेवर असतं तर त्याला वाईट वाटलं असतं त्याने आपल्या नशिबाला कोसलं असतं, कोणालातरी दोष दिला असता. पण इब्राहिम वेगळ्या मातीचा होता त्याने ठरवलं की ज्या खेळावरून मला हे ऐकावं लागलं तो खेळ मी खेळणार.टेबल टेनिस सारखा खेळ हा हाताशिवाय खेळता येत नाही. इब्राहिम ला फुटबॉल ची आवड होती आणि तो ते खेळत ही होता कारण फुटबॉल मधे हातांची गरज नसते. पण त्याला टोचलेले ते शब्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. दोन्ही हात नसताना टेबल टेनिस खेळणार कसं?  

इब्राहिम ने कोणत्याही परिस्थितीत टेबल टेनिस शिकण्याचा निश्चय केला. हात नाही म्हणून काय झालं? टेबल टेनिस ची रॅकेट तोंडात आणि त्याचा बॉल उजव्या पायाने पकडून त्याने टेबल टेनिस खेळण्याची अशी एक पद्धत शोधून काढली. तब्बल ३ वर्ष रोज ३-४ तास टेबल टेनिस खेळून त्याने खेळात अशी एक उंची गाठली की त्याने २०११ आणि २०१३ मधे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रोप्य पदक जिंकल. २०१६ च्या रीओ पॅराऑलम्पिक स्पर्धेत वयाच्या ४३ व्या वर्षी त्याने आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून टेबल टेनिस कोर्टावर आपल्या जिद्दीचा नजराणा पेश केला आणि सर्व जग अवाक झालं. त्याने त्या स्पर्धेत ११ वा क्रमांक पटकावला तर टीम स्पर्धेत त्याने ९ स्थान पटकावलं. टोकियो पॅराऑलम्पिक स्पर्धेत त्याने वयाच्या ४८ व्या वर्षी भाग घेतला आणि पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की, 

 (Nothing Is Impossible) काहीच अशक्य नाही..... 

संपूर्ण जग ज्याच्या खेळाचं कौतुक करते असा जगातील क्रमांक १ चा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच हा इब्राहिम च्या खेळाने इतका प्रभावित झाला आणि त्याने ट्विट केलं,  

“Amazing… I am in awe of this @ibrahim_hamadto.” 

आयुष्यात अपयश, टीका सगळ्यांच्या वाटेला येते. नशिबाचे फेरे सगळ्यांचे फिरतात पण आपल्या हातात असते की त्यातून आपण स्वतःला कसं सावरतो. निराशेच्या त्या खोल गर्तेत जातो की फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा उडी घेतो आणि अशी उंची गाठतो की जिकडे संपूर्ण जग अवाक होऊन बघत रहाते. असं म्हणतात की, 

ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले,  ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है.....

इब्राहिम हमदतु टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत पराभवाला सामोरा गेला असेल पण त्याने सर्व जगातील लोकांची मन जिंकली आहेत. कित्येक लोकांना अपयशाचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. आपल्या खिलाडूवृत्ती ने त्याने पॅराऑलम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेचा दर्जा उंचावला आहे. इब्राहिम हमदतुसाठी तिकडे जिंकणं किंवा हरणं महत्वाचं नाही. तिकडे मी दोन्ही हात नसताना टेबल टेनिस खेळू शकतो हे दाखवणं महत्वाचं होतं. 

इब्राहिम हमदतु च्या आयुष्यात त्या क्लब मधे घडलेली घटना त्याचा कायापालट करणारी ठरली. अश्या छोट्याच घटनांमध्ये मनाला प्रज्वलित करण्याचं सामर्थ्य असते. पण ते दुधारी असते. एक रस्ता रसातळाला नेतो तर दुसरा उत्कर्षाकडे. संपूर्ण जगाला आणि मला स्वतःला प्रोत्साहन देणाऱ्या इब्राहिम हमदतु ला माझा कडक सॅल्यूट आणि त्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा... 

फोटो स्त्रोत :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment