Thursday, 19 August 2021

अफगाण गर्ल (शरबत गुला)... विनीत वर्तक ©

 अफगाण गर्ल (शरबत गुला)... विनीत वर्तक ©

आज नॅशनल फोटोग्राफी दिवस आहे. त्या निमित्ताने जगाचा विचार बदलवणाऱ्या एका फोटोचा हा प्रवास...

१९८४ सालच्या डिसेंबर महिन्यात नॅशनल जिओग्राफी या अंकाचा फोटोग्राफर स्टीव्ह मॅक करी पाकिस्तान मधल्या शरणार्थी कॅम्प मधे अफगाण लोकांच्या आयुष्याचे ते क्षण टिपत होता ज्याची जगाला पुसटशी कल्पना पण नव्हती. एका संध्याकाळी धुळीच्या लोटातून त्या नासिर बाघ रेफ्युजी कॅम्प मधे फिरताना त्याची नजर एका १२ वर्षाच्या मुलीवर खिळली. एक अनाथ अफगाण मुलगी आपल्या आजीसोबत आणि नातेवाईकांसोबत पाकिस्तानात अफगाणिस्तानातून चालत आली होती. त्या काळच्या सोव्हियत युनियन ने अफगाणिस्तानात कब्जा केल्यावर अनेक शरणार्थी पाकिस्तानात येऊन पोहचले होते. त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती. अफगाणिस्तानच्या त्या परिस्थितीची कल्पना जगातील लोकांना नव्हती. पण त्या अफगाण मुलीच्या नजरेत ते सर्व काही होतं जे संपूर्ण जगाला अफगाणी लोकांची अवस्था सांगेल. स्टीव्ह ची नजर तिच्यावर खिळली आणि त्याने त्या डोक्यावरून घेतलेल्या लाल दुपट्टा आणि हिरव्या बाहुल्यांच्या चिरत जाणाऱ्या नजरेला आपल्या निकॉनच्या लेन्स ने फिल्म मधे बंदिस्त केलं. 

त्याकाळी डिजिटल कॅमेरे नसल्याने आपण जे टिपलं ते योग्य रीतीने बंदिस्त झालं का? याची खात्री स्टीव्ह ला नव्हती. पण त्याला एक कळून चुकलं होतं की हे डोळे आणि ती नजर काहीतरी वेगळी होती. त्याने काही दिवसांनी ती फिल्म डेव्हलप केली आणि जो फोटो समोर आला तो स्तिमित करणारा होता. स्टीव्ह ने नॅशनल जिओग्राफी च्या एडिटर ला तो दाखवला. तो पाहिल्यावर अक्षरशः तो ओरडला आणि म्हणाला, आपल्या पुढल्या अंकाचा कव्हर फोटो हाच असेल. स्टीव्ह आणि त्या एडिटर या दोघांना काहीच कल्पना नव्हती की आपण नॅशनल जिओग्राफी च्या इतिहासातला सर्वोत्तम फोटो जगाशी शेअर करतो आहोत. जून १९८५ सालच्या अंकावर अफगाण गर्ल या नावाने तो झळकला. त्या खाली लिहलेलं होत, 

 “Haunted eyes tell of an Afghan refugee's fears”

त्या फोटोने जगभर खळबळ माजवली. नॅशनल जिओग्राफी ची ती अफगाण गर्ल अफगाणी लोकांवर विशेष करून स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा चेहरा म्हणून संपूर्ण जगात नावाजली गेली. अफगाणी लोकांवर होणाऱ्या अत्याचाराची कल्पना आणि झळ जगातील कानाकोपऱ्यात याच फोटोमुळे पोहचली. या फोटोने संपूर्ण जगाचा अफगाणिस्तानकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकला. अफगाण गर्ल हा जगातील सगळ्यात जास्ती ओळखला आणि बघितला गेलेला फोटो ठरला. एका फोटोत बंदिस्त झालेल्या त्या नजरेने फोटोग्राफी ची ताकद जगाला दाखवून दिली. तिचे झपाटलेले डोळे अफगाणी संघर्षाचा आरसा ठरले. पण या सगळ्यात स्टीव्ह मात्र त्या मुलीचं नाव विचारायचं ही विसरून गेला होता. 

तब्बल दोन दशकं लोकांच्या मनावर या फोटोने अधिराज्य केलं. स्टीव्ह ला कुठेतरी वाटलं की ज्या डोळ्यांनी जगात बदल घडवला त्यांचा शोध घ्यायला हवा. १९९० पासून त्याने त्या डोळ्यांचा शोध घ्यायला सुरवात केली पण प्रत्येक वेळी त्याला अपयश आलं. २००२ साली स्टीव्ह ने पुन्हा एकदा नॅशनल जिओग्राफी च्या टीम सोबत अफगाणिस्तान च्या दिशेने कूच केलं. ती नक्की कोण होती? याचा शोध १७ वर्षानंतर घेणं खूप कठीण होतं. जिकडे त्याला ते डोळे दिसले तो कॅम्प कधीच बंद झाला होता. तिथल्या स्थानिक लोकांच्या साह्याने त्याने तिचा शोध घ्यायला सुरवात केली. काही गोरे लोकं एका अफगाण मुलीचा शोध घेत आहेत ही वार्ता समजल्यावर अनेक लोक पैश्याच्या आमिषाने पुढे आले. अफगाण स्त्रियांची ओळख पटवणं अवघड होतं. एकतर धार्मिक भावनांमुळे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसमोर चेहरा दाखवणं शक्य नव्हतं. अश्या वेळी स्टीव्ह च्या मदतीला आले ते डोळेच. माणसाच्या डोळ्यातील बाहुल्या या एकमेव अश्या असतात. यासाठी स्टीव्ह आणि टीम ने आयरीस रेकॉग्निशियन पद्धतीचा अवलंब केला. स्टीव्ह ने शेवटी तिचा शोध लावला. त्या अफगाण गर्ल च नाव होतं 'शरबत गुला'. 

Iris recognition is an automated method of biometric identification that uses mathematical pattern-recognition techniques on video images of one or both of the irises of an individual's eyes, whose complex patterns are unique, stable, and can be seen from some distance.

एफ.बी.आय.अनॅलिस्ट, फॉरेन्सिक अनॅलिस्ट आणि आयरीस पद्धती मधून पास होऊन अफगाण गर्ल पुन्हा एकदा नॅशनल जिओग्राफिक च्या कव्हरवर झळकली. त्या वेळेला ती तीन मुलांची आई होती. स्टीव्ह ने तिला तिचा फोटो दाखवेपर्यंत तिला आपण जगप्रसिद्ध असल्याची कोणतीच कल्पना नव्हती. ज्या डोळ्यांनी अफगाण स्त्रियांचा संघर्ष जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला, ज्या डोळ्यांनी अफगाण नागरिकांच्या अडचणींना जगासमोर मांडल. त्या डोळ्यांना आपण काय केलं आहे याची जाणीव नव्हती. स्टीव्ह पुढे तिने एकच इच्छा व्यक्त केली की तिच्या मुलींना शिक्षण मिळून दे. जे खडतर आयुष्य तिच्या वाट्याला आलं ते तिच्या मुलींच्या वाट्याला नको यायला. 

२०१६-१७ च्या सुमारास पाकिस्तान मधे खोट्या नावाखाली राहिल्यामुळे तिला अटक करण्यात आली. शरबत गुला जन्माने अफगाणिस्तान मधली असली तरी तिने आपलं आयुष्य पाकिस्तान मधे घालवलं होतं. पाकिस्तानमधे अवैध रीतीने राहिल्यामुळे तिला १४ वर्ष कारावासाची शिक्षा झाली. ५००० अमेरिकन डॉलर चा दंड ठोठावण्यात आला. त्यावेळी ती ४ मुलांची आई होती आणि तिला 'हेपेटायटीज सी' ही कावीळ ही झाली होती. पण पुन्हा एकदा स्टीव्ह आणि नॅशनल जिओग्राफिक च्या प्रयत्नांनी तिची सुटका करून तिला अफगाणिस्तान ला सोडण्यात आलं. अफगाणीस्तान च्या सरकारने तिला स्वतःच घर ही दिलं. अफगाण लोकांची 'मोनालिसा' म्हणून तिला ओळखलं गेलं. पण आपल्या नजरेने अफगाणिस्तान चा संघर्ष जगाला सांगणारी शरबत गुला आयुष्यभर मात्र त्यात होरपळत राहिली. 

आज २०२१ मधे पुन्हा एकदा अफगाणिस्तान त्याच तालिबानी राजवटीखाली गेला आहे ज्यात येणाऱ्या अनेक पिढ्यातील स्त्रियांच्या आयुष्यात तोच संघर्ष लिहलेला असेल जो शरबत गुला ने अनुभवला होता. तिची ती नजर आजसुद्धा संपूर्ण जगाला त्या अफगाण स्त्रियांचा आक्रोश पोहचवत आहे. कदाचित शेवटपर्यंत पोहचवत राहील. पण अश्या अफगाण गर्ल पुन्हा एकदा घडू नयेत यासाठी जग काय पाऊल उचलेल त्याला महत्व आहे. अन्यथा तो फोटो आणि ते डोळे शेवटपर्यंत जगाला 

“Haunted eyes tell of an Afghan refugee's fears” सांगत राहतील. 

आज नॅशनल फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने अफगाण गर्ल च्या त्या डोळ्यांना आणि ते टिपणाऱ्या स्टीव्ह मॅक करीला माझा साष्टांग नमस्कार. 

फोटो स्त्रोत :-  स्टीव्ह मॅक करी - नॅशनल जिओग्राफी

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




No comments:

Post a Comment