Monday, 16 August 2021

उषःकाल होता होता काळरात्र झाली... विनीत वर्तक ©

 उषःकाल होता होता काळरात्र झाली... विनीत वर्तक ©

२००१ मधे एका काळरात्रीतुन मधून अफगाणिस्तान च्या क्षितिजावर सूर्याचा उदय झाला होता. १९९६ ते २००१ एक क्रूर आणि वेदनामयी आठवणी असणारा प्रवास सगळ्याच अफगाण नागरिकांनी विशेष करून महिलांनी केला होता. तालिबानी राजवटी ने लादलेल्या शरीया कायद्याच्या आड जो अमानुष असा खेळ सुरु होता त्याला सगळ्याच अफगाणी महिला बळी पडलेल्या होत्या. ९/११ हल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने तालिबानी राजवटी मधून अफगाणिस्तान ची मुक्तता केली आणि अमेरिकेच्या अधिपत्याखाली एका नवीन अफगाणिस्तान ची स्वप्न अफगाणी नागरिकांनी बघायला सुरवात केली. 

२००१ ते २०२१ या जवळपास २० वर्षाच्या कालावधीत अफगाणिस्तान हा देश म्हणून किंवा तिथल्या लोकांच्या मानसिकते मधे तितकासा बदल झाला नाही. पण बदल झाला तो मूलभूत हक्कांच्या बाबतीत. अमेरिकेने सत्तेची सूत्र हातात घेऊन एका नवीन अफगाणिस्तान ची निर्मिती करण्याची स्वप्न आणि मनसुबे आखले खरे पण ते सगळे कधी पूर्णत्वाला गेले नाहीत. उलट अमेरिकेने आपल्या धोरणांनी अफगाणिस्तान ची अवस्था अजून दयनीय केल्याचं आता स्पष्ट होते आहे. अमेरिकेने २००१ मधे तालिबान राजवट आणि त्यांचे कायदे उधळून टाकल्यानंतर एका लोकशाही राष्ट्राचा आत्मविश्वास तिथल्या जनतेला दिला. तालिबानी राजवटीचे कायदे इतके अमानुष होते की त्यांच्या ओझ्याखाली माणूस म्हणून जन्माला येणं हे एक पाप वाटत होतं. कोणत्याही अधिकारांच स्वातंत्र्य त्या राजवटीत नव्हतं आणि मानवी हक्काची पायमल्ली प्रत्येक क्षणी अनुभवायला लागत होती. जिकडे पुरुषांची अवस्था अशी होती तिकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि एकूणच त्यांच्या आयुष्याबद्दल बोलायला शब्द अपुरे पडतील. 

शरिया कायदा हा मुसलमान धर्माचा धार्मिक कायदा आहे. मुस्लिम धर्माच्या पवित्र अश्या कुराणातील आदर्श जीवनपद्धतीचा अवलंब करण्यासाठी हा बनवला गेला असं त्याबद्दल म्हंटल जाते. पण आदर्श या शब्दाचे अर्थ धार्मिक लोकांनी आपल्याला हवे तसे काढून आज जे या कायद्याचं स्वरूप जगासमोर आणलं आहे ते भयंकर असेच आहे. तालिबान ने १९९६ ला जो कायदा लादला होता त्या प्रमाणे प्रत्येक पुरुषाला दाढी वाढवणं बंधनकारक होतं. त्यांना त्यांचे हुकूमशहा सांगतील तसं वागणं बंधनकारक होतं. कोणताही आदेश तोडल्यास भर चौकात दगडाने ठेचून किंवा धड, शरीराचे अवयव वेगळे करण्याची तरतूद त्यात होती. महिलांना घराबाहेर पडण्यास संपूर्णतः बंदी होती. कोणत्याही प्रकारचं शिक्षण, नोकरी अथवा पद संभाळण्यापासून त्यांना बंदी घातली गेली होती. घराबाहेर पडताना पुरुषासोबत बाहेर पडलं पाहिजे असा आदेश होता. तसेच त्यांच लग्न जबरदस्तीने लावण्याचा अधिकार आणि कोणत्याही तालिबानी सैनिकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दिलेला आदेश पाळणं बंधनकारक होतं. या शिवाय ज्या पद्धतीच्या मानसिक आणि शारीरीक त्रासातून तिला जावं लागत होत याची कल्पना पण आपण करू शकणार नाहीत. 

हे सर्व बघितलेली आणि जगलेली पिढी गेली २० वर्ष एक मोकळा श्वास घेत होती. त्याकाळी विशीमध्ये हे सगळं जवळून अनुभवलेल्या महिला आणि पुरुष आज चाळीशी मधे आहेत. आज जेव्हा अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबानी राजवटीखाली जातो आहे तेव्हा त्या २० वर्षा पूर्वीच्या आठवणी चाळीशीत असलेल्या पिढीच्या जाग्या झाल्या आहेत. आज आयुष्याच्या २० ते २५ वर्षाच्या टप्यात असणाऱ्या तरुण पिढीला या गोष्टी ऐकून माहित होत्या. पण आता ते अनुभवावं लागणार आहे या गोष्टीचा अंदाज आल्याने अफगाणिस्तान च्या विमानतळावर जे काल प्रसंग घडले ते पुढे काय घडणार आहे ते सांगणारे होते. उषःकाल होता होता काळरात्र झाली त्या प्रमाणे अफगाणिस्तान च्या क्षितिजावर पुन्हा येणाऱ्या एका अनिश्चित अश्या ग्रहणाने त्यांच भविष्य काळवंडून टाकलं आहे. काल देशाबाहेर जाण्यासाठी जिवाच्या आकांताने जी लोकांची धावपळ सुरु होती ती त्याच भितीने जे त्यांनी २० वर्षापूर्वी अनुभवलं होतं. तालिबान पुन्हा एकदा तेच कायदे आणणार आणि आपल्यावर अमानुष अत्याचार करणार हे जवळपास प्रत्येक अफगाणी नागरिकाला स्पष्ट झालं आहे. जिकडे अमेरिके सारखी महासत्ता काही करू शकली नाही  तिकडे युनायटेड नेशन, जी ७, जी २० किंवा अजून सगळेच ग्रुप निषेध करण्याशिवाय काही करणार नाहीत हे अफगाणी जनतेला कळून चुकलं आहे. खरं तर या अफगाणी लोकांना कोणीच वाली उरलेला नाही हे स्पष्ट झालं आहे. 

अमेरिकेने अफगाणिस्तान ची अवस्था आगीतून फुफाट्यात नेली आहे. त्याचा चटका बसायला लागल्यावर तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न अमेरिका आज करत आहे. पण याचे चटके अमेरिकेला सर्व स्तरावर बसणार हे स्पष्ट आहे. अल कायदा सारख्या संघटना पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. अतिरेकी लोकांना एक सेफ हेवन मिळणार आहे. पाकिस्तान आज आनंदात आहे कारण त्यांनी अमेरिकेला दाखवून दिलं आहे की आमची साथ सोडल्यामुळे आज अफगाणिस्तानात ही परिस्थिती उदभवली आहे ज्यात अमेरिकेने गेल्या २० वर्षात कमावलेलं सगळं स्वाहा झालं आहे. दुसऱ्याला खड्यात ढकलताना आपण ही त्यात पडणार आहोत हा विचार करण्याची गरज आणि तितकी दूरदृष्टी पाकिस्तानकडे नाही. त्यामुळे आज त्यांचे नेते सुद्धा तालिबानी राजवटीला मान्यता देत आहेत. चीन, रशिया सारखे देश आपला फायदा बघत आहेत. तर भारताची अवस्था कैचीत सापडल्यासारखी झाली आहे.  

जगातील सगळ्यात मोठ लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारतामधील अनेकांना आपल्या हक्काची आणि स्वातंत्र्याची पायमल्ली होत असल्याचं वाटत होतं आणि त्यासाठी देश सोडण्याचा फुसका बार ही त्यांच्यापैकी अनेकांनी सोडलेला आहे. आज आपल्याच देशात आपल्या स्वातंत्र्यावर धाय मोकलून रडणारे मिळेल तो कोपरा बघून आपली जागा सुरक्षित करत आहेत. नक्की स्वातंत्र्यावर गदा येणं काय असते? आणि दुसऱ्याच्या भरवश्यावर आपलं आयुष्य कसं टांगणीला लागू शकते? हे तेच रडणारे लोक मूग गिळून गप्पपणे बघत आहेत. आज अश्या परिस्थितीवर मानवतेच्या पायमल्लीवर पुरस्कार परत करणारे आणि एकूणच मानवतेची आस्था असणारे लोकं बोलू शकत नाहीत. अफगाणिस्तान चा ऱ्हास जरी आपल्याशी निगडित नसला तरी त्यातून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. आज कुंपणावर असणारी अशी प्रवृत्ती कधी आपल्या घरात शिरून आपलं घर उध्वस्थ करेल हे आपल्याला कळणार पण नाही. तस व्हायला नको असेल तर या तालिबानी नामक ग्रहणाची तीव्रता आपण आजच समजून घेतली पाहिजे.   

अफगाणिस्तान च भविष्य काय? असा प्रश्न आज अनेकांच्या मनात असेल. रात्रीच्या अंधारात जे खेळ चालतात तेच त्याच भविष्य असणार आहे. तिथल्या नागरिकांना पुन्हा एकदा त्या २० वर्षा पूर्वीच्या काळरात्रीमधून प्रवास करावा लागणार आहे. या सगळ्यात माणुसकीची जी पायमल्ली होणार आहे तिचा निषेध पण करण्याइतपत आपल्याला लाज वाटेल अश्या कहाण्या पुढे येणार आहेत. हे सगळं घडत असताना ट्विट आणि सोशल मिडियावर चिव चिव करणारे सगळेच शांततेचा पुरस्कार आणि आतंकवादाला धर्म नसतो हे सांगत सुटणार आहेत. काल अफगाणिस्तान मधे आपल्या जिवाला न घाबरता विमानाच्या टायर ला पकडून आपल्या आयुष्याची मशाल पेटवण्याचा प्रयत्न करणारे सगळेच येणारी काळरात्र किती भयानक असणार आहेत हेच जगाला सांगत असावेत असं मला तो व्हिडीओ बघताना मनापासून वाटलं. या साठी कोण दोषी? यावर अनेक आरोप प्रत्यारोप होतील. यातून कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान यावर अनेक मत येतील. पण अफगाणिस्तान च्या भविष्यात उषःकाल होता होता काळरात्र झाली हे नक्की आहे. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment