Saturday 21 August 2021

प्रतिभेची प्रतिमा... विनीत वर्तक ©

प्रतिभेची प्रतिमा... विनीत वर्तक ©
२०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात मी नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, अमेरिका इकडे भेट दिली होती. तिकडे अनेक अमेरिकन पालक आपल्या ५ ते १२ वर्षाच्या मुलांना घेऊन आले होते. तिकडे तुम्हाला अंतराळात राहून आलेल्या अवकाशयात्रींची भेट घेता येते, त्यांच्याशी संवाद साधता येतो, त्यांना प्रश्न विचारता येतात, त्यांच्या सोबत जेवण घेता येते. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे त्या कोवळ्या मनांवर पडणारा 'प्रतिमेचा प्रभाव'. आपण अश्या एका माणसासोबत हात मिळवतो आहोत, अश्या माणसाशी संवाद करण्याची संधी मिळते आहे, ज्याने पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या आहेत; ज्याला रॉकेटमधून जाण्याचा अनुभव आहे, ज्याने अंतराळात काही दिवस, महिने व्यतीत केलेले आहेत; हे सगळं कुठेतरी त्या कोवळ्या मनांना प्रज्वलित करत होतं. कुठेतरी प्रेरणा देत होतं की आपणसुद्धा स्वप्नं बघितली पाहिजेत, आपण ती पूर्ण करण्याचा ध्यास धरला पाहिजे. त्या वेळेला मला स्वतःला जाणवत होतं की अश्या प्रसंगांतून उद्याचे नागरिक बनत असतात. उद्या हीच मुलं अमेरिकेचा झेंडा मंगळावर रोवताना दिसली तर आश्चर्य वाटणार नाही.
प्रतिभेची प्रतिमा ही कळत नकळत आपल्या मनात तयार होत असते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती 'मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम' यांनी आपल्या प्रज्वलित मने या पुस्तकातून नेमकं हेच मांडलं आहे. देशातील प्रगतीचा आढावा घेताना त्याचा प्रभाव कसा या कोवळ्या मनांवर पडेल आणि त्यातून कसे उद्याचे जबाबदार नागरिक तयार होतील हे त्यांनी आपल्या शब्दातून मांडलं आहे. जेव्हा देशाच्या सर्वोच्च पदावरील माणसं अश्या पद्धतीने आपला प्रभाव पाडतात, तेव्हा त्याचे परिणाम खूप दूरगामी होतात. भारतात अनेक वर्षांपासून खेळाला दुय्यम महत्व दिलं गेलं आहे. भारतात आयुष्यात ध्येय हे फक्त आणि फक्त मार्कांच्या शर्यतीत शिरून १००% मिळवणारे कारकून अभियंते आणि डॉक्टर बनण्याचं शिकवलं जातं. एकवेळ आपल्या मातृभाषेत बोलता आलं नाही तरी चालेल पण कोडिंग आलं पाहिजे. वयाच्या ५-७ व्या वर्षी कोडिंग शिकलं नाही तर आयुष्याला काय अर्थ? अशी प्रतिभा निर्माण करणारा समाज असल्यावर त्यातून आपण कोणत्या प्रतिमेची अपेक्षा करणार आहोत?
अभ्यासापलीकडे कला, खेळ आणि इतर अनेक अश्या छटा आहेत ज्यातून आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. खेळातसुद्धा क्रिकेटपलीकडे इतरही खेळ आहेत जे आपला मान-सन्मान आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा समाजात निर्माण करू शकतात. १३० कोटी लोकसंख्येच्या देशातून दोन आकडी सुद्धा स्पर्धक ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपली चमक दाखवू शकत नाहीत, हे चित्र गेली अनेक वर्षं आपण बघत आलो आहोत. पण ते बदलण्यासाठी काय केलं गेलं इतक्या वर्षांत याचा विचार आपण कधी केला नाही!! आपण 'प्रतिभेची प्रतिमा' नवीन पिढीमध्ये घडवण्यात कमी पडत होतो त्यामुळेच ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपली पदकांची संख्या मर्यादित राहिली होती. पण या वर्षी अशी एक घटना माझ्या बघण्यात आली, की जिच्यात हे चित्र बदलण्याची शक्यता दिसते आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंची भेट घेतली. त्यात त्यांनी खेळाडूंकडून काही गोष्टी करण्याचा आग्रह करताना वचन घेतलं. एक म्हणजे प्रत्येक खेळाडूने ७५ शाळांना भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे. ते करत असताना त्यांना योग्य आहाराचं महत्व एक उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी किती महत्वाचं आहे हे समजावणं. आज जिकडे एक पिढी जंक फूडच्या आहारी जात आहे, त्यावेळी सकस आहाराचं महत्व पुढल्या पिढीला सांगणं खूप महत्वाचं आहे. खेळासोबत आपलं सकस अन्नही तितकंच महत्वाचं आहे. एखाद्या ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू जेव्हा या गोष्टीचं महत्व सांगेल, तेव्हा नवीन पिढीमध्ये प्रतिभेची प्रतिमा आपोआप तयार होईल. नक्कीच याचे चांगले परिणाम बघायला मिळतील.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक खेळाडूने १०-१५ मिनिटं त्या शाळेतील मुलांसोबत कोणताही मैदानी खेळ खेळणं. ही गोष्ट त्या मुलांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरेल असं मला मनापासून वाटतं. जेव्हा मी नासामध्ये आलेल्या अमेरिकेतील मुलांशी अंतराळवीरांची भेट झाल्यावर सहज संवाद केला होता तेव्हा ते संपूर्णपणे भारावलेले होते. एक अवकाशात राहून आलेला माणूस माझ्यासोबत जेवण करतो, हात मिळवतो माझ्या शंकांना उत्तरं देतो किंवा माझ्यासोबत फोटो काढतो हे क्षण त्यांच्या आयुष्यात त्यांना नेहमीच लक्षात राहतील असे होते. मी असं म्हणत नाही की, त्यापैकी प्रत्येकजण नासा-मध्ये काम करेल किंवा अवकाश क्षेत्राशी त्याचा संबंध पुढे जाऊन असेल, पण हे क्षण त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नक्की प्रोत्साहन देणारे होते.
अवकाशयात्रींच्या 'प्रतिभेची प्रतिमा' त्या कोवळ्या मनांत निर्माण झाली होती. मला वाटते जर ऑलिम्पिकमधील प्रत्येक खेळाडूने ती १५ मिनिटं त्या मुलांना दिली तर नक्कीच कुठेतरी त्या सर्वांच्या मनात खेळाविषयी आणि ऑलिम्पिकविषयी एक कुतूहल निर्माण होईल. त्यातूनच भारतात पुढचे ऑलिम्पिक जिंकणारे खेळाडू तयार होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान सगळं फोटोसाठी करतात, राजकीय फायद्यासाठी करतात अथवा स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी करतात वगैरे मुद्यांमध्ये मला जायचं नाही, तो वेगळा मुद्दा आहे. त्याच्यावर प्रत्येकाची मते असू शकतील. पण अश्या प्रकारची ज्याला 'आउट ऑफ द बॉक्स' विचार करण्याची क्षमता आणि तो विचार सगळ्या खेळाडूंपर्यंत पोहचवणं हे नक्कीच भारताच्या किंवा निदान मी बघितलेल्या काळातील भारताच्या इतिहासात पहिल्यांदा होताना दिसत आहे. याचे राजकीय, पक्षीय आणि पर्सनल भाग बाजूला ठेवला तर ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या, त्या संघाचा भाग असलेल्या किंवा एकूणच ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसोबतचे हे क्षण नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारे असतील.
समाज अश्याच छोट्या छोट्या गोष्टींतून प्रगल्भ होत असतो. वास्तविक ही खूप छोटी गोष्ट असेल पण नासासारख्या संस्थेत अवकाशयात्रींना भेटून किंवा उद्या ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटून एका नवीन प्रतिमेची प्रतिभा त्या कोवळ्या मनांमध्ये रुजत असते असं मला मनापासून वाटतं. भारताचे सगळे ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेले खेळाडू पुढल्या १.५ - २ वर्षांत शाळांना भेट देऊन अश्या अनेक कोवळ्या मनांना प्रज्वलित करतील, ज्याची स्वप्नं डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी बघितली होती. भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या सर्व खेळाडूंच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
तळटीप :- पोस्टचा उद्देश राजकीय नाही न कोणत्या एका व्यक्तीशी निगडित आहे. पोस्ट चा उद्देश निर्माण होणाऱ्या भावनेशी संबंधित आहे. तरी या पोस्ट चा वापर कोणत्याही राजकीय हेतूसाठी, राजकीय चिखलफेकीसाठी करू नये अशी नम्र विनंती.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment