ZyCoV-D आत्मनिर्भर भारताचं एक पाऊल पुढे... विनीत वर्तक ©
भारताच्या झायडस कॅडीला कंपनीच्या जगातील पहिल्या डी.एन.ए. कोरोना लसीला Central Drugs Standard Control Organisation (CDSO) आणि Drug Controller General of India (DCGI) ने आणीबाणी च्या वापरासाठी मान्यता दिली आहे. झायडस कॅडीला कंपनीने ZyCoV-D ही डी.एन.ए. लस तयार केली आहे. तिसऱ्या पातळीच्या चाचणीत २८,००० कोरोना झालेल्या लोकांना ही लस दिली गेली. यात ६६.६% लोकांमध्ये याची परिणामकारता दिसून आली आहे.
झायडस कंपनीची ही लस अनेक अर्थाने वेगळी आहे. डी.एन.ए. वर आधारित ही जगातील पहिली लस आहे. अश्या पद्धतीच्या तंत्रज्ञानावर आधारित लस जगात पहिल्यांदा वापरात येत आहे. ही लस घेतल्या नंतर आपल्या शरीरात SARS-CoV-2 या विषाणूशी संबंधित प्रोटीन डी.एन.ए. मधून निर्माण करण्याचा आदेश शरीराला दिला जातो. सहाजिक अश्या अनोळखी पद्धतीच्या प्रोटीन ची निर्मिती शरीरात सुरु झाल्यावर आपलं शरीर त्या विरुद्ध तात्काळ इम्यून सिस्टीम तयार करते. लसी मधे विषाणू नसल्याने शरीराला इजा होत नाही. पण कोरोनाचा संसर्ग पुढे कधी झाल्यास आणि अश्या पद्धतीचं प्रोटीन शरीरात पुन्हा शिरल्यावर कोणती उपाय योजना करायची हे इम्यून सिस्टीमला माहिती होते. त्यामुळे कोणताही वेळ न दवडता शरीर कोरोनाच्या विषाणूंचा खात्मा करते. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्यावर त्याची गंभीरता ही मृत्यू पर्यंत जात नाही किंवा लक्षणे ही प्राथमिक स्वरूपा पुरती मर्यादित राहतात. या लसीच्या चाचण्यांमध्ये लस दिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.
झायडस कंपनीची ही लस अजून काही कारणांसाठी वेगळी आहे. ही लस १२ वर्षानंतर कोणालाही घेता येणार आहे. या लसीच्या चाचण्या १००० मुलांवर ( १२ ते १८ वर्ष वयोगट) झाल्या असून या वयोगटात ही लस योग्य रीतीने काम करत असल्याचं चाचण्यांमधून स्पष्ट झालं आहे. तसेच ही लस इंजेक्शन शिवाय घेता येणार आहे. इंजेक्शन मधून कोणतीही लस शरीरात टोचताना ते देणारे हेल्थ वर्कर आणि ते टोचून घेणारा व्यक्ती हे अनेक प्रकारच्या इतर आजारांसाठी उघडे पडत असतात. ज्यात एड्स सारख्या आजारांचा समावेश आहे. अमेरिका सारख्या देशात सुई टोचल्यामुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे ६ ते ८ लाख प्रत्येक वर्षी आजारी पडतात. त्यामुळे भारतासारख्या देशात ही संख्या किती प्रचंड असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. झायडस कंपनीची लस ही इंजेक्शन शिवाय शरीरात सोडण्यात येते. यासाठी फार्माजेट सारख्या कंपन्यांनी बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. लसीचा एक खूप छोटा प्रवाह एका सेकंदाच्या १० व्या भाग इतक्या वेगाने शरीराच्या त्वचेतून आत सोडण्यात येतो. यासाठी शरीरात कोणतीही सुई प्रवेश करत नाही. यामुळे इंजेक्शनमुळे होणारं इन्फेक्शन हे होत नाही.
झायडस कंपनीची लस कोरोना च्या वेगवेगळ्या प्रकारावर ही परिणामकारक असल्याचं चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं आहे. ही लस सुरक्षित ठेवण्यासाठी २ ते ८ डिग्री सेल्सिअस हे तपमान गरजेचं असलं तरी २५ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस तब्बल ३ महिने व्यवस्थित रहात असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात अनेक दुर्गम भागात लसी पोहचवणं यामुळे शक्य होणार आहे. ही लस ०-१८-५६ अश्या दिवसांच्या अंतराने तीन वेळा घ्यायची असून याच्या दोन डोसने काय परिणामकारकता दिसते यावर चाचण्या सुरु असून त्याचे निष्कर्ष ही काही दिवसात स्पष्ट होणार आहेत.
मोठा गाजावाजा करत जगात दाखल झालेल्या आणि भांडवलशाही करत भारत सरकारवर पैश्याच्या मस्तीवर दबाव टाकणाऱ्या फायझर च्या लसीची डेल्टा प्रकारात परिणामकारता ६०% वर येऊन पोहचली असताना त्याचवेळी भारतातील वैज्ञानिकांनी भारतात तयार केलेल्या झायडस कॅडीला कंपनीच्या ZyCoV-D या जगातील पहिल्या डी.एन.ए. बेस लसीची परिणामकारकता याच प्रकारात ६७% च्या आसपास आहे. हे भारतीय संशोधनाचं आणि भारतीय तंत्रज्ञानाचं यश आहे. त्या शिवाय ही लस १२ ते १८ वर्ष वयोगटात ही सुरक्षित म्हणून सिद्ध झाली आहे. तसेच त्याची साठवणूक आणि वहन ही भारतीय प्रदेशाशी अनुकूल आहे. भारताने फायझर सारख्या भांडवलशाही आणि मस्तवाल कंपनींना बाहेरचा रस्ता दाखवून त्याचवेळी आपल्या वैज्ञानिकांवर विश्वास ठेवत आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे.
झायडस कॅडीला च्या मते प्रत्येक वर्षाला १० ते १२ कोटी लस बनवण्याची त्यांची क्षमता असून त्यांनी या लसीची निर्मिती आधीच सुरु केली आहे. त्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या लसीची किंमत तूर्तास स्पष्ट नसली तरी भारतीयांची गरज आणि इतर लसींच्या किमतीएवढीच ती असेल असा अंदाज आहे.
कोरोना च्या लढाईत भारताला आत्मनिर्भरतेत एक पाऊल पुढे घेऊन जाणाऱ्या झायडस कॅडीला टीम च अभिनंदन आणि पुढल्या वाटचालीस शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत झायडस कॅडीला कंपनीची ZyCoV-D लस, दुसऱ्या फोटोत फार्माजेट तंत्रज्ञान पद्धतीने लस शरीरात जाताना )
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
नमस्कार
ReplyDeleteDisposable सुया injection साठी गेल्या काही वर्षांपासून वापरतात..तरीही इतर आजारांचा धोका राहतोच का...??