एका स्वातंत्र्यासाठी... विनीत वर्तक ©
आज संपूर्ण भारत आणि जगभर विखुरलेले भारतीय देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहेत. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत बघितलेली पिढी आता हळूहळू काळाच्या पडद्याआड लुप्त होत आहे. त्यामुळे अनेक भारतीयांचा जन्म हा ब्रिटिश गुलामगिरी पासून स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात झालेला आहे. मुळातच स्वातंत्र्य म्हणजे काय? हे समजण्याची पात्रता अनेक भारतीय लोकांमध्ये आजही नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. आपले हक्क आणि आपलं स्वातंत्र्य यासाठी आग्रही असणाऱ्या प्रत्येक भारतीयाला याची आपण काय किंमत मोजलेली आहे किंवा काय मोजत आहोत याबद्दल कोणतीच जागरूकता आढळून येत नाही.
स्वातंत्र्य लढा काय असतो? आपले हक्क आणि आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यानंतर काय परिस्थिती येते हे माझ्या किंवा माझ्या आधीच्या पिढीलाही कळलेलं नाही. आज जेव्हा अश्या एका देशात मी आहे जिकडे पाय ठेवताना तिथल्या लोकशाही आणि एकूणच स्वातंत्र्याची पायमल्ली झालेली होती. लोकांचे हक्क हिरावून घेतले गेले. लोकांचा आवाज बंद करण्यात आला. लोकांमध्ये बंदुकीची दहशद निर्माण करण्यात आली. त्या सगळ्या परिस्थितीमधे लोकांनी जो उठाव केला. जे मोर्चे काढले, ज्या सभा घेतल्या, जो लाठीमार अंगावर घेतला, ज्या गोळ्या अंगावर झेलल्या. ते सगळं जवळून बघण्याचा अनुभव मी घेतला आणि तेव्हा कुठेतरी जाणवलं की स्वातंत्र्य काय असते? आज आपल्या देशाचं ते स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी आपण किती मोठी किंमत मोजतो आहोत.
भारताचे तुकडे करणाऱ्या गॅंग आणि तो आवाज बुलुंद करणारी स्वतःला बुद्धीमंत समजणारी एक पिढी, अमर जवान स्मारकाला पायाने तुडवणारे आज पुन्हा मान वरून करून समाजात वावरू शकतात कारण आपल्याला स्वातंत्र्याची नसलेली जाणीव. चुकीच्या अस्मिता, चुकीचे समज, चुकीच्या गोष्टी लहानपणापासून शिकवून आपण असे कारकून तयार केले आहेत की जे पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर ही न उडणाऱ्या पोपटासारखे आहेत. ज्यांना आदेश देण्याची ताकद अश्या लोकांच्या हातात आहे ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी देश विकला आहे आणि विकायला काढला आहे. जे आपल्याला त्या शिकवलेल्या पोपटासारखं बोलायला लावतात जे त्यांना ऐकायचं असते. त्यामुळे आपल्या अस्मिता, धर्म, जात, प्रांत, भाषा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्याला शिकवून ठेवले आहेत. जे आपल्या स्वातंत्र्यापेक्षा आपल्याला महत्वाचे वाटतात. याचाच फायदा घेऊन आजवर देशात सर्व धर्म, सर्व प्रांत, सर्व जाती, सर्व भाषा हेच विषय घेऊन राजकारण केलं जाते. आपण त्या पोपटासारखे उडता येत असून सुद्धा याच विषयांच्या भोवती घुटमळून आपले पंख छाटून घेतो.
आज अश्या एका देशात जिकडे राजकारणाच्या नावाखाली सर्व हक्क, स्वातंत्र्य आणि एकूणच संपूर्ण मानवी अधिकाराची पायमल्ली केली जात आहे अश्या देशात आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणं याचं महत्व अजून मला जास्ती जाणवते आणि हे एक दिवसांपुरती नाही. ही एक जाणीव आहे जी आयुष्यभर सोबत राहील. ही कोणत्या पुस्तकातून किंवा कोणत्या चित्रपटातून होत नसते. ती व्हायला त्याचा अनुभव घ्यावा लागतो. प्रेरणा मिळवण्यासाठी पुस्तकातले शब्द प्रत्यक्ष आयुष्यात जगायला हवेत आणि चित्रपटातून दाखवलेल्या घटनांच्या ठिकाणी स्वतः एकदा जाऊन ती घटना अनुभवावी लागते. कारगिल मधे काय झालं हे समजण्यासाठी कारगिल च्या त्या पर्वत शिखरांच्या खाली उभे राहून आपण वर सरळसोट जाणाऱ्या कड्यांकडे बघू तेव्हा त्या उंचीवर तिरंगा फडकवण्यासाठी आपल्या कित्येक अनाम वीरांनी बलिदान दिलं असेल याचा आपण थोडाफार अंदाज लावू शकतो. शेरशहा ला अनुभवायचं असेल तर त्याच्या गुहेत जावं लागते. तो आपल्याला मुंबई- पुण्यात बसून अमेझॉन प्राईम वर अनुभवता नाही येत.
आज राष्ट्रगीताला उभे न राहणं, मातृभूमीच्या सन्मानासाठी वंदे मातरम न बोलणं किंवा जय हिंद न बोलणं हे आपल्याला संविधानाने, आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याने दिलेले हक्क आहेत असे मानणारे लोक आणि अश्या पिढी जोवर आपण पुढे नेत राहू तोवर येणारा प्रत्येक स्वातंत्र्य दिवस हा एक सुट्टीचा आणि झेंडा फडकावण्याचा दिवस म्हणून मर्यादित राहील. ज्या लोकांनी या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडल, आपल्या आयुष्याची होळी केली, आपल्या आयुष्याच बलिदान दिलं कदाचित ते आपल्याला कळत नसेल किंवा माहित नसेल तर निदान जे स्वातंत्र्य आज आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत या देशाने जन्मतः दिलेलं आहे त्याबद्दलची जाणीव निदान आपल्यात आणि आपल्यासोबत आपले कुटुंबीय, आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजात निर्माण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे.
आजच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्या वाचकांना, भारतीयांना माझ्या खूप खूप शुभेच्छा.
भारताचं स्वातंत्र्य चिरायू होवो याच आशेवर आज त्या तिरंग्याला माझा कडक सॅल्यूट...
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment