Friday, 6 August 2021

नावाचा घोळ... विनीत वर्तक ©

 नावाचा घोळ... विनीत वर्तक ©


नाव कोणाचे? ते नामांतरण हा एक यक्ष प्रश्न गरज नसताना राजकारण्यांनी देशापुढे उभा केला आहे. त्याचा उपयोग करून लोकांच्या भावना भडकवणे, स्वतःची राजकीय पोळी भाजणे तसेच आपल्या कुटूंबियांच्या नावाने देशाची अस्मिता लिहणे असे एक ना अनेक पक्षी या एका नावावरून या देशात मारले जात असतात. हा हुकमाचा एक्का विरोध करण्यासाठी काहीही नसलं की एकदम हक्काने अस्मिता, भावना आणि विरोध पेटवण्यासाठी वापरला जातो. याच नावाच्या घोळावरून कित्येक आंदोलन झाली आहेत. कित्येक लोकांना आपले प्राण गमवायला लागले आहेत. पण खरच एखाद्या नावाने आपल्या आयुष्यात इतका फरक पडतो का? आपली अस्मिता इतकी तकलादू आहे का? नाव देण्याने त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रसार, त्याची जपणूक आपण खरच करतो का?

एखाद्या वास्तूला, एखाद्या प्रोजेक्ट ला, एखाद्या पुरस्काराला देशातील सन्मानीय व्यक्तीच नाव देण्यामागे विचार असतो की नावामुळे त्या सन्मानीय व्यक्तीने घेतलेल्या प्रयत्नांची जाणीव येणाऱ्या काळात राहावी, त्यांच्या विचारांचा प्रभाव आणि त्यांनी दिलेलं योगदान अनेकांना प्रेरणा देणारं ठराव तसेच त्यांच्या कार्याची माहिती भारतातील अनेकांना व्हावी. पण प्रत्यक्षात असं घडते का? वर लिहलेल्या सगळ्या गोष्टी या कागदापुरती उरतात. नाव देण्याच्या अट्टाहासापायी सुरु होतो एक असा खेळ ज्यात भावना, अस्मिता आणि पैसा याच्या तालावर लोकांना नाचवलं जाते. एखादी गोष्ट पदरात पडल्यावर त्याचे श्रेय घेऊन सण समारंभ साजरे केले जातात. कोणीतरी राजकीय नेता अथवा भाई, दादा, अण्णा किंवा साहेब येऊन दोन शब्द बोलून आपण अस्मिता कशी जपली ते आपण लढा कसा दिला याच संपूर्ण वर्णन केले जाते. धमक्या दिल्या जातात. हा भावनांचा लढा, अस्मितेचा लढा पुढे सुरु ठेवण्याच्या घोषणा होतात. दिवस सरतो आणि दुसऱ्या दिवशी या सर्व गोष्टी एखाद्या निर्माल्या प्रमाणे स्वाहा केल्या जातात.

एखाद्या व्यक्तीच्या विचारांच आचरण, त्यांच योगदान, त्यांच कर्तृत्व, त्यांची मेहनत, त्यांचा संघर्ष आणि त्यांचा प्रवास या सगळ्याची जाणीव नाव दिल्याने होते का? मला तरी व्यक्तिशः असं वाटत नाही. गल्लीमधल्या रस्त्याला नाव देण्यापासून, कोपऱ्यावरच्या मंदिराला नाव देण्याची स्पर्धा आज सुरु आहे. त्यातही दिलेले नाव बदलण्याची चढाओढ ही काही वर्षांनी सक्रिय होते. त्यासाठी एकमेकांच्या आई- बापाचं श्राद्ध घालण्यापासून ते रक्त सांडेपर्यंत हाणामाऱ्या होतात. ते ही नाव कोणाचं असते तर अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या अथवा शांतीप्रिय, सज्जन कर्तृत्व असणाऱ्या एखाद्या सन्मानीय व्यक्तिमत्वासाठी. व्यक्तीच्या नावापेक्षा त्यांच्या गुणांच अंगिकरण, आचरण त्यातून आपला उत्कर्ष साधणं हे आपल्याकडून जास्ती अपेक्षित आहे. आज ४०० पेक्षा जास्त वर्षानंतर मराठी साम्राज्य निर्माण करणारे म्हणून ज्यांच नाव आदराने घेतलं जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते १० गुण आपण अंगिकारले असं याच अस्मितेचा लढा देणाऱ्यांना विचारलं तर कोणते १० गुण त्यांच्यात होते हे आठवण्यासाठी वेळ लागेल कदाचित त्यांच्या गावी ही हे गुण नसतील. त्यामुळे ते गुण अंगीकारणे ही तर दूरची गोष्ट राहिली. मग एखाद्या वास्तूला नाव देण्याने त्यांच्या विचारांची आणि मराठी अस्मिता कशी जपली जाणार आहे? हे एक उदाहरण झालं असं भारतातील प्रत्येक शहरात, खेड्यात नाव दिलेल्या प्रत्येक सन्मानीय व्यक्तीच्या बाबतीत लागू आहे.

एखादा पुरस्कार व्यक्तीच्या नावाने अश्याच क्षेत्रात दिला जावा ज्याच्याशी ती संबंधित असेल. जर संबंधित नसेल तर त्याला एखाद्या सन्मानीय व्यक्तीच नाव जोडणं हे सुद्धा तितकच मला व्यक्तिशः खटकते. त्या व्यक्तीच कर्तृत्व जर त्या संबंधित क्षेत्रात नसेल तर त्याच नाव पुरस्काराशी जोडण्याने कोणती प्रेरणा पुरस्कार मिळवणाऱ्या किंवा त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना मिळणार आहे? नावाचा संबंध जर पैश्यावरून, राजकीय वजनावरून, घराणेशाही वरून अथवा कोणत्यातरी दुसऱ्या क्षेत्रात कर्तृत्व असल्यामुळे असेल तर असे संबंध जोडणाच्या प्रयत्नांमुळे खरे तर पुरस्काराचा दर्जा कमी होत असतो. ज्यांना हा पुरस्कार मिळतो किंवा जे तो मिळायच्या पात्रतेचे असतात त्यांना वास्तविक नावाशी काही देणं घेणं नसते. नावावरून गदारोळ करणारे, तसेच त्या वरून अस्मिता जागवणाऱ्यांना गल्लीतला पण पुरस्कार कधी मिळालेला नसतो हे वास्तव आहे. त्यामुळे एखाद्या पुरस्काराचा संबंध कोणत्यातरी नावाशी नकोच आणि असला तरी त्या संबंधित व्यक्तीच योगदान हे त्या कार्यक्षेत्राशी किती होत याचा विचार करून मग तो जोडण्यात यावा.

कोणत्याही शाळेला, कॉलेजला किंवा विद्यापीठाला एखाद्या व्यक्तीच नाव दिल्यानंतर किंवा ते दिल्यामुळे ज्ञानाची गंगा वाहायला लागते असं कोणाला वाटत असेल तर नक्कीच आपण पुन्हा एकदा शिकण्याची गरज आहे असं मला मनापासून वाटते. एखाद्या व्यक्तीचे विचार रुजवण्यासाठी आपण काय केलं हे त्यापेक्षा जास्ती महत्वाचं आहे. ते विचार नुसते न रुजवता त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर केला किंवा कसा केला जाऊ शकतो यावर विचारमंथन होईल तेव्हाच त्या सन्मानीय व्यक्तीच्या विचारांची गंगा पुढे वहायला लागेल. हा विचार करण्याइतपत प्रगल्भता आपल्या समाजात अजून निर्माण झालेली नाही ही  माझ्यामते त्या सर्व सन्मानीय व्यक्तीच्या विचारांची शोकांतिका आहे.

नावाचा घोळ करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष, राजकारणी आणि नेते मंडळी आपापल्या परीने करत आलेली आहेत किंबहुना भविष्यात ही करत राहतील. एखादी वास्तू उभारली नसताना सुद्धा एक दोन नाही तर चार नाव त्याला देण्याची स्पर्धा आपण आत्ता सुद्धा अनुभवत आहोत. कोण चुकीचं आणि कोण बरोबर यापेक्षा अश्या घोळामध्ये आपला समावेश होऊ न देता चालू असलेल्या वैचारिक दिवाळखोरीचा भाग होणं हे आपण नक्कीच टाळू शकतो. नावाच्या घोळात ज्या वेळेस आपण आपले विचार, अस्मिता आणि संस्कृती यांचा संबंध त्यांच्याशी जोडणं थांबवू त्यावेळेस माझ्या मते त्या सन्मानीय व्यक्तीच्या विचारांशी स्वतःला जोडू. जोवर हे घडत नाही तोवर नावाचे घोळ आपल्या देशात असेच सुरु राहणार.

तळटीप :- या पोस्टचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशी, नेत्याशी अथवा त्यांच्या वागणुकीशी जोडू नये. तसेच कोणत्याही राजकीय प्रतिक्रिया देऊ नयेत. पोस्टचा उद्देश नावामुळे होणाऱ्या भावनांच्या खेळाशी निगडित आहे. कृपया कोणीही या पोस्टचा वापर राजकीय चढाओढी अथवा राजकीय दृष्टिकोनातून करू नये ही नम्र विनंती.  
   
जय हिंद!!!

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

No comments:

Post a Comment