Thursday 19 August 2021

चाळीशीतील प्रेम... विनीत वर्तक ©

चाळीशीतील प्रेम... विनीत वर्तक ©

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. पण आयुष्याचे काही टप्पे असे असतात की जिकडे पुन्हा एकदा एक नवीन सुरवात करावी असं मनापासून वाटत असते. शाळा- कॉलेज च्या त्या मयूरपंखी दिवसातच प्रेम या शब्दाशी आपली पहिली ओळख होते. खरतर ओळख झाल्यावर ही ती समजून घ्यायला अनेकदा कित्येक वर्ष सुद्धा जातात. कधी ते कळते, कधी ते उमजते तर अनेकदा उमेजून कोमेजते. कधी ते व्यक्त होते तर कधी अव्यक्त रहाते, कधी आपलसं होते तर अनेकदा आपलसं  होऊन पण अर्ध्यावर सोडून जाते. पण काही असलं तरी ते प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग मात्र असते. 

आयुष्य वळणं घेतं पुढे जात रहाते त्या नदी प्रमाणे जी समोर येईल त्याला ओलांडून अथवा त्याला वळसा घालून पुढे जात रहाते. आयुष्यच जोडीदार आपलं प्रेम बनते किंवा अनेकदा जोडीदाराच्या प्रेमात स्वतःला बांधून घ्यावं लागते. त्या प्रवासात भूमिका बदलत राहतात. प्रेयसी ची बायको आणि प्रियकराचा नवरा होतो. त्यात एक किंवा अनेक पूर्ण मिलनाच्या जीवांची भर पडते. आयुष्य कसं रंगीबेरंगी होऊन जाते. आपण त्या प्रवासात नकळत स्वतःला बंदिस्त करून घेतो. मधल्या काळात अनेक गोष्टी मिळत जातात तर अनेक सुटत जातात. आयुष्याच्या त्या वेगात उसंत मिळत नाही. आधी जोडीदार मग मुलं या सगळ्यात आपण स्वतःकडे बघायला विसरायला लागतो. आयुष्य एकसुरी बनत जाते आणि मग ते अश्या टप्यावर येतं की जिकडे पुन्हा एकदा प्रेमात पडावं असं वाटू लागते. हेच ते चाळीशीच प्रेम. 

आयुष्याच्या या टप्यावर प्रेम या शब्दाचे अर्थ बदललेले असतात. जर आपण गेल्या २०-२५ वर्षात बदललेले असू तर २०-२५ वर्षापूर्वी असलेली ओढ आता सुद्धा सारखी कशी असेल. त्याकाळचं ते मयूरपंखी प्रेम आणि चाळिशीतील परीपक्व प्रेम यात फरक असतोच. त्या काळात वाटणारी ओढ मग ती शारिरीक असेल किंवा मानसिक आयुष्याच्या या टप्यावर ती अनुभवलेली असते. खरे तर आपल्या जोडीदारा सोबत आपण त्याचा अनुभव आजही तितक्याच उत्कठतेने घेत असतो. मग या टप्यावर नक्की काय हवं असते? आयुष्याच्या या टप्यावर आपल्यासोबत अनेक नाती असतात मग ते मित्र- मैत्रीण असतील. तसेच आपल्याला जवळचे मानणारे असतील किंवा आपण ज्यांना जवळचे मानू असे असतील. जोडीदार, मुलं आणि कुटुंब सगळेच तर असते मग नक्की काय कमी असते? खरच कमी असते का? 

चाळिशीतील प्रेम म्हणूनच वेगळं असते. त्याचे संदर्भ वेगळे असतात. आयुष्याच्या या टप्यावर असं कोणीतरी हवं असेल की जे आपल्याशी कुठेच जोडलेलं नसेल. पण त्याचवेळी आपल्याला तितकचं समजून घेईल किंवा आपण त्याच्या / तिच्या समोर जसे आहोत तसं आपल्याला व्यक्त होता येईल. आयुष्याशी जुळवून घेता घेता आपण इतकी आवरणं घालतो की आपलं स्वतःच अस्तित्व विसरून जातो. आपल्या चालण्या, बोलण्यावर इतकच काय हसण्या, रडण्यावर पण बंधन येत जातात. त्यातली काही आपसूक आलेली तर काही ओढवून घेतलेली. त्यामुळेच त्या सगळ्या आवरणाच्या आत आपण घुसमटत असतो. मनासारखं जगता आलं नाही तरी मनासारखं व्यक्त होता यावं हीच अपेक्षा चाळीशीत वाटू लागते. जर असं कोणी आपल्या आयुष्यात आलं जे या आवरणाखाली दबलेल्या आपल्याला बघू शकेल. आपल्याशी आडपडदा न ठेवता व्यक्त होऊ शकेल अथवा आपल्याला त्याच्याकडे आपण जसे आहोत तसे व्यक्त होता येईल. तर तेच चाळिशीतील प्रेम... 

चाळिशीतल्या प्रेमाला भेटीची गरज नसते किंवा कोणत्या आणाभाका घ्यायची ही गरज नसते. कोणीतरी आहे ही एक भावना पुरेशी असते. रोज उठून प्रेमाची परीक्षा किंवा आपल्या असण्याची वर्दी देण्याची पण गरज नसते. गरज असते ती फक्त जाणिवेची आणि ती समजून घेण्याची. ते असेल तर कोणत्याच शब्दांची, भेटीची अथवा मिलनाची गरज भासत नाही. चाळिशीतल्या प्रेमात हक्काची भावना असते ती समजून घेण्यासाठी अनेकदा मन मोकळं करण्यासाठी. शारिरीक जवळीक किंवा मिलन हा भाग तिकडे येतच नाही किंवा निदान तो आणू नयेच. कारण दोन प्रेमांची मिसळ अनेकदा खरे तर सगळ्याच वेळी असं स्वरूप घेते की ज्यात आपल्या सोबत आपलं कुटुंबपण भक्ष्य बनते. एकमेकांसापासून लांब राहून पण जवळ असण्याची भावना म्हणजेच चाळिशीतलं प्रेम.... 

चाळिशीतलं प्रेम जितकं सहज होते तितकं सहज लांब पण जाते. ते टिकवणं, समृद्ध करणं त्यातून आपल्या स्वतःला शोधणं खूप कमी जणांना जमते. कोणतीच बंधन नसलेलं हे निरपेक्ष प्रेम जाताना वेदना ही तितक्याच देऊन जातात. त्यामुळेच ते जितकं चांगलं तितकच वाईट पण होऊ शकते. आपण आणि ज्याच्या सोबत आपण जोडले जातो त्या दोन व्यक्तींच्या अपेक्षा या एक असतील तरच चाळिशीतील प्रेम यशस्वी ठरते. वयाच्या या टप्यावर आपण आपल्याला काय हवं आहे आणि आपल्या समोरच्या कडून काय अपेक्षा हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. जेव्हा हा संवाद त्या दोघांमध्ये होईल तेव्हाच त्या प्रेमाला खरा अर्थ प्राप्त होईल. आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागणुकीतून ते समोरच्या पर्यंत पोहचलं तरच ते चिरकाळ टिकणारं असेल. 

चाळीशीच्या टप्यावर कोणी असं आपल्या आयुष्यात येणं किंवा आपण कोणाच्या आयुष्याचा भाग होणं हे आपल्या स्वतःला पण खूप समृद्ध करते. अनेकदा याच प्रेमातून आपल्या जोडीदाराच्या प्रेमाला ही पुन्हा एकदा नवीन पालवी फुटते. याच प्रेमातून आपण स्वतःला पुन्हा एकदा ओळखायला लागतो. पुन्हा एकदा आत्मविश्वास आपल्याला येतो. पुन्हा एकदा एका नवीन वळणावर सुरवात करतो. लांब असून सुद्धा तितकच जवळ असणाऱ्या चाळिशीतील प्रेमात एकदातरी स्वतःला चिंब भिजवावं. 

फोटो स्रोत :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



2 comments:

  1. अप्रतिम शब्दांकन !
    मनातील भाव जसेच्या तसे शब्दात व्यक्त केले आहेत !
    Hats off to you !

    ReplyDelete
  2. अप्रतिम, जगतोय

    ReplyDelete