Friday 27 August 2021

कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

 कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

काल भारतात तब्बल १ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली. हा आकडा नक्कीच भुवया उंचावणारा आहे. २४ तासात इतक्या प्रचंड प्रमाणात लसी देणं हे सरकारी यंत्रणांचे यश आहे त्याचसोबत लसी बनवणाऱ्या औषधी कंपन्या, लस देणारे वैद्यकीय कर्मचारी, लसींचा पुरवठा सुरळीत करणारी यंत्रणा आणि डॉक्टर सगळ्यांच अभिनंदन. भारतात सध्या कोविशील्ड, कोवॅक्सीन आणि स्पुटनिक फाय अश्या लसी दिल्या जात असून त्यात येत्या काळात ZyCoV-D या झायडस कॅडीला लसीची भर पडेल.  

भारतातील ४८ कोटी लोकांनी कोरोना लसीचा एक डोस तरी घेतलेला आहे तर १३ कोटी पेक्षा जास्त लोकांचे दोन्ही डोस झालेले आहेत. भारतातील जवळपास ३७% लोकांना एक डोस मिळालेला आहे तर १०% लोकांच संपूर्ण लसीकरण झालेलं आहे. टिका करणारे भारताच्या लोकसंख्येच तुलनात्मक वर्गीकरण करतील. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाच संपूर्ण लसीकरण किंवा निदान अर्ध्या लोकसंख्येचं लसीकरण करण्यासाठी वेळ लागणार हे लक्षात घेतलं पाहिजे. १३ कोटी लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले म्हणजे २६ कोटी लस दिल्या गेल्या आहेत. या सर्व लसींच उत्पादन, त्यांचा पुरवठा आणि त्या पलीकडे हे लसीकरण स्वेच्छेने आहे. त्यामुळे लोकांकडून होणारी दिरंगाई, उदासीनता आणि इतर गोष्टी धान्यात घेतल्या तर हा आकडा खूप मोठा आहे. 

घरातल्या ४ लोकांना आवरू न शकणारे आपण भारताच्या टक्केवारीवर टिका करून मोकळं होतो पण प्रत्यक्षात इतक्या प्रभावीपणे लसीकरण भारताचा आवाका लक्षात घेता त्याच्या काना कोपऱ्यात पोहचवणे हे खूप मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. त्यातही हे लसीकरण ऐच्छिक आहे. अतिशहाणे राजकारणी, काही अडाणी लोकं आणि लसींचा खोटा प्रचार करणारे यांनी लोकांच्या मनात लसींविषयी संभ्रम निर्माण केला. पण हळूहळू लोकांच्या मधे लसीविषयी जागृती झाल्यावर आज हा वेग शक्य झाला आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने लोकांचे जीव गेले त्यानंतर लसी किती उपयुक्त आहेत याची जाणीव भारतीयांना झाली. याशिवाय सरकारी पातळीवर काही राज्यांच्या सरकारांनी अवलंबिलेलं अडवणुकीचं धोरण आणि त्यातही स्वतःचा खिसा गरम करण्यासाठी केलेल्या गोंधळांमुळे लसीकरण अभियान यशस्वी होऊ शकलेलं नव्हतं. लसींचा पुरवठा हा पण एक महत्वाचा मुद्दा होता. लसीकरण अभियानाच्या काही सुरवातीच्या महिन्यात गोंधळ सरकारी पातळीवरून झाला हे स्पष्ट आहे. पण नक्कीच त्यावर आता योग्य नियंत्रण मिळवलं गेलं आहे. आज भारताच्या अनेक राज्यामध्ये लसी शिल्लक आहेत. 

भारतातल्या कोटीच्या कोटी उड्डाणाची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज आपण दुसऱ्या देशातून लावू शकतो. आज म्यानमार सारख्या देशात कोवॅक्सीन आणि कोविशील्ड च्या एका लसीची चोर बाजारातील किंमत तब्बल ४०० अमेरीकन डॉलर आहे. (जवळपास २८,००० रुपये). आज इकडे भारतीय लसीसाठी लोकं वणवण फिरत आहेत. ३००-४०० डॉलर मोजून सुद्धा मिळालेली भारतीय लस खरी आहे की नाही याबद्दल काही खात्रीने सांगू शकत नाहीत. चोर बाजारात सुद्धा या लसीसाठी वेटिंग आहे. चीन मधून आयात केलेल्या लसीला म्यानमार मधील लोकांनी केराची टोपली दाखवली आहे. चीन ची लस फुकट सुद्धा ही लोकं टोचून घ्यायला तयार नाहीत. पण भारताच्या लसीसाठी ४०० डॉलर मोजायला तयार आहेत. हे कसं  शक्य आहे तर भारतीय लसींन बद्दल असलेला विश्वास. आज प्रत्येक भारतीयाला सगळ्या लसी या फुकट दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्याची किंमत जाणवत नाही. भारताच्या दोन्ही लसींच्या झालेल्या चाचण्या आणि त्या लसींची परिणामकारकता यावर इथल्या लोकांना विश्वास आहे. चीन च्या एकाही गोष्टीवर या लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे आज आपल्याला भारतीयांनी भारतात बनवलेल्या लसी फुकट मिळत आहे त्याबद्दल आपण नक्कीच याचा अभिमान बाळगला पाहिजे. 

जगात सगळ्यात जास्ती लस चीन नंतर भारताने दिलेल्या आहेत. चीन च्या आकड्यांवर आणि एकूणच तिथल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास कितपत ठेवायचा हे प्रत्येकाने ठरवायचं. नक्कीच आपण संपूर्ण लोकसंख्येच्या बाबतीत १०% लोकांपर्यंत पोहचलो असलो तरी हा आकडा खूप मोठा आहे. ज्या वेगाने आता लसीकरण पुढे जाते आहे त्या वेगाने आपण प्रत्येक महिन्यात २०- २२ कोटी लोकांना लस देऊ शकणार आहोत. नक्कीच तो दिवस दूर नाही जेव्हा आपण १०० कोटी लोकांपर्यंत पुढल्या ६ महिन्यात पोहचू. हा कालावधी लागणार आहेच. संपूर्ण भारतातील लोकांना लसी पोहचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठीच या अभियानाशी संबंधित असलेला प्रत्येकजण अभिनंदनास पात्र आहे. 

सर्व डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, राज्य आणि केंद्र सरकार त्यांचे अधिकारी, कर्मचारी, दळणवळण यंत्रणा, लसी बनवणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांचे पुन्हा एकदा आभार आणि त्यांना कडक सॅल्यूट.  

जय हिंद!!!

तळटीप :- या पोस्टचा वापर राजकीय चिखलफेक किंवा चढाओढीसाठी करू नये. पोस्टचा उद्देश भारताच्या लसीकरण कार्यक्रमाशी संबंधित आहे. 

फोटो स्त्रोत :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: