एका नव्या पर्वाची सुरवात... विनीत वर्तक ©
कालच्या संपूर्ण दिवसात दोन फोटोंनी माझं लक्ष वेधलं. कालच्या एका दिवसात भारताच्या खात्यात दोन पदके जमा झाली. एक रोप्य पदक कुस्ती मधे रवी कुमार दहिया ने भारतासाठी जिंकलं तर पुरुष हॉकी संघाने जर्मनीच्या संघाला हरवत कांस्य पदकाची कमाई केली. या दोन्ही स्पर्धांच्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या दोन फोटोंनी एक वेगळा संदेश दिला आहे तो कसा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तसेच या घटना भारताच्या मानसिकतेला कलाटणी देणाऱ्या ठरतील अश्याच होत्या. त्या का होत्या? हे आपण त्या सोबत समजून घेतलं पाहिजे. त्या आधी थोडं इतिहासात...
काल भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलम्पिक मधे कांस्य पदकाची कमाई केली आणि तब्बल ४१ वर्षांनी भारताच्या हॉकीच्या क्षितिजावर सूर्य पुन्हा उगवला. भारताच्या हॉकी चा सुवर्णकाळ ओसरल्यानंतर म्हणजेच १९८० पासून यशाचा आलेख सतत वर खाली जात राहिला. काही आनंदाचे क्षण आलेही पण तरीही भारतीय हॉकी संघ ऑलम्पिक पदकापासून लांब राहिला. हाच काळ होता जेव्हा क्रिकेट ने भारतीयांच्या मनात घर केलं. १९८३ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर क्रिकेट म्हणजेच सर्वस्व असं एक चित्र तयार झालं. त्याच काळात भारतात सर्वोत्तम क्रिकेटपटूंची एक फळी तयार झाली. यात अनेक नावे येतील त्यामुळेच एकाचवेळेस पैसा आणि खेळाचा दर्जा कमालीचा वाढला. या प्रवासात सगळ्यात जास्ती गळचेपी झाली ती हॉकीची. एकेकाळी मेजर ध्यानचंद यांच्या सारख्या खेळाडूंनी ऑलम्पिक मधे भारत म्हणजे हॉकीतील बादशहा असा दबदबा निर्माण केला होता तो संपूर्णपणे नाहीसा झाला.
हॉकी मधील आटत चाललेला पैसा, फेडरेशन मधील राजकारण आणि भ्रष्टाचार त्यात क्रिकेट सारख्या खेळाने दिलेली मात अश्या अनेक गोष्टी भारतात हॉकीसाठी प्रतिकूल ठरल्या. ऑलम्पिक म्हणजे पिकनिक इतकं समीकरण तयार होईपर्यंत हॉकी हा खेळ भारतीयांच्या मनातून उतरला होता. २०-२० क्रिकेट सुरु झाल्यावर त्याने अनेक भारतीयांना झटकन आनंद दिला पण क्रिकेट या खेळाची मजा आणि समाधान कुठेतरी हिरावून नेलं. एकेकाळी रेडिओवर कॉमेंट्री ऐकणारा भारतीय आज सगळं काही फिक्स असते या मतापर्यंत येऊन पोहचलेला होता. पुन्हा एकदा एक पोकळी खेळाच्या बाबतीत भारतात गेल्या काही वर्षात निर्माण झाली होती. या सगळ्यात हॉकी चे खेळाडू, चाहते आणि एकूणच हॉकी च्या संबंधित सर्व लोक याच प्रतीक्षेत होते की तो दिवस कधी उजाडेल जेव्हा हॉकीचा सुवर्णकाळ पुन्हा सुरु होईल. माझ्या मते तो दिवस होता ५ ऑगस्ट २०२१.
भारत आणि जर्मनी मधे अतिशय चुरशीचा सामना झाला. सामना संपायला अवघ्या काही सेकंदाचा अवधी बाकी होता आणि जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्या वेळेस भारत ५-४ अश्या फरकाने पुढे होता. त्यामुळे जर जर्मनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करते तर सामना बरोबरीत आणि पेनल्टी शूटआऊट मधे गेला असता. अश्या मोकाच्या क्षणी इतिहासात अनेकवेळा भारतीय हॉकी संघाने कच खाल्ली होती. कालही जर कच खाल्ली असती तर भारतीय हॉकी पुन्हा जैसे थे अश्या जागी कदाचित पुन्हा गेलं असतं. त्यामुळे ती काही सेकंद अतिशय महत्वाची होती. भारताचा ३५ वर्षीय गोलकिपर श्रीजेश एखाद्या भिंतीसारखा गोलपोस्ट समोर उभा राहिला. ३.६६ मीटर रुंद आणि २.१४ मीटर उंच अश्या ७.८३ स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ असलेल्या भागाचं संरक्षण त्याला करायचं होतं. कारण एक चूक आणि चेंडू जाळ्यात. पण तो उभा राहिला आणि त्याने गोलपोस्ट मधे जाणाऱ्या चेंडूला अडवलं आणि तिकडेच भारताच्या क्षितिजावर एका नवीन दिवसाचा उदय झाला. तो क्षण किती महत्वाचा होता हे श्रीजेश चांगल ओळखून होता. त्यामुळेच सामना संपल्यावर त्याने त्या गोलपोस्ट ला साष्टांग नमस्कार केला. माझ्या मते हा क्षण भारताच्या हॉकी मधला एक निर्णायक क्षण ठरेल. या विजयाने भारतीय हॉकीला एक नवी संजीवनी दिली आहे. नक्कीच पुन्हा एकदा भारतात हॉकीचा सुवर्णकाळ सुरु झाला याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
५७ किलोग्रॅम फ्री स्टाईल उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या रवी कुमार दहिया चा सामना कझाकिस्तान च्या नूरीस्लाम सनएव्ह बरोबर रंगला होता. रवी कुमार गुणांनुसार मागे पडला होता. सामना जिंकायचा तर एकच मार्ग शिल्लक होता तो म्हणजे आपल्या समोर असलेल्या प्रतिस्पर्ध्याला पिन डाऊन करणं. भारताच्या रवी कुमार ने नेमकं प्रतिस्पर्ध्याला आपल्या डावपेचात अडकवत पिन डाऊन करण्याचा प्रयत्न केला. आपली पकड त्याने इतकी मजबूत आवळली होती की त्यातून सुटणं कझाकिस्तान च्या खेळाडूला कठीण झालं आणि अश्या वेळेस त्याने आपल्या तोंडाने करकचून चावा रवी कुमार ची पकड सुटावी म्हणून त्याच्या दंडाला घेतला. हा चावा इतका करकचून होता की रवी कुमार च्या दंडावर त्याच्या सगळ्या दातांचे वळ उमटले. अतिशय वेदना होत असताना पण रवी कुमार ने आपली पकड ढिली पडून दिली नाही आणि शेवटी त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला पिन डाऊन करत सामना आणि पदक आपल्या नावावर निश्चित केलं. त्याच्या या क्षणाचा फोटो बघताना मला जाणवलं की गेले कित्येक वर्ष भारतीय खेळाडूंन मधे ज्या फायटिंग स्पिरिट चा अभाव असायचा ते स्पिरिट कुठेतरी मला रवी कुमार दहियाच्या त्या लढतीमध्ये जाणवलं. नक्कीच ही फायटिंग स्पिरिट येणाऱ्या एका नवीन भारतीय जिद्द, उत्साह आणि वृत्ती ची नांदी आहे.
या दोन्ही फोटोंनी माझा कालचा दिवस समृद्ध केला यात शंका नाही. भारतीय हॉकीने नक्कीच कात टाकली आहे तर भारताच्या खेळाडूंनी आता हाराकिरी करायची थांबवली आहे असा एक संदेश नक्कीच येणाऱ्या खेळाडूंना मिळाला असेल. आपल्या सचोटीने, प्रयत्नांनी पुन्हा एकदा भारतीय हॉकीला संजीवनी देणाऱ्या भारताच्या पुरुष हॉकी संघ आणि कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांच खूप खूप अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment