Tuesday, 17 August 2021

#चित्रांची_रहस्यं (मोनालिसा) भाग १... विनीत वर्तक ©

 #चित्रांची_रहस्यं (मोनालिसा) भाग १... विनीत वर्तक ©

जगातील सर्वांत सुंदर चित्र कोणतं असा प्रश्न कोणालाही विचारला तरी एका चित्रापाशी उत्तर येऊन थांबते आणि ते म्हणजे “मोनालिसा”. लिओनार्डो डा विन्सीने काढलेलं हे चित्र आजही ५०० वर्षांनंतर जगभरात कुतूहलाचा विषय आहे. साधारण १५०३ ते १५०६ च्या दशकात बनवलं गेलेलं पोर्ट्रेट पद्धतीचं चित्र ७७ X ५३ से.मी. आकाराचं असून ऑइल ऑन वूड पद्धतीने चित्रित करण्यात आलं आहे. ह्या चित्रात जिचं चित्र चित्रित करण्यात आलं आहे त्या स्त्रीचं नाव लीजा घेरादिर्नी असं मानण्यात येतं. लीजा फ्रान्सिस्को डेल जिओकोंडो ह्याची बायको होती. हे चित्र चित्रित करताना मोनालिसा गर्भवती असल्याचं अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. ज्या वर्षी हे चित्र साकारलं गेलं, त्याच वर्षी मोनालिसा ने एका गोंडस अपत्याला जन्म दिला होता. इटलीमध्ये आदरयुक्त भाव स्त्रीला देताना “मोना” असं म्हटलं जातं. ( जसे इंग्रजी मध्ये मॅडम म्हणतात.)

'मोनालिसा' चं चित्र आजही न उलगडलेलं कोडं आहे. हे चित्र काढताना लिओनार्डोने काळाच्या पुढचा विचार केला होता. मोनालिसाच्या मागे जो निसर्ग चित्रित झाला आहे. ते चित्रित करणं काळाच्या पुढचं होतं. विमानाचा शोध तेव्हा लागला नसताना हवेतून डोंगर, नदी किंवा एकूणच निसर्ग कसा दिसत असेल ह्याचा विचार मनात करून ते रंगांनी साकारणं हे अद्भुत होतं. 'मोनालिसा'चा चेहरा आणि मागील निसर्ग ह्याचा विचार तुलनात्मक विचार केला तर तिच्या चेहऱ्यामागे बर्फाने झाकलेले डोंगर दाखवताना त्याखाली एका बाजूला नदीचा प्रवाह आणि एक छोटा पूल मानवी अस्तित्वाचं दर्शन त्या चित्रात अतिशय प्रभावीपणे दाखवून देतो. 'मोनालिसा'चे डोळे आणि क्षितिजाची रेषा एकाच पातळीवर ठेवताना 'मोनालिसा'चा चेहरा पाठीमागच्या निसर्गात मिसळून जाण्याची किमया साधली आहे. 'मोनालिसा'चा डौलदार चेहरा, चेहऱ्यावर असलेले गूढ भाव दाखवताना पण ती तितकीच शांत वाटते हे लिओनार्डोच्या कलाकारीचं यश आहे.

'मोनालिसा'च्या हाताची ठेवणही बघण्यासारखी आहे. उजवा हात डाव्या हातावर ठेवताना बोटांची रचना अतिशय उत्कृष्ट आहे, तसेच हाताच्या रंगाचा साधलेला मेळ तो हात खरा असल्याचं क्षणभर आपल्याला बघताना भासवत रहातो इतका सुंदर चित्रित केला गेला आहे. अंगावर असलेल्या वस्त्रांची रचना ते त्यावर पडलेल्या सुरकुत्या दाखवताना खूप बारकाईने त्याचा अभ्यास केला गेला आहे. केसांच्या बटा दाखवताना मोनालीजा आपल्यासमोर त्याने आपल्या कुंचल्याने उभी केली आहे. पण ह्या चित्राचं वेगळेपण आणि रहस्य ज्यात आहे त्या गोष्टी 'मोनालिसा'ला इतर चित्रांपासून एक वेगळी उंची देतात. 

'मोनालिसा'ला डोळ्यांच्या वर भुवया आणि पापण्यांना केस दाखवलेले नाहीत. काही संशोधकांच्या मते त्या काळी अशी फॅशन असावी की स्त्रियांनी भुवया आणि पापणीचे केस ठेवणं त्यांच्या सौंदर्याला बाधा आणत असावं म्हणून त्या काढल्या जात असाव्यात. २००७ साली फ्रांसच्या पास्कल कोटे नावाच्या एका अभियंत्याने केलेल्या अल्ट्रा हाय रिझोल्यूशन स्कॅनमध्ये 'मोनालिसा'ला आधी भुवया आणि पापण्यांना केस होते असं समोर आलं. काळाच्या ओघात रंग उडून गेल्याने अथवा त्यावर पुन्हा रंग दिल्याने 'मोनालिसा'ला आजचा चेहरा प्राप्त झाला असं संशोधनात समोर आलं आहे. 

मोनालिसा ओळखली जाते ते तिच्या गूढ हास्यासाठी. "मोनालिसा हास्य" म्हणून आजही आपण अनेक ठिकाणी हा शब्द प्रयोग करतो कारण 'मोनालिसा'चं हास्य आजही गूढ आहे. डोळ्यांकडे बघताना ती आनंदात वाटते तर जेव्हा आपलं लक्ष ओठांकडे जातं, तेव्हा ते वेगळं जाणवतं. 'मोनालिसा'ला बघताना अनेकांना तिच्या चेहऱ्याकडे बघून वेगवेगळे भास होतात व हेच 'मोनालिसा'ला अभिजात चित्रकलेचा एक सर्वोत्तम आविष्काराचा दर्जा देतात. 

Dutch researchers from the University of Amsterdam ran the painting's image through "emotion recognition" computer software developed in collaboration with the University of Illinois at Urbana-Champaign. The technology demonstration found the smile to be 83% happy, 9% disgusted, 6% fearful, 2% angry, less than 1% neutral, and 0% surprised.

जिकडे कॉम्प्यूटरही 'मोनालिसा'च्या हास्याचे निश्चित असे ठोकताळे बांधू शकत नाही, ह्यावरून चित्रात असलेली गूढता आपल्याला लक्षात येते. असंही म्हटलं जातं, की लिओनार्डोने आपलंच रूप ह्या चित्रात चित्रित केलं आहे. लिओनार्डो समलैंगिक असावा व त्याने आपलं स्त्री रूप चितारलं असावं. ह्याला दुजोरा देताना असं सांगतात की मोनालिसा आणि लिओनार्डोच्या चेहऱ्यात कमालीचं साम्य आहे. केस आणि दाढी काढल्यावर मोनालिसा आणि लिओनार्डोचा चेहरा एकमेकांशी तंतोतंत जुळतात. ह्या सर्व रहस्यांमुळे 'मोनालिसा'च्या चित्राभोवतीचं गूढ वलय अजूनच गडद झालं आहे.

'मोनालिसा'चं चित्र २१ ऑगस्ट १९११ ला फ्रांसमधल्या लुवरे इथल्या संग्रहालयातून चोरीला गेलं. ही चोरी करण्यामागे तत्कालीन चित्रकार पाब्लो पिकासो असावा असा कयास बांधला गेला. चौकशीसाठीही पाब्लो पिकासोला बोलवण्यात आलं. पण दोन वर्षांनंतर ही चोरी विन्सेन्झो पेरीगिगा ह्याने केली असल्याचं उघड झालं. हा विन्सेन्झो लुवरे इथल्या संग्रहालयात कामाला होता. पैसे मिळवण्यासाठी आपल्या कोटाच्या आत लपवून त्याने हे चित्र आपल्या घरात लपवून ठेवलं. दोन वर्षांनी हे चित्र विकायला काढलं असताना त्याला पकडण्यात आलं. हे चित्र इटलीचं असून इटली मध्ये राहावं ह्यासाठी आपण त्याची चोरी केली असं विन्सेन्झोने सांगितलं. पण ह्या काळात त्याच्या ६ कॉपी अमेरिकेत विकण्यासाठी बनवल्या गेल्या ह्यामागे एडूआर्डो वाल्फिरीनो याने आपल्या सहकाऱ्यामार्फत विन्सेन्झोला चोरी करण्यासाठी प्रवृत्त केलं असं सांगण्यात येतं.

ह्या चोरीपर्यंत 'मोनालिसा' जगभरात इतक प्रसिद्ध नव्हती. पण ह्या चोरीनंतर 'मोनालिसा'ला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. जरी ह्याच्या ६ प्रती अमेरिकेत गेल्या, तरी मूळ चित्र युरोपात राहिलं. ४ जानेवारी १९१४ ला मूळ चित्र पुन्हा लुवरे इथल्या संग्रहालयात विराजमान झालं. पण ह्या चित्राचे जितके चाहते होते तितकेच दुश्मनही होते. १९५६ ला ह्या चित्रावर एका माथेफिरूने एसिड फेकलं. ज्यात ह्या चित्राचं थोडं नुकसान झालं. १९७४ च्या टोकियो प्रदर्शनात हे चित्र लोकांसाठी खुलं असताना एका महिलेने त्यावर लाल रंग उडवला, पण बुलेट प्रुफ काचेत असल्याने चित्राला काही इजा नाही झाली. २००९ साली एका रशियन महिलेने ह्या चित्रावर चहाचा कप फेकला. पण बुलेट प्रुफ काचेमुळे चित्राला कोणतीही इजा नाही झाली.

ह्या सगळ्या घटनांमुळे ह्या चित्राची सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न बनला. 'मोनालिसा' हे चित्र ५०० वर्षांहून अधिक जुनं आहे. ह्याचे रंग खराब होऊ नये म्हणून त्याला अतिशय योग्य तपमानात ठेवण्यात आलेलं आहे. तसेच त्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून बुलेट प्रुफ काचेत ठेवण्यात आलेलं आहे. चित्रावर पडणाऱ्या प्रकाशाने रंग बदलू नयेत म्हणून खास करून २० वॅट क्षमतेचे एल.ई.डी. लाईट बसवण्यात आले असून ह्याचा कलर रेंडरींग इंडेक्स ९८ असून ह्यामुळे इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हॉयलेट रेडियेशनपासून चित्राच्या रंगाचे संरक्षण होते. ह्याच्या पूर्ण संवर्धनाची जबाबदारी जपानच्या निप्पोन टेलिव्हिजनकडे आहे. दरवर्षी सुमारे ९ मिलियन (९० लाख लोक) हे चित्र बघतात. १९६२-६३ ला ह्या चित्राचा १०० मिलियन यु.एस. डॉलरचा विमा काढण्यासाठी मागितले गेले. पण हा विमा घेतला गेला नाही कारण त्यापेक्षा जास्ती खर्च त्याच्या सुरक्षेवर होत होता. आज ह्या चित्राची किंमत करावयाची झाल्यास ती जवळपास ८०० मिलियन यु.एस. डॉलरच्या (८० कोटी अमेरिकन डॉलर) घरात जाते. अर्थात ह्या चित्राची किंमत होऊ शकत नाही हा भाग वेगळा. २०१४ साली फ्रांस २४ ह्या एका वाहिनीने देशाचं कर्ज चुकवण्यासाठी 'मोनालिसा'ला विकण्याची कल्पना मांडली होती. पण फ्रांसच्या कायद्याप्रमाणे एखाद्या संग्रहालयात ठेवलेली गोष्ट ही राष्ट्रातील सर्व लोकांच्या मालकीची असून त्याची विक्री होऊ शकत नाही असं त्यांना सांगण्यात आलं.

'मोनालिसा' त्यावेळी पण अद्भुत  होती आणि मोनालिसा आजही तितकीच अद्भुत आहे. 'मोनालिसा' ५०० वर्षांपूर्वी गूढ आणि रहस्य होती आणि आजही ती तितकीच गूढ आणि रहस्य आहे. 'मोनालिसा' एक चित्र नाही तर एक दंतकथा आहे. रंगांचा आविष्कार इतके वर्षं जगातील करोडो लोकांना आजही विचार करायला लावू शकतो, ह्यातच मोनालिसाचं यश आणि प्रसिद्धी दडलेली आहे. तिच्या मागे असणारा इतिहास आणि तिची झालेली चोरी ह्या चित्राला अजून वलय प्राप्त करून देत आहे. पण तरीही 'मोनालिसा'चं हास्य? ते ती कोण होती? तिच्या नसलेल्या भुवया ह्यावर अजूनही संशोधन सुरू आहे.   

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



No comments:

Post a Comment