एक लक्ष्यभेद... विनीत वर्तक ©
आजपासून ९ वर्षपूर्वी २०१२ साली एक कुटुंब जोधपूर, राजस्थान इकडे आपल्या कारमधून निघालं होतं. त्यात १० वर्षाची एक मुलगी जोधपूर ला आपण जातो आहोत म्हणून अतिशय आनंदात होती. तिच्या शाळेचा नृत्याचा एक कार्यक्रम होता ज्यात तिने भाग घेतला होता. लहानपणापासून संगीताच्या तालावर तिचे पाय थिरकत होते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या कुटुंबा समोर ते थिरकणार म्हणून ती खूप आनंदात होती. गाडीत तिचे आई, बाबा, भाऊ आणि चुलत भावंड ही होती. प्रवासात त्याच नृत्याची स्वप्न बघता बघता तिचा डोळा लागला. अचानक त्या स्वप्नातुन ती काहीतरी आदळण्याने अर्धवट जागी झाली. तिला काही कळेपर्यंत गाडी रस्त्यावरून २-३ वेळा उलटी पलटी होऊन बाजूच्या शेतात घुसली होती. ती भानावर आली तोवर त्या कोवळ्या मुलीला काय घडलं आहे याचा अंदाज येत नव्हता. तिच्या पाठीतून कळा येत होत्या. तिने पाय हलवण्याचा प्रयत्न केला पण ती हलवू शकली नाही. आपले संगीताच्या तालावर थिरकणारे पाय आज तिला सापडत नव्हते. हे एक वाईट स्वप्न आहे असा विचार ती करायला लागली. हॉस्पिटल मधे जाताना कदाचित काही वेळाने आपण स्वतः उठून उभं राहू असंच तिला वाटत होतं.
दिवसांमागुन दिवस गेले, महिने गेले पण तिचे पाय कायमचे हरवले. सहा महिने हॉस्पिटल मधे राहिल्यानंतर तिला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली पण ती आता स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती. एकेकाळी नाचण्याचे स्वप्न बघून जोधपूर ला जाणारी ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती हा धक्का तिच्यासाठी खूप मोठा होता. या घटनेने त्या १० वर्षाच्या चिमुरडीच्या आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं होतं. सगळ्यात रमणारी, हसणारी ती आता सर्वांपासून लांब झाली. गप्प राहयला लागली. तीच संपूर्ण विश्व कुठेतरी उध्वस्थ झालं होतं. तिच्या वडिलांनी तिला मित्र- मैत्रिणी बनवण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा मोकळ्या आकाशाशी नातं जोडायला सांगितलं पण हे सगळं स्विकारणं तिच्यासाठी खूप कठीण गेलं.
२०१५ साली ९ वी च्या सुट्टींमध्ये तिच्या वडिलांनी तीच मन बाहेरच्या जगात गुंतवण्यासाठी धनुर्विद्या या खेळाशी ओळख करून दिली. पण तिला हे शिवधनुष्य पेलणं जमलं नाही. मग त्यांनी तिला शूटिंग रेंज वर नेलं. तिची ओळख बंदुकीशी करून दिली. ती साधारण ५ किलो ची बंदूक उचलून १० मीटर वर निशाणा लावणं तिला जड गेलं पण तिने आयुष्यात पहिल्यांदा फायर केलेले १० च्या १० शॉट समोरच्या काळ्या वर्तुळात लागले होते. तिकडेच त्या मुलीला आपलं लक्ष्य सापडलं होतं. त्या लक्ष्याला तिने आजच्या ३० ऑगस्ट २०२१ या दिवशी वयाच्या फक्त १९ व्या वर्षी पॅराऑलम्पिक स्पर्धेत जागतिक विक्रमाशी बरोबरी करत सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान मिळवताना पूर्ण केलं आहे. ती आहे भारताची पॅरा नेमबाज 'अवनी लेखरा'.
२०१२ साली झालेल्या घटनेने अवनी च संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिची ओळख अश्या एका आयुष्याशी झाली ज्याची कधी तिने कल्पना केली नव्हती. हे नवीन आयुष्य स्वीकारणं तिला खूप कठीण गेलं. अगदी बसण्यापासून ते रोजच्या रोज सगळी कार्य करताना तिला आयुष्याची परीक्षा द्यावी लागत होती. हे सोप्प नव्हतं. तिच्या मते आपण दिव्यांग झालो आहोत हे स्वीकारणं सगळ्यात मोठी गोष्ट होती. आपल्या बाजूचं जे जग बदललेलं आहे ते एकदा का स्वीकारलं की पुढचा प्रवास काय असणार आहे याची कल्पना येऊन त्यावर मार्गक्रमण करणं हा भाग सोपा होता. २०१५ ला शूटिंग रेंज वर नेमबाजी करणं एक टाईमपास म्हणून तिने स्वीकारलं होतं. पण तिचे वडील नेमबाजी या खेळासाठी गंभीर होते. त्यांनी तिला भारताचा ऑलम्पिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा च आत्मवृत्त आणून दिलं. ते वाचल्या नंतर अवनी च्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. ज्या पद्धतीने त्याने भारतासाठी पहिलं ऑलम्पिक मधलं सुवर्ण पदक जिंकलं तसा सन्मान मिळवण्याचं ध्येय तिने निश्चित केलं.
आधी शाळेतून तर नंतर राज्य स्तरीय स्पर्धेतून तिने आपल्या नेमबाजीची झलक दाखवायला सुरवात केली. काही स्पर्धेत धडधाकट असणाऱ्या स्पर्धकांना मागे टाकत अवनी ने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. बंदुकीची नेमबाजी हा खेळ तसा खर्चिक आहे. अवनी आत्तापर्यंत बंदुकी आणि लागणार साहित्य हे दुसऱ्याचं वापरत होती. शालेय किंवा राज्य स्तरीय ज्युनिअर पातळीवर त्याने काम भागत होतं पण ऑलम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च महाग होता. २०२१ साली होणाऱ्या पॅराऑलम्पिक स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी भारत सरकारच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने Target Olympic Podium Scheme (TOPS) ची योजना काही वर्ष आधी आणली होती. अवनी ने भारत सरकारकडे मदत मागितली. त्या नंतर अवनीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं साहित्य या योजनेखाली उपलब्ध करून देण्यात आलं. पण ही सुरवात होती तिला अनेक अडथळ्यांवर मात करायची होती. तिच्या मते,
“I believe it is harder for us because we have to have mental strength. When you are a para-athlete, people start judging you. To live with a disability is a victory in itself.”
दिव्यांग म्हणून समाजाची बघण्याची मानसिकता वेगळी झालेली असते. स्वतःच्या आयुष्याशी झगडणाऱ्या त्या खेळाडूला खेळाशिवाय या अडथळ्यांवर मात करून आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करायचं असते. आज अवनी लेखरा त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत लक्ष्यभेद करताना आपलं नाव खेळाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरताना भारताची महिला ऑलम्पिक सुवर्ण पदक मिळवण्याचा मान पटकावला आहे. तिचा हा प्रवास राखेतून उडी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखा आहे. जो अनेक भारतीय खेळाडूंना तर प्रेरणादायक आहेच पण आयुष्यात छोट्या छोट्या अपयशांनी खचून जाणाऱ्या प्रत्येकाला अपयशावर कश्या रीतीने मात करता येऊ शकते हे दाखवणारा आहे.
अवनी लेखरा च तिच्या उत्तुंग यशासाठी खूप खूप अभिनंदन. आज प्रत्येक भारतीयाला मग तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू दे तुझा अभिमान आहे. तुझ्या पुढील प्रवासासाठी सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
अतिशय प्रेरणादायी प्रवास आणि तितकेच सहजसुंदर लिखाण...
ReplyDelete