Thursday 2 September 2021

'लैंगिक शिक्षण', एक चुकलेलं गणित... विनीत वर्तक ©

 'लैंगिक शिक्षण', एक चुकलेलं गणित... विनीत वर्तक ©


'लैंगिक शिक्षण' हा विषय जितका सोप्पा आहे तितकाच गुंतागुंतीचा आहे. खरं तर अन्न, वस्र, निवारा या नंतर मानवाची चौथी मूलभूत गरज ही लैंगिकतेशी निगडीत असताना या विषयावर काही बोलणं अथवा लिहीणं हे समाजाच्या चौकटीत आजही भुवया उंचावणारं ठरतं. वयाच्या १२-१३ वर्षांपासून अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत सोबत असणाऱ्या या विषयावर आज अनेक प्रकारचं ज्ञान उपलब्ध असलं तरी ते योग्य रीतीनं पोहोचवण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आपण समाज म्हणून आजही खूप अपयशी ठरलेलो आहोत. समाजरचनेच्या अनेक टप्प्यांवर हे ज्ञान खरं तर जवळ असणाऱ्या लोकांकडून दिलं जायला हवं, पण असं होतं का? आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं? पैसे कसे कमवायचे? करिअर कोणतं निवडायचं? अगदी कपडे कोणते आणि कसे घालायचे, ते लग्न कोणाशी आणि कसं करायचं याबद्दल सजग असणारे आपल्या जवळचे लोक 'लैंगिक शिक्षण' या विषयाची माहिती आपल्याला बाहेरून मिळाली असेल, अथवा आपण ती करून घ्यावी, असा समज करून घेतात. 

मुळातच अगदी मासिक पाळीपासून समागमापर्यंत आणि लैंगिक अवयवांच्या ओळखीपासून समलैंगिकतेपर्यंतचे अनेक पदर या एका विषयाखाली येतात. हे सगळे गुंते सोडवण्याचं शिवधनुष्य ज्याचं त्याला पेलावं लागतं. किंवा ते प्रत्येक व्यक्तीनं पेललेलं असेल किंवा पेललं जाईल अशी अपेक्षा समाज आणि आपल्या जवळच्या व्यक्ती करत असतात. अर्थात त्या चुकीच्या नाहीतच. कारण आपली जी समाजव्यवस्था आहे त्यात अश्या गोष्टींचं शिक्षण कश्यापद्धतीनं द्यावं किंवा त्याची खोली काय असावी याबद्दलचे कोणतेच मापदंड अस्तित्वात नाहीत. दोन अपूर्णांक पूर्ण होण्यासाठी मानसिक आणि शारीरिक मिलन या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. शारीरिक मिलन ही नवीन सजीव निर्माण करण्याची प्रक्रिया लग्न नावाचा सोहळा झाल्यानंतर करण्याची अनुमती आपला समाज देतो आणि या सोहळ्याच्या आधी असा अनुभव किंवा नंतर दुसऱ्या व्यक्तीसोबत घेतलेला अनुभव हा समाजात निषिद्ध मानला गेला आहे. हा एकमेव मापदंड समाजाच्या रचनेत अंतर्भूत केला गेला आहे. 

प्रत्येक व्यक्ती हा निसर्गात वेगळा म्हणून जन्माला येतो, हे आपल्याला माहीत आहे. त्याचं दिसणं, स्वभाव, व्यक्तिमत्व आणि मन हे सुद्धा एकमेव असंच असतं. मग त्याच्या शारीरिक गरजा या सगळ्यांच्या एकसारख्या कश्या असतील? त्या गरजांचा अभ्यास कधी केला जातो का? तो अभ्यास करण्याची यंत्रणा एक समाज म्हणून आपण निर्माण केली आहे का? त्या व्यक्तीला मिळालेलं ज्ञान योग्य की अयोग्य ? त्याचे स्त्रोत कोणते? असे प्रश्न आपल्याच लोकांना पडतात का? किती आई वडील अथवा कुटुंबांत आपल्या मुलाला/मुलीला जोडीदाराच्या आणि स्वतःच्या शारीरिक अपेक्षांबद्दल ज्ञान, अनुभव किंवा पद्धती याबद्दल वैचारिक देवाणघेवाण केली जाते. 'लैंगिक शिक्षण' हे मासिक पाळी आणि गुड टच-बॅड टच यापुरतं मर्यादित नाही. किती वडीलधाऱ्या माणसांकडून आपल्या पाल्याच्या सेक्स किंवा एकूणच लैंगिक कल्पनांच्या स्तराचा आढावा घेतला जातो किंवा त्याबद्दलचे अनुभव हे शेअर केले जातात? आपल्या मुलीला अथवा मुलाला मिळालेलं लैंगिक ज्ञान हे योग्यच आहे हे किती पालक ठामपणे सांगू शकतात. 

लैंगिक ज्ञान मिळवण्याचे आजचे स्त्रोत जर बघितले तर ते अनेकदा मित्र-मैत्रीण, इंटरनेट, पॉर्न साईट, ब्लु फिल्म्स, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम किंवा अगदी क्राईम पेट्रोलसारख्या मालिका तसेच काही बाबतीत पुस्तकं अथवा मासिक यांपुरते मर्यादीत आहेत. मग या सगळ्या लैंगिक ज्ञान देणाऱ्या स्त्रोतांवर समाजाचं काय बंधन आहे? अथवा काही मापदंड आहेत का? चार भिंतीतल्या गोष्टी चार भिंतीत ठेवण्याचं ज्ञान आपल्याला दिलं जातं, पण त्या चार भिंतीत काय गोष्टी करायच्या या मात्र आपण बाहेरून कुठून तरी शिकायचं असतं, तसंच त्या कितपत योग्य अथवा अयोग्य याबद्दल कोणालाही विचारण्याची सोय आपण केलेली नसते. मग चुकीचं शिकून त्या चार भिंतीत घडणाऱ्या गोष्टींचे चटके मनाला किंवा शरीराला लागले तर मुकाट्याने सहन करत पुढे नेण्याच्या प्रक्रियेला 'संसार' असं गोंडस नाव देतो. जिकडे पाळणे हलतात पण कड्यावरून कोसळणं काय असतं ते कधी अनुभवलं जात नाही, समजून घेतलं जात नाही.  

आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या लैंगिक अनुभवांतून जातो. तारुण्याच्या सुरूवातीला मासिक पाळी आणि वीर्यस्लखन या बदलांपासून सुरू झालेला प्रवास मेनोपॉझ आणि इरेक्टाइल डिसफंक्शनपर्यंत होतो. प्रत्येकवेळी या टप्प्यांवर होणारे बदल स्वीकारण्यासाठी समाजाने कोणत्या शिक्षणपद्धतीची सोय केली आहे? यांतील प्रत्येक टप्प्यांवर अनेक प्रश्न असतात, पण ते विचारण्याची आणि त्याचं समाधानकारक उत्तर शोधण्याची व्यवस्था आज आपला समाज करू शकलेला नाही. आजही या गोष्टी बोलण्याची अथवा त्यावर चर्चा करण्याची मोकळीक समाज आपल्याला देत नाही. लैंगिक शिक्षणाचे समलैंगिकता, सेफ सेक्स, बर्थ कंट्रोल, sexual abstinence (लैंगिक संयम) हे सगळे पदर तर बाजूलाच राहिले. त्यावर अजून ब्र काढण्याची हिंमत किती जण करतात? खरे तर हे विषय आहेत हे पण आपण अजून उमजून घेतलेले नाही. त्यामुळे एकमेकांच्या आयुष्याच्या त्या चार भिंतीत काय सुरू आहे हे जाणून घेण्याच्या इच्छेने आसुसलेले आपण सर्वच मुळात त्या चार भिंतीत काय करायचं असतं, हे योग्य रीतीने जाणून घेण्यासाठी किती मेहनत घेतो याचा विचार आपण करायला हवा.  

लैंगिकता एक अभ्यास आहे एखाद्या गणितासारखा. गणितात जशी सुरूवात आकड्यांपासून होते. मग त्या आकड्यांशी जवळीक केली की आपण अनेक प्रमेयं सोडवू शकतो, पण जर ती ओळख करून न घेता प्रमेयं सोडवायला सुरूवात केली तर गणितं हमखास चुकणार. तीच अवस्था लैंगिकतेच्या बाबतीत आहे. तो अभ्यास आहे जो आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करावा लागतो. त्यातून आपली कोडी आपण सोडवायची असतात. काही सूत्रं जरी समान असली तरी समोर येणारं प्रत्येक गणित हे ज्याप्रमाणे वेगळं असतं त्याचप्रमाणे लैंगिकतेचे अनुभव, अडचणी, अगदी मिळालेली आणि काढलेली उत्तरंसुद्धा वेगळी असतात. गरज आहे ती हा गुंता सोडवण्याची आणि तो सोडवण्यासाठी लागणारी सशक्त व्यवस्था निर्माण करण्याची. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


1 comment:

  1. अतिशय प्राथमिक विषयावर आपण चर्चा केली आहे. अभिनंदन. हे शिक्षण योग्य प्रकारे दिले जात नाही म्हणून सर्व समाजात अनेक गैरप्रकार होत आहेत. अशी व्यवस्था असावी असे वाटत असेल तर काय सुधारणा करणे आवश्यक आहे, यावरही विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आपण घेऊन काही बदल घडविण्याची इच्छा असल्यास एकत्र काम उभे करण्याची गरज व इच्छा आहे. विचार जुळत असल्यास संपर्क साधावा. देवेंद्र दिनकर गुप्ते. दूरध्वनी क्रमांक ८६५२४०१०००

    ReplyDelete