Sunday 19 September 2021

#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग १)... विनीत वर्तक ©

 #पडद्यामागचे_सूत्रधार (भाग १)... विनीत वर्तक ©

आजकाल एखाद्या छोट्या कामाचं श्रेय घेण्यासाठी गल्लोगल्ली लागणारे फ्लेक्स आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. रस्त्यावर टाकलेल्या डांबरापासून ते कोपऱ्या वरच्या संडासापर्यंत श्रेय घेण्याची चढाओढ आपण अनुभवलेली असतेच. पण आजच्या भारताला सुरक्षित ठेवणारे अनेक चेहरे मात्र प्रसिद्धीपासून खूप लांब तर राहिले पण काळाच्या ओघात त्यांच कार्य इतिहासाच्या पानात लुप्त पण झालं. अश्याच काही चेहऱ्यांचा वेध आणि त्यांच कार्य ह्या सिरीज च्या माध्यमातून घेणार आहे. 

सी.आय.ए. आणि एफ.बी.आय. या अमेरिकेच्या दोन गुप्तचर संस्थांची नाव आपल्या भारतीयांना अतिशय ओळखीची आहेत. पण भारतात ही अश्या दोन गुप्तचर संस्था कार्यरत आहेत ज्या भारताच्या सुरक्षिततेशी संबंधित माहिती गुप्तपणे गोळा करत असतात. भारताच्या शत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवत असतात. त्यातील एक  आहे आय.बी. (IB Intelligence Bureau) ही संस्था भारतातील अंतर्गत घटनांबाबत माहिती गोळा करत असते. तर दुसरी आहे  रॉ (RAW, Research and Analysis Wing of India.) आय.बी. ही भारतातील जुनी गुप्तचर संघटना आहे. १९६२ च्या भारत- चीन युद्धात आणि १९६५ च्या भारत- पाकिस्तान युद्धात काही आघाड्यांवर आलेल्या अपयशानंतर गुप्तचर संघटनेची गरज प्रकर्षाने जाणवली. भारताला युद्धात आलेलं अपयश हे मुख्यतः युद्धातील अनेक गोष्टींचा आधीच अंदाज न आल्यामुळे होतं. १८८७ साली स्थापन झालेल्या आय.बी. ची क्षमता कुठेतरी कमी पडत होती. १९६८ साली भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आय.बी. मधून अमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या आणि भारताच्या बाहेरची माहिती गोळा करणाऱ्या संघटनांना वेगळं स्वरूप दिलं आणि त्यातून जन्माला आली ती म्हणजे रॉ (RAW, Research and Analysis Wing of India.). 

रॉ चा मुख्य उद्देश परदेशातून भारतासाठी महत्वाची माहिती गोळा करणं हा होता. माहिती मग ती शत्रूच्या हालचालींची असो, आतंकवादी कारवायांची असो, राजकीय किंवा परराष्ट्र संबंधांविषयक असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची जिचा प्रभाव भारताशी संबंधित असेल हा ठेवला गेला. या संघटनेची उभारणी करण्याची जबाबदारी अश्या एका व्यक्तींना दिली गेली जे कोणत्याही प्रसिद्धी पासून दूर होते, जे अजातशत्रू होते. त्यांचा लोकसंग्रह इतका प्रचंड होता की नुसत्या एका फोनवर अनेक गोष्टींसाठी चक्र फिरवली जात. अश्या अतिशय गुप्तपणे जगणाऱ्या पण त्याचवेळी अतिशय मुत्सद्दी, हुशार आणि प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीवर पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही जबाबदारी टाकली होती. ती व्यक्ती म्हणजे 'रामेश्वर नाथ काव". 

रामेश्वर नाथ काव हे काश्मिरी पंडित होते. १९१८ साली वाराणसी इकडे त्यांचा जन्म झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून एम.ए. इंग्लिश ची पदवी घेतली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १९४७ साली आय.बी. मधे प्रवेश केला. आय.बी. ही त्याकाळी ब्रिटिश इंटीलिजन्स युनिट एम.आय. ५ च्या धर्तीवर काम करत होती. काव यांचा संबंध त्याकाळी अनेक ब्रिटिश गुप्तचरांशी आणि अधिकाऱ्यांशी आला. त्यामुळेच १९५० साली ब्रिटिश राणीने जेव्हा भारताला भेट दिली तेव्हा तिची सुरक्षा करण्याची जबाबदारी रामेश्वर नाथ काव यांच्यावर होती. १९६२ आणि १९६५ युद्धानंतर भारताला आपल्या आत आणि आपल्या बाहेर चालणाऱ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी वेगळ्या संस्थांची गरज भासली आणि त्यातून रॉ १९६८ मधे जन्माला आली. रामेश्वर नाथ काव त्याचे पहिले अध्यक्ष ठरले. रामेश्वर नाथ काव यांनी जवळपास २५० लोकांची गुप्तहेर आणि रॉ चे एजंट म्हणून निवड स्वतः केली. ही सर्व माणसे वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून निवडली गेली. या लोकांना काव यांनी निवडलं असल्याने त्यांना 'कावबॉईज' असं नाव पडलं. काव यांना या बद्दल कळताच त्यांनी फायबर ची एक प्रतिमा बनवून ती रॉ च्या मुख्यालयात बसवून घेतली.  

रॉ ची भूमिका १९७१ च्या युद्धात स्पष्ट झाली. बांगलादेश ची निर्मिती करण्यात सगळ्यात मोठा हात हा भारताच्या रॉ चा होता अर्थात या सगळ्यामागे होते भारताचे सुपर स्पाय मास्टर रामेश्वर नाथ काव. काव यांच्या निर्देशाप्रमाणे रॉ ने बांगलादेश स्वातंत्र्य संघटना 'मुक्ती बाहिनी' हिला पडद्यामागून बळ दिलं. भारत युद्धात उतरायच्या आधी भारताच्या पुर्वेकडील पाकिस्तान चा असलेला धोका आणि एकाचवेळी पश्चिम आणि पूर्व सिमेवर पाकिस्तानला तोंड देणं कठीण जाणार हे ओळखून रॉ ने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात अप्रत्यक्ष मदत केली. त्याचा परिणाम म्हणजे १९७१ साली भारताने पाकिस्तान ला हरवून बांगलादेश ची निर्मिती जगाच्या नकाशावर केली. बांगलादेश च्या लढ्यात अग्रणी राहिलेल्या अनेक नेत्यांना सुद्धा रॉ आणि रामेश्वर नाथ काव यांची भूमिका माहित होती. पण रामेश्वर नाथ काव यांनी कधीच आपल्या कामाच्या श्रेय कोणत्याही फ्लेक्स किंवा कोणत्याच प्रकारे घेतलं नाही. 

भारताच्या अति पूर्वेकडील भागावर चीन ची नजर होतीच. १९६२ च्या युद्धात भारताच्या चुकलेल्या राजकीय निर्णयांमुळे भारताला खूप मोठा प्रदेश चीन सोबत गमवावा लागला होता. हीच चूक भारत करणार असं चीन ला वाटत होतं. याचा अंदाज रॉ ला आला रामेश्वर नाथ काव यांनी लागलीच या गोष्टीची जाणीव पंतप्रधान इंदीरा गांधींना करून दिली. चीन ने काही कारवाई करायच्या आधी भारताने सिक्कीम सोबत वाटाघाटी करत जवळपास ७००० चौरस किलोमीटर चा भूभाग भारताशी १९७५ साली जोडून टाकला. चीन ला ही गोष्ट कळेपर्यंत खूप उशीर झाला. गुप्तपणे भारताने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. अर्थातच या सगळ्यामागे होती भारताची गुप्तचर संघटना रॉ आणि भारताचे सुपर स्पाय मास्टर रामेश्वर नाथ काव. 

भारताच्या या सुपर स्पाय मास्टर ला फ्रांस च्या गुप्तचर संघटना SDECE (Service For External Documentation And Counter-Intelligence) ने जगातील सर्वोच्च अश्या पहिल्या पाच गुप्तचरांमध्ये रामेश्वर नाथ काव यांचा समावेश केला होता आणि म्हंटल होतं, 

“What a fascinating mix of physical and mental elegance! What accomplishments! What friendships! And, yet so shy of talking about himself, his accomplishments and his friends.” 

भारतातील अतिशय महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करणाऱ्या special protection group (SPG), national security guard (NSG) सारख्या संस्थेच्या उभारणीत रामेश्वर नाथ काव यांचा सिंहाचा वाटा होता. भारताची उभारणी करण्यात किंबहुना भारताच्या जडणघडणीत खूप मोलाचा वाटा असणाऱ्या रामेश्वर नाथ काव यांनी कधीच कोणत्या गोष्टीच श्रेय घेतलं नाही. ते नेहमीच प्रसिद्धी पासून दूर राहिले. त्यामुळे आजही अनेक भारतीयांना रामेश्वर नाथ काव यांच कार्य आणि नाव माहित नाही. २००२ साली रामेश्वर नाथ काव इतिहासाच्या पानात लुप्त झाले. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांनी केलेल्या कामाचा उपापोह अनेक पुस्तकातून आणि येणाऱ्या वेब सिरीज मधून पुढे येतो आहे. आजच्या भारताच्या जडणघडणीत महत्वाचे शिल्पकार राहिलेल्या भारताच्या स्पाय मास्टर रामेश्वर नाथ काव यांना माझा कडक सॅल्यूट. 

क्रमशः 

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment