Monday, 20 September 2021

#पडद्यामागचे_सूत्रधार (भाग २) ब्लॅक टायगर ... विनीत वर्तक ©

 #पडद्यामागचे_सूत्रधार (भाग २) ब्लॅक टायगर ... विनीत वर्तक ©

भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात अनेक लोकांचं रक्त सांडलं आहे. आजही त्यांच्या बलिदानाची दखल घेतली जात नाही. काही मूठभर लोकांच्या बलिदानाचे मात्र सगळीकडेच गोडवे गायले जातात. पडद्यावरचे कलाकार तर सगळ्यांना दिसतात पण त्या पडद्यामागे असलेल्या लोकांचं आयुष्य मात्र नेहमीच अंधारात राहते. हेच खरे सूत्रधार असतात जे पडद्यामागून आपल्या समोर घडणाऱ्या घटनांना मूर्त स्वरूप देत असतात. ते अश्या पद्धतीने काम करतात की त्यांना त्यांच काम एकट्याने पूर्ण करायचं असते. वेळप्रसंगी आपलं कुटुंब, आपली मातृभूमी या सर्वांपासून लांब जाऊन बलिदान द्यावं लागते पण त्या बलिदानाची कदर सुद्धा अनेकदा त्याच्या आपल्या लोकांकडून केली जात नाही. पण तरीही त्यांनी मातृभूमीसाठी दिलेलं बलिदान हे सर्वोच्च असते.   

ह्या देशाच्या सीमांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या आणि शेजारच्या शत्रूच्या प्रत्येक हालचालींची माहिती भारताच्या सैन्य दलाला देणाऱ्या भारताच्या सर्वोत्तम गुप्तहेराला आज आपण सगळेच विसरलो आहोत. आज जर भारताचा सर्वोत्तम गुप्तहेर कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच येते.ते म्हणजे 'ब्लॅक टायगर'.  ब्लॅक टायगर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला भारताच्या ( Indian Research and Analysis Wing) (RAW) रॉ चा गुप्तहेर म्हणजेच 'रविंद्र कौशिक' (नाबी अहमद शकिर पाकिस्तानी नाव ).  

भारताच्या 'ब्लॅक टायगर' म्हणजेच रविंद्र कौशिक चा जन्म ११ एप्रिल १९५२ ला राजस्थान झाला. लहानपणापासून रविंद्रला अभिनयाची प्रचंड आवड होती. त्याच्या ह्याच आवडीमुळे तो रॉ च्या अधिकारांच्या नजरेत आला. रॉ चा एजंट बनल्यावर त्याला अनेक खडतर प्रशिक्षणातून जावं लागलं. रॉ ने त्याला पाकिस्तानात जाऊन तिथली माहिती भारताला पुरवण्याची जबाबदारी दिली. ह्यासाठी रविंद्र ला उर्दू शिकावी लागली. पाकिस्तानातील अनेक भागांचा अभ्यास करावा लागला. ह्याशिवाय कुराण आणि धार्मिक गोष्टी ही शिकाव्या लागल्या. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रॉ चा एजंट बनुन रविंद्र कौशिक आता नाबी अहमद शकीर बनला. भारतात त्याच्या नावाचे सर्व रेकॉर्ड रॉ ने पुसून टाकले. आता नाबी अहमद शकीर ने पाकिस्तान च्या कराची विद्यापीठात प्रवेश घेऊन वकीलाची पदवी मिळवली. 

ह्यानंतर नाबी अहमद शकीर पाकिस्तान सैन्यात भरती झाला. पाकिस्तान सैन्यात यशस्वीपणे मिसळून जाताना नाबी अहमद शकीर ने पाकिस्तान सैन्यात मेजर बनण्या पर्यंत मजल मारली. पाकिस्तानात असताना त्याने अमानत नावाच्या मुलीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी पण झाली. १९७९ ते १९८३ पर्यंत पाकिस्तानी सैन्याच्या सगळ्या हालचालींची माहिती रविंद्र कौशिक उर्फ नाबी अहमद शकीर भारताच्या रॉ ला पुरवत राहिला. त्याच्या अमुल्य माहितीमुळे भारताने पाकिस्तानचे अनेक मनसुबे मोडीत काढले. त्याच्या ह्या पराक्रमासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण ह्यांनी त्याला 'ब्लॅक टायगर' ही उपाधी दिली. 

१९८३ साली 'इनायत मसीहा' नावाचा अजून एक रॉ एजंट पाकिस्तानात गेला असताना पाकिस्तानी सैनिकांनी त्याला पकडलं व चौकशी च्या वेळी त्याने रविंद्र कौशिकचं नाव उघड केलं. पाकिस्तानी सैनिकांनी नाबी अहमद शकीर म्हणजेच रविंद्र कौशिक ला ताब्यात घेऊन त्याचा अतोनात छळ केला. १९८५ साली त्याला फाशीची शिक्षा झाली पण नंतर त्याला आजन्म कारावासात टाकण्यात आलं. जेलमधून रविंद्र कौशिक ह्याने आपल्या पत्नीला पत्रे पाठवली होती. एका पत्रात त्याने हताश होऊन लिहिलं होतं, 

"क्या भारत जैसे बडे देश मैं कुर्बानी देने वालो को यही मिलता हैं?".......  

भारताचा ब्लॅक टायगर २००१ साली क्षय रोग आणि हृदयाच्या रोगाने पाकिस्तान मधल्या मुलतान जेलमध्ये हुतात्मा झाला. आजपर्यंत रविंद्र कौशिक ह्यांच कुटुंब भारत सरकारकडे त्यांच्या ह्या कामगिरीची पोचपावती मागत आहे. पण आजही पडद्या मागचा हा 'ब्लॅक टायगर' उपेक्षित आहे. आपण विचार करू शकतो का? वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आपलं संपूर्ण अस्तित्व देशाच्या पटलावर पुसून टाकत भारताचा हा ब्लॅक टायगर एकटाच पाकिस्तान च्या अंधारात भारतासाठी लढला. पण आपण आज त्याची साधी दखल घेऊ शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे.

आम्ही फक्त पुतळे उभारतो आणि फोटोंना फुले वाहतो. आमच्यासाठी संघर्ष फक्त आणि फक्त दिसणारे लोकं करतात. अर्थात ते ही आमचे हिरो नसतात. चित्रपटात शर्ट काढून नाचणारे आमचे आदर्श तर कोट्यावधी रुपयांचे घोटाळे करून पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या लोकांच्या आम्ही पाया पडतो. 

चित्रपटगृहात चित्रपटाच्या आधी सुरु होणाऱ्या राष्ट्रगानाला उभे राहायला आमचे पाय लटपटतात आणि साध्या सैनिकाला आम्ही सलाम करत नाही तर पडद्यामागच्या ब्लॅक टायगरचं कोणाला काय पडलं आहे!........  

आम्ही कुठे रविंद्र कौशिकच्या पराक्रमाची नोंद ठेवणार....... 

कोणाला काही वाटत असलं तरी भारताच्या सर्वोत्तम गुप्तहेराचं पडद्यामागचे बलिदान हे भारताच्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिका आणि प्रत्येक सैनिकाइतकंच महत्वाचं आहे. पडद्यामागच्या या भारताच्या ब्लॅक टायगर सूत्रधाराला माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार!

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment